राजा माणूस...
कला हा व्यवसाय म्हणून स्वीकारला की काही बंधनं
पाळावी लागतात. एक म्हणजे; आपली सर्जनशीलता, कलेतला आनंद वगैरे गोष्टींवर फार
प्रेम करायचं नाही. आणि दुसरा नियम; क्लायंटशी फार मैत्री
करायची नाही. विविध विषयांवरच्या फिल्मस्, जाहिराती,
लेख वगैरे लिहिताना; संगीत करताना मी हेच
सूत्र कटाक्षाने पाळत आलो. पण असा रोकडा कलाव्यवहार करताना मला एक ‘राजा माणूस’
भेटला. त्यांच्यासाठी मला माझे सारे नियम मोडावे लागले. किंवा असं म्हणू की
त्यांनी मला या बंधनांच्या पार पाहायची नवी दृष्टी दिली.
इंजिनिअरींग क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या ‘बी. जी.
शिर्के’ या कंपनीचे सीइओ अर्थात मुख्य कार्यकारी संचालक श्री. जगन्नाथ जाधव, अर्थात जाधव सर.
माझे छायाचित्रकार मित्र भाई डोळे, बी. जी. शिर्के
कंपनीसाठी एक कॉर्पोरेट फिल्म दिग्दर्शित करत होते. कथा आणि पटकथालेखनाचं काम
माझ्याकडे आलं. माहिती घेण्यासाठी काही भेटीगाठी आवश्यक असतात. पण शेकडो कोटींची
उलाढाल, हजारो कर्मचारी, अनेक मानांकनं
मिळवणाऱ्या कंपन्यांमध्ये त्यासाठी किती सहकार्य लाभतं हे मला अनुभवाने माहित
होतं. मी जरा रिकाम्या मनानेच जाधवसरांना भेटायला गेलो.
पण ती भेट मी कधीही विसरणार नाही.
पुणे मुंबई रस्त्यावर एका अवाढव्य पुलाचं बांधकाम
अंतिम टप्प्यात आलं होतं. रेल्वे, नदी आणि रस्ता असा तिन्हीवरून जाणारा हा पूल भारतात एकमेव
आहे. यावरच फिल्म करायची होती. तिथेच रस्त्याच्या कडेला एक तात्पुरत्या स्वरुपाचं
पण छान ऑफिस उभारलं होतं. आसपास बांधकाम साहित्याचा पसारा होता. पण त्यातही एक
नीटनेटकेपणा होता. साऱ्या वातावरणावर एक अदृष्य धाक जाणवत होता. आम्ही वेळेत पोचलो
होतो पण आत चालू असलेली मिटींग काही संपत नव्हती. जरा वेळाने बोलावणं आलं.
बाहेरच्या बांधकामाचा विसर पाडणारं अतिशय देखणं ऑफिस. भिंतींवर वेगवेगळे चार्टस्,
प्रकल्पाचे काही फोटो, मधोमध पद्मश्री बी. जी.
शिर्क्यांच्या छायाचित्राची सोनेरी फ्रेम, एसीचा गारवा,
फुलांचे बुके...
भल्या मोठ्या टेबलाभोवती एक मिटींग चालू होती.
मुख्यस्थानी बसलेले एक साहेब गंभीर चेहऱ्याने सगळ्यांचं ऐकून घेत होते. थोडसंच पण
अतिशय मार्मिक बोलत होते. त्यांच्यावर बोलायची कुणाची प्राज्ञा नव्हती. आम्हाला
पाहिल्याबरोबर त्यांच्या चेहऱ्यावर स्वागताची स्मितरेषा उमटली. त्यांनी एका
कामगाराला बोलावून घेतलं. त्याच्या कानात काहितरी कुजबुजले. पुन्हा कामात गढले.
काही सेकंदातच आमच्यासमोर चहापाणी हजर झालं. इतक्या व्यापातूनही या मोठ्या
कंपनीच्या सीइओने आमचं अगत्य केलं होतं. हेच जाधव सर.
नंतर आमची मिटींग तर अशी झाली की जणू त्यांची माझी
ओळख वर्षानुवर्षांची आहे. यात ‘अधिकाराचं प्रेम’ होतं का ‘प्रेमाचा अधिकार’ हे मला अजूनही ठरवता आलेलं नाही. मग मीही धिटाईने काही वेगळ्या कल्पना मांडू लागलो. माझी वर
सांगितलेली बंधनं आपसूक सैलावत गेली. अशा वेळी काम हे काम रहातच नाही. स्वतःच्या
आनंदासाठीच हे करत आहोत अशी जाणीव होते. मग आपणही क्षमता ओलांडून काहीतरी नवं करू
लागतो. कामाचं समाधान मिळतं. हे असं खुलवून चांगलं काम करवून घेण्याची
हातोटी जाधव सरांना देवदत्त होती.
रिकाम्या मनाने आत गेलेला मी, भरली ओंजळ घेऊन बाहेर
आलो.
मस्त सहा फूट उंची. देखणा चेहरा. रुबाबदार
व्यक्तीमत्व. क्षणात मन जिंकून घेईल असं लाघवी हसणं. मऊ आवाजात प्रत्येकाशी
खानदानी अदबीनं बोलणं. प्रत्येकाचं मनापासून ऐकून घेणं. नर्मविनोदी शैलीने
समोरच्याला आपलंसं करण्याची हातोटी. उंची कपडे. चवीनं खायची आवड आणि त्याहीपेक्षा मुख्य
आवड चवीनं खायला घालण्याची.
ऐश्वर्य म्हणजे काय ते त्यांच्या ‘शिवश्री’ बंगल्यात
जाऊन पहावं. लक्ष्मी चारही हातांनी प्रसन्न होती. पण सर आणि त्यांच्या पत्नी वनिता
जाधव म्हणजेच वहिनींना अहम्ची कणमात्र बाधा नाही. अतिशय खडतर परिस्थितीवर प्रचंड
कष्टांनी मात करून दोघं इथपर्यंत पोहोचले होते. आपली पाळंमुळं मात्र विसरले
नव्हते. गडगंज संपत्तीपेक्षा मनाची श्रीमंती अधिक जपून होते. कंपनीतला कोणीही बडा अधिकारी असो वा घरातले नोकर चाकर, सगळ्यांशी तितक्याच आत्मियतेने बोलायचे.
मध्येच त्यांना छान हुक्की यायची. मग एखाद्या
संध्याकाळी सर, वहिनी, मी, माझी पत्नी,
भाई डोळे दांपत्य, विद्या परचुरे असे सारे जमत
असू. कधी गाणं व्हायचं तर कधी एखाद्या कथा, कवितेचं वाचन.
सरांना या सगळ्या कलांचं कोण कौतुक. जेवण झालं की रात्री बंगल्याच्या पायऱ्यांवर
पुन्हा मैफल जमायची. वहिनी जुन्या कुठल्या कुठल्या आठवणी सांगायच्या. सर
त्यांच्याकडे प्रेमाने बघत असायचे. असं बघणं कुणाच्या लक्षात आलं की पटकन सावरून
बसायचे. वयाची साठी ओलांडली तरी दोघं एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले होते.
अगदी विषय काढून काढून स्वतःच्या लव्हमॅरेजचे किस्से सांगणं त्यांना आवडायचं.
वहिनी तर कसलेल्या चित्रकार. त्यांची साथ लाभल्यानेच जाधव सरांचं आयुष्य रंगीत
झालं होतं. मुलगा आणि मुलगी दोघंही उच्चशिक्षित. आपापल्या क्षेत्रात यशस्वी होऊन
अमेरिकेत स्थायिक झालेले. साठीच्या घरातले सर आणि वहिनी आता
हळुहळू वानप्रस्थाकडे झुकू लागले होते. आपल्या जवळचं सारं वाटून टाकण्याचा विचार
माणसाला सुंदर बनवतो. सरांच्या मूळच्या देखण्या चेहऱ्यावर या
सौंदर्याचं तेज चढू लागलं होतं.
त्यांना आपल्या वाई या गावाबद्दल नितांत प्रेम होतं.
इथूनच कधीतरी सामान्य घरातून त्यांचा प्रवास सुरू झाला होता. आता यशाच्या या
टप्प्यावर पोचल्यावर, आपल्या गावासाठी काहीतरी करावं असं त्यांच्या मनानं
घेतलं. इंजिनिअरींगची बुद्धी, गावाबद्दलची कृतज्ञता, इतक्या वर्षांच्या अनुभवातून आलेली कल्पकता असं सारं वाईच्या विकासासाठी जमून येत होतं.
याचवेळची एक आठवण आहे. वाईवर एक फिल्म करायची होती.
मी तिचं लेखन करत होतो. पण काही सुचेचना. एकीकडे कामाला उशीर होत होता. सरांच्या
ते लक्षात आलं. ते आम्हाला जेवायला घेऊन गेले. जेवण झाल्यावर ते स्वतः माझ्या एका
बाजूला आणि दुसऱ्या बाजूला वहिनी येऊन बसल्या. ‘प्रवीण, काय होतंय?
मी काही कल्पना सुचवू का? का असं करूया,
दोनचार दिवस वाईलाच जाऊन राहूया...’ असं बोलत बोलत सरांनी हलक्या
हाताने गुंता सोडवला. जे मला दोन महिन्यात सुचत नव्हतं ते पुढच्या पंधरावीस
मिनीटात होऊन गेलं. स्वतःच्या मोठेपणाची यथायोग्य जाणीव असलेली माणसंच लहान माणसांमध्ये
असं छान मिसळून जाऊ शकतात.
मी त्यांच्यासाठी अनेक फिल्मस्चं लेखन केलं. पण आमचं
नातं व्यवसायाच्या पार गेलं होतं. कधी कोणती अडचण घेऊन सरांकडे गेलं की ते
इंजिनिअरींगच्या तर्कनिष्ठ नजरेने विचार करायचे. आणि भावनिक बाजू वजा न करता अतिशय
कल्पकतेने अचूक सल्ला द्यायचे. मला वाटतं व्यवसाय, तंत्रज्ञान, व्यवस्थापन...
कोणतंही क्षेत्र असो, त्यात मन विरघळून गेलं की सारं
कलेच्याच पातळीवर जातं. सर त्यात छान मुरले होते. साठा उत्तराच्या कहाणीचा गोडवा
पाझरू लागला होता.
त्यांचा साठीनंतरचा एक वाढदिवस होता. खरं तर ते आपले वाढदिवस
इतक्या मोठ्या प्रमाणावर करायचे नाहीत. पण त्या वर्षी त्यांना काय वाटलं कोण जाणे.
सर्व जुने मित्र, आप्तेष्टांना बोलावून त्यांनी हा वाढदिवस जंगी साजरा केला. जी मित्रमंडळी
येऊ शकली नाहीत त्यांच्या घरी जाऊन भेटीगाठी घेतल्या. जणू काही त्यांना भविष्य कळलं असावं. ते सगळ्याला आनंदाने निरोप देत होते.
त्यानंतर काहीच दिवस गेले आणि अचानकपणे ती वाईट बातमी कानावर आली.
मृत्यू कसा, कधी, कुठे यावा याचे काहीच आडाखे नसतात. पण सरांना अदृष्टामधली अस्पष्ट जाणीव झालीच असेल ना. त्यांच्याकडे ती समजून घ्यायची सिद्धी होतीच. का समोरच्याचं नीट ऐकून घ्यायच्या सवयीने त्यांनी मृत्यूची हाक ऐकली आणि खानदानी अदबीने त्यालाही ‘येतो’ म्हणाले? जीवनव्रताचं उद्यापन इतक्या सहजपणे करून मोकळे झाले.
कला आणि कलाकार यांच्यावरच्या प्रेमाखातर त्यानी एक
आंतरराष्ट्रीय दर्जाची आर्ट गॅलरी उभारायचं ठरवलं होतं. अगदी मोक्याच्या ठिकाणी, सर्व सोयींनी
समृद्ध अशी ही गॅलरी त्यांचं स्वप्न होतं. आमच्या कित्येकदा त्यावर चर्चा
व्हायच्या. इथे कोणीही यावं,आपल्या कलेची साधना करावी.
अपेक्षा कसलीच नाही. सरांनी आपल्या आयुष्यात काहीच अर्धवट ठेवलं नव्हतं. मग या
स्वप्नाचं पुढे काय होणार, हा प्रश्न माझ्या मनात रुतून बसला
होता. पण विचारणार तरी कोणाला आणि कसा? सरांनंतर वहिनींसमोर
जायची तर माझी हिम्मतच होत नव्हती.
आणि एके दिवशी वहिनींचाच फोन आला.
सरांनी सुरू केलेलं आर्ट गॅलरीचं काम वहिनींनी पूर्ण केलं होतं. ‘जगन्नाथ हाऊस’ या नावानं गॅलरी उभारली. मला पहायला बोलावलं होतं. लगेचच गेलो. त्या कलादालनाचा कोपरा न् कोपरा सरांच्याच उत्साहानं भारलेला होता. इथे सर्व कलांना मुक्त संचार होता. वहिनी बोलता बोलता सहजतेनं म्हणाल्या, ‘हे काम मी अर्धवट ठेवलेलं सरांना आवडणार नाही.’ मी चमकून त्यांच्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात असा भाव होता की जणू काही सर गेलेच नाहीयेत. तिथे दुःख नव्हतं तर सरांविषयी अभिमान होता. त्या दिवशी जाणवलं; सरांच्या विचारांचं, प्रेरणेचं, कार्याचं संचित इतकं मोठं आहे की त्यांना रुढार्थानं मृत्यू आलाच नाही. ते केवळ शरीराने दिसेनासे झाले. वहिनी अतिशय आपुलकीनं सारं दाखवत होत्या. तो 'जगन्नाथाचा रथ' त्यांनी एकहाती ओढला होता. मला कलेच्या दालनाबरोबरच विशाल मनांच्या दालनांचं दर्शन होत होतं.
त्यानंतर मी अनेक व्यावसायिक कामं केली. ती करताना कोणतीही बंधनं पाळली नाहीत. पण कामाचं तसं समाधान कधी लाभलं नाही. तशा आनंदाच्या मैफलीही कधी जमून आल्या नाहीत.
...जाधव सरांसारखा ‘राजा माणूस’ आयुष्यात पुन्हा पुन्हा येत नाही.
...प्रवीण जोशी
98505
24221
pravin@pravinjoshi.com
सुंदर लिखाण
ReplyDeleteMast re pravin
ReplyDelete93 साला पासुन त्यांचा सहवास लाभला खरच असं व्यक्तिमत्व होणे नाही .
ReplyDeleteखरोखर राजा माणूस 🙏🙏🙏
Sundar
ReplyDelete👌❤️
ReplyDeleteWah!!
ReplyDeleteप्रवीण, तू इतकं छान लिहीतोस की जिच्याबद्दल लिहीतोस ती व्यक्ती अनोळखी असूनही अगदी जवळची वाटायला लागते. घडलेले प्रसंग डोळ्यासमोर साक्षात उभे राहतात. फारच अप्रतिम !!
ReplyDeleteTuza shabd n shabd khra aahe
सुंदर शब्दचित्र
ReplyDeleteव्वा! साधे सोपे आणि मनाला भिडणारे लेखन!✍️✍️
ReplyDeleteVaa.Sunder lihile ahes
ReplyDeleteव्वा! मनातल्या भावनांना अगदीं छान शब्दांत व्यक्त केलंय.
ReplyDelete