टेपरेकॉर्डरचा डॉक्टर...
‘काकाऽऽ अहो केव्हा होईल हा दुरूस्त? चार महिने होत आले आता.’
मी पोटतिडकीने विचारत होतो. समोर आमचा टेपरेकॉर्डर बिचारा; बटणं इकडे,
स्पीकर तिकडे अशा छिन्नविछिन्न अवस्थेत पडला होता. मला त्याकडे बघवत
नव्हतं. पण काका या नश्वर दुनियेकडे पाठ करून एका रेडिओला संजीवनी देण्यात गुंतले
होते. निष्णात डॉक्टर एका पेशंटची नाडी तपासताना दुसऱ्या पेशंटकडे निर्विकारपणे
पाहतात तशा चेहऱ्याने ते माझ्याकडे आरपार अनोळखी बघत होते.
‘सांगा ना...’ मी रेटा लावला. आज मी सरपे कफन बांधे हुए आलो होतो. तेवढ्यात
त्या रेडिओमधून खरखर ऐकायला आली. काकांचा चेहरा खुलला.
‘शूऽऽऽ रेडिओची खरखर ऐक. हिला म्हणतात व्हाईट नॉईज. मस्त. क्या बात है...
एक चहा पाठव रे.’ शेवटचं वाक्य समोरच्या अमृततूल्यवाल्यासाठी होतं.
‘अहो पण आमच्या टेपरेकॉर्डरचं काय?’
‘त्याचं काय?’
‘दुरूस्त करा नाऽऽ’
‘च्... तुम्ही मुळात बिघडवता कशाला? वस्तू वापरता
येत नाहीत धड आणि खराब झाल्यावर माझ्याकडे येता.’ काका माझ्यावरच डाफरले. नुकत्याच
जन्म झालेल्या मुलाकडे वारंवार कौतुकाने बघावं तसं काका त्या प्राचीन रेडिओकडे
पाहात चहाचे घोट घेऊ लागले. मध्येच मला विचारलं, ‘आणलाय का?’
‘काय?’
‘तुझा टेपरेकॉर्डर’
‘अहो, हा काय. तुमच्याचकडे खोलून पडून आहे. चार महिने
झाले.’
‘हॅः या रेडिओला तर सहा महिने झाले येऊन. झाला ना पण दुरूस्त? याचा मालक विसरलासुद्धा असेल एव्हाना याला’ आपल्या बोलण्यात काही तारतम्य
नाही याचा काकांना पत्ताच नव्हता.
साधारण पंचाऐंशी नव्वदचा काळ होता तो. टेपरेकॉर्डर, रेकॉर्डप्लेअर,
टिव्हीसारख्या वस्तू नुकत्याच घरोघर रुळत होत्या. कधी नीट चालायच्या
तर कधी रुसून बसायच्या. त्यांच्या देखभालीसाठी त्याकाळी आजच्यासारखी ऑथोराइज्ड
सेंटर्सची भानगड नव्हती. ‘येथे इलेक्ट्रॉनिक उपकरणे खात्रीलायकरित्या दुरूस्त करून
मिळतील. प्रोप्रायटर अमुकतमूक. सोमवारी बंद’ अशा दुकानांवरच सारी भिस्त असायची.
माझ्या वडिलांना टेपरेकॉर्डर, ग्रामोफोन अशा वस्तूंची भारी
आवड. या वस्तू घरात आल्या आणि पाठोपाठ या अजब वल्लीची ओळख झाली. ‘घायाळ काका.’
घायाळ हे त्यांचं आडनाव. मीही हे आडनाव नंतर कधीही कुणाचंही ऐकलेलं नाही.
ते असो...
त्या दिवशी मी वैताग, त्रागा, चिडचिड
ही वळणं पार करून थेट रडकुंडीच्या घाटात पोचलो होतो. यांच्याकडे असंच होतं हे
माहित असूनही माझे वडिल वस्तू इथेच दुरूस्तीला का टाकतात याचा मला प्रचंड राग आला होता.
पण बोलता येत नव्हतं. दोघंही वयानं मोठे. एकमेकांचे दोस्त. मी मधल्यामध्ये पिसला
जात होतो. त्या पसाऱ्यातच आमच्या टेपरेकॉर्डरच्या उशाशी उकिडवा बसून मी विचारलं.
‘काका, याला
झालंय काय ते तरी सांगा.’
‘बेल्ट गेलाय.’ काकांनी डोळे बारीक करत आठवून सांगितलं.
‘मग मिळत नाहीये का?
‘मिळतो की’
‘मी आणून देऊ का कुठून?’ मी
हेका सोडला नाही.
‘कशाला? माझ्याकडे आहेत की वाट्टेल तेवढे.’ काकांनी
कॅलेंडरच्या खिळ्याला टांगून ठेवलेल्या, छोट्या रबरी बेल्टस्ने
भरलेल्या पिशवीकडे बोट दाखवलं.
‘अहो, बसवा ना मग’ मी उठलो आणि ती पिशवी काढली.
आता मात्र काकांचा नाईलाजच झाला. ‘चल, घे तिथला स्टार हेड स्क्रू
ड्रायव्हर’ काकांनी फर्मावलं. मी निमूटपणे आज्ञेचं पालन केलं.
‘हं. आता खोल ती ॲसेम्ब्ली.’ त्यांनी मलाच कामाला लावलं होतं.
सर्कशीतल्यासारख्या छोट्याशा स्टूलावर बसून डाव्या पायावर उजवा पाय टाकत, हातात चहाचा कप खेळवत काका हुकूम सोडत होते. ‘ते चार स्क्रू काढ आणि
फटीतून बेल्ट सरकव आत... नीऽऽट’ असं करत ते नाजूक ऑपरेशन त्यांनी माझ्याकडूनच
करवून घेतलं. पुढच्या वीस मिनीटात आमचा टेपरेकॉर्डर गायला लागला होता. मी खूष
झालो. माझ्याकडे त्रासिकपणे बघत काका म्हणाले, ‘बघ. एवढं
सोप्पं होतं. उगाच माझे चार महिने खाल्ले. जा आता...’ मी निमूटपणे हातात तो
टेपरेकॉर्डर घेऊन दुकानाची पायरी उतरलो.
घायाळ काका इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुरूस्तीसाठी प्रसिद्ध होते. तेव्हा या
क्षेत्राची चलती होती. आजच्या सॉफ्टवेअर इंजिनिअर्सप्रमाणे यातले तंत्रज्ञ
वेगळ्याच जगात असल्यासारखे वागायचे. पण घायाळ काका वेगळे होते. त्यांना आपल्या
ज्ञानाबद्दल प्रचंड आत्मविश्वास होता मात्र किंचितही ताठा नव्हता. कामात हुशार तर
होतेच पण हुशारीबरोबर येणारे सारे तऱ्हेवाईक गुणही अंगी छान मुरले होते.
शनिवार पेठेतल्या एका वाड्याच्या दर्शनी भागात त्यांनी हा उद्योग मांडला
होता. नीटनेटकेपणा आणि काका यांचं जन्मजात वैर. इतका शिस्तशीर बेशिस्त माणूस मी
आजवर पाहिलेला नाही. पसारा म्हणजे काय याचं उत्तर त्या दोनतीन खणांच्या जागेत
पसरून राहिलेलं असायचं. टेबल, खुर्च्या, जमीन
हे सारं असंख्य उपकरणांनी व्यापून राहिलेलं. साऱ्या वस्तू खोलून ठेवलेल्या. कुठे
एखाद्या रेकॉर्डरचा कोथळा बाहेर आलाय, कुठल्या रेडिओचा काटाच
लोंबतोय, फार तर दुभत्याचं कपाट म्हणून वापरता येईल अशा
अवस्थेतलं एखादं टिव्हीचं खोकं... भिंतीवरच्या खुंट्यांवर वायरींची भेंडोळी
टांगलेली, कोनाड्यांमध्येही असंच काय काय कोंबून ठेवलेलं.
एकूणात सरकारी इस्पितळातल्या जनरल वॉर्डसारखं दृष्य. त्या जगड्व्याळ पसाऱ्यातून
काकांना नेमकी हवी ती वस्तू कशी काय सापडते हे कोडंच पडायचं. ठिकरीपाणी खेळावं तसं;
त्यातल्या त्यात रिकाम्या जागेवर पाऊल ठेवत; स्क्रू,
स्प्रिंगांच्या टोचण्या सहन करत काकांपर्यंत पोचावं लागे. म्हणजे जर
ते दुकानात हजर असतील तर.
यांच्याकडे बिघडलेली वस्तू घेऊन गेलं की; काय झालं कसं झालं वगैरे
विचारण्याच्या फंदात न पडता ते प्रथम स्क्रू ड्रायव्हर घेऊन ती वस्तू उघडून
ठेवायचे. हे गिऱ्हाईकाला अडकवून ठेवण्यासाठी नसायचं.
लहान मुलांना कसं बाहुलीच्या झिंज्या उपटल्याशिवाय; तिच्या
गालांवर चित्रकला केल्याशिवाय ती सुंदर दिसत नाही तसंच काहीसं घायाळ काकांचं या
उपकरणांबाबत होतं. पण वस्तू हातात घेताक्षणी काय झालंय हे त्यांच्या लक्षात आलेलं
असे. आपण काही बोलेपर्यंत ते पूर्ण कुंडली सांगायचे. ही वस्तू काकांशिवाय दुसरं
कुणीच दुरूस्त करू शकणार नाही असा विश्वास यायचा. आता मुद्दा एवढाच उरे की ती
दुरूस्त कधी होईल? खरं तर आजुबाजूचा पसारा पाहून हा प्रश्न
विचारण्याची हिंमतच व्हायची नाही. त्या पसाऱ्यात आपल्याही वस्तूची भर पडणार आहे
याचंच विचित्र दडपण यायचं.
उंचीने मध्यम. जरासे स्थूल. गोल गोरा चेहरा. मोठी जाड मिशी. डोक्यावर
केसांनी अकाली माघार घेतलेली. नीटनेटका हाफ शर्ट आणि मळकी पँट. सतत उत्साही
आणि आनंदी. स्वतःवरती बेहद्द खूष. मोठ्ठ्या खणखणीत आवाजात कुणाशीही युक्तीवाद करायला सतत तयार. पण कसेही
वागले तरी त्यांचं कुणाशी भांडण झालेलं मी तरी पाहिलं नाही. एक न सांगता येणारा
लोभसपणा होता त्यांच्यात. लोक वारंवार येऊन दुरूस्ती कुठवर आलीय याची चौकशी करत.
पण काका त्यांना आपल्या भन्नाट वाक्चातुर्याने वाटेला लावत. अशा गिऱ्हाईकांचा तर
एक क्लबच तयार झाला होता. दुकानात काका नसतानाही तिथे कुणी ना कुणीतरी चहा पित
बसलेलं दिसायचं. काकांचा फॅनक्लबच तो. आयसीयूमध्ये असलेल्या पेशंटस्चे नातेवाईक
एकमेकांत बोलतात तशी ही मंडळी आपापल्या वस्तूचं कसं अन् काय बिघडलंय ते एकमेकांना
सांगत बसायची. काका कुठल्यातरी भलत्याच गडबडीत हरवलेले. इतकी लगबग करूनही या
माणसाची कामं वेळेवर का आटपत नाहीत हा प्रश्न एकालाही कधीच पडला नाही. उलटपक्षी
वस्तू उशीरा देण्याच्या गुणाचंच कौतुक जास्त होई. ‘घायाळ वस्तू उशीरा देतील पण काम
कसं शंभर नंबरी...’
असा सगळा आनंद होता. पण यातली गंमत समजायला त्या काळातच जन्म घ्यायला
पाहिजे. छान शांत संथ काळ होता तो. टेपरेकॉर्डर आजच्या
मोबाईलसारखा जीवनावश्यक झालेला नव्हता. जमाना ‘यूज ॲण्ड थ्रो’चा नव्हता. त्यामुळे
उपकरणं आणि माणसंही वर्षानुवर्ष छान सामंजस्याने वागायची. व्यावसायिक स्पर्धा तर
असणारच. पण काका सर्वात भारी होते हे निर्विवाद. त्यांनी यथावकाश धनकवडीत घर
बांधलं. शनिवार पेठेतलं दुकान घराच्या गच्चीत हललं. पण बदल असा काहीच झाला नाही. आम्ही
शनिवार पेठेऐवजी धनकवडीत जायला लागलो एवढंच. बाकी पसारा तोच, काम करण्याची पद्धतही तीच.
त्यांच्याकडे एक जुनी एम-एटी गाडी होती. त्यावरून ते गावात येऊन साहित्याची
खरेदी करत. कधीही मनात आलं की याच गाडीवरून ते थेट रत्नागिरीला जात. एकदम
दोन तीन आठवड्यांनी उगवत. इकडे ग्राहकमंडळी अत्यवस्थ. याच दरम्यान त्यांनी
स्वतःच्या ब्रँडचा टेपरेकॉर्डर आणि काय काय बनवून विकायला सुरवात केली होती. ‘आपण
क्वालिटीमध्ये फिलीप्सलाही मागे टाकू शकतो’ असं हसत हसत म्हणायचे. त्यामागे
जबरदस्त विश्वासही होता. कामाचा झपाटा वाढत होता.
पण असं सगळं छान चालू असताना; काकांनी या व्यवसायातून अचानकपणे
निवृत्ती घेऊन रत्नागिरीला शेती करण्याचा निर्णय घेतला तेव्हा मात्र कुणाला काय
बोलावं सुचलंच नाही. गिऱ्हाईक क्लब तर हिरमुसलाच. काकांच्या स्क्रू ड्रायव्हरचा
स्पर्श लाभलेल्या अनेक टेपरेकॉर्डर्सनी काही मिनीटं मौन पाळलं...
काकांच्या ब्रँडच्या काही वस्तू आजही माझ्याकडे आहेत. खणखणीत वाजतायत.
नंतरच्या काळात रेकॉर्डिंग्जच्या निमित्ताने अद्ययावत तंत्रज्ञानाशीही ओळख झाली.
अनेक आधुनिक उपकरणं पाहिली, हाताळली... आजही एखादं उपकरण मध्येच
रुसून बसतं. अचानक घायाळ काकांची आठवण येते. त्यांना हे सारं
सांगावसं वाटतं.
पण हा टेपरेकॉर्डरचा अवलिया डॉक्टर मला त्यानंतर आजतागायत कधीही भेटला
नाही.
...प्रवीण जोशी
98505
24221
pravin@pravinjoshi.com
नेहमी प्रमाणे बेतशीर
ReplyDeleteछान लिहिलं आहे
Deleteनिरीक्षण कौशल्य अफाट
आज आणखी एका अवलियाशी ओळख झाली! ही भेट घडवून आणल्या बद्दल धन्यवाद!
ReplyDeleteउत्तम
ReplyDeleteमस्त
ReplyDelete👌🙏
ReplyDeleteनजरेसमोर आले
ReplyDeleteखरंच पूर्वीची ही अतरंगी माणसे म्हणजे कमाल होती. जुन्या काळतील लोकांचा अशांशी सबंध असायचाच. मस्त वर्णन. दिल खुश हुवा.
ReplyDeleteटेपरेकॉर्डर प्रमाणेच मिक्सर दुरुस्ती साठी लक्ष्मी रोडवर अवलिया काका प्रसिध्द होते. गृहिणी ( आधीच्या अनुभवावरून ) नवाऱ्याला दुकानात पाठवीत असत. मिक्सर निष्काळजीपणे वापरण्याचे l लेक्चर कमी प्रमाणात मिळे.
ReplyDeleteसुमारे 20 वर्षांपूर्वी माझ्याकडे फिलिप्स ची थ्री इन वन सिस्टीम होती, जुनी झाल्यामुळे ती नीट दुरुस्त ही होत नव्हती. दोन मोठे स्पीकर्स छान होते. त्यामुळे जीव अडकला होता. त्या काळात सुमारे 3 महिने एक जर्मनी विद्यार्थी रहात होता. त्याला आपली मानसिकता माहित नव्हतीच.त्याने एका भारतीय मित्राला हाताशी धरून, पासोड्या विठोबा परिसरातून एक कॉम्पॅक्ट 3 इन 1 आणून, मला भेट म्हणून दिला. आजही त्याची दिलेली भेट माझ्या कडे आहे. काळाच्या ओघात कॅसेट आणि नंतर CD प्लेअर बंद पडले आहेत.रेडिओ अजूनही मला साथ देत आहे आणि जर्मन मित्राची आठवणही .!!
Chan lihileyas
ReplyDeleteउत्तम 👌👌
ReplyDelete