विचक्रमादित्य

परवा ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्‌’ हा शब्द खूप दिवसांनी कानावर पडला आणि धनंजय कुलकर्णीची तीव्रतेने आठवण झाली. विक्रमांचा चक्रमादित्य म्हणजे धनंजय कुलकर्णी.

विक्रम म्हटल्यावर आपल्याला सचिनच्या शंभर सेंचुरीज्‌, लतादिदींची हजारो गाणी, ऑलिंपिकमधली रेकॉर्डस्‌ असं सगळं आठवतं. पण हे झाले आकड्यात मोजता येणारे विक्रम. धनंजय कुलकर्णी या प्राण्याची विक्रमाची कल्पना तुम्हाआम्हाला न झेपणारी होती. कुणाच्या मनातही येणार नाही असं काहीतरी अचाट करायचं हाच त्याचा ध्यास आणि येनकेनप्रकारेण आपलं नाव ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्‌’मध्ये आणायचं हेच एकमेव स्वप्न.

धनंजय कुलकर्णीचा पहिला विक्रम होता, ‘काचा खाणे’.

हो... हा माणूस चक्क काचा खायचा. त्यातही ट्यूबलाइटच्या काचेची चव तर त्याच्या अधिक आवडीची. तुम्ही आम्ही हातात ऊस धरून खातो तसा हा ट्यूबलाईट खायचा. अगदी मन लावून कुडूमकुडूम करत. हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे.

पण त्याला कुठूनतरी कळलं की काचा खाण्याचा विक्रम आधीच कुणाच्या तरी नावावर जमा आहे. मग पठ्ठ्यानं कसून शोध घेतला. अशी माहिती मिळवण्यासाठी त्याकाळी आजच्यासारखा सोशल मिडिया नव्हता. संपर्काची साधनं नव्हती. यानं थेट लंडन गाठलं. तिथल्या विक्रमवीराने म्हणे अडीच किलो काचा खाल्या होत्या. मग या बहाद्दरानं तिथेच दोन किलो सहाशे ग्रॅम काचा खाऊन तो विक्रम खळ्‌कन तोडला.

असं हे पूर्ण ‘सरकलेलं’ प्रकरण होतं. सतत काहीतरी अफाट करण्याच्या धुंदीत त्यानं काय काय केलं असेल? मुंबईतल्या एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये त्याने बसल्या बैठकीला एकशे चौऱ्याण्णव कप चहा पिण्याचा विक्रम केला. यासाठी विशेष उपस्थिती होती अमिताभ बच्चनची. त्यानंतर कधीतरी पस्तीस तास एका पायावर उभा राहण्याचा विक्रम केला. एकदा पंचाहत्तर तास सलग टाळ्या वाजवल्या. एवढं सगळं करूनही आपलं नाव गिनिजमध्ये येत नाही म्हटल्यावर त्याने ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्‌’ हे हजार एक पानांचं पुस्तकच खाऊन टाकलं. काचा खाणाऱ्याला कागदांचं काय विशेष?

असे सगळे उपद्व्याप करण्यासाठी तो पैसे कसे उभे करायचा देव जाणे. पण जगावेगळ्या वाटेवरच्या माणसांच्या मागे जगावेगळे दानशूरही उभे असतात. काचा खाऊन दाखवण्यासाठी त्याला अनेक जाहीर कार्यक्रमांची निमंत्रणं यायची. टिव्हीवरही त्याच्या खूपदा मुलाखती झाल्या. एकदा डोंबिवलीत कार्यक्रम होता. त्यासाठी डेक्कनक्वीनने निघाला. पण लक्षात आलं की ही गाडी डोंबिवली स्टेशनवर थांबतच नाही. स्टेशन मागे टाकून वेगाने धाडधाड धावणाऱ्या गाडीत या सुपरमॅनला सुचलं की आपण डेक्कनक्वीनमधून स्टेशनवर उडी मारण्याचाच विक्रम का करू नये? मनात आलेला आचरटपणा प्रत्यक्षात यायला कितीसा वेळ. लगेच तयारीला सुरवात. या विक्रमामाठी रितसर परवानगी काढून ताशी शंभरच्या वेगाने धावणाऱ्या डेक्कनक्वीनमधून डोंबिवली स्टेशनवर उडी मारली. अनेक हाडे मोडली. काही महिने हॉस्पीटलमध्ये झोपून होता. नंतर बायका हौसेने नवा दागिना दाखवतात तसा प्लॅस्टरमधले हातपाय दाखवत हिंडत होता.

उंची पाच साडेपाच फूट. किरकोळ शरीरयष्टी. अतिशय आकर्षक उमदं व्यक्तीमत्व. जाड भुवया. बच्चनस्टाईल केस. ताडताड चालायचा. जिन्याच्या तीनतीन पायऱ्या एकदम चढायचा. मस्त बडबड्या. त्याच्याबरोबर तासन्‌तास गप्पा रंगायच्या. त्यात माझं काम केवळ भारावून ऐकत बसणे एवढंच असायचं. सतत ‘मी हे करणार ते करणार’ असं म्हणायचा. पण त्या वल्गना वाटायच्या नाहीत. आज वाटतं की हे बोलणं लोकांसाठी नव्हतंच. तो स्वतःच स्वतःला आव्हानं देत होता. आणि प्रत्येक वेळी आधीच्यापेक्षा अवघड.

जगप्रसिद्ध नायगरा धबधब्यात उडी मारणे हे जगभरातल्या विक्रमवीरांसाठी एक कठीण आव्हान आहे. अनेक जणांनी हे धाडस केलंही आहे. पण त्यातून जिवंत राहणाऱ्या व्यक्ती अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्या. एकदा हा काही कागदांची भेंडोळी घेऊन घरी आला. काय आहे विचारेपर्यंत भेंडोळी उलगडली. नायगऱ्यामध्ये उडी मारायची तंत्रशुद्ध योजना त्याने तयार केली होती. अगदी सचित्र. लोखंडी तारांनी बांधलेली फायबरची पेटी, त्यातल्या स्प्रिंगा वगैरे असंख्य बारीकसारीक तपशील तो समजावत राहिला. नायगऱ्यात उडी मारून वाचलेल्या एका बाईशी त्याने फोनवरून चर्चाही केली होती. ती या प्रयत्नात जन्माची अपंग झाली होती. हे सगळं सांगताना त्याचे झपाटलेले डोळे मला अजूनही आठवतायत. त्याला जणू काही ते सारं घडताना दिसत होतं. हा सगळा वेडेपणा होता हे तर खरंच; पण धनंजयचं वेड ‘जुनून’ या स्वरुपाचं होतं. याला मनस्वीपणा म्हणाल तर त्याबरोबर येणारा सजग शहाणपणा नावालाही नव्हता. त्याऐवजी एक खोलवर रुजलेलं पिसाटलेपण होतं. अगदी अमानवी वाटावं असं. पण त्याला शोभून दिसायचं. स्वतःच्या स्वप्नाशी शंभर टक्के प्रामाणिक होता त्यामुळेही असेल कदाचित.

एकदा घरी आला तेव्हा टिव्हीवर मासूम चित्रपटातलं ‘लकडी की काठी’ गाणं लागलं होतं. पटकन म्हणाला, ‘अरे हे आमच्या गौरी बापटनं गायलंय. चांगली ओळख आहे माझी तिच्याशी’ एवढं बोलून महाराज थांबले नाहीत. मोठ्या आवाजात सहजपणे म्हणाला, ‘तुला आरडीला भेटायचंय?’

आर डी बर्मनदा?’ मी अविश्वासाने विचारलं. हे तर मला नायगऱ्यात उडी मारण्यापेक्षा अवघड वाटत होतं.

हो. मी जाणार आहे परवा त्याच्याकडे. चल बरोबर.’

अर्थात तो परवा कधीच जुळून आला नाही. पण त्या दिवशी गप्पा काही रंगल्याच नाहीत. तो कुठल्यातरी तंद्रित हरवला होता. मध्येच म्हणाला, ‘मी संगीत शिकलो असतो ना तर यातलं काहीच केलं नसतं. असं काही करावसं वाटलंच नसतं.’ मग अचानकपणे ‍गप्प झाला. शांतपणे इकडे तिकडे पहात राहिला. त्याच्या बोलण्याचा मला तेव्हा उलगडा झाला नाही आणि त्या शांत बसण्याचाही अर्थ लागला नाही. पण आज अनेक प्रश्न पडतात.

इथे प्रत्येक माणसाची आपापली एक दुनिया आहे. स्वतःच्या नादात हरवण्यासाठी प्रत्येकाला हक्काची जागा आहे. तरीही हे जग आपल्यालाच तऱ्हेवाईक का म्हणतं याचं त्याला वैषम्य वाटत असेल का? मना येईल ते करण्याचे धाडस असलेल्या स्वच्छंदी माणसांकडे दुनिया केवळ करमणूक म्हणूनच बघते. चाकोरीतली शहाणी माणसं दोन क्षण आश्चर्याचा आव आणतात आणि पाठीमागे नादिष्ट छंदीफंदी म्हणून वेड्यात काढतात. पण डोंबाऱ्याचा खेळ बघताना त्यांच्या मनातला छुपा आनंद, दोरीवर चालणारी मुलगी खाली कशी पडेल हेच बघण्याचा असतो. मग जास्त अमानवी कोण? शहाणं कोण? वेडं कोण?

पण धनंजय कुलकर्णीसारख्यांना याच्याशी काही देणंघेणंच नसतं. त्यांचा पिंडच मुळी सर्वस्व उधळून देण्याचा असतो. जन्मजात लाभलेला दैवी वेडेपणा जपण्यातच त्यांना धन्यता वाटते त्याला कोण काय करणार? आज वाटतं, गिनिज बुकमध्ये नाव येणं हे त्याला प्रसिद्धीसाठी नकोच होतं. ते त्यानं स्वतःला दिलेलं वचन होतं. ती स्वतःची ओळख होती. ‘माझ्या वेडेपणाला तुमच्याच भूमीचा आधार आहे’ एवढंच त्याला जगासमोर सिद्ध करायचं होतं. अर्थात खरं खोटं तोच जाणे.

खूप वर्ष झाली या गोष्टीला...

परवा ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्‌’ हा शब्द अनेक दिवसांनी कानावर पडला आणि हे सारं आठवलं. मी शोध घेतला पण त्या पुस्तकात मला त्याचं नाव आढळलंच नाही. कुणाला सापडलं तर अवश्य कळवा.

ती दोन ओळींची नोंद म्हणजे धनंजय कुलकर्णीच्या वेड्या आयुष्याचं शहाणं संचित असेल.

 

...प्रवीण जोशी
98505 24221
pravin@pravinjoshi.com

Comments

  1. समर्पक वस्तुनिष्ठ लिहिता लिहिता कातरता छान साधलीस की...
    रवी कुलकर्णी

    ReplyDelete
  2. माझी आठवण बरोबर असेल तर सुधीर गाडगीळ यांनी यांची tv वर मुळखावेगळी माणसं या कर्यक्रमात मुलाखत घेतली होती असे वाटते. लेख सुंदर व माहितीपूर्ण आहे.

    ReplyDelete
  3. अप्रतिम। जुन्या आठवणीत गेलो। आजही धनंजय आठवतो

    ReplyDelete
  4. लेख सुंदर माहितीपर

    ReplyDelete
  5. ह्याने माझ्या घरी आमची बशी खाल्ली होती,खूप चांगला आठवतोय मला 🙏🙏

    ReplyDelete
  6. झपाटलेपणाला करूण झालर असायलाच हवी हा नियम आहे बहुतेक नियतीचा

    ReplyDelete
  7. अक्षरशः चक्रम पण अवलिया माणूस म्हणजे धनंजय कुलकर्णी ! रेकॉर्डमध्ये नोंद होण्यासाठी, नागपूरला आमच्या धरमपेठ शाळेच्या इमारतीवरून त्याने उडी मारली होती , हे मला आजही नीट आठवतंय !
    झपाटलेल्या ध्येयवेड्या विक्रमादित्याला सलाम !

    ReplyDelete
  8. Khup Sunder Dada

    ReplyDelete

Post a Comment