सुनीता विल्यम्सच्या निमित्ताने... मराठी शिणुमा
पृथ्वी... ओढ एका घराची !
(सुनीता विल्यमच्या यशस्वी आगमनावर आधारित, ज्ञान आणि श्रद्धा यांचा संगम दाखवणारा आगामी मराठी
चित्रपट...)
कथासूत्र -
कथानायक अंतराळवीर आहे. (आपण त्याचं नाव सुबोध
ठेऊया!) तो ‘खगोलनायक महायोगी ग्रहगोलाधिपती वाकडे बाबा’
यांचा परमभक्त आहे. त्यामुळे त्याच्या अंगी
दिव्य शक्ती आहेत. बाबांचाच अंगारा लावल्यामुळे नासामध्ये भरती झाला आहे. अर्थात हे सुरवातीला नासाला माहितच नसते. पण
एकदा शनीच्या कड्यांमधून येणारे किरण सुबोध केवळ साध्या डोळ्यांनी बघून ओळखतो
तेव्हा नासाला याची प्रचिती येते.
इथे शिणुमाची टायटल्स येतात आणि मग कथा
फ्लॅशबॅकमध्ये शिरते.
सुबोधच्या आईला (तिचं नाव निवेदिता असावं) तिच्या नवऱ्याने (सयाजी?) फसवले आहे. सयाजी पक्का
नास्तिक आणि दारूडा आहे. तेव्हा पासून आई पोलीस असलेल्या अशोकमामांच्या सहाय्याने
राहते आहे. ते दोघंही वाकडे बाबांचे भक्त आहेत.
इथे बाबांचे भक्तीपर गाणे -
वाकडे वाकडे,
बाबा वाकडे,
ग्रहमान झाले फाकडे फाकडे....
सुबोधचे सोसायटीतल्या अमृताशी लग्न ठरले आहे. परंतू शनी आणि
गुरूच्या पंचमस्थानात मंगळ येत असल्याने ते अडले आहे. हे स्थान हलवण्यासाठी म्हणून
सुबोध लहानपणापासून प्रयत्न करतो आहे. (मराठीत प्रथमच - बचपनका प्यार!)
इथे त्यांच्या खगोलसंघर्षाचे गाणे -
शनी कसा हलला. गुरू कसा कलला.
पंचम माझा,
पंचम माझा बघ कसा भुलला.
मग यथावकाश सुबोध दहावीत त्रेसष्ट टक्के मिळवतो
आणि खास आरक्षण योजनेतून थेट नासात भरती होतो. तिथे बालशास्त्रज्ञ म्हणून त्याचा
गौरव होतो तेव्हा त्याच्या वडिलांचे (सयाजी) डोळे उघडतात. अशोकमामांचे डोळे भरून
येतात. निवेदिताचे डोळे नुसतेच येतात. पण सुबोध आपल्या शक्तीने ते सारे बरे करतो.
आता नासा परग्रहावरती माणसे पाठवण्याच्या तयारीला लागते. पण
मालेगावची एक दहशतवादी संघटना नासाला दम देत असते. (हे उपकथानक
आहे) पण इन्स्पेक्टर असलेल्या अशोकमामांच्या मध्यस्थीने ती
शमते. मग सुबोध अशोकमामांना आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करण्याची शपथ देतो. (यासाठी
मराठीत पहिल्यांदाच करंगळी कापण्याचा स्पेशल इफेक्ट)
आता काही काळ जातो. मामा थकले आहेत. (कसे ते विचारू नका,
वाकडे बाबा रागावतील) पण निवेदिता टुणटुणीत आहे. (क. ते. वि. न., वा. बा. रा.) सुबोध नासाकडून
अंतराळप्रवासासाठी निवडला जातो. नासामध्ये प्रयाणाची तारीख ठरवण्यासाठी मिटींग
भरते. खूप काथ्याकूट होतो. सुबोध भिंतीवर टांगलेलं कालनिर्णय आणि दाते पंचांग
बघतो. भारतातून वाकडे बाबाही आपल्या समोर रुद्राक्षरुपी ग्रहगोलांची गणिते मांडून
बसले आहेत. तिघांचंही उत्तर एकच येतं.
नेमकी तारीख आणि वेळ ठरते. तयारी सुरू होते. तो दिवस
उजाडतो. सुबोधचा प्रयोगशाळेतून अंतराळयानाकडे गाडीतून प्रवास चालू असताना त्याच
क्षणी भारतात निवेदिता एस्टी महामंडळाच्या लाल गाडीने बाबांच्या दर्शनाला निघाली
आहे. (ज्ञान आणि विज्ञानाचा समांतर प्रवास) आणि त्याच वेळी अमृता
आपल्या डान्स कॉम्पिटिशनमध्ये पहिली आली आहे. (भावनिक धागा)
गाणे (विरहाची
लावणी) -
आकाशी गेला साजण माझा,
उडला माझ्यावरी.
रंग पिरतीचा खुळा ग बाई
चढला माझ्यावरी.
बाबांचे गाणे,
अमृताचे गाणे आणि नासाचे काऊंटडाऊन असे एकत्र ऐकू येतात. सुबोध यानात हेल्मेट
घालून हातात अवकाशयानाचे स्टिअरींग धरून बसला आहे. समोरच्या डॅशबोर्डवर बाबांचा
फोटो आणि माळ आहे. यान उडते. भोवतालचे टाळ्या वाजवतात.
(अंतराळातील तरंगणे कसे दाखवायचे हा एक पेच आहे. काहीजण
म्हणाले की तीनचार पेग पुरेसे होतील... असो. मराठी चित्रपट अशा फालतू समस्यांवर
विचार करत नाही. प्रत्यक्ष तुकारामबोवांना न्यायला आलेले पुष्पक यान दाखवलेली
माणसं आम्ही... अशा प्रॉब्लेमला घाबरतोय होय?
हा शिणुमा व्हावा ही तो वाकडेबाबांची इच्छा.)
असो. तर सुबोध वरून खाली बघतो त्याला भारताचा नकाशा दिसतो. त्याच्या
अंतराळयानाच्या सिडी प्लेअरवर गाणं लागतं... सुबोध अंतराळयानात उभा राहून खाडकन सॅल्यूट
करतो.
राष्ट्रभक्तीचे गाणे -
देश माझा,
देश माझा...
कित्ती कित्ती छान.
त्याच्यावरून उडत जाते
माझे अंतराळयान
या गाण्यावर मोंटाज - त्याचे यान उड्डाण घेत असतानाच आईची
गाडी घाटात पंक्चर होते. तिला वाकडे बाबांकडे पोचावण्यासाठी एक खेडवळ म्हातारा
तयार होतो. बैलगाडीच्या प्रवासात तो तिला उपदेश करतो. हे बाबांचेच एक रूप
आहे. यान हवेत झेपावल्याक्षणीच मठामध्ये समाधीत बसलेल्या बाबांचे
डोळे उघडतात, त्यांना
भविष्यातील भयंकर धोक्याची जाणीव झाली आहे.
गाणं संपताना निवेदिता दार उघडून बाबांच्या पायावर झेपावते.
बाबांच्या
आशीर्वादाच्या पोजमधल्या हातावर क्लोज.
....मध्यांतर....
मध्यांतरानंतर पहिला सीन - मालेगावातली चालू
काळातली समाजकंटकांची दंगल. त्यातच सुबोधच्या वडिलांचा फ्लॅशबॅक. (यातून काहीही
साध्य झाले नाही तरी चालेल.)
निवेदिता बाबांसमोर हताश बसलेली. तिच्या डोळ्यात पाणी.
बाबांच्या डोळ्यात करुणा. आता बाबा तिला त्यांच्या सांकेतिक भाषेत धोका
सांगतात.... बम बम नवग्रहं चिक्केसर्वः ई
इज इक्वल टू एमसी खर्वः
निवेदिताला काही कळत नाही. ती भावविभोर होते. पण
भक्तगणांच्या गर्दित बसलेल्या एका अमेरिकन भक्ताला त्याचा अर्थ समजतो. तो तात्काळ
नासाला फोन लावतो. नासामध्ये सदाशिव माधव कुलकर्णी नावाचा भारतीय वंशाचा
शास्त्रज्ञ फार मोठ्या पदावर आहे. त्याला तिथे अप्पा असं म्हणतात. (आजोळचं आडनाव प्रभावळकर असावे) तर अप्पा ही समस्या समजावून घेतात.
आणि गंभीर आवाजात विचारतात,
‘इज बाबा देअर?’ अमेरिकन
माणूस ‘यस्स’ म्हणतो. अप्पा सुटकेचा निश्वास सोडतात.
आता आपल्याला कळतं की काही तांत्रिक कारणाने सुबोध परत येऊ
शकणार नाही. मालेगावमध्ये फटाके वाजतात. मुंबईमध्येही काही कलाकार आनंद साजरा
करतात. पण त्याचवेळी टिव्हीवर आपले लाडके मंत्री भाषण करतात. आणि सारं काही शमतं.
आता इथून पुढे सुबोधची परतीची वारी हाच एक विषय राहतो. सुबोध
अंतराळात अडकला आहे म्हणून आईने उपास धरला आहे. अमृताने डान्स सोडला आहे. वडिलांनी
दारू सोडली आहे. मालेगावने दंगल सोडली आहे. आता वाकडे बाबा आपल्या अंगरख्याची बाही
सावरतात. त्या अमेरिकन शिष्याशी इंग्रजीत बोलत एक रुद्राक्ष आकाशात भिरकावतात.
भक्तगण त्यांच्या नावाचा जयजयकार करतात. आणि तिकडे बंद पडलेल्या यानाचं इंजिन
घँऽऽग आवाजात सुरू होतं. सुबोध शूर वीर आहे. पण त्याचबरोबर श्रद्धाळूही आहे. तो
हातातल्या अंगठीकडे पाहतो. (कट टू) वाकडे बाबा पृथ्वीवरून त्याला आशीर्वाद देतात.
आता ग्रहगोलांची दिशा बदलते. (हे शुटींग नेहरू तारांगणात
घ्यावे का याबद्दल सरकारशी चर्चा चालू आहे. परवानगी नाही मिळाली
तर भावना दुखावल्या गेल्या म्हणून पायी मोर्चा काढायला माणसं गाड्या भरून तयार
आहेतच) कॅमेरा सुबोधवरून तीनशेसाठ कोनातून फिरतो. या चक्राकार गतीत त्याला स्वतःचं
आयुष्य बालपणापासून आठवतं. प्रत्येक ग्रह म्हणजे त्याच्या यशाचा टप्पा असं
दाखवण्यासाठी इथे नऊ कडव्यांचं गाणं.
तर आता यान पुन्हा पृथ्वीच्या कक्षेत आलं आहे. पृथ्वीवर
जल्लोश. खास करून वाकडे बाबांच्या गावी. यान कुठे उतरवायचं यावरून राजकारण सुरू
होतं. मघाचचे मंत्री नासाशी चर्चा करतात. पण नासा
ऐकत नाही. टिव्हीवर परिसंवाद होतो. सुबोध तर हट्ट
धरतो की बाबांच्याच गावी
बाबांच्या मठासमोरच उतरवायचं. आता या गोष्टीला मालेगावचाही पाठिंबा असतो.
(विज्ञानाचा दृष्टीकोन समाजात एकी घडवतो याचं हे दर्शन) सुबोध
कोणाचंही न ऐकता स्टिअरींग फिरवतो. अप्पा ‘हट्टी मुलगा... ’ असं कौतुकाने म्हणत गालातल्या गालात हसतात. यावरून इतर नासावासी काय तो बोध घेतात. गप्प
बसतात.
मग यानाचा वेगाने पृथ्वीच्या दिशेने प्रवास चालू होतो.
सुबोधला वरून भारत दिसू लागतो. (पुन्हा एकदा गाणे - देश माझा देश माझा...) आईला
यान दिसू लागते. पण याच वेळी वाकडे बाबा एका पायावर उठून उभे राहतात आणि म्हणतात; ‘भक्तगणहो... चला... आता माझ्या निर्वाणाची वेळ झाली.’ साऱ्या मठावर
शोककळा पसरते. पण बाबा निग्रही असतात. ठरवलं म्हणजे ठरवलं. ते मठासमोरच्या एका उंच झाडाच्या शेंड्यावर
चढून जाऊन तिथे पद्मासनात बसतात. इथूनच त्यांच्या गुरूंनीही
स्वर्गात प्रयाण केलेलं असतं. या झाडाभोवती नवग्रहांचं रिंगण आहे. म्हणूनच झाडावरून त्यांना यान अजूनच जवळ दिसत
असतं. त्यांच्यादेखत सुबोधचं यान सुखरूप उतरतं. सुबोध बाहेर येतो. श्रद्धेनं झाडाकडे बघतो. पण
त्याच क्षणी तो सत्पुरूष वाकडे बाबा अंतराळात विलीन झाला आहे.
सुबोध भरल्या डोळ्यांनी ‘बाबा बाबा’ म्हणत अमृताकडे
धावतो. अमृता ‘सुबोध सुबोध’ म्हणत आईकडे धावते. आई ‘मामा मामा’ म्हणत वडिलांकडे
धावते. वडिल ‘निवेदिता निवेदिता’ म्हणत मामांकडे धावतात. असा हा नर्मविनोदी घरगुती
सुखाचा प्रसंग नासाचे अधिकारी त्यांच्या प्रयोगशाळेत टिव्हीवर बघत असतात. तेही
जल्लोश करतात.
मग एकदाचे सारेजण एकाच फ्रेममध्ये येतात. सुबोध राष्ट्राला
उद्देशून भाषण करतो. आणि अखेरच्या गाण्यासह शिणुमा संपतो.
गाणे -
ही वसुंधरा माझी,
ही परंपरा माझी,
हे विशाल सह्यकडे...
ज्ञान अन् विज्ञान जाणती
आमचे बाबा वाकडे...
...समाप्त...
प्रवीण
जोशी
9850524221
pravin@pravinjoshi.com
😂😂😂😂😂👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
ReplyDeleteहा हा....
ReplyDeleteछानच प्रवीण राव 👌👌😃😃
ReplyDeleteफारच उत्तम ,,,,, रोंघे
ReplyDeleteBhari.Best zala ahe Shinuma
ReplyDeleteबॅाक्स ॲाफिसवर हिट होणार … कोटींचा धंदा वगैरे छोटे आकडे आहेत … बाबा वाकडे वरून आदेश देतील नवीन क्लब निर्माण करण्याचा 😀
ReplyDeleteEk number... beyond OSCARS
ReplyDelete