जुने जाणते
पूर्वी
कोणत्याही संस्थेत, कारखान्यात विशिष्ट कामांसाठी प्रौढ जाणती माणसं नेमलेली असायची. त्यांच्या वडिलकीच्या धाकाने
तिथे सारे बांधले गेले आहेत हे सहज कळायचं. एका कंपनीत माझी जोशीकाकांशी ओळख झाली.
तेही असेच होते. पण जरा वेगळ्या रंगातले. मी अनुभव घेण्यापुरता थोडा काळ तिथे लेखक
म्हणून काम करत होतो. आयुष्यातली पहिली आणि शेवटची नोकरी. पण जोशीकाका मात्र तिथे
तीसचाळीस वर्ष होते. सगळ्यावर देखरेख करणे, व्यवस्था पाहणे
हेच त्यांचं काम. त्यासाठी यांच्यासारखा कडक शिस्तीचाच माणूस
पाहिजे. लेखनासाठी संदर्भ, पुस्तकं असं बरंच काही साहित्य
लागायचं. तो इंटरनेटचा जमाना नव्हता. हे सगळं खातं जोशीकाकांच्या ताब्यात. अगदी
पेन, पेन्सिली, कागदसुद्धा
त्यांच्याचकडे मागायला लागायचे. लग्नघरामध्ये मुख्य ट्रंकेची किल्ली एखाद्या कडक
शिस्तीच्या खवट काकांच्या हाती असावी तसे सगळे अधिकार यांच्या स्वाधीन होते.
पेन्सिल मागितली तर आधी वापरलेल्या पहिल्या पेन्सिलीचा शेवटचा टोकही न करता येणारा
तुकडा नेऊन दाखवावा लागे. कागद, पेन मागितले तर, ‘कामं करताना तर दिसत नाही, कागद पेनं संपतात कशी
तुमची?’ हे ऐकावं लागे. काहीही विचारायला गेलं की प्रश्न
पूर्ण होण्याआधीच एक बोट हलवत ‘नाही नाही’ असं दुबार उत्तर यायचं.
स्वच्छ
पांढरा शर्ट, पांढरा पायजमा, कोल्हापुरी चपला. बुटकेसे आणि गोरे.
वय साठीच्या आसपास झालं तरी केसात चहासाखरेचं मिश्रण होतं. या वयात पैशासाठी काम
करण्याची गरज नसावी. जाड भिंगाचा चष्मा नाकावरून सतत खाली नाकपुड्यांवर घसरत असे.
नाकपुड्या बंद व्हायला लागल्या की काका तो वर ढकलत. जोशीकाका चष्म्याचा उपयोग
प्राणायामासाठी करतात असा आम्ही एक शोध लावला होता. आम्हां तरुण पोरांची वागणूक
आणि कामाचा वेग त्यांना झेपत नसे. तेही कधी सगळ्यांमध्ये मिळून मिसळून वागत नसत.
आपल्या खुर्चीवरून कधी उठायचेच नाहीत. सकाळी सगळ्यांच्या आधी ऑफिसला यायचे. दीड
वाजला की फाईली बाजूला सारून त्याच टेबलावर आपला डबा काढून जेवायचे. काही मिनीटे
डोळे मिटून घोरत एक डुलकी काढली की पुन्हा संध्याकाळपर्यंत प्रत्येकाला धारेवर
धरायला तयार. संध्याकाळी टेबल व्यवस्थित आवरून वेळेत घरी जायचे. ते नसताना त्यांच्या खुर्चीचाही धाक वाटायचा. तिथे कुणीच कधी बसायचं नाही.
तरीपण
जोशीकाकांमध्ये काहीतरी गोडवा होता. आपलेपणा वाटावा असंही खूप काही होतं. आम्हाला
त्या वयात ते जाणवणं शक्यच नव्हतं. नोकरीमध्ये आपलेपणा फक्त पगाराच्या दिवशी काही
तास जागा असतो. बाकी महिनाभर असते ती चाकरमानी. पण जोशीकाकांचं त्या कंपनीशी
पगाराच्या पलीकडचं नातं होतं. हा कारभार चालवण्याची जबाबदारी आपल्यावरच आहे असं
त्यांना प्रामाणिकपणे वाटे. बोलून दाखवण्याचा स्वभावच नव्हता त्यांचा पण प्रत्येक
कृतीतून हे टोकदारपणे जाणवत राहायचं. आताशा मालकांची पुढची पिढी व्यवसाय
सांभाळायला लागली होती. सारे बदल पाहात आणि पचवत जोशीकाका नेमाने ऑफिसला येत होते.
त्यांची
कधीच कसली तक्रार नव्हती. सणासुदीच्या दिवसात चिक्कार काम पडायचं. जोशीकाका अशा
वेळी अधिकच कडक व्हायचे. रजा मागणाऱ्याला कामावरून काढून टाकायची धमकी मिळायची.
सगळे मालकी हक्क ते बिनदिक्कत वापरत. पण त्यांना मी कधीच मालकांसमोर मोठ्या आवाजात
बोलताना ऐकलं नाही. मालकांच्या पुढच्या पिढ्यांसमोरही नाही.
पण
काळाच्या वेगवान चाकाचे चटके प्रत्येकाला बसतात. नेमकं काय घडलं ते कळलं नाही.
एके दिवशी काकाचं चित्त काही थाऱ्यावर नव्हतं. गप्प गप्प होते. त्या
दिवशी ते कुणावरही रागावले नाहीत; कुणाला काही बोलले नाहीत.
नरमाईने वागत होते. आत खोलवर काहीतरी दुखावलं गेलं होतं. खपली निघाली होती. ती
लपवण्याच्या नादात एकदा हसण्याचाही प्रयत्न केला; तोही फसला.
कदाचित त्यांना कुणीतरी ‘तुम्ही जे आपलं हक्काचं समजताय तिथे खरे तर नोकर आहात’
अशी टोचणी दिली होती. त्या दिवशी डबा खाल्यानंतर डुलकी काढली नाही. लगेच पुन्हा
कामाला बसले. हिशेब वगैरे तपासू लागले. जोशीकाकांना असं रुसलेलं अबोल पाहून आम्ही
चपापलो. इतकी वर्ष त्यांनी या कंपनीशी आपलं आयुष्य जुळवलं होतं; या ऑफिसला आपलं मानलं होतं. आता इथे त्यांना
चिडण्याचाही अधिकार नव्हता. खरं तर तो अधिकार त्यांच्या मनाने कधी स्वीकारलाच
नव्हता.
काकांचं
वागणं बदलत चाललं. त्यांना आपलं नक्की काय चुकलं हे कळत नसावं पण ते विचारायला
त्यांच्यापेक्षा मोठं तिथे कुणीच नव्हतं. पाचसात दिवसांतच त्यांचा धाक उतरणीला
लागला होता. आम्हांला आता ते आपल्यातलेच आहेत असं वाटू लागलं होतं आणि असं
वाटण्यात अपराधीही वाटत होतं. जोशीकाकांना मवाळलेलं पाहून चुकल्यासारखं होत होतं.
आठवडा तसाच गेला आणि शनिवारी काकांनी कधी नव्हे तो हाफ डे घेतला. आठवड्याभराचं
उरलेलं काम टेबलावर तसंच ठेऊन घरी निघून गेले. सोमवार उजाडला. काका आलेच नाहीत.
पुढेही दोनतीन दिवस ते टेबल तसंच राहिलं. त्यांचं काम कुणीही सांभाळलं नाही.
कंपनीत छुप्या चर्चा चालू झाल्या. निरर्थक कंड्या पिकू लागल्या.
आणि
अचानकपणे एके दिवशी काका वेळेत कामावर आले. आज ते पूर्वीचेच जोशीकाका होते. तोच
दरारा, तोच धाक. तीच एक बोट हलवत नाही म्हणायची लकब. आम्हाला हायसं वाटलं.
रागावणारं कुणी असलं की बरंच वाटतं. मधल्या पाचसात
दिवसांमध्ये काय घडलं होतं कोण जाणे. कुणी त्यांची समजूत काढली असण्याचीही काहीच शक्यता नव्हती. आज असं वाटतं की वयाच्या शहाणपणाने त्यांनी स्वतःलाच,
‘आपणच तोल सांभाळला नाही तर नाही चालणार’ असं बोट हलवून दुबार
सांगितलं असणार. जोशीकाका नसण्याच्या त्या पाचसात दिवसांत आम्हाला त्यांचं खरं
दर्शन झालं. त्या दिवसापासून रिटायर होईपर्यंत जोशीकाका तसेच राहिले.
रिटायरमेंटच्या सेंडऑफच्या समारंभात म्हणे त्यांनी स्टाफला पेन्सिली वाटल्या
होत्या. कडक शिस्तीच्या माणसाला गोडवा दाखवण्याची संधी क्वचितच मिळते.
आजकाल
सगळ्या कंपन्यांमध्ये तरुणांचं राज्य असतं. अशी जुनी प्रौढ माणसं कुठे दिसत नाहीत.
प्रचंड उत्साही आणि प्रोफेशनल वातावरणात काहीतरी कमी आहे हे सतत जाणवत राहतं. ही
पोकळी भरून काढण्यासाठी ॲडमिन किंवा एच् आर म्हणजेच ह्यूमन रिसोर्सेस नावाची
यंत्रणा असते. जोशीकाका तर हेच काम करायचे ना. पण एच् आर डिपार्टमेंट कंपनीचं
‘वर्क कल्चर’ मेंटेन करते आणि जोशीकाकांसारखी माणसं कंपनीची ‘संस्कृती’ सांभाळतात
एवढाच काय तो फरक.
तो
मिटवण्यासाठी नुसतं जुनं होऊन चालत नाही, जोशीकाकांसारखं जाणतंही असायला
लागतं…
...प्रवीण जोशी
98505
24221
pravin@pravinjoshi.com
जरासं वेगळं, पूर्णतेच्या जरा जास्तच अलिकडे फेडौट केलयं का? मला लक्षात नाही आलं...
ReplyDeleteरवी कुलकर्णी
उत्तम लेख
ReplyDeleteखूपच सुंदर लेख। प्रवीण धन्यवाद
ReplyDelete👌👍👏🙏
ReplyDeleteखरचं अशी शिस्तीची पण तेवढीच प्रामाणिक. आपलीशी वाटणारी माणस आपल्या आजूबाजूला असतात
ReplyDeleteखरचं अशी शिस्तीची पण तेवढीच आपल्याला हवीशी माणसआपल्या जवळपास असतात
ReplyDeleteनिव्वळ अप्रतिम !👌👌
ReplyDeleteGood one
ReplyDeleteखरंच अशी माणसे होती, त्या वेळी ऑफिस ची ही एक शान असायची. ऑफिस च्या वेळेत कठोर वाटली तरी एरवी आपुलकीचा, मायेचा झरा अनुभवायला यायचा. लेखा मुळे अश्या माणसाची आठवण झाली. पण लेख एकदम सम्पवल्या सारखे वाटले. ओघावता शेवट जाणवला नाही असे मला वाटते, कदाचित मी चूक असेनही.
ReplyDeleteवा! सुरेख👌
ReplyDelete👌🏻👌🏻
ReplyDelete