लायब्ररी
त्या वास्तूला विशेष असं काहीच नाव नव्हतं. माझ्या लहानपणी गावांमध्ये एक बरं असायचं, चौकाला चौकच म्हणायचे, बस स्टॅण्डला बस स्टॅण्डच म्हणायचे. उगाच ‘अमक्याच्या स्मरणार्थ, तमक्याच्या निधीतून’ वगैरे बेगडी पाट्या लावून गाव बटबटीत करायचे नाहीत. ही वास्तूही तशीच निर्मळ होती. माझ्या आजोळचं वाचनालय. तिला सारेजण लायब्ररीच म्हणायचे. इतकी सुंदर प्रेमळ इमारत मी आजतागायत कुठे पाहिली नाही आणि तिच्याइतका पुन्हा कुठेच रमलोही नाही. जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावरचं खालापूर हे माझं आजोळ. तालुक्याचं गाव. तरी पण आकारानं अगदी तळहाताएवढं. पोलीस चौकी, दवाखाना, कोर्टाची इमारत, ग्रामपंचायत, पाण्याची टाकी सगळं कसं टुमदार आणि अगदी दिवाळीतल्या किल्यावर ठेवावं तसं आटोपशीर. मे महिन्याच्या, दिवाळीच्या सुट्टीत किंवा कोणाच्या लग्नकार्याला जाणं व्हायचंच. लाल एसटी हायवे सोडून धूळ उडवत फाट्यावरून गावात शिरायची आणि थोड्याच अंतरावर डाव्या हाताला ही लायब्ररी दिसायची. आजुबाजूला मोकळं माळरान, एखाद्या शेताचा तुकडा, पलीकडे थोड्या अंतरावर पशू दवाखाना. आणि रस्त्यावरून अगदी पंधरावीस पावलांवर लायब्ररी. मातीच्या बांधकामाची बैठी कौलारू इमा...