अभिजात
थोर माणसांच्या ओळखी होण्याच्या बाबतीत मी फार भाग्यवान आहे. आपलं अज्ञान जाहीर करून टाकलं आणि कोणताही स्वार्थ मध्ये न आणता निरपेक्षपणे उभं राहिलं की दारं उघडली जातात. त्यांचे अनुभव ऐकताना खूप काही शिकायला मिळतं. बऱ्याचदा तर आपण त्यांचं ऐकतो त्याहीपेक्षा ते आपलं ऐकून घेतात. अर्थात हे घडून येणं तितकसं सोपं नसतं. अनेक परीक्षा पार कराव्या लागतात.
ख्यातनाम चित्रकार रवि परांजपे यांच्याशी असाच स्नेह जुळला. चित्रकलेच्या तांत्रिक अंगापासून मी जरा लांबच आहे. चित्रं पाहायला आवडतं एवढंच काय ते. परांजपे सरांचं स्थान तर जागतिक स्तरावरचं. माझ्या पत्नीने त्यांच्या एका पुस्तकाचं सारांशलेखन केलं होतं. त्या निमित्ताने त्यांच्याशी जुजबी ओळख झाली होती. त्यांच्या चित्रदालनातल्या एका प्रदर्शनासाठी मी काही लेखन केलं होतं. त्या वेळी आमचा पहिला संवाद झाला. मी अज्ञानाने काहीतरी बोलून गेलो आणि सरांनी निळसर डोळे मोठे करत विचारलं;
‘तू काय डावा आहेस का रे?’
‘छे छे...’ मी लगबगीने उत्तरलो. मला खरं तर हे ‘डावं-उजवं’ वगैरे फारसं कळत नाही. असुंदर, लालित्यहिन गोष्टींचा मात्र तिटकारा आहे. सरांनी ते हेरलं असावं. मग त्यांच्या विचारांचा अक्षरशः धबधबा सुरू झाला. मीही धिटाईने काहीबाही विचारत होतो. गल्लीक्रिकेटवाल्या पोराने सचिनला बॉल टाकण्याचाच तो प्रकार होता. परंपरावाद, सौंदर्यवाद, मॉडर्न आर्ट अशा अनेक विषयांवरच्या अतीव सुंदर व्याख्यानाचा अनपेक्षितपणे लाभ होत होता.
तुकतुकीत गुलाबी गोरा वर्ण, हसरा बाळसेदार चेहरा, छान गोलगरगरीत अंगयष्टी, निळसर पिंगट डोळे, डोक्यावर केसांनी पांढरा झेंडा दाखवत माघार घेतलेली, वय ऐंशीच्या आसपास, आवाज मध्यमपट्टीतला आणि बोलण्यात कोणत्याही क्षणी कॅच घ्यावा लागेल अशा बेतात उभ्या राहिलेल्या फिल्डरचा सावधपणा; तरीही हसणं अतिशय निर्मळ आणि प्रसन्न. त्या पहिल्याच भेटीत मी त्यांच्याकडे ओळखीच्या पण न कळणाऱ्या चित्राचा अर्थ लावत बघत बसावं तसा पाहत राहिलो.
ओळख झाली तरी आदरयुक्त धाक तसाच होता. औपचारिकतेच्या भिंती पार व्हायच्या होत्या. आणि एके दिवशी तोही योग आला. अचानक फोन वाजला. कोऱ्या कॅनव्हासवर पहिली जोरकस रेघ मारावी तसं त्यांचं वाक्य ऐकू आलं.
‘हॅलो… उद्या घरी ये’
कशासाठी बोलावलं असेल याचा अंदाज बांधत त्यांच्या मॉडेल कॉलनीमधल्या घरी हजर झालो.
त्याआधी मी चित्रकाराच्या घराची कल्पना करून पाहिली होती. ब्रश, रंग, फ्रेम्स, अस्ताव्यस्त पडलेल्या कागदांच्या पसाऱ्यात आणि स्वतःतही हरवलेला तो कलाकार... पण सरांच्या घरी पाऊल टाकताच माझ्या मनातलं ते चित्र क्षणात टरकावलं गेलं. अतिशय सुंदर नीटनेटकं घर. जागोजागी उत्तम पुस्तकं, उच्च अभिरुचीची साक्ष देणाऱ्या वस्तू आणि त्याहीपेक्षा खुल्या मनाचं दर्शन घडवणारा आपलेपणा. मी त्या धक्यातून सावरतोय तोच स्वतःच्या मोठेपणाचा कोणताही आडपडदा न बाळगता त्यांनी माझ्या पाठीवर स्नेहाचा हात ठेवला. मी अवघडून गेलो.
‘काय काय लिहिलंयस रे?’ त्यांनी प्रेमाने विचारलं.
मी तेव्हा नुकतंच, मीनाताई मंगेशकरांनी लतादिदींवर लिहिलेल्या ‘मोठी तिची सावली’ या पुस्तकाचं शब्दांकन केलं होतं. ते त्यांच्या हाती दिलं. एकीकडे पहिलं पान उलगडत निळे डोळे माझ्यावर रोखत पुढचा प्रश्न आला, ‘हे तू मला भेट देतोयस का विकत?’ आता आली का पंचाईत? मला उत्तर सुचायच्या आत म्हणाले, ‘हे बघ, विकतच दे. आणि भेट देणार असशील तर त्यावर नाव टाकू नकोस. मी वाचून परत देईन. म्हणजे नंतर माझ्याकडे पडून राहायला नको आणि तुलाही दुसऱ्या कोणाला देता येईल.’
हा माणूस जरा अवघड आहे याची खात्री पटत होती. पण एकदोन आठवड्यातच त्यांच्या पत्नीचा, स्मिताताईंचा कौतुकस्वरात फोन, ‘सरांना पुस्तक वाचून दाखवत्येय. आम्हां दोघांना खूप आवडतंय. सरांनी घरी बोलावलंय.’
मी पुन्हा गेलो. पण या भेटीत पुस्तकावर एकही शब्द बोलणं झालं नाही. सगळी चर्चा भारतीय परंपरा, सौंदर्य, कलाकाराचा सामाजिक विचार, तत्वज्ञान अशा गहन विषयांवर. तीही अतिशय क्लिष्ट शब्दांत. त्यातली काही वाक्य सांगतो-
‘वारसा परंपरा आणि सिद्धी या तीन गोष्टी राष्ट्राचं कल्चरल इन्फ्रास्ट्रक्चर ठरवतात…’
‘राष्ट्रीय सौंदर्यदृष्टी राष्ट्रगाडा सुरळीत ठेवण्याचं काम करते…’
‘कुठल्याही क्षेत्रात ‘ब्रेक थ्रू’ मिळाल्याखेरीज यश नाही…’
माझ्या चेहऱ्यावरचं मोठ्ठं प्रश्नचिन्ह वाचून त्यांनी विचारलं, ‘तुला पटत नाहीये का माझं म्हणणं?’
‘अहो सर, पटणं लांब राहिलं. मला तर यातला एक शब्दही कळत नाहीये’ मी प्रामाणिकपणे सांगून टाकलं. जे काही तोडकंमोडकं समजलं होतं त्याच्या आधारे विषय चालू ठेवला. गप्पांची बैठक छान जुळली. ‘चित्रकार म्हणजे केवळ रंग आणि रेषा’ ही कल्पना पूर्णपणे खोडली जात होती. कलाकार चिंतनाच्या मार्गाने कलेच्या पार जातो. त्या प्रवासाचं हे दर्शन होतं.
सरांचं वाचन प्रचंड होतं. अनेक संदर्भ मुखोद्गत होते. त्यावर स्वतःचे विचार घासून पाहायला त्यांना आवडायचं. संगीताचीही चांगली जाणकारी होती. त्यांच्या त्या सुंदर कलादालनात शास्त्रीय संगीताच्या मैफिली होत. कधी वेगवेगळ्या विषयांवरच्या तज्ज्ञांच्या मुलाखती होत. समृद्ध करणारा अनुभव असायचा तो. पण त्यांच्यासारख्या विद्वानाने माझ्याशी इतक्या चर्चा करण्याचं कारण काही मला कळत नव्हतं. आज समजतंय की ते मला हाताला धरून खोल पाण्यात घेऊन चालले होते. थोडंफार उमगायला लागलं. त्यांच्या विचारांची दिशा कळू लागली. कधीकधी विरोधी मतही ते ऐकून घेत. बऱ्याचदा त्यावर तुटून पडत. अगदी भांडणाची वेळ येई. पण कधी मनापासून कौतुकही करत. असेच एके दिवशी अगत्यानं पाठीवर हात ठेवत म्हणाले,
‘मी माझ्या लेखांच्या आधाराने एक पुस्तक लिहितोय. त्याचं संकलन करशील का रे?’
‘मी?’
‘अर्थात...’ माझ्या हातात लेखांचा संग्रह ठेवत म्हणाले. ‘हे वाच. तुझी मतं सांग. हवं ते एडिट कर. तुला पूर्ण स्वातंत्र्य आहे.’
इतिहास, संस्कृती, कला, भारतीय परंपरा, व्यवहारवाद अशा अनेक विषयांवरचा सरांचा अभ्यास त्या लेखांमधून प्रकट होत होता. तुमच्याआमच्या विचारांना, मतांना ढवळून टाकणारे, नवीन दृष्टी देणारे ते लेख होते. आजवरचं सारं चिंतन सरांनी त्या लेखांमध्ये गोठवलं होतं. खरं तर एका विचारवंत कलाकाराने केलेली ती निरवानिरव होती. पुस्तकाचा मुख्य विषय होता ‘अभिजातता’.
मी काम सुरू केलं आणि त्याच दरम्यान लॉकडाऊन सुरू झाला. आमच्या भेटीगाठी थांबल्या. फोन चालू झाले. भारतीय संस्कृतीतली प्रतिकं, कलेमुळे जीवनाला मिळणारी गती, राष्ट्रवाद, रामदास अशा विषयांवर तासतासभर चर्चा व्हायच्या. मला चित्रकला समजावून सांगण्याचा प्रयत्न त्यांनी पहिल्याच भेटीत सोडला असावा. पण खरा चित्रकार चित्र काढून थांबत नाही तर ते पाहायची दृष्टीही देतो.
ही त्यांची अखेरची वर्षे होती. पण ते तरी कसं म्हणावं? कलाकाराला ‘अखेरचा काळ’ असतो का? तेही रंगरेषांचं सुंदर जग घडवणाऱ्या रवि परांजप्यांसारख्या कलाकाराला? त्यापेक्षा असं म्हणेन की मी त्यांना परिपक्वतेच्या सर्वोच्च पातळीवर असताना पाहिलं. या काळात ते अभावानेच चित्र रेखाटत होते. कुंचल्याची जागा लेखणीने घेतली होती. साऱ्या कला शेवटी माणूसपणाचा शोध घेत एकाकार होतात. सरांच्या या शोधाला अजून वेगळी किनार होती. त्यांना भारतीयत्वाचा अन्वयार्थ लावायचा होता. भाबडेपणाने भूतकाळात रमण्यापेक्षा कलेतून डोळसपणे भविष्य घडवणं त्यांना अधिक मोलाचं वाटत होतं. त्यासाठी ‘सौंदर्य आणि औचित्य यांचा संगम म्हणजे अभिजातता’ हे त्यांचं लाडकं सूत्र भेटेल त्याला पटवून देत असत. म्हणूनच ‘अभिजाततेच्या दृष्टीकोनातून भारत - काल आज आणि उद्या’ हे पुस्तक त्यांना महत्वाचं वाटत होतं. ते अक्षरशः झपाटले होते. पुस्तक प्रकाशित झालं. त्यात त्यांनी माझा विशेष उल्लेख केलेला पाहून भरून आलं. सरांची सही असलेली ती प्रत माझ्यासाठी फार मोठा ठेवा आहे.
या पुस्तकाच्या निमित्ताने मी अभिजातता पाहिली...
...तिच्या हट्टी स्वभावाला वाढत्या वयाचा मऊपणा लाभला होता. वय केवळ ‘पिकलं’ नव्हतं तर ‘परिपक्व’ झालं होतं. कलाकाराने जपून ठेवलेल्या बालवृत्तीला विचारवंताच्या अभ्यासू वृत्तीची जोड मिळाली होती. समोरच्याचं ऐकून घेण्याचा दुर्मिळ गुण शोभत होता. स्वभावात करडी शिस्त असली तरी भावनांचं पॅलेट कोरडं झालेलं नव्हतं. आनंदाचा रंग हरवला नव्हता...
‘अभिजात’ या शब्दाचा अर्थ ‘रवि परांजपे’ हे नाव धारण करून शब्दचित्र रेखत होता...
...प्रवीण जोशी
98505 24221
pravin@pravinjoshi.com
हृदय स्पर्शी लेखन
ReplyDeleteवा.वा...आभिजात हा एकच शब्द अगदी सुयोग्य
ReplyDeleteवा... अप्रतिम...
ReplyDeleteVery nice article!!! What a lovely introduction of a great artist in equally wonderful words!!
ReplyDelete👌❤️
ReplyDeleteखुप छान प्रविण. या लेखाच्या अनुषंगाने अनेक आठवणी ताज्या झाल्या. आज कळतेय ते सुवर्णक्षण होते.
ReplyDeleteलेख अतिशय सुरेख.साऱ्याच अंगानी.लिहिता रहा.
ReplyDeleteज्ञानदा
चित्रकला म्हणजे काय याची थोडीफार का होईना तुझ्या लेखामुळे झाली . अभिनंदन. चंद्रकांत रोंघे ,,,,,,,
ReplyDeleteप्रविण, खूप छान लिहिलं आहेस. परांजपे सरांना अनेकदा भेटण्याचा, चर्चा करण्याचा योग आल्यामुळे तुझ्या लेखातले बारकावे, नेमकेपणा अधिक भावला.
ReplyDelete-चारुहास