डील...
मित्रामित्रांमध्ये एक ‘डील’ असतं. एकमेकांशी कसं वागायचं
याचा छान समजुतीचा ठराव झालेला असतो. अगदी आतून, संपूर्णतः खाजगी. कुणी ठराविक
मित्र भेटला की त्याला आपण जन्मांतरीचं देणं लागत असल्याप्रमाणे चहा पाजायचा असतो.
तिथे अपील नाही. कुणाला भेटल्या भेटल्या टाळी हवी असते तर कुणाशी एखाद्या जुन्या घटनेचा
संदर्भ लावून बोलायचं असतं. यामागे काहीही लॉजिक नसतं. तिसऱ्या माणसाला त्यातली मजा सांगून समजणारही
नाही. मैत्री या सुंदर नात्यातला तो एक वय विसरायला लावणारा बालीश रिवाज असतो.
पशा आणि माझ्यात डील होतं, ‘परस्परांशी कधीही सरळ बोलायचं
नाही’. संवादात अर्ध वाक्य जरी कौतुकाचं आलं तर दोघंही अस्वस्थ व्हायचो. मग लगेच एकमेकांना
टाकून बोलण्याची चढाओढ लागायची. हे झाल्याशिवाय भेट झाल्यासारखी वाटायचीच नाही. कितीही
तिरकं बोललं तरी त्याला राग येणार नाही आणि मला वाईट वाटणार नाही याची दोघांनाही खात्री
होती. गंमतच सगळी. खेळीमिळीच्या मैत्रीत असं चालतंच. आमची एक मजेदार फॅन्टसी होती.
ती म्हणजे, दोघांपैकी एकाचा सत्कार होतोय आणि दुसरा स्टेजवरून जाहीरपणे कौतुकाचं भाषण
करतोय. या कल्पनेनंच आम्हाला खूप हसायला यायचं. कारण एकमेकांबद्दल इतकं चांगलं कसं
काय बोलणार? तेही जाहीरपणे. मग पशा त्या घटनेची धमाल नक्कल करायचा. प्रसंग जिवंत करायचा.
जणू काही मी स्टेजवर मान्यवरांच्या खूर्चीत बसलोय आणि तो भाषण करतोय...
‘हेऽऽ प्रवीण जोशी. सुप्रसिद्ध लेखक, संगीतकार, मेंडोलीन
वादक आणि माझे मित्र...’ या वाक्यानंतर पशा माझ्याकडे बघत नकलेतच कुचकट हसायला लागायचा.
आणि पाठोपाठ तोंडून ‘भ’च्या बाराखडीतल्या इरसाल शिव्या यायच्या. जसं काही तो स्टेजवरच
मला घालून पाडून बोलतोय. हा आमचा खेळ कितीतरी वेळ रंगायचा.
पशा म्हणजे प्रसाद रानडे. गायक, किबोर्ड वादक, संगीतकार, ॲरेंजर, रेकॉर्डिस्ट, व्हॉईस ओव्हर आर्टीस्ट, इलेक्ट्रॉनिक विषयातला तंत्रज्ञ अशी त्याची विविधांगी ओळख. मी आजवर जे हरहुन्नरी कलाकार पाहिले आहेत त्यात पशाचा क्रमांक फार वरचा आहे. कारण तो रुढार्थाने यातलं काहीच शिकला नव्हता. त्याला हे सारं सहजसाध्य होतं. हौस म्हणून सुरू झालेला प्रवास त्यानं जीवनमार्ग म्हणून निवडला. या सगळ्या गुणांच्या गर्दीत तो जत्रेतल्या मुलासारखा छान हरवलेला असायचा. प्रत्येक क्षेत्रात स्वतःचं नावंही निर्माण केलं होतं. अशी 'हरफनमौला' माणसं सहसा स्वतःच्याच नादात असतात. पण प्रसादचं पहिलं व्यसन म्हणजे मित्रांची गर्दी. समोरच्याशी मैत्री केल्याशिवाय त्याला राहवायचंच नाही. फार काळ पोषाखी वागता यायचं नाही. आमची पहिली ओळखही गमतीशीरच होती. एकाच क्षेत्रातले असल्याने माहितीचे होतोच. पण पुलंच्या शब्दात सांगायचं तर, भेटी झाल्या तरी मनाच्या गाठी पडल्या नव्हत्या.
माझ्या एका गाण्याचं रेकॉर्डिंग चालू होतं. प्रसाद रेकार्डिस्ट. आम्ही अत्यंत औपचारीकपणे एकमेकांशी बोलत होतो. माझ्याप्रमाणेच तोही पंचमदांचा म्हणजे
आरडी बर्मनदांचा भक्त. त्या गाण्यात एक स्वरावली अशी आली की आम्ही सगोत्र आहोत हे
त्याला झटक्यात कळलं. तशा पद्धतीची स्वरावली पंचमदांनी ‘इजाजत’ या सिनेमात वापरली आहे. पशानं डोळे बारीक करत तिरकसपणे विचारलं, ‘प्रवीण, ही चाल करताना टिव्हीवर
इजाजत लागला होता का रे?’ उत्तरादाखल माझ्या तोंडून शिवी निघून गेली. आमचे सूर जुळल्याची ती निशाणी होती.
कलेकडे केवळ व्यवहार म्हणून न पाहता आनंद म्हणून पाहणाऱ्या
पिढीचा प्रसाद रानडे हा सन्मान्य प्रतिनिधी. सतत उत्साही आणि हसरा. अंगानं किडकिडीत. त्याच्या पंचकोनी चेहऱ्यावरती हनुवटी, नाक आणि गालांची हाडं यांच्यामध्ये ‘तू पुढे का मी पुढे’
अशी चढाओढ लागलेली. चिकटवल्यासारखी वाटणारी मोठी मिशी. बोलण्यात अस्सल पुणेरी खोचकपणा. एकाच वेळी सतराशेसाठ कामं अंगावर
घ्यायची खोड. त्यामुळे सदा विस्कटलेला. वरून फटकळ पण आतून भाबडा आणि दिलदार.
तो खरं तर माझ्यापेक्षा दहा बारा वर्षांनी मोठा. पण त्याचं
वय जणू वाढतच नव्हतं. सर्वांनाच आपल्या बरोबरीचा आणि हक्काचा वाटायचा. स्टुडिओमध्ये हास्यकल्लोळ चाललेला असला की नक्की
समजावं केंद्रस्थानी प्रसाद रानडे आहेत. त्याच्याकडे हजारो किस्से होते. किबोर्ड वादक
म्हणून अनेक कार्यक्रमांचा, दौऱ्यांचा प्रचंड अनुभव पाठीशी होता. हर तऱ्हेचे कलाकार पाहिले
होते. त्यातली एखादी आठवण निघाली की पशा रंगात यायचा. स्मरणशक्तीही दांडगी. मग कधी कोणाची विकेट निघेल याचा नेम नसायचा.
मस्त स्वच्छंदी पण बेछूट नाही. छान बेशिस्त पण बेताल नाही.
एरवी चालू रेकॉर्डिंगही मध्येच थांबवून गप्पांचा अड्डा जमवणाऱ्या प्रसादची शिस्त भलत्याच
ठिकाणी उगवायची ती पत्ते खेळताना. तो रमीमधला चॅम्पियन. मला तर पत्ते हातात
धरायचाही तिटकारा. अशा माणसानं त्याच्याबरोबर खेळायला बसूच नये. पत्ते खेळताना इतर काही बोललेलं
त्याला बिलकुल खपायचं नाही. तिथे शिस्त म्हणजे शिस्त. मला वाटतं अनेक गुण अंगी असणारी
माणसं वरवर पाहता इतस्ततः विखुरलेली दिसतात. बेशिस्त वाटतात. पण आतून एका वेगळ्याच शिस्तीच्या सूत्राने त्यांनी स्वतःच्या गुणांना एकसंध ठेवलेलं असतं. जोपासलेलं असतं. ते लॉजिक इतरांना
कळणं अवघडच. प्रत्येक गोष्ट स्वतःची स्वतः शिकत गेलेला प्रसाद मनानं प्रचंड भावनाशील
होता पण तर्कनिष्ठ विचार करताना मेंदूतल्या भावनिक डिपार्टमेंटला पूर्ण सुट्टी.
त्याला इलेक्ट्रॉनिक उपकरणं खोलून बघण्यात भलता इंटरेस्ट.
महागातल्या महाग आणि गुंतागुंतीच्या वस्तू सहज दुरूस्त करायचा.
मी एकदा विचारलं, ‘पशा तुला भीती नाही वाटत?’
‘कशाची?’ ओठांचा चंबू करून हनुवटी उडवत त्यानं उलट विचारलं.
‘हे महागडे किबोर्डस् बिनधास्त खोलतोस...’
‘हॅः त्यात काय झालं?’ दोन्ही खांदे मागे घेऊन टिचभर छाती पुढे
काढत पशानं मला किरकोळीत काढलं.
‘अरे पण तुला समजतं कसं की काय बिघडलंय ते?’
‘मला सांग, रोग शोधणं सोपं का आरोग्य शोधणं?’
‘रोग’ मी म्हणालो.
‘चल चहा घेऊ...’ त्यानं तीन शब्दात विषय संपवला.
पुण्यानं मोठा अद्यवावत रेकॉर्डिंग स्टुडिओ पाहिला तो प्रसाद
रानडे, नितिन वाशीकर, जयदिप ढमढेरे आणि नितिन वैद्य या चार मित्रांच्या प्रयत्नाने.
या चौघांनी पुण्यात एका नवीन व्यवसायाची नांदीच केली. आणि मग प्रसाद फुलून आला. कुशल
वादक, तंत्रज्ञ, रेकॉर्डिस्ट तर होताच. आता संगीतकार म्हणूनही कामं सुरू झाली. त्याला
चाली पटापट सुचायच्या. मूड वगैरे भानगड नसायची. आजुबाजूच्या कोलाहलाचाही त्याला कधी त्रास व्हायचा नाही. ग्रामीण ढंगाच्या चाली हा तर त्याचा
हातखंडा.
सारंच येत असल्याने त्याला कुणीही कधीही कोणत्याही कामासाठी बोलवायचं. एकीकडे एखाद्या सिनेमाचं बॅकग्राउंड म्युझिक कंपोज करणारा प्रसाद मध्येच कुठेतरी जाऊन कोरसमध्येही उभा रहायचा. स्टुडिओतल्या काचेच्या अलीकडचं आणि पलीकडचं अशा दोन्ही बाजूंचं ज्ञान असणारी माणसं फार थोडी असतात. पशा त्यातला होता. एखादं काम आपल्याला येणार नाही हे त्याला पटूच शकत नसे. प्रचंड आत्मविश्वास हे मुख्य भांडवल. गाताना श्वास कुठे घ्यायचा, कोरस एकसंध वाटण्यासाठी काय करायचं, व्हॉईस ओव्हर करताना आवाज कसा वापरायचा, केलेली चाल प्रोड्यूसरला आवडली नाही तर तीच चाल वेगळी म्हणून कशी ऐकवायची अशा अनेक गोष्टींचा तो चालता बोलता संदर्भ ग्रंथ होता. अडलेल्यांसाठी चांगला शिक्षक होता.
पशाचा मुलगा सत्त्याही हुशार. वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेऊन याच क्षेत्रात आला. या बापलेकांचं नातं फार मजेशीर. मध्येच केविलवाणा चेहरा करून पशा सत्याला विचारायचा, ‘सत्त्याऽऽ माझ्याच स्टुडिओत मला थोडा वेळ बुकिंग मिळेल का रे ? नाही तर नाही एक कप चहा तरी पाज मालकाला.' हे ऐकून स्टुडिओत नवीन आलेल्याच्या पोटात गुदगुल्या व्हायच्या. असं आतबाहेर काही नसलेलं छान मुक्त आयुष्य जगणारा पशा. या मजेशीर प्राण्याच्या लेखी सुंदरतेचं मोजमाप एकच होतं. ते म्हणजे, ‘सोनाली बेंद्रे’. जेवणात आवडीचा पदार्थ असला तरी ‘आज जेवायला सोनाली बेंद्रे होती’ असं म्हणायचा.
एकदा त्याच्या निखळ स्वभावाचं वेगळंच दर्शन घडलं. माझ्याकडे एक सिनेमा पार्श्वसंगीतासाठी आला होता. काही कारणाने मला त्यातला एक सीन आवडला नाही म्हणून मी निर्मात्यांना नकार कळवला. प्रसादचं नाव सुचवलं. त्यानं तो छान पूर्ण केला. प्रिमिअरच्या दिवशी प्रसादनं मला बोलावून घेतलं. आम्ही एकत्रच थिएटरमध्ये बसलो होतो. माझा तो नावडता सीन पडद्यावर येताच पशा भर थिएटरमध्ये मोठ्याने म्हणाला, ‘हा सीन प्रवीणला आवडला नाही म्हणून सिनेमा माझ्याकडे आला, थँक यू प्रवीण...’
प्रसादला गेली काही वर्षे विचित्र असाध्य आजार जडला होता.
वयाच्या पंचेचाळीशीतच तो म्हाताऱ्यासारखा पाठीतून वाकला. खूप त्रास व्हायचा. पण चेहऱ्यावर
कधीच वेदना दिसली नाही. काटकोनातली पाठ घेऊन तरातरा चालायचा. स्वतःवरच विनोद करायचा.
सतत मित्रांशी गप्पा मारत कामात दंग रहायचा. तेच त्याचं मुख्य औषध होतं. मुळचा तडतड्या स्वभाव, विनोदबुद्धी आणि सकारात्मक
वृत्ती अजूनच उफाळून आली होती. लढवय्या प्रसाद रानडेचं दर्शन होत होतं. तो कधीच थकलेला
हारलेला दिसला नाही. पण अखेरीस व्हायचं ते झालंच...
कालाय तस्मै नमः
त्याची माझी अजून एक विचित्र फॅन्टसी होती. अजून एक डील होतं. आज सांगायला
ऑकवर्ड वाटतंय पण सांगतोच. ते म्हणजे, आमच्यापैकी कोणीतरी एक गेलाय आणि शोकसभेच्या
भाषणामध्ये दुसरा पहिल्याला मनसोक्त शिव्या घालतोय. आज माझ्यावर दुर्दैवाने ते डील पार पाडण्याचा प्रसंग
आलाय. पण मी पशाबद्दल त्या पद्धतीने बोलू शकणार नाही. शक्यच नाही ते.
सॉरी पशा ! आपलं डील मोडलं...
pravin@pravinjoshi.com
🙏🙏 एवढचं करू शकते
ReplyDeleteखुप छान लिहिलंयस.. फारच उत्तम माणूस .. आदरांजली 🙏🙏🌹🌹
ReplyDeleteरेडिओ जाहिरातींच्या रेकॉर्डिंगस् निमित्ताने अनेकदा प्रसादशी भेट झाली. गप्पा झाल्या. पण प्रवीण तू त्याच व्यक्तिचित्र अगदी परफेक्ट उतरवलंयस ! 👌
ReplyDeleteअवलिया कलाकाराला सॅल्युट !
Pavya khup chan lihil ahes re......kharach Prasad ubha kelas......me tumchya hya shivyanchi sakshidar ahe.......tyala visaran shakyach nahi.....
ReplyDeleteSurekh🙏
ReplyDeleteकातर व्हायला लावणारा लेख
ReplyDeletePravin dada 😢😢😢
ReplyDeleteछान
ReplyDelete������ कमाल लिहिलं आहेस...
ReplyDeleteआनंद
हरहुन्नरी कलाकार 🙏🏻🙏🏻 😥
ReplyDeleteलिखाण नेहमीप्रमाणेच कमाल 🙏🏻
वा प्रविण,पश्या ला डोळ्या समोर उभ केलस😓😢🙏
ReplyDeleteउत्कृष्ट... शेवट फारच हृदयाला भिडणारा...
ReplyDelete
ReplyDeleteअरे ..पशा कधी गेला ?
मला आत्ता कळतंय..
तसं माझा आणि पशाचा एवढ्यात संबंध आला नाही..
तुझा सुंदर लेख वाचताना पशा एकेका पदराने आठवत गेला आणि मी त्याकाळातच गेलो
१९९४ असेल बहुधा.. पशाच्या शिवरंजनी मध्ये माझ्या "स्वयंवर झाले डॉलीचे" नाटकाचे संगीताचे रेकॉर्डिंग होते...
तुझ्या लेखातलं प्रांजळपण मी हळूहळू चहाच्या घोटासम अनुभवत होतो..आणि चहा संपताना एकदम तोंडात गाळ यावा तसे झाले...
असो पशाच्या आठवणीने जख्मी व्हाव की पशा गेला हे वाईट वाटणेपण बाजूला सारुन तुझ्या सुंदर लेखाच कौतुक करावं...हे या क्षणी तरी कळत नाहीये...
भन्नाट! खूप खूप सुंदर.👌🙏
ReplyDeleteडील तोडलसं
ReplyDeleteअगदी यथायोग्य शब्दचित्र.
ReplyDeleteफार चटका लावून गेला.
Vaa.
ReplyDeleteप्रविण दादा तुझ्या लेखनातून नवीन नवीन माणस मला नेहमी भेटतात
ReplyDeleteआणि लेखाच्या शेवट पर्यंत ती मला आपलीशी केव्हा होतात हेच कळत नाही
नेहमी प्रमाणेच शब्दान मध्ये जबर दस्त ताकद आहे
खूपच सुंदर लिहिलाहेस: प्रसाद
ReplyDeleteकमाल लिहिलं आहेस.. पूर्ण व्यक्तिमत्त्व उभं केलंस रे..
ReplyDeleteव्यक्ती असली,तरी ती प्रथम वल्ली असली की जगण्याला एक मजा येते, त्यांच्या स्वतःच्या व त्यांच्या सम्पर्कात येणाऱ्या इतरांच्या ही. अप्रतीम लिहिलंय. 👍👌
ReplyDelete