लायब्ररी

त्या वास्तूला विशेष असं काहीच नाव नव्हतं. माझ्या लहानपणी गावांमध्ये एक बरं असायचं, चौकाला चौकच म्हणायचे, बस स्टॅण्डला बस स्टॅण्डच म्हणायचे. उगाच ‘अमक्याच्या स्मरणार्थ, तमक्याच्या निधीतून’ वगैरे बेगडी पाट्या लावून गाव बटबटीत करायचे नाहीत. ही वास्तूही तशीच निर्मळ होती. माझ्या आजोळचं वाचनालय. तिला सारेजण लायब्ररीच म्हणायचे. इतकी सुंदर प्रेमळ इमारत मी आजतागायत कुठे पाहिली नाही आणि तिच्याइतका पुन्हा कुठेच रमलोही नाही.

जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावरचं खालापूर हे माझं आजोळ. तालुक्याचं गाव. तरी पण आकारानं अगदी तळहाताएवढं. पोलीस चौकी, दवाखाना, कोर्टाची इमारत, ग्रामपंचायत, पाण्याची टाकी सगळं कसं टुमदार आणि अगदी दिवाळीतल्या किल्यावर ठेवावं तसं आटोपशीर. मे महिन्याच्या, दिवाळीच्या सुट्टीत किंवा कोणाच्या लग्नकार्याला जाणं व्हायचंच. लाल एसटी हायवे सोडून धूळ उडवत फाट्यावरून गावात शिरायची आणि थोड्याच अंतरावर डाव्या हाताला ही लायब्ररी दिसायची. आजुबाजूला मोकळं माळरान, एखाद्या शेताचा तुकडा, पलीकडे थोड्या अंतरावर पशू दवाखाना. आणि रस्त्यावरून अगदी पंधरावीस पावलांवर लायब्ररी. मातीच्या बांधकामाची बैठी कौलारू इमारत. भोवती फड्या निवडुंगाचं कुंपण. भिंतींवर कधीकाळी दिलेला पिवळटसर रंग. मोठाल्या चौकोनी खिडक्या. त्यांना उभे लोखंडी गज. जुन्या वाड्यांना दर्शनी असायची तशी त्रिकोणी कमानीची ओसरी. त्यातून दिसणारं तपकिरी रंगाचं लाकडी दार. अंगणातल्या हिरव्यापिवळ्या गवतातून तिथपर्यंत जाणारी फरशीची वाट.

माझ्या मावशीसारखीच शांत, समाधानी अशी ती इमारत माझ्याकडे पाहून मंद हसत असायची. माझी वाट बघत असायची.

लहानपणाची एक गंमत असते. तेव्हा कदाचित आपलाच आकार लहान असतो म्हणून, डोळे छोटे असतात म्हणून, किंवा आपण एका वेगळ्याच स्वप्नांच्या दुनियेत रमलेलो असतो म्हणून म्हणा, भवतालच्या सगळ्या गोष्टी मोठ्या दिसतात. आपलं घर, शाळा, अंगण लहानपणी कधीच छोटं वाटत नाही. पुढे खूप वर्षांनी आपण स्वतः मोठे झाल्यावर ते जग लहान लहान होत कुठेतरी हरवून जातं. पण एक नक्की की लहानपणीच्या छोट्याशा पावलांनी मोजलेलं अंतर आताच्या स्क्वेअर फुटांपेक्षा खूऽऽप मोठं असतं. तशीच ही लायब्ररी तेव्हा मला खूप खूप मोठ्ठी वाटायची.

एसटीतून उतरून आजीकडे पोचल्यावर कधी एकदा हातपाय धुवून लायब्ररीत जातो असं व्हायचं. ‘अरे आत्ताच आलायस ना प्रवासातून? काय गाठोडं ठेवलंय त्या लायब्ररीत?’ अशी आजीची बोलणी खाऊन झाली की पळ काढायचो. पण जाताना मावशी मात्र हळूच सांगायची, ‘पौन्या, कालच तुझ्या पुस्तकांचा गठ्ठा काढून ठेवायला सांगितलाय रे’.

त्या लायब्ररीत विशेष काहीतरी ओढ लावणारं होतं. आत शिरतानाच पुस्तकांचा छान वास यायचा. थोडासा कोंदट, थोडासा धुळीचाही पण शेवटी तो पुस्तकांचाच वास. मधोमध एक जाड लाकडी फळ्यांचं मोठ्ठं टेबल. त्यावर सभासदांनी बदलायला आणलेल्या पुस्तकांचा ढिग. त्या एवढ्याशा गावातली सगळीच माणसं पुस्तकं वाचत असतील असं वाटायचं. पुस्तकांसाठी भिंतीला लागून लाकडी कपाटं उभी केली होती. एकदोन काचेच्या बंद दारांची, पत्र्याचीही होती. त्या कपाटातली पुस्तकं जास्त टेचात असल्यासारखी वाटायची. लायब्ररीत फारशी गर्दी नसायची पण लाकडी बाकांवर एखाददोन माणसे सतत बसलेली असत. कोकणी माणूस जात्याच बडबडा, गप्पांमध्ये रमणारा. पण या साध्यासुध्या इमारतीचा साऱ्यांवर छान प्रेमळ धाक होता. कोणीच मोठ्या आवाजात बोलत नसे.

माझी जागाही ठरलेली होती. मागच्या बाजूच्या जाड भिंतीत खिडकीसमोर आलेला कट्टा होता. तिथे सहसा कोणी  बसायचं नाही. सगळी मोठी माणसं शहाण्यासारखी टेबलासमोर खुर्च्या ओढून बसायची. पण वाचन कसं पाय पसरून छान ऐसपैस झालं पाहिजे. मी त्या खिडकीतल्या शहाबादी फरशीच्या कट्ट्यावर मस्त मावायचो. जणू माझ्यासाठीच बांधला होता तो.

मला वाचनाचं वेड आईकडून जन्मजात लाभलंय. पण वाचनाचा अर्थ मला त्या खिडकीत समजला. वाचन म्हणजे थांबलेली वेळ, निर्भय आश्वस्त वातावरण, एखाद्या शब्दापाशी थबकणं, मध्येच डोळे मिटून बसणं, पुस्तकाचा वास घेणं, त्यातलं सारं अनुभवणं... वाचन म्हणजे अक्षरांची नाही तर स्वतःची ओळख करून घेणं.

अर्थात तेव्हा याची काही जाणीव नव्हती. लहान मुलांनी वाचावं असं त्याकाळी बरंच काही होतं. पाचवी ते सातवीपर्यंत आनंद, चांदोबा, चंपक आणि नंतर दहावीपर्यंत किशोर, छावा, रिडर्स डायजेस्ट वगैरे मासिकं कमालीची सुंदर असायची. मी ती आजही तितक्याच आवडीने वाचू शकतो. पण हे सगळं मला पुण्यातही मिळायचंच की. इथे या लायब्ररीत पुस्तकांचा खजिना होता. कपाटातून हवं ते पुस्तक काढून माझ्या ‘मी टाईम’मध्ये वाचायची मुभा होती. कोणी अडवायचं नाही. ‘हे वाच ते वाचू नकोस’ असंही म्हणायचं नाही.

गुरूनाथ नाईक, बाबा अर्नाळकर, बाबा कदम, सुहास शिरवळकर, नारायण धारप यांच्या रहस्यकथा, गुप्तहेरकथा आणि दक्षताचे अंक हे तर जेवणच असायचं. सोबतीला भा. रा. भागवतांचा फास्टर फेणे, टारझन, ताम्हनकरांचा गोट्या आणि त्यासोबत मोठ्यांची अगदी चंद्रकांत काकोडकरांच्या रोमँटिक कादंबऱ्याही होत्या. हे सारे लोकप्रिय लेखक टेबलावर मौजूद असायचे. एवढ्याशा गावातली ती लायब्ररी फार समृद्ध नव्हती पण तालुक्याचा आब राखून होती.

मला वाचायला काहीही चालायचं. बरचसं डोक्यावरूनच जायचं. पण उत्साह मात्र दांडगा. सहसा वाचनाच्या आवडीचा श्रीगणेशा पुलंपासून होतो. पण तिथे माझ्या हाती पुलंच्या आधी सावरकरांचं ‘माझी जन्मठेप’ लागलं. जगच बदलून गेलं. हे काहीतरी भारी आहे असं जाणवायला लागलं. अशा प्रकारची आणखी पुस्तकं कोणती हे विचारावं तरी कोणाला? मग स्वतःच बाबासाहेब पुरंदरे, गोनिदा, वि. स. वाळींबे, वि. ग. कानिटकर... शोधून काढले. हाती येईल ते, त्या वयाला न पेलणारं वाट्टेल ते वाचलं. चार्लस डिकन्सचं ‘द टेल ऑफ द टू सिटीज्‌’, जॉर्ज ऑरवेलच्या ‘ॲनिमल फार्म’चं भाषांतर, अरेबियन नाईटस्‌, शेरलॉक होम्स... कशाचा कशाला ताळमेळ नव्हता. पण एक न सांगता येण्यासारखा संस्कार होत होता. तेव्हा समजला नाही. मुंजीतल्या मंत्रांचा अर्थ मुहूर्ताच्या वेळी थोडाच समजतो आपल्याला?

आवडीच्या लेखकाचा शोध घेण्यात गम्मतच असते. शिवसेनेच्या उभारणीचे दिवस होते ते. कोकणात तर धामधुम असायची. सगळ्या मामा लोकांच्या चर्चांमध्ये बाळासाहेब ठाकरे हे नाव असायचं. मावशीकडे मार्मिकचा अंक यायचा. त्यावरची बाळासाहेबांनी काढलेली व्यंगचित्रं फार सुंदर असायची. विषय अर्थातच माझ्या अकलेबाहेरचे होते. एके दिवशी टेबलावरचे मार्मिकचे सगळे अंक गोळा केले आणि त्यावरची व्यंगचित्र बघत एकटाच हसत बसलो. शेजारचा माणूस माझ्याकडे विचित्र नजरेनं का बघतोय ते समजलं नाही; पण हे ठाकरे नावाचे कोणीतरी फारच भारी आहेत हे जाणवलं. मग ट, ठ, ड, ढ च्या कपाटांकडे मोर्चा वळवला. ठाकरे शोधले. ते निघाले प्रबोधनकार ठाकरे.  मला वाटलं तेच बाळासाहेब. सगळं वाचून काढलं. कळण्याच्या नावानं इल्ले.

आकाराने मोठी पुस्तकं वाचायची हौस होती. पण ती मुक्कामाच्या मुदतीत संपणार नाहीत म्हणून घेता यायची नाहीत. मग तिथल्या लायब्ररीयन बाई त्यातलं एखादं घरी न्यायची परवानगी द्यायच्या. त्या पुस्तकाची नोंद रजिस्टरमध्ये व्हायची नाही. त्या बाईंचं नाव मला आठवत नाही. खरं तर मला ते माहितच नव्हतं. पण निळ्या काठांची पांढरी साडी, केसात कसलं तरी फूल, गोरा गोल चेहरा मात्र स्वच्छ आठवतो. मी गेल्यावर हसून ‘आली का भाचेमंडळी पुण्याहून?’ असं विचारायच्या. मावशीच्या मैत्रीण असतील. एखादवेळेस जेवणाचा डबाही आणायच्या माझ्यासाठी. मला एकदम प्रमुख पाहुण्यासारखं वाटायचं. मी इतरांच्या समोरून पुस्तक मिरवत घरी जायचो.

कधी कधी काहीच न वाचता त्या खिडकीतून बाहेर बघत नुसता बसून राहायचो. समोर हलतं जिवंत पुस्तक असायचं. त्यात काय नव्हतं? फाटेवाल्या कातकरी माम्या, पलीकडे राहणाऱ्या सुप्रा मावशीच्या घरातून निघणारी चुलीच्या धूराची रेषा, पशूंच्या दवाखान्यातली गुरं, डुलणारी शेतं, त्यामागे एक टेकडी, तिच्याखाली वळण घेऊन जाणारा पुणे मुंबई रस्ता. तेव्हा वाहतूक तुरळकच असायची. एखादा ट्रक किंवा एसटी जाताना दिसायची. तो आवाज इथवर पोचायचा नाही. पुस्तकांनी भारलेल्या या जगात बाहेरच्या शब्दांना स्थानच नव्हतं.

वेळेचं भान राहायचं नाही. संध्याकाळ व्हायची. चाळीस वॅटचे पिवळे बल्ब लागायचे. त्यावर पाखरं भिरभिरायला लागायची. मी जागा बदलून बसायचोआठ वाजता लायब्ररी बंद करण्यासाठी त्या बाईंची लगबग सुरू व्हायची. भोवती अंधार पडलेला असायचा. तिथून घर जवळच होतं पण रस्त्यावर दिवे नव्हते. मग त्या मला म्हणायच्या ‘अरे जरा सोबत चलतोस का? सडकेवर अंधार आहे ना फार.’ आज आठवलं की हसायला येतं. खरं तर त्या मला लायब्ररीतून बाहेर काढायच्या. पण बोलणं मात्र असं गोडं होतं.

एकदा दुपारी कुंपणातल्या फड्या निवडुंगाला उगाचच त्वेषाने दगड मारत बसलो होतो. दगड मारला की त्यातून पांढरा चिक निघतो. लहानपणचा लढाईचा खेळ. ते त्या बाईंनी पाहिलं. थोड्या वेळाने आत गेलो तर माझ्या जागेवर साने गुरूजींचं पुस्तक ठेवलेलं दिसलं.

आठवत बसलं तर असं बरंच काही सांगता येईल. असो...

परवा खूप वर्षांनी आजोळी गेलो. आता गाव बदललंय. साहजिकच आहे. काळाच्या रेट्यात ते मागे कसं पडेल? कुणा एका वेड्या मुलाची आठवण म्हणून ती लायब्ररी कोण जपून ठेवेल? पडली बिचारी. नवीन बिल्डींगमध्ये गेलीय म्हणे आता. सगळा भवतालही बदललाय. तेही एक बरंच झालं. फक्त लायब्ररी गेली असती तर जास्त दुःख झालं असतं. अनिच्छेनं त्या दृष्याचे फोटो काढले नंतर तेही उडवून टाकले. आता हे जग माझं उरलंच नव्हतं. तेवढ्यात कोणीतरी हटकलं, ‘क्या चाहिये...?’ माझ्या कोकणातल्या आजोळगावात हिंदीतून प्रश्न आला. नाळेचा शेवटचा धागाही तटकन्‌ तुटला. मध्यंतरी मी एका कादंबरीचं भाषांतर केलं. तिच्या अर्पणपत्रिकेत लिहिलं, ‘खालापूर गावातल्या छोट्याशा वाचनालयाच्या स्मृतीस, जिथे माझं वाचनवेड जोपासलं गेलं’. एका ऋणातून मोकळा झालो असं वाटलं. तरीही काहीतरी ठुसठुसत राहिलंच.

एकदा मावशी घरी आली. आमचा नेहमीसारखाच अबोल संवाद झाला. तिनं माझ्या बायकोला विचारलं, ‘हा ज्ञानेश्वरी वाचतो का ग?’ मी नाही म्हटलं. ‘वाचत जावी रे. आधार असतो.’ त्या पाच शब्दांनी काहीतरी सांधल्यासारखं झालं. मावशीनं जगातला सर्वात मौल्यवान ग्रंथ अलगदपणे माझ्या हाती ठेवला. आताशा वाचन करताना काहीतरी पूर्णत्वाला पोचतंय असं वाटत राहतं. मनातला सारा गोंधळ विरत जातो. शांत स्थिर वाटू लागतं.

अबोध वयात वाचनाचं वेड जोपासणारी लायब्ररी आणि कळत्या वयात त्या वेडाला व्रताचं रूप देणारी मावशी... आज दोघीही नाहीत. काळ पुढेपुढे जातच असतोपण मध्येच कधीतरी आठवणी जाग्या होतात. जीव इवला इवला होतो. काय करावं सुचत नाही. कवेत सामावून घेणारी, निर्भय आश्वस्त करणारी ती खिडकी तर आता नसतेच... पण म्हणून काय झालं, पुस्तकांची दारं तर असतात ना. मी ती उघडतो...

तिथेच रमतो !



...प्रवीण जाेशी
98505 24221
pravin@pravinjoshi.com

Comments

  1. अप्रतिम!! मी पुणे मराठी ग्रंथालयात जाऊन पुस्तक वाचायचे त्याची आठवण झाली. घरी आणलेलं पुस्तक बदलायला जाताना आपण खूप मोठं महत्वाच काम करायला घराबाहेर पडत आहोत असं वाटायचं. सगळं आठवलं.

    ReplyDelete
  2. वाचन म्हणजे थांबलेली वेळ ❤️अप्रतिम, संपूर्ण लेखच 😊👌👍❤️

    ReplyDelete
  3. सुदंर 👌 माझ्यापण ‘वाचनीय’ आठवणींना उजाळा दिलास. आमच्या गावी पण अशीच एक सरकारी लायब्ररी कम इंस्टिट्यूट होती. घरी वाचायला कमी नव्हतं पण तिथे जाऊन टेबलटेनिसच्या दोन गेम्समधे किंवा रविवारी निवांत वाचत बसण्याची मजा काही औरंच होती. आपल्यासारख्या वाचनप्रीय मुलांना अवांतर वाचनासाठी किती आटापिटा करावा लागायचा लहानपणी. आजच्या पोरांकडे बघून कीव येते. सगळं जग हातात आलंय पण वाचनाची गोडी वा प्रेरणाच हरवलीय.
    कालाय तस्मै नमः
    असो.
    राहुल एकबोटे

    ReplyDelete
  4. मलाही आमच्या लहानशा गावातल्या श्रीराम वाचन मंदिराची आठवण झाली. तिथंही चंपक सोडून सर्व पुस्तकं मी वाचली. विभावरी शिरूरकरांची पुस्तकं वाचतांना हे काहीतरी नवीन आहे असं वाटत असे.लेख छान जमला आहे, सर्वांच्या आठवणींचे मोहोळ‌ उठवणारा.

    ReplyDelete
  5. पुस्तका॑सारखा मित्र नाही हे खरेच आहे..सुख-दुखात कायम सोबत करणारा... भावना खूप छान मांडल्या आहेत..... योगेश इनामदार

    ReplyDelete

Post a Comment