भूक...
मी त्यांचं नाव सांगणार नाही. आणि तुम्ही ते ओळखावं अशी अपेक्षाही नाही.
खूप
वर्षांपूर्वी आमच्या घरी नेमकं दुपारी जेवायच्या वेळेत एक गृहस्थ यायचे. नातंगोतं
काहीच नाही. ओळखही अगदी आहे-नाहीच्या काठावरची.
ते आले की जेवल्याशिवाय जायचेच नाहीत. आमच्याकडे यायचा उद्देशच मुळी दुपारची वेळ
भागवण्याचा असे. ‘सहज इकडे आलो होतो म्हणून तुमच्याकडे वळलो...’ अशीही काही बतावणी
नसे. महिन्यातून तीनचार वेळा तरी त्यांचं येणं व्हायचं. का कोण जाणे त्यांना
झिडकारणं आम्हाला कधी जमलं नाही; तशी इच्छाही झाली नाही.
आमच्या घरी अनेक कलाकार, हौशी लोकांचा राबता असायचा. त्यात हे कधी येऊ लागले स्मरत नाही. पण त्यांचं व्यक्तीमत्व आजही लख्ख आठवतंय. उंची पाच फुटाच्या आतबाहेर. स्थूल पण बेढब नाही अशी अंगकाठी. पातळ पांढरे विरळ केस. वर्ण उन्हातान्हाने रापलेला. मोठे पाणीदार डोळे. भलंथोरलं नाक. पांढऱ्या भुवया. जाड ओठ. गोल मोठा ठसठसशीत चेहरा. तेव्हा वय असेल सत्तरीच्या आसपास; पण हा माणूस तारुण्यात उमदा सुंदर दिसत असावा. आता वयोमानानुसार चालणं अडखळतं झालेलं. पण बोलणं मात्र अस्खलित, अगदी तालीमबाज नटासारखं. गुढग्याखाली पोचणारी हाफ पँट आणि कुणीतरी दिलेला ढगळ मळका शर्ट. पायात चपला नसायच्या. खांद्यावर झोळणावजा पिशवी. हातात क्वचित काठी असायची.
त्यांना
आम्ही कोणत्याच नावाने हाक मारत नसू. काका म्हणावं तर वय जास्त. शिवाय एवढी
जवळीकही नव्हती. ती करण्याची आमची इच्छाही नव्हती. खऱ्या नावाने हाक मारणं शक्य
नव्हतं. त्यांना ‘तात्या, अप्पा, नाना’ असं काही टोपणनाव असलं तर ते माहीत नव्हतं.
पोटाची
खळगी भरण्यासाठी ते असे अजूनही चार घरी फिरत असावेत. माधुकरी किंवा भिक्षाच ही एक
प्रकारची. त्यांच्या संपूर्ण व्यक्तीमत्वावर केवळ भूक आणि भूकच व्यापून उरलेली असे.
आमच्याकडे जेवायला मिळेल हा विश्वास वाटायचा. वेळ साधून आलेत म्हटल्यावर जेवायला
वाढावंच लागायचं. दोनतीन पोळ्या आणि असेल ती भाजी मागून घ्यायचे. मचामचा आवाज करत
भराभर जेवायचे. तांब्याभर पाणी पिऊन तृप्त ढेकर द्यायचे. आपल्या मोठाल्या डोळयांनी
घराकडे एकवार समाधानाने पाहायचे आणि निघून जायचे. हा माणूस अनेक वर्ष माझ्यासाठी एक
कोडं होता. त्यांचं येणं कपाळावर नाखुशीची आठी चढवणारं असे. माझे वडील यांची एवढी
खातीरदारी का करतात हेच कळेनासं होई. पण एकदा या सगळ्याचा अंधूकसा उलगडा झाला. आणि
नाखुशीची जागा आदरयुक्त कुतूहलाने घेतली.
हे गृहस्थ पूर्वी एका नामवंत संगीत नाटक कंपनीत नोकरीला होते. जुन्या काळी कलाकार नाटक कंपनीत नोकरीलाच असत. त्यात हे उभरते नट होते. पण स्वातंत्र्यकाळाच्या आधी अचानकपणे अनेक नाटक कंपन्या डबघाईला आल्या. मोठमोठ्या संस्थानिकांनीही ज्यांच्या ऐश्वर्याचा, लोकप्रियतेचा हेवा करावा अशा संस्थांची एका रात्रीत पडझड झाली. प्रचंड तेजीत चाललेला हा व्यवसाय अचानकपणे उतरणीला लागला. वावटळच एक प्रकारची. या नाटक कंपन्यांवर पोट अवलंबून असलेल्या सामान्य कलाकारांसाठी हे अघटितच होतं. त्यांची दारूण वाताहात झाली. त्यातल्या काही चतूर मंडळींनी वेळीच काळाची पावलं ओळखली आणि आपापली आयुष्य सावरली. पण नाटक आणि वास्तव यात गल्लत झालेल्या अशा काही वेड्या कलाकारांची मात्र विचित्र फरफट झाली. ते अजूनही भाबडेपणाने मनात आशा धरून होते. काळ पायाखालून वाळूसारखा निघून चालला आहे याचा त्यांना पत्ताच नव्हता.
आमच्याकडे
येणारे हे भुकेले नट त्यातलेच. दैवी कलाकारालाही दुपारची वेळ चुकली नाही हे
त्यांना कळलं होतं पण तोपर्यंत आयुष्याची संध्याकाळ झाली होती. कलाकाराला कालची
टाळी आजही हवी असते; पण त्या टाळीमुळे पोळी मिळत नाही. ते नट म्हणून किती मोठे होते
हे मला माहित नाही. उगाच कौतुक करण्यात अर्थही नाही. त्यांनी एक विलक्षण काळ
पाहिला होता हे मात्र निश्चित.
मधूनच
कधीतरी झोळण्यातून जुने विटलेले फोटो काढून दाखवायचे. अक्षरशः पोपडे उडालेले, पिवळे
पडलेले फोटो. यांच्या लेखी तो सोन्याचा खजिनाच होता. अस्तंगत झालेल्या एका लोकप्रिय
नाटक कंपनीच्या आठवणी होत्या त्या. काही भल्या काही बुऱ्या. त्या सांगताना, कंपनीच्या
मालकांबद्दल बोलताना त्यांचे पाणीदार डोळे भरून यायचे. ‘या महान कलाकारानं आम्हाला
जगवलं...’ असं म्हणत फोटोला वारंवार नमस्कार करायचे. आपण त्या काळाचे साक्षीदार
आहोत हेच त्यांच्या आयुष्याचं संचित होतं. त्यापुढे भूक क्षुल्लक होती. म्हणूनच की
काय, त्यांच्या भुकेजल्या चेहऱ्यावर कधीच अजीजी दिसली नाही. आपण असं दारोदारी मागून
जेवलेलं आपल्या मालकांना आवडणार नाही याची मनात कुठेतरी टोकदार जाणीव असावी. पण कलाकाराचा
पडता काळ पाहून लोकांनी त्याला पोसलंच पाहिजे असंही वाटत असावं. संकोच आणि हक्क यांचं
विचित्र मिश्रण वयाच्या या शेवटच्या टप्प्यावर त्यांच्यात उतरलं होतं.
त्यांना
म्हणे नाटक कंपनीच्या मालकांनी विपरित काळी विश्वास दिला होता, ‘ही अवघड वेळ
जाऊदे... माझ्या गाजलेल्या भूमिका तूच करशील.’ पण काळ नावाचा नाटककार वेगळंच काही घडवत असतो.
मालकच अकाली स्वर्गवासी झाले. मालकांच्या त्या एका वाक्याने यांचं आयुष्य मात्र होतं
तिथेच थांबलं, थिजलं. प्रत्येकाच्या एंट्री एक्झिटची वेळ ठरलेली असते. मालक निघून
गेले पण यांच्या एंट्रीची वेळ कधी आलीच नाही. नाटक संपलं तरी विंगेत तसेच ताटकळत
उभे राहिले.
याला भाबडेपणा
म्हणा, खुळेपणा म्हणा पण कलेची आसक्ती; व्यवहारात जगण्यासाठी सर्वस्वी निरुपयोगी अशा
देणग्या देत असते. त्या जपत हा माणूस जगत होता. हरपलेलं काही शोधू पाहात होता. त्यातला
फोलपणाच त्यांच्या जगण्याचा आधार झाला होता. आमच्या घरी हार्मोनियम होती.
तिच्याकडे ते एखाद्या राहून गेलेल्या स्वप्नाकडे पहावं तसे पहायचे. मग माझ्याकडे बघायचे.
त्या वेळी त्यांचे डोळे वाचणं फार मुश्कील असे. आयुष्याचे सारे अंक संपले होते तरी
डोळ्यात काहीतरी चमक होती. खूप काही सांगायचं असावं पण त्यासाठी शब्द नव्हते. आशीर्वाद
द्यायचा असावा पण तो अधिकार आपल्याला आहे की नाही याबद्दल मनात साशंकता होती.
मधल्या काळात
यांनी जगण्यासाठी काय केलं कोण जाणे. कुटूंब, नातेवाईक असतीलच; पण चेहऱ्यावरून
दिसायचं की सारी वाताहात झाली आहे. एक मुलगा होता म्हणे. त्याबद्दल कधीच काही
समजलं नाही. मीही ते विचारण्याच्या वयात नव्हतो. ते आमच्याकडे यायचे अचानकपणे बंद
झाले. अखेरीस त्यांनी एका तीर्थक्षेत्राचा आधार घेतला होता असं समजलं. पुढे काय
झालं माहीत नाही.
आपण
कलाकारांच्या विफल आयुष्यांच्या कथा ऐकतो. लौकिक जगात त्यांनी काय गमावलं याचीच ती
उजळणी असते. पण त्याच्या दुसऱ्या बाजूचं अंधूकसं दर्शन मला झालं. यांची कुणाबद्दलच
काही तक्रार नव्हती, ना कुठला खेद. उरली होती ती फक्त भूक. ती माणसाला लाचार बनवते,
विचारही शिकवते. यांनी ही दोन्ही दानं घेतली नव्हती. भूकही दुपारच्या अन्नाची होती
का सरलेला काळ परत आणण्याची ती अतृप्ती होती हे मी अजूनही ठरवू शकलेलो नाही. जरा संदर्भ
समजले की कलाकाराच्या आयुष्यावर यशापयशाचे शिक्के मारणं सोपंच असतं. म्हणूनच मी
त्यांचं नाव सांगणार नाही. तुम्ही ते ओळखावं अशी अपेक्षा नाही.
आणि... नावच न झालेल्या कलाकाराचं नाव सांगायचं तरी कसं?
...प्रवीण जोशी
98505 24221
pravin@pravinjoshi.com
हृदयस्पर्शी ! 😢
ReplyDeleteचांगलं लिहिलं आहेस रे...👍
ReplyDeleteKhupach sunder.....
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteमनाला भिडणारं लिखाण
गलबलून आलं
Deleteभावनिक व्यवहार, व्यावहारिक भावना हे सगळं एकाच वेळी नांदत असतं. फक्त आपण कुठल्या ठिकाणी आणि पातळीवर आहोत यानं संदर्भ व श्लेष बदलतात. एकाच व्यक्तीचा एका क्षणाचा करारी मुखवटा दुसर्या ठिकाणी दयनीय असू शकतो. दुसर्याचं कशाला, आपण स्वत:ही या दुटप्पी भूमिका युक्तीयुक्तीनं जगत असतोच. जसं आपण कुणा भूकबळीला निरखत असतो, तसंच आपल्यालाही कोणीतरी नीट पहात पाहू शकत असणं एवढं अशक्य नसतं. चमत्कारिक बाब अशी आहे, की आपण स्वत:ला इतके ओळखत असूनही त्या दुसर्या कुणाकडे सराईत तटस्थपणे पहाणारे आपण स्वत:ला तितक्या तटस्थपणे पहायला अनुत्सुक असतो. सरतेशेवटी, तिर्हाईत व्यक्ती आपल्यासाठी शीतळच असल्यानं तिचं निरिक्षण, विश्लेषण, करणं सुलभ असतं. स्वत:कडे अशाच नजरेनं पहाण्यासाठी एक असामान्य धैर्य लागतं, ज्याची वानवाच असते.
ReplyDeleteParat ek sundar likhan
ReplyDeleteखूपच छान लिहिलंय, मन आणि डोळे भरून आले त्या अनाम कलाकाराला 🙏🙏🙏
ReplyDeleteप्रविण अफलातुन अनेक चेहरे नज़रे समोर उभै केलेस
ReplyDeleteAs usual THE BEST ,,,, Chandrakant Ronghe...
ReplyDeleteExcellent and very touching.
ReplyDeleteAnand
खूप छान! मनाला भिडणारं लिखाण आणि हे अनोळखी अनोखं व्यक्तिमत्त्वही!
ReplyDeleteTouching !😔🙏
ReplyDeleteआधुनिक काळातील एक सबंध कला जीवन अशा भाबडया भुकेने भरलेले आहे. अव्यवहारी पणा म्हणा का समाज आपली कधीतरी ओळखून आपल्याला डोक्यावर घेईल अशी सुप्त आशा…भोळसटपणाचा कहर वाटतो कधी, तरी एक गम्भीर प्रश्न सोडून जातो…हे सगळं कोणत्या मूल्यांसाठी?.
ReplyDelete-निखिल
खरंच डोळ्यात पाणी आलं वाचून. कलाकारांना व्यवहार जमायचा नाही आणि व्यवहारी लोकांना कलाकार समजायचा नाही असा काळ होता मध्यंतरी. आताचे काही कलाकार तरी स्मार्ट झालेत हीच त्यातल्या त्यात जमेची बाजू म्हणायची. माझे गाण्याचे गुरूजीसुद्धा असेच होते. त्यांची फार आठवण झाली आज
ReplyDeleteनेहेमीप्रमाणे कमाल लिखाण .... आणि जुन्या काळातल्या भाबड्या कलाकाराच्या जीवनाची दाहकता समजावणारा लेख... सुंदर...
ReplyDelete- संजीव मेहेंदळे.