खास वेड्यांचा पसारा

‘सवाई गंधर्व महोत्सव’ रात्रभर चालायचा तेव्हाची गोष्ट. शनिवार पेठेतल्या रमणबागेत पहाटेच्या थंडीत पं. शिवकुमार शर्मा आणि उ. झाकीर हुसेन यांचं वादन रंगलं होतं. द्रुतलय सुरू झाली होती. संतूरच्या सुरांनी मंडप भरून गेला होता आणि अचानक एक बेसूर वाक्य कानात घुसलं. ‘बरंका, माझ्याकडे गेल्या सतरा वर्षांतल्या सगळ्या सवाईंचं रेकॉर्डिंग आहे...’ सवाईमध्ये असे रेकॉर्डगंधर्व शेकड्यांनी यायचे. त्यातलेच हे. पण जरा अधिक विशेष. वय सत्तरीच्या पुढे, माकडटोपी, जाड भिंगाच्या चष्म्यामागे विचित्र वेडसर झाक, दातांची संख्या शून्य आणि आवाज थेट स्टेजवर ऐकायला जावा एवढा मोठ्ठा. मी दुर्लक्ष केलं तर त्यांनी माझ्या बखोटीला धरून खेचलं आणि खांद्यावरची मोठ्ठी शबनम उघडून दाखवली. त्यात नावं-तारखांनुसार लावलेल्या असंख्य कॅसेटस्‌ होत्या. मी कसनुसं हसून काहीतरी बोललो आणि जागा बदलली. पुढच्या समेवर तेच वाक्य पलीकडून ऐकू आलं, ‘बरंका, माझ्याकडे गेल्या सतरा वर्षांतल्या...’ त्यांनी दुसरा श्रोता गाठला होता. त्याने झिडकारल्यावर मग तिसरं गिऱ्हाईक. त्यांना सारे टाळत होते. कुणी हसत होते, चेष्टाही करत होते. ते मात्र या कशाची पर्वा न बाळगता आपलं वेड बिनदिक्कतपणे मिरवत होते. मला काही वर्षांनंतर समजलं की त्यांच्या घरी खरंच दोनतीन हजार मैफीलींच्या रेकॉर्डींग्जचा दुर्मिळ संग्रह होता. मी मनातल्या मनात ओशाळलो.

लहानपणी माझं जग पुण्याच्या सदाशिव, शनिवार आणि नारायण या तीन पेठांएवढंच होतं. दर तीनचार वाड्यांच्या पलीकडे कोणता ना कोणता तरी थोर माणूस राहायचा. आजही सहज पाहिलं तरी ठिकठिकाणी ‘इथे अमूक तमूक राहायचे’ असे नीलफलक दिसतात. शास्त्रापासून शस्त्रापर्यंत कसला ना कसला ध्यास घेतलेली ही थोर मंडळी. पण इथे विषयांचं वेड घेतलेली माणसं होती तशीच वेडाचा विषय झालेल्यांची संख्याही काही कमी नव्हती. प्रत्येक गल्लीचा, एक तरी मानाचा वेडा असायचाच. मी नावं आणि स्थळं सांगणार नाही. काहीही झालं तरी त्यांची हेटाळणी किंवा अपमान व्हावा असं मला वाटत नाही. कारण यातले बहुतांशजण बुद्धी कमी असल्याने नाही; तर खूप बुद्धी असूनही तिला वेळीच व्यावहारीक दिशा न मिळाल्याने सरकलेले होते. यांना आधी ‘नादीष्ट’ म्हणून गणलं गेलं आणि नंतर हळूच वेडसरांच्या कप्प्यात टाकलं गेलं. पण या पेठांनी जसं ज्ञानवंतांना सांभाळलं तसंच या वेडवंतांनाही जपलं होतं. त्यांचीच ही आठवण. 

एक जण दररोज सकाळी डेक्कन क्वीनच्या वेळेत कोट वगैरे घालून जय्यत तयार व्हायचा. हातात एक बॅगही असायची. त्याला म्हणे मुंबईला जायचं असायचं. काहीतरी महत्वाची मिटींग असल्यासारखा तो घरातून तरातरा बडबडत निघायचा. तोंडी रसायनशास्त्रातले अगाध नियम, फॉर्म्युले असायचे. हा म्हणे त्या विषयात पीएचडी होता. पण ज्ञानाचं काय करायचं हे मात्र कळत नव्हतं. त्याचा कुणावरही राग नव्हता की आकस. मग जरा चार गल्ल्या चालून झाल्या, डोक्यावर उन तापलं की ‘छे, आजही डेक्कन क्वीन चुकली...’ असं म्हणत घरी परतायचा. दुसऱ्या दिवशी पुन्हा मुंबईवारी सुरू.

गाण्याच्या कार्यक्रमांना एक बाई यायच्या. चांगल्या घरातल्या असाव्यात. कोणाची ना कोणाची ओळख काढून अगदी पहिल्या रांगेत येऊन बसायच्या. फिकट रंगाची बरी साडी, उजळ चेहरा, स्थूल शरीरयष्टी. पण विचित्र स्लीव्हलेस ब्लाऊज घालून दोन्ही हात वर करून कार्यक्रम बघत बसायच्या. आवडीचं गाणं मोठ्याने गायच्या. आजुबाजूच्यांना त्रास व्हायचा. सुरवातीला दुर्लक्ष केलं. पण नंतर मात्र त्यांचं तिथे तसं बसणं खटकायला लागलं. पुढे पुढे तर थेट स्टेजवर येऊन गाण्यांवर, कलाकारांवर कॉमेंटस्‌ करू लागल्या. या बाई गाणं चांगलं शिकल्या होत्या म्हणे. पण त्याचं पुढे काही झालं नाही. ती सारी अस्वस्थता अशी विचित्रपणे प्रकट होत होती.

माझ्या माहितीतला एकजण राजकारणाला वाहिलेला होता. वय अगदी तरूण. काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याच्या सभेला हा सतरंज्या घालण्यापासून ते वक्ता गाडीत बसेपर्यंत हजर. काय करतोस असं विचारलं की उत्तर यायचं ‘पक्षकार्य’. आता पक्षकार्य याचा अर्थ ज्यांना माहित असायचा ते खोखो हसत सुटायचे. मग हा अजूनच चिडायचा. तसाच एकजण कडक इस्त्रीचा पांढरा शर्ट आणि खाकी हाफपँटमध्ये वावरायचा. हातात दंड असायचा. ‘दक्ष’ म्हटलं की रस्त्यात असेल तिथे ताठ उभा राहायचा. वास्तवतेचं भान सुटलेले हे दोघे राजकिय विषयांवर अभ्यासपूर्ण संदर्भ देऊन वाद घालू शकत.

असेच एक वयस्कर काका होते. धुवट धोतर, मळकट झब्बा, कशीतरी वाढलेली पांढरी दाढी. ते स्कुटरवरून हिंडताना दिसायचे. त्यांची ती स्कुटर कुठूनही ओळखू यायची. तिला एक साईडकारही होती. तिच्यावर नानाविध फलक लावलेले असायचे. ‘अमूक झिंदाबाद... तमूक मुर्दाबाद’ पासून ते ‘असं असं झालंच’ पाहिजे अशा घोषणा देत हिंडत. कसलीतरी पत्रकं वाटत. मध्येच एखाद्या चौकात थांबून त्या स्कुटरवरच उभं राहून झोकात अगदी मुद्देसूद भाषण देत. ऐकायला गर्दी जमायची. ही एक फिरती राजकिय करमणूक होती

एका मित्राला वेडा शेजार लाभला होता. संपूर्ण बंगल्यात एक वेडसर गृहस्थ आणि त्यांची तशीच बहिण दोघेच राहायचे. हे घर जरा भीतीदायकच होतं. दगडी एकाकी बंगल्यात साठीच्या वयातले वेडे बहिणभाऊ राहतायत ही कल्पना करून पाहा म्हणजे कळेल. एका छोट्याशा चोरखिडकीत अर्धाच चेहरा दिसायचा. राठ त्वचा, टक्कल आणि बटाट्यासारखे गरगरीत डोळे. त्यावर कधीतरी अस्ताव्यस्त चष्मा. खिडकीतून ते डोळे थेट आमच्यावर रोखलेले असायचे. आमच्या बोलण्यातला कोणताही धागा उचलून त्यावर बडबड करू लागायचे. ते म्हणे कुठल्यातरी मोठ्या हुद्यावरून निवृत्त झाले होते. एकदा रात्री त्याच्यांशी जोरदार भांडण झालं. त्यातही ते अस्सल इंग्रजीतून बोलत होते.

एका चौकात मला वेडी भिकारीण बसलेली दिसते. हातात एक जाड पुस्तक असतं. ती ते वाचण्याचा अभिनय करते का खरंच वाचत असते हे मला उमगलेलं नाही. पण तिच्या चेहऱ्यावर सारं काही समजल्याचं शहाणं हसरं समाधान असतं. जवळ जाऊन काही विचारलं तर जाणतेपणानं उत्तर देईल याची खात्री वाटते. पण ते आपल्याला कळेल की नाही याबद्दल मात्र शंका वाटते.

याच विचारात कधीतरी ‘जगी हा खास वेड्यांचा पसारा मांडला सारा...’ हे नाट्यगीत ऐकलं. आणि त्यातल्या ‘खास’ या शब्दामुळे वेगळंच चक्र सुरू झालं. आपल्यापैकी प्रत्येकाला काही ना काही वेड असतंच. ते निभवायला कुणाकडे चतुर बुद्धी असते तर कुणाकडे केवळ भाबडं मन. या पेठांमधली ही वेडावलेली माणसं दुसऱ्या गटातली. अगदी खास. वेडाच्या काठावर उभं राहून हातातून सुटलेल्या शहाणपणाकडे पाहणारी. जोवर यातून कुणी शास्त्रज्ञ, संगीतकार, तत्वज्ञ उभारून येत नाही तोवर चेष्टेचा विषय होऊन बसलेली. म्हणायला वेडे पण यांच्या जगात कितीतरी बौद्धिक वादळं येत असतील; कितीतरी प्रश्न पडत असतील; त्यांची उत्तरं शहाण्यासुरत्या जगात सापडत नसतील. विषय तुमचे आमचेच, यांची दिशा मात्र वेगळी. त्या दिशेला सहसा कुणी जात नाही. मग अनोळखी वाटेवर एकटं वाटत असेल; सारी गणितं बरोबर येऊनही लोक आपल्याला वेडं का म्हणतात हेच कळत नसेल...

मनात असे काहीतरी वेडगळ विचार सुरू झाले की एकच होतं... मला त्यांच्यावर कधी हसायला येत नाही. 


...प्रवीण जोशी
98505 24221
pravin@pravinjoshi.com

Comments

  1. Great observation ! मस्त लिहिलंयस👌👌

    ReplyDelete
  2. Your best ever blog. Reminded me of a wonderful movie "The disciple" by Rajan Tamhane. 👏🙏👍Madhav Phatak

    ReplyDelete
  3. प्रवीण,मनस्वी लेख. तसं म्हटलं तर प्रत्येक जण वेडाच आहे.

    ReplyDelete
  4. एखाद्याचे वेड असणें आणि एखादा मवेडा असणे यातला योग्य तोल सांभाळत हा लेख लिहीला आहे
    ह्या बद्दल तुझे खरच कौतुक

    ReplyDelete
  5. मला ही नेहमीच हा प्रश्न पडतो की नक्की काय केमिकल लोच्या होतो यांच्या मेंदूत की चांगले चांगले लोक ही वेडे होत जातात.

    ReplyDelete
  6. वा प्रवीण, लेख सुंदरच..
    यातल्या दोन व्यक्ती आपण दोघांनीही एकत्र अनुभवलेल्या आहेत.. ती बाई तर माझी आवडतीच😃😃 आणि ते बहिण भाऊ माझे दुश्मन 🤣🤣

    ReplyDelete

Post a Comment