वजाबाकीची यादी
‘मला माझा मुलगा आणून दे...
आत्ता इथे, ताबडतोऽऽब’
तो काहीबाही बरळत होता.
रात्रीची वेळ. स्टुडिओमध्ये फक्त तो आणि मी. एका रेकॉर्डिंगसाठी आला होता. पण चक्क
दारू पिऊन. उभं राहताना तोल जात होता, दोन पावलं टाकताना भेलकांडत होता. याला सावरायचा
तरी कसा? हाकलून द्यावं तर तमाशा करणार. पण सांभाळून घ्यायचंही काही कारण नव्हतं. कुठल्या
कुठल्या गोष्टी काढून रडत होता. म्हणायला मित्र, खरं तर जरा जवळच्या ओळखीचा. आवाज छान.
शब्दांची समजही उत्तम. पण कुठेतरी काहीतरी बिनसलं आणि मग त्याच्या आयुष्यात सारं चुकतच
गेलं. व्यसनाच्या आहारी जाण्याआधीच्या साऱ्या पायऱ्या पार झाल्या. इथून पुढे फक्त उताराची
वाट. त्यावरून गडगडत होता, निरर्थक बडबडत होता. काम कसंबसं उरकलं. त्याला स्टुडिओच्या
बाहेर काढला.
या घटनेला आता पंचवीसहून
अधिक वर्ष होऊन गेली. आजही तो कुठे लांबवर दिसला तरी मी रस्ता बदलतो. याचा कधीही सपर्क
नको. चुकून आलाच तर ते कुणाला कळायला नको. त्याची हुशारी त्याच्यापुरती. त्याला झटकून
टाकावं, मनातून पुसून टाकावं हेच उत्तम. दुर्दैवानं हे असं अनेक जणांच्या बाबतीत होतं.
त्यांची नावं ही ‘वाया गेलेली माणसं’ म्हणून टाळण्याच्या यादीत कायमची नोंदवली जातात.
हीच ती तुमच्यामाझ्या मनातली ‘वजाबाकीची यादी’.
पण का कोण जाणे, अशांना
वजा केल्यावरही एक विचित्र हळहळ साचून राहतेच. या विचित्र संबंधांचा भागाकार निःशेष
नसतो. कितीही टाळलं तरी थोडी बाकी उरतेच. आपण यांना ओळखतो हे चारचौघात सांगताना जीव
संकोचतो खरा; पण ही नावं विसरू शकत नाही हेही तेवढंच खरं. म्हणूनच त्यांच्याबद्दल हे
थोडंसं अर्थपूर्ण... बरचसं व्यर्थपूर्ण...
असाच एक दुकानदारीचा व्यवसाय
करणारा मित्र. नाटकातही हौसेनं काम करायचा. बायको, एक मुलगा, राहतं घर सारं काही यथासांग.
पण कुठे पाऊल वाकडं पडलं कोण जाणे. अचानकपणे एके दिवशी घरातून निघून गेला. कुठे गेला
काहीच पत्ता नाही. चिठ्ठी नाही, निरोप नाही. जिवाचं काही बरंवाईट करण्याचंही काही कारण
नाही. अखेरीस कुठल्यातरी तसल्या बाईबरोबर दूरच्या गावात असतो असं कानावर आलं. काही
दिवस चर्चा, कुजबूज, कानगोष्टी झाल्या. विषय संपला. तो मित्र विस्मरणात गेला. आणि दहाबारा
वर्षांनी लोकांनी त्याला त्याच्या दुकानापाशीच घुटमळताना पाहिलं. कापल्या गेलेल्या
दोरांकडे आशेने बघावं तसा तो आपल्या बंद दुकानाकडे बघत होता.
अजून एकजण. त्याला तर मी
लहानपणापासून ओळखतो. अत्यंत उमदा, हसरा, खेळकर. विनोदबुद्धी उत्तम. प्रेमविवाह झाला.
व्यवसाय छान चालू होता. पण सुरळीत चाललेल्या गाडीला अचानकपणे अपघात व्हावा तसं काहीतरी
झालं. घरात कुरबुरी सुरू झाल्या. अखेरीस घटस्फोट झाला. यथावकाश दुसरं लग्नही झालं.
पण याचं वागणं अतर्क्यरित्या बदललं. डोक्यावर परिणाम झाल्यासारखा हिंडायला लागला. मी
त्याला रस्त्यातून मोठमोठ्याने अर्वाच्य बोलत जाताना पाहिलं आहे. खरोखरीचं वेड लागलं
तर समजू शकतो. पण हा शहाणपणापासून पळून जायचा प्रयत्न करत होता. वजाबाकीच्या यादीत
अजून एकाची भर पडली.
यातल्या कोणाचीच नावं सांगण्यात
काही अर्थ नाही. ती जाणून घेण्यात कोणाला दोन घटका करमणूक यापेक्षा अधिक रसही नसतो.
यादीतल्या माणसांनादेखील कदाचित स्वतःच्या नावाचं ओझं वाटत असेल. नावाबरोबर चिकटलेला
भूतकाळ नको होत असेल. घड्याळातल्या सेकंद, मिनिट, तासांचं करायचं काय हेही कळत नसेल.
या बधीर अवस्थेत मनापर्यंत काही पोचतच नसेल. अशा तेल संपत चाललेल्या दिव्यांकडे बघायला वेळ
आहे कुणाला? त्यांच्याबद्दल वाईट वाटतं. पण एक सांगतो, आजकाल असं कोणी दिसलं तर कीव
येण्याच्या आधी माझा चतूर सावधपणा जागा होतो. उदार वाटणारी मतं कडक कर्मठ बनतात. सुरवातीला
जरा कठीण गेलं. पण नंतर सरावायला झालं.
तरीपण मी कधीतरी फाजील उत्सुकतेने
क्षणभर त्यांच्या बाजूने विचार करतो. आयुष्य नावाची सुंदर गोष्ट अशी कवडीमोलाची होताना
त्यांच्या आत कुठे तुटत नसेल? का त्याची जाणीवच नसेल? वादळाबरोबर गिरक्या घेत चाललेल्या
पाचोळ्यासारखा तो कैफ. नंतर उरणारी भकास पोकळी. आपल्या आयुष्यात आता यापुढे काहीही
होऊ शकणार नाही हे उमगलेल्या त्या निराश भयाण नजरा; चारचौघात कसनुसं बोलताना निघणारे
ते पोकळ शब्द; त्या निस्तेज हालचाली; दिशाहिनपणे जगत राहण्याचा अट्टाहास... या साऱ्याच्या
नोंदी कोण ठेवणार, आणि का? माणूस ही अशी वजा करण्याची गोष्ट आहे? एवढी स्वस्त आहे?
अर्थात हे त्यांचं समर्थन
नाही. ज्याचं त्याचं आयुष्य असतं. कोणीही काहीही करावं. त्याला आपण एकवेळ मूर्खपणा
म्हणू. पण एक सांगतो, या वजाबाकीच्या यादीत मनानं वाईट, दुष्ट अशी माणसं फारशी सापडली
नाहीत. कुणी व्यसनामुळे वाया गेलं, तर कुणी आर्थिक परिस्थितीमुळे. कुणाच्या वाट्याला
नात्यामधली फसवणूक, तर कुणी स्वतःच्याच मिजाशीत. कुणाला जगाबद्दल गैरसमज तर कुणाला
स्वतःबद्दलच. कारण काही का असेना. समाजाने ठरवलेल्या चौकटीतून रितसर पैलतीर गाठण्याची
उमेद प्रत्येकानं सोडली. तारू मध्येच भरकटलं.
ही माणसंही कधीतरी हसत होती.
तुमच्याआमच्यासारखं सगळ्या विषयांवर बोलत होती. लहानपणी खेळली होती, भांडली होती. मग
पुढे असं काय झालं की सारं वाफ होऊन उडून गेलं? मी अशा अनेकांचं फुलणं पाहिलं आहे.
राग, लोभ, द्वेष, मत्सर साऱ्या गुणदोषांनी नटलेली तुमच्यामाझ्यासारखीच ही माणसं. सहानुभूती
बाजूला ठेवून कोरड्या तटस्थपणेही हा विचार पुन्हा पुन्हा मनात आल्याशिवाय राहत नाही;
नेमकं काय झालं आणि यांच्या हातून लगाम सुटला?
आपण सामान्य माणसं जीवनाचा
अर्थ, दिशा, उद्देश, आदर्श असे मोठ्ठाले शब्द ऐकतो, सहजपणे वापरतोही. त्यांच्या आधारे
‘समाजात कसे वागावे’ याचे नियम तयार करतो. त्या रंगीबेरंगी शब्दांच्या पताका लावून
माणूसपणाची वेस सजवतो. ही वेस ओलांडणाऱ्यांना पुन्हा आत यायला मज्जाव. कोणी घुसू लागलं
तर आपण बहुमताने निषेध नोंदवणार. आणि क्वचित त्यातलं कोणी पंख उभारून आपल्या डोक्यावरून
उडून गेलं तर जयजयकार करणार. पुन्हा आपले ‘चूक-बरोबर’ची तागडी घेऊन वेशीपाशी उभे. कधी
त्या बंधनमुक्त जीवांबद्दल चोरटेपणाने हेवाही वाटतो पण ते मोठ्याने सांगायची छाती होत
नाही. त्यांना हात द्यावासा वाटतो पण संस्कारांच्या भींती आड येतात. अशा वेळी वाटतं
की आपल्या नीतीच्या मागे भीती उभी असते.
कितीही उदारपणे विचार केला तरी त्यांच्याबद्दल मनात अढी का राहते हे कळत नाही. त्यांच्यातली एकेकाळची खळाळणारी उर्जा आठवली की उदास व्हायला का होतं हेही उमगत नाही. मग या वजाबाकीच्या यादीत रमण्याचं कारण काय?
व्यर्थातून अर्थ वेचण्याचा प्रयत्न... दुसरं काय?
...प्रवीण जोशी
98505 24221
pravin@pravinjoshi.com
वा प्रवीण, छान लिहितो आहेस.....अशी आणि याहूनही अधिक अत्रांग माणसं मला पण भेटलीत..... कोणाच्या आयुष्याचं गणित कधी चुकेल हे सांगणे अवघड.....नेमके कोणते हातचे घ्यायचे राहून गेल्याने उत्तर शून्य आलं हे ज्याला त्याला समजत असेलही,पण तोवर परीक्षेची वेळ संपत आलेली असते.
ReplyDeleteहृदय स्पर्शी
ReplyDeleteखूप गहन हळवा v तटस्थ विचार करायला लावणारं लेखन
🙏
ReplyDeleteअनेक माणसं आठवली
ReplyDeleteइतकं आठवतंय लिहिता येतंय तर वजा नाहीच केलेलं - तात्पुरतं जगण्याच्या गणितात धरलं नाही इतकंच. यातून माणसाला एक समजलं तरी पुरे आहे की कोणालाच काही वजा करता येत नाही. एकदा मेंदूत कनेक्शन जुळलं त्या घटनेचं आठवण या स्वरूपात की ते कायमचं. यामुळे कोणी जुन्या आठवणींनी नाराज निराश होत असेल तर ते समजून घेता आलं तरी पुरे आहे. बोचऱ्या आठवणी दुसऱ्या कोणी validate केल्या की धार कमी होते आणि त्याचा त्रास ही पण वजा होत नाही कधीच. त्यामुळे माझ्या दृष्टीने बजाबाकी नाही !
ReplyDeleteवा... उत्तम विषय.... अतिशय समर्पकपणे मांडलेली निरीक्षणं आणि त्यामागच्या भावना! माझ्याही अनुभव विश्वातील अशी "वाजाबकीची यादी" आठवली.
ReplyDelete