वन लाईन स्केचेस...

चित्रकलेत क्विक स्केच नावाचा एक प्रकार आहे. कमीत कमी रेषांमध्ये दोनचार मिनीटात एखादं व्यक्‍तीमत्त्व कागदावर रेखाटणं हे त्याचं वैशिष्ट्य. तशीच ही शब्दांतली ‘वन लाईन स्केचेस’. अगदी एखाददोन ओळीत मांडलेली अर्कचित्रं.

जन्मापासून आपण अक्षरशः शेकडो हजारो लाखो माणसं पहात असतो. पण त्यातली ओळखीची म्हणाल तर आकडा पाचशे हजाराच्या वर जाणार नाही. खोटं वाटत असेल तर सहज एकदा आपल्या मोबाईलमध्ये किती कॉन्टॅक्टस्‌ आहेत ते पहा. त्यातही नेहमीच्या संपर्कातले केवळ पन्नास साठच निघतील. पण हीच मंडळी आपल्याला जगातल्या सग्गळ्या माणसांविषयी अंदाज बांधायला शिकवतात. समोरच्याबद्दल काहीही माहीती नसतानाही क्षणार्धात मत बनवण्यात आपण तरबेज होतो ते यांच्यामुळेच. अशा सगळ्या ओळखीच्या माणसांचे आभार मानून मी अनोळखी माणसांची ही ‘वन लाईन स्केचेस’ करतोय.‍ खरं तर हे सगळे गर्दीतले चेहरे. सतत तुमच्या आमच्या अवतीभवती असतात, कधीतरी ओझरते दिसतात. प्रत्येकाचं काही ना काही वेगळेपण असतंच. त्यांच्याकडे पाहता पाहता मानवी स्वभावाची अनेक उत्तरं मिळतात. त्यांच्या प्रथमदर्शनाने जे मनात येतं ते कमीत कमी शब्दांत मांडण्याचा हा प्रयत्न आहे.

- संध्याकाळी सहासाडेसहाच्या सुमाराला ऑफिस सुटल्यावर स्कुटीवरून घरी जाणाऱ्या बायका. गाडीवर पायाशी भाजीची पिशवी असते. सकाळी ऐटीत खांद्यावर अडकवलेल्या पर्सचं आता ओझं झालेलं असतं. पाठुंगळीला एखादं मूल बांधलेलं असेल तर दृष्य अजूनच पूर्ण होतं. त्या बायका लगबगीने एका ड्यूटीवरून दुसऱ्या ड्यूटीवर चालल्यासारख्या दिसतात...

- गणपती विसर्जनाच्या उत्सवी गर्दीत नदीवर किंवा विसर्जन कुंडावर हातात गणपती घेऊन विसर्जनाला एकटाच आलेला मध्यमवयीन गृहस्थ. तो कधीच इकडे तिकडे बघत नाही. एकट्याने आरती करतो, एकट्याने प्रसाद खातो. त्याच्या घरी कोणीच नसेल हा आनंद साजरा करायला? त्याच्यासमोर जाऊन कुणी गणपती बाप्पाऽऽ असं जोरात ओरडलं तर तो हलकेच मोरया म्हणतो. माझ्या मनातल्या त्या रंगीत चित्राला हा माणूस कायम उदासवाणी छटा देतो...

- शाळेत जाणारी येणारी मुलं तर वन लाईन स्केचसाठी आव्हानच. सकाळी छान आवरून शाळेत जाणारा मुलगा इतरांसारखाच शहाणा शहाणा दिसतो. पण संध्याकाळी शर्टवर शाईचे डाग घेऊन, मस्त भांग वगैरे विस्कटून घरी हसत जाणारा मुलगा पहावा. तो अधिक देखणा दिसतो...

- अगदी घाईच्या वेळी रस्त्यातून जाताना एखादा ओळखीचा वाटावा असा चेहरा दिसतो. तुम्ही क्षणभर थांबता. तोही थबकतो. तुम्ही हसण्याचा साशंक प्रयत्न करता, पण तो मनापासून हसतो. हा क्षण फारच मजेशीर. उत्कंठा, आठवण, विचार अशा गोंधळातून चेहऱ्यावरचं हसू टिकवणं अवघड जातं. पण ‘कुठेतरी पाहिलंय’ या व्यतिरिक्‍त ओळख पटत नाही. तो चेहरा पुढच्याच क्षणी गर्दीत विरघळून जातो. तुमचा संपूर्ण दिवस मात्र ‘हा होता तरी कोण?’ या प्रश्नाने खाऊन टाकलेला असतो. अनोळखी माणसाचं दिलखुलास हसणं पचवणं तसं अवघडच असतं...

- गेली दोन तीन वर्ष एका सिग्नलपाशी, सुरकुत्यांच्या जाळ्यात हरवलेली एक जख्ख म्हातारी भिकारीण माझ्या गाडीच्या काचेवर टकटक करते. चेहऱ्यावरच्या प्रत्येक रेषेत भीक मागण्याची सराईत लाचारी असते. पण त्याहीपेक्षा, कधीतरी या गाडीची काच खाली होईल आणि हातात एखादं नाणं पडेल ही तिच्या नजरेतली अजिंक्य आशा मला फार सतावते. मी भीक देत नाही कारण मला तिच्यासमोर हरायचं नसतं...

- एखाद्या सोसायटीच्या आवारातल्या कट्‌ट्यावर, अमृततुल्यच्या बाकड्यांवर किंवा देवळाच्या पायऱ्यांवर जमणारा ज्येष्ठ नागरिकांचा घोळका पहावा. त्यात टीशर्ट घातलेले एक तरी आजोबा असतातच. गुडघेदुखी, ब्लडप्रेशर, डायबेटीस, दमा यातलं बरचसं अंगावर वागवूनही त्याबद्दल ते एकही चकार शब्द उच्चारत नाहीत. ते खरं तर फारसे बोलतच नाहीत. चष्म्याआडून समजूतदार नजरेने जगाकडे पहात असतात. कवळीमुळे तुकतुकीत झालेल्या गालांतल्या गालात हसत असतात. काहीच नातं नसताना हे सुंदर वार्धक्य आकर्षित करतं...

- चहापोहे, इडली वगैरेचा स्टॉल चालवणारे एक म्हातारेसे काका. त्या बिचाऱ्यांना पैसे देण्याघेण्यासाठी जीपे, फोनपे, क्रेडीट कार्ड या भानगडीतलं काहीही कळत नाही. तरीपण दुकानात कुणीतरी क्यूआर कोड बसवलेला असतो. आपण त्यावरून पेमेंट केलं की त्यांच्या भोळ्या चेहऱ्यावर ‘फसवाऽऽ मला म्हाताऱ्याला’ असा भाव उमटतो. मला त्या काकांचं हसूही येतं आणि कीवही. झपाट्यानं बदलणाऱ्या या जगात अशांचं काय करावं?...

- केस वाढलेला, काटकोळा, काळासावळा, एखादा मवालीसा मुलगा बाईकवरून वेगात येतो. आपल्या गाडीला घाईघाईत ओव्हरटेक करताना धडकेल असं वाटत असतानाच सिग्नल तोडून झपकन निघून जातो. प्रचंड संताप येतो. मी त्याला त्वेषाने मनातल्या मनात अशिक्षित, अडाणी, असंस्कृत असं काहीबाही म्हणून घेतो. कितीही वेगाने पुढे निघून गेला तरी पुढच्या सिग्नलला दिसतोच. पण तोपर्यंत माझा राग मावळलेला असतो. त्याच्या वयाकडे पाहून माफ करून टाकतो...

---

अशी एक ना दोन किती माणसं मोजावीत? आपलं जग अनोळखी माणसांनीच अधिक भरलं आहे याची जाणीव करून देणारे हे चेहरे तुम्ही आम्ही ‍दररोज पहात असतो. अगदी क्षणभर दिसतात न दिसतात. तरी दिसताक्षणी आपण मारे एका वाक्यात मत ठणकावून देतो. हा असा असेल, तो तसा असेल असे आडाखे बांधतो. त्यातून मानवी स्वभावाची उत्तर मिळोत न मिळोत पण पडणारे प्रश्न मात्र फार अवघड असतात.

ही माणसं आपल्याला वाटली तशीच खरोखर असतात का? माहित नाही. मग हा खटाटोप कशासाठी? केवळ करमणूकीसाठी? की माझा अंदाज बरोबर आला हा अहंकार जपण्यासाठी? ती अनोळखी माणसं तर पुन्हा कधी भेटतही नाहीत. मग या वन लाईन स्केचेसचं काय होतं? मनातल्या मनात विरून जातात

नाही, या एकेका ओळींच्या रेघोट्यांचा गुंत्यातून अजून कोणाचं तरी स्केच घडत असतं.

...पण कुणाचं?

 

...प्रवीण जोशी
98505 24221
pravin@pravinjoshi.com

Comments

  1. अगदी खरंय......भारी

    ReplyDelete
  2. नेहमी प्रमाणे अप्रतिम!👌😊

    ReplyDelete
  3. प्रवीण तुझे लिखाण वेगळीच दृष्टी देऊन जाते..मला वाटते जग बघायची कला तू आम्हाला शिकवतो आहेस..अप्रतिम लिखाण !!!

    ReplyDelete
  4. अप्रतिम निरीक्षण आणि परीक्षण ! 👌

    ReplyDelete
  5. वाचताना बीन चेहेरया ची माणसे नजरे समोरून गेली
    सुंदर लिखाण

    ReplyDelete
  6. फारच छान कल्पना....एकदम जिवंत स्केचेस!

    ReplyDelete
  7. फारच मस्त मी तीन-चार चार तरी वाचली असतील मला सर्व आवडली

    ReplyDelete

Post a Comment