राणी
रात्री
उशीराची वेळ. दीड दोन वाजून गेलेत. माझं घर जरा लांब आहे. त्याच्याहीपुढे कात्रज भागातल्या
एकाकी सोसायट्या. निर्जन रस्ता. थोडासा पाऊस... मला समोर ॲक्टिव्हावरून चाललेली एक
मुलगी दिसते. अगदी निर्धास्तपणे. एवढ्या रात्रीची एकटी मुलगी कोण जात्येय हा प्रश्न
घेऊन; काळजी, उत्सुकता, कुतूहल असे टप्पे पार करत मी जरा जवळ पोचलेलो असतो. चांगली
जाडजूड मुलगी. अजागळ ड्रेस, ॲक्टिव्हावर पायाशी मोठमोठ्या पिशव्या आणि अजून काय काय
सामान. मुली झाकतात तसा ओढणीने चेहराही झाकलेला नसतो. एकूण हालचालीत भय तर नाहीच
उलट एकटेपणाची मजा अनुभवत ऐटीत चाललेली ती मुलगी. आणि अचानक माझ्या लक्षात येतं. अरे
ही तर राणी... मग खरं सांगायचं तर त्या निर्जन रस्त्यावर मलाच तिची सोबत मिळालेली असते.
राणी
माझ्या बायकोची मैत्रीण. पण तिच्याशी मैत्र जमायला अशा मध्यस्थीची गरजच नव्हती. या
मैत्रीची लागण थेटच व्हायची. पहिल्याच भेटीत राणी तुमच्या बेस्ट फ्रेंड लीस्टमध्ये
टॉपवर जाऊन बसलेली असायची.
तिला
मी प्रथम कधी पाहिलं ते आठवत नाही पण त्यानंतरची प्रत्येक भेट लक्षात राहिली. तिचं
अस्तित्व कोणत्याही प्रसंगात ठसठशीतपणे उठून दिसायचं. ‘स्थूल’ हे जोडाक्षर सडपातळ वाटावं
अशी छान ऐसपैस. सावळा गोल चेहरा. त्यावर कोणत्याही क्षणी उमलण्यासाठी तयार असं लोभस
हसू. आवाज जरासा घोगरा आणि वरच्या पट्टीतला. पण त्यात न सांगता येण्यासारखा छान गोडवा.
केस सदा विस्कटलेले. चालणं ‘नमवी पहा भूमी’ अशा थाटाचं. जे काही करायचं ते दणकट, टिकाऊ,
आडमाप आणि शंभर टक्के मनापासून. सौंदर्य ही कचकड्याची वस्तू नाही यावर तिचा ठाम विश्वास.
आणि
स्वभावाचं वर्णन करायचं तर मला अनेक विरुद्धार्थी शब्द एका वाक्यात घालावे लागतील.
तरीही ते पूर्ण होणार नाहीच. मानवी स्वभावाचं हे वेगळंच रसायन. स्त्रियांमध्ये सहसा
न सापडणारा अगोचर धीटपणा आणि त्याला जोड हळवेपणाची. भाषा म्हणाल तर अरेरावीची पण त्यात
हिसकेबाज प्रेम. छान व्यावसायिक म्हणून कौतुक करावं तर कुणीही फसवून जाईल अशी भाबडी.
एकूण प्रकृती कोणाचं न ऐकण्याचीच; पण जरा आवाज चढवला की लहान मुलीसारखी गोलाकार मान
हलवत हो म्हणणार. हसणं सातमजली आणि रडणं मनातल्या मनात. हे सारं तिला शोभायचं. राणी
म्हणजे एक गुंता होता.
तिचा
व्यवसाय होता केटरींगचा. हा खरं तर सर्व्हिस इंडस्ट्रीतला व्यवसाय. पण तिथेही हिचीच
क्लायंटवर दादागिरी चालायची. मेनू ठरवायला किंवा ऑर्डर पोचवायला अशा थाटात जायची की
यजमान कोण हेच कळेनासं होई. ‘तुम्ही ठरवलेला मेनू तुमच्या पाहुण्यांना आवडणार नाही.
त्यापेक्षा मी सांगते ते घ्या, पोटभर खा’ असं आपल्या क्लायंटला कोण ऐकवतं? पण राणीसमोर
बोलायची कोणाची टापच नव्हती. तमाम ग्राहकवर्ग निमूटपणे मान खाली घालून ताटातले चविष्ट
पदार्थ खात बसायचा. त्यांच्या समारंभाच्या ठिकाणी हिचाच दंगा बघण्यासारखा. असं धुमधडाक
वागुनही पुढची ऑर्डर हिलाच मिळे. चवीचं खूप कौतुक व्हायचं पण त्याच ग्राहकांनी
थकवलेल्या पैशांचे आकडे फुगत जायचे. मग राणी बावरून जायची. पण पुढच्याच क्षणी, ‘अरे छोडदो
यार. हम भी कुछ कम नही...’ असा काहीतरी हिंदी डायलॉग मारत पुन्हा झपाट्याने कामाला
लागायची.
पण
राणीची ओळख केटरर म्हणून करून दिलेली तिला आवडणार नाही. ती अव्वल दर्जाची अभिनेत्री
होती. अनेक वेडांपैकी अभिनय हे पहिलं वेड. व्यावसायिकरित्या फार काम केलं नाही तरी
नाटक अंगात मुरलेलं होतं. स्वतःकडेही प्रेक्षकांच्या नजरेतून पाहायची दुर्मिळ सिद्धी तिला
लाभली होती. मी तिचं एक नाटक पाहायला गेलो. नाटकात ती आणि तिची बहिण अंजली अशा दोघीच.
राणी भूमिकेत इतकी मिसळून गेली होती की नाटक सुरू होऊन पंधरा मिनिटं झाली तरी मी तिला
ओळखूच शकलो नाही. खूप वर्षांनी तिला हे सांगितलं आणि सात मजली गडगडाटी हास्यावर दोन
मजले अजून चढले.
राणीसारखं
शंभर टक्के सच्चेपणही दुर्लभच. काहीही आतबाहेर नाही. माझ्या घरी आली की थेट माझ्या
आजारी आज्जीच्या खोलीत घुसायची. ‘काय म्हातारेऽऽ नातसून सेवा करत्येय ना? घे मजा करून...’
मैत्रीणीच्या आजेसासूला तिच्याच घरात घुसून असा प्रश्न वरच्या आवाजात विचारण्याचा अधिकार
राणीला या सच्चेपणानेच दिला होता. त्यात आपुलकी आणि प्रेम भरभरून असायचं. आज्जीसुद्धा
माझ्या बायकोला ‘काय गं... बऱ्याच दिवसात आला नाही त्या अक्काबाईचा फेराऽऽ’ असं विचारायची.
माझ्याकडे
एक जुनी फियाट होती. मी ती घरचा गॅस सिलींडर लावून चालवायचो. याला सरकारी बंदी होती.
नेमकं एका चौकात पोलीसाने पकडलं. मी आपला शरण गेलो. त्याच वेळी कुठून तरी राणी उपटली.
परिस्थितीचा थेट ताबा घेत मध्ये पडली. आणि तिने त्या हवालदाराला बोलून बोलून जे काही
गोंधळात टाकलं ते पाहून मी भर रस्त्यात हात टेकले. माझ्याकडे केविलवाणेपणाने पाहात
निघून गेलेला तो हवालदार आठवला की आजही हसायला येतं.
राणीला पत्रकारितेचं शिक्षण घ्यायचं होतं. त्यासाठी लागणारी धडाडी, चातूर्य, बुद्धीमत्ता, व्यक्तीमत्व सारं काही होतं; नव्हतं ते ॲडमिशनसाठी लागणारं वय. मग त्या शिक्षणसंस्थेच्या नियमांनाच चॅलेंज देत राणी म्हणाली, ‘माझा इंटरव्ह्यू घेऊन बघा, पास झाले तर ॲडमिशन द्या...’ उत्तम मार्कांनी पास झालेल्या राणीला ॲडमिशन द्यावीच लागली.
काठावर बसून कुचूकुचू
बोलणं राणीला कधी जमलंच नाही. जे काही असेल ते तिथल्या तिथे तोंडावर. मनमोकळेपणाने
कौतुक करावं तर तिनंच. ती कार्यक्रमाला येऊन प्रेक्षकात बसली की दडपण यायचं. कारण
लोक ज्यावर साधी टाळी वाजवतात तिथे ही शेजाऱ्याच्या पाठीत धपाटा घालणार. स्मितहास्याच्या
ठिकाणी थिएटर गाजवणाऱ्या आवाजात हसणार. अशा वेळी जरा ओशाळंच वाटायचं. पण राणीला त्याचं
काय? तिला जर सांगितलं की, ‘राणी जरा जपून वागावं गं...’ तर आपलं काय चुकलंय हेच न
कळून छान फुरंगटणार. या साऱ्याला काय म्हणावं? नेमकं सांगायचं तर पुलंच्या रावसाहेबांचं
‘स्त्री’रूप म्हणजे राणी.
असं
सगळं ओबडधोबड प्रकरण असलं तरी जगण्यावागण्यात एक छान डौल होता. विजयी वीरानं पंचकल्याणी
घोड्यावर स्वार व्हावं तशी ती ॲक्टिव्हावर स्वार व्हायची. साधी हाक मारण्यातही तासभर
गप्पांची नांदी असायची. रसरसून जगणं म्हणजे काय तर राणी. तिच्या आयुष्याला वेग होता
आणि आवेगही.
राणीनं नावातला अजिंक्यपणा मिरवला; पण आयुष्याच्या खेळात तिच्यावरच राज्य आलं. नेमकं काय ते घडलं ते तिनं कधीच सांगितलं नाही. पण तिच्या आक्रमक पवित्र्यामागे क्षणभरासाठी का होईना; त्या राज्य आलेल्या मुलीचा कावराबावरा चेहरा दिसून जायचा. तो लपवण्यासाठी अभिनय करायला लागायचा. राणी आयुष्यात कधी नाटकी वागली असेल तर तेवढ्यापुरतीच.
स्वभावातला गोडवा रक्तात झिरपला म्हणून का काय राणीला मधुमेहानं घेरलं. हिला आजारपण येऊ शकतं या घटनेवर कोणाचाच विश्वास बसत नव्हता. तिचा स्वतःचाही नाही. भोळ्या स्वभावाला साखरेनं फसवलं. राणी मिटत गेली. विंगेतून प्रवेश घेताना भूमिका विसरलेल्या नटीसारखी भांबावली. संवादच हरवून बसली. आणि चेहऱ्यावरचं हसू मावळण्याआधी तिने कसलेल्या अभिनेत्रीसारखी एक्झिट घेतली.
राणीचं सिंहासन रिकामं आहे... रिकामंच राहील.
98505 24221
pravin@pravinjoshi.com
🙏
ReplyDeleteउत्तम लेखन, आणि आतील गोडवा...जो आठ मजली हसणार्या राणी ताईंना ही शंभर टक्के आवडला असता...त्या कायनेटीक वरून ऐका हाताने टाळी देत ओरडल्या..असत्या...भारी ओरडल्या असत्या..भारी ओ जोशी..चला चहा पाजते तूम्हाला
Deleteअंगावर येतं रे.🙏
ReplyDeleteप्रवीण, माझी बहिण गेल्यानंतर आजच ती मला भेटली रे.....
Deleteतुझ्यामुळे...
Thanks म्हणून तू आत्मीयतेने लिहिलेल्या चां अपमान होईल.
कमाल सर..!! राणी उभी राहीली समोर..!!
ReplyDeleteअग किती सुंदर राणी che सर्व पैलू उभी राहिली g डोळ्यासमोर अजून वादळा सारखी होती g ती सर्व भारावून टाकणारी
ReplyDeleteएक नंबर लेखन आहे प्रविण जी तुमचे एकदम सरकत काटा आला वाचताना तीला खुप अनुभवले आहे आम्ही झोकून देणारी प्रेमळ लटका राग समजून घेणारी अशीच होती राणी
Thanks मनाच्या कप्प्यातून बाहेर काढली तीला तुम्ही
Miss you Rani🌹🌹
Nilima taie
तिनं जगण्याचा उत्सव केला . स्वतःच्या आणि इतरांच्याही .... जीव ओवाळून टाकणारी अशी मैत्रिण मिळाली हा आमचा सुंदर योग
ReplyDelete........मंजिरी