नितळ...

काही माणसं आपल्या लक्षात का राहतात या प्रश्नाला ठोस उत्त्तर नाही. सहवास, गरज, नातं, मैत्री यातलं काहीच नसताना ती उगाचंच मनात घर करतात. व्यक्तीमत्व, परिस्थिती यात समान म्हणावं असं काही नसतं. त्यांच्याविषयीच्या घटनाही महत्त्वाच्या नसतात. असं वाटतं की औपचारिकतेचा पडदा बाजूला सरून नितळ दर्शन झालं की ही नाळ जुळत असावी.

बाजीराव रोडवर नवा विष्णू मंदिराच्या शेजारी एक तांदुळाची वखार होती. अजूनही आहे. तिथे मावळातले अनेक शेतकरी आपापल्या शेतातला भात सडायला आणायचे. वखारीत पोती उतरवून दिवसभर तांदुळाचा नमुना घेऊन विक्रीसाठी फिरायचे. वर्षाचा तांदूळ एकदम विकत घ्यायची पद्धत खूप घरांमध्ये होती. चांगला तांदूळ स्वस्त आणि घरपोच मिळतोय म्हणून गिऱ्हाईक खूश आणि आपला माल एकदम खपतोय म्हणून शेतकरी खूश.

या वखारीतलेच एक तांदूळवाले आमच्या घरी यायचे. तांदूळवाले हे नाव आम्ही ठेवलेलं. त्यांचं आडनाव होतं दारवटकर. वर्षातून एकदोनदा या दारवटकरांची आमच्याकडे चक्कर असायचीच. वेल्ह्याच्या परिसरात कुठेतरी त्यांचं गाव होतं. अगदी आडबाजूचं खेडेगाव. अशा खेड्यापाड्यांकडून शहरात येणाऱ्या गावकऱ्यांमध्ये त्या काळी विलक्षण बुजलेपण, अवघडलेपण असायचं. हा भाव मी सर्वप्रथम या तांदूळवाल्यांच्या चेहऱ्यावर पाहिला.

गावाकडची काटक अंगयष्टी. वय पन्नाशीच्या आतबाहेर. उन्हात काम करून रापलेला मूळचा सावळा वर्ण. खुरटी काळीपांढरी दाढी. डोईवर मुंडासं, अंगात पट्टीचा पांढरा झब्बा आणि लाल काठाचं मातकट धोतर. घरी आले की आधी मुंडासं काढून घाम पुसायचे. मग ओसरीवर बसावं तसं भिंतीला पाठ टेकून गुडघे वर करून त्यावर हाताची मिठी घालून बसायचे. ते कधी खुर्चीत किंवा कोचावर बसल्याचं मला आठवत नाही. पाणी प्यायला तांब्या भांडं दिलं की भांडं बाजूला ठेवून तांब्याने थेट घशात पाणी ओतायचे. घशातून गटगट आवाज येत राहायचा. पूर्ण रिकामा झाल्याखेरीज हातातला तांब्या खालीच यायचा नाही. मग ढेकर देत मिचमिच्या डोळ्यांनी भाबडं हसायचे. त्यांना छोट्या छोट्या गोष्टींचंही अप्रुप वाटायचं. टिव्ही, रेडिओ, घड्याळ अशा वस्तुंकडे लहान मुलांनी खेळण्यांच्या दुकानात काचेपलीकडून पहावं तसं बघत राहायचे. पण त्या पाहण्याला ‘हे आपल्याकडे नाही’ या भावनेचा स्पर्शही नसायचा. होतं ते एक छान निरागस कुतूहल.

मग तांदुळाच्या किमतीची बोलणी चालू होत. गावाकडचे झाले म्हणून ते काही व्यवहारात कच्चे नव्हते. शहरी माणसांसारखे निर्ढावलेले नव्हते एवढंच. म्हणूनच या चर्चेला गावरान तांदूळासारखाच गोडवा असायचा. आम्ही आणि ते दोघांनाही एकाच वेळी आपण फसवले जातोय असं वाटायचं आणि फायद्यात आहोत असंही वाटायचं. शहरी चातुर्य आणि गावठी बेरकीपणा यांची ती चढाओढ असायची. या रस्सीखेचीत कधीकधी एक पाऊल मागे घेताना ते गोड हसायचे. जरा वेळ गप्प बसायचे. आणि अचानकपणे आपल्याला यातलं काहीच कळत नाही असा चेहरा करून, ‘आता द्याऽऽ तुम्हीच काय ते समजून...’ असा गावठी डाव टाकायचे. आपलं भाबडेपण व्यवहारामध्ये कसं वापरावं हेही त्यांना ठाऊक असावं. मग कोणत्यातरी बोलीवर एकमत व्हायचं. मान हलवत निघून जायचे. आणि एक दोन दिवसात घरी तांदुळाचं पोतं पोचतं व्हायचं.

एकदा कसा कोण जाणे त्यांच्या गावाचा विषय निघाला. चेष्टेत सहज बोलून गेले, ‘या की आमच्या खेड्याकडं...’ आम्ही ते आमंत्रण मनावर घेतलं. हे मात्र त्यांना अपेक्षित नसावं. शहरातली ही पांढरपेशी माणसं आपल्याकडे खेड्यातल्या घरी येणार म्हणतायत हे पाहून बोलायचे थांबले. हो म्हणावं तर अवघडल्यासारखं होतंय आणि नाही म्हणावं तर मनाला पटत नाही अशा विवंचनेत पडले. ‘आमच्या गावाकडं वीज नाही, रस्ता लई खराब आहे, आमचं साधं जेवन चालनार का?’ अशा बऱ्याच सबबी सांगून त्यांनी शेवटी पातळ घोगऱ्या आवाजात विचारलं, ‘मंग कधी येता?’

दिवस ठरला. आम्ही उत्साहाने त्यांच्या गावी पोचलो. ती सहल आजवर स्मरणात राहिली आहे. छोटसंच कौलारू घर. पुढे मागे सारवलेलं अंगण. अवतीभवती झाडं. कोंबड्यांचा पकपकाट. एखादा पाण्याचा ओहोळ. गावात वीज नावालाच होती. तांदूळवाल्या दारवटकरांचं स्वतःच्या घरी यजमान म्हणून दिसलेलं हे रूप वेगळंच होतं. त्यांचं ते बुजलेपण कुठच्या कुठे पळालं होतं. त्या जागी एक कर्ता पुरूष जातीने काय हवं नको ते विचारत होता. आमच्या अतिथ्यात कुठेही काही कमी पडू नये याची परोपरीने काळजी घेत होता. आपल्याकडे शहरातले पाहुणे आले आहेत याचं त्यांना केवढं कवतिक. आजुबाजूच्या सगळ्या वाड्यावस्त्यांमध्ये त्यांनी याची जाहिरात केली होती. आपण शहरी माणसं ग्राहकाच्या भेटीच्या प्रत्येक क्षणाचा व्यावसायिक फायदा कसा करून घेता येईल याचा विचार करतो. पण यांच्या स्वभावात हे खातंच नव्हतं. आतबाहेर असं काही नव्हतंच त्यांच्यात. आम्ही मुलं त्या सारवलेल्या अंगणात खेळताना पाहून त्यांना मजा वाटत होती. जेवण अतिशय साधं पण कमालीचं चविष्ट. चुलीवरच्या भाकरीबरोबर खाल्लेली पावट्याच्या उसळीची चव तर मला आजही आठवते.

आम्ही त्यांना भेट द्यायला म्हणून एक गजराचं घड्याळ घेतलं होतं. त्याचे काटे अंधारात चमकणारे रेडियमचे होते. ते हाती ठेवल्यावर त्या निरागस चेहऱ्यावर आनंद, अवघडलेपण, यांचं मोहक मिश्रण पसरलं. काहीतरी अमौलिक वस्तू लाभावी तशा कौतुकाने ते घड्याळाकडे पहात राहिले. अशी काही भेटवस्तू द्यायची असते वगैरे शहरी औपचारिकता त्यांना कधी शिवलीच नसावी. त्यामुळे आता काय करावं हे कळत नव्हतं. मिचमिच्या डोळ्यांनी गोड हसत राहिले.

यानंतर एकदोन महिने गेले असतील. दुपारी दार वाजलं. घरी मी एकटाच होतो. दार उघडलं तर समोर तांदूळवाले. आत या म्हणालो तर ते नाही म्हणाले. त्यांच्याकडे फारसा वेळ नव्हता. ट्रकमधून गावी परत जायची घाई होती. काही क्षण तसेच अवघडून दारातच उभे राहिले. एक हात पिशवीत गुंतलेला होता. आपण करतोय हे योग्य की अयोग्य याचा त्यांना अंदाज येत नव्हता. बोलण्यासाठी शब्दही सापडत नव्हते. अखेरीस त्यांनी आपल्या पिशवीतून काहीतरी काढलं. ‘तुम्ही समदे एवढं आमच्या घरी आल्ता... आमी तुमाला काहीच दिलं नाही...’ अशा अर्थाचं काहीतरी अडखळत बोलले. आणि मी पुढे केलेल्या हातांवर दोन स्केचपेनं ठेवली. त्या भाबड्या गावकऱ्याने दिलेली ती रिटर्न गिफ्ट होती. पुन्हा एकदा मिचमिच्या डोळ्यांनी हसले. जिना उतरून निघून गेले.

बस्स ! एवढेच ते तांदूळवाले दारवटकर. नंतर हळुहळू त्यांचं येणं थांबलंच. आता मला त्यांचा चेहराही अंधूकसाच आठवतोय.

व्यक्तीमत्वाच्या साऱ्या ठळक रेषा नितळ स्वभावात विरघळून जातात हेच खरं...


...प्रवीण जोशी
98505 24221
pravin@pravinjoshi.com


Comments

  1. डोळ्यासमोर लख्ख उभे राहिले तांदूळ वाले दरवाटकर.... अप्रतिम

    ReplyDelete
  2. खरंच.... तांदूळवाले ही व्यक्ती उभी राहिली डोळ्या समोर ..... 👌छान च लिहितोस ..

    ReplyDelete
  3. वा फारच छान
    लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या.

    ReplyDelete
  4. मस्त....शेवट एकदम खास

    ReplyDelete
  5. कारुण्याचा सूर लागण्याच्या आत, व्यक्तिचित्राचा समारोप करण्याचं कसब तर साधलं, पण त्याच्या अपरिहार्य अपेक्षेला कसा न्याय देता येणार हा प्रश्न मला पडतो आताशी... रवी कुलकर्णी

    ReplyDelete
  6. नामांकीत

    ReplyDelete
  7. खूप छान आणि प्रभावाने ते व्यक्तिमत्त्व डोळ्यासमोर आलं. जणू काही आपणही यांना भेटलोय असं वाटलं. शेवट गोड झालाय.

    ReplyDelete
  8. खूप छान वर्णन. आपणही यांना भेटलोय असं वाटलं. शेवटही छान झालाय

    ReplyDelete
  9. छान लिहिलं आहे
    वर्णन मस्त

    ReplyDelete
  10. कमालीचं निरीक्षण आणि ते लेखणीतून उतरवण्याची कमाल! वा!

    ReplyDelete
  11. Vaa.Pravnya Pustak kadhaych manavar ghe.Lavkarat lavkar.

    ReplyDelete
  12. काय लिहू, लिखाण, मांडणी सगळं उत्तमच..
    - संजीव

    ReplyDelete

Post a Comment