हौशी
माझ्या वडिलांच्या मित्रपरिवारात खूप कलाकार मंडळी होती. घरी त्यांचा सतत राबता असे. संगीत, कविता, नाटक अशी सगळ्याचीच आवड आणि सजग जाणकारी असलेले, उपजीविकेसाठी वेगळाच काहीतरी नोकरीधंदा करणारे, उत्साहाने कला जपणारे असे हे सगळे. ‘हौशी’ या शब्दाला तेव्हा ‘कमअस्सल’ असा अर्थ चिकटलेला नव्हता. आवडीच्या क्षेत्रात हौसेने काम करतो तो हौशी. व्यासंगात मात्र कोणापेक्षाही तसूभर कमी नाही. यातलं कुणीच, ‘कला म्हणजे पैसा मिळवून देणारी विद्या’ असं मानत नव्हतं आणि कलेवर सर्वस्व उधळून देणारा छंदीफंदी बेछूटपणाही नव्हता. होती ती केवळ मध्यमवर्गीय माणसाची रसिकता आणि हौस.
या
सगळ्यात लक्षात राहिले ते काळेकाका अर्थात अशोक काळे.
लोकसंगीत
हा काळेकाकांच्या आवडीचा विषय. ते लोकसंगीतातला कोणताही प्रकार त्यातल्या पूर्ण उर्जेसह सहजतेनं गळ्यावर पेलू शकत. त्यांच्या मनातली एकतारी आणि तुणतुण्याची तार एकच होती.
आवाज स्वभावाइतकाच स्वच्छ मोकळा होता. त्याला पट्टीचं बंधनच नव्हतं. पेटी अशी वाजवत
की तीही गात्येय असं वाटायचं. काळेकाका गायक आहेत का पेटीवादक हे ठरवता येऊ नये इतक्या सफाईने
दोन्ही गोष्टी करायचे.
नावात
‘काका’ असलं तरी वागणं मात्र वयाने मोठ्या असलेल्या मित्रासारखं. मला वाटतं सुरांमध्ये
रमणाऱ्या माणसांचं वय एका टप्प्यानंतर वाढतच नसावं. काका तर तरुण मुलांमध्येच रमलेले
असायचे. सतत आनंदी आणि उत्साही. प्रत्येक नवीन गोष्टीचं त्यांना कुतूहल होतं. ती शिकायची हौस होती. उंचीने बुटके.
वर्ण अस्सल सातारी सावळा. वागणंही अगदी गावाकडल्या माणसासारखं. त्यात कसलीही औपचारिकता
नाही की शहरी आढ्यता नाही. आखूड बदामी गुरूशर्ट आणि काळी पँट. तोंडात रंगलेलं पान. मी कुठेही दिसलो तरी उजवा हात हवेत उडवत दणदणीत आवाजात हाक मारत. मग पेटी आणि गाण्याबरोबर गप्पांचीही
मैफल जमायची. भाषाही मस्त रांगडी. त्यांना दुनियाभरचे किस्से माहीत असायचे. ते रंगवून
सांगायचीही हातोटी होती. काहीही विशेष सांगताना तोंडाचा चंबू करून त्यावर उपड्या हाताने ‘ओबोबोबोऽऽ’ असं करण्याची त्यांची लकब आजही माझ्या लक्षात आहे. दिलखुलास स्वच्छ हास्य
ही सुरांइतकीच दुर्मिळ देणगी काळेकाकांना लाभली होती. स्वभावात कडक शिस्त
आणि मिश्किली यांचा सतत लपंडाव चालू असे.
माझी
त्यांच्याबद्दलची पहिली आठवण गमतीशीरच आहे. आमच्या घरी एक जुनाट पेटी होती. जरा भाता
मारला की किंचाळून उठायची. जलद वाजवायला गेलं की स्वरांपेक्षा बटणांचा खडखडाटच जास्ती
ऐकायला यायचा. मी वडिलांकडे नवीन पेटीसाठी हट्ट धरला. अगदी रडवेला वगैरे होऊन. हा हट्ट
मोडून काढण्यासाठी की काय त्यांनी काळेकाकांना घरी बोलावलं. काकांनी ‘वाऽऽ’ म्हणत आमची
ती पेटी पुढे ओढली, भाता उघडला. आश्चर्य म्हणजे तीच खडखडपेटी त्यांच्या हाती छान गोड
वाजायला लागली. आता काही आपल्याला नवीन पेटी मिळत नाही, या विचाराने मी अजूनच हिरमुसलो.
काळेकाकांच्या कुशल वादनाचा मला खरं तर रागच आला होता. पण वाद्याशी मैत्री करून वाजवणं
म्हणजे काय हेही दिसत होतं. त्यामुळे पेटीचा हट्ट मावळत चालला. पण आठवड्याभरातच काळेकाका
स्वतः एक सुंदर नवीन पेटी घेऊन आमच्या घरी हजर झाले. मग आमची गट्टी झाली ती शेवटपर्यंत.
ते
संगीत कुठे शिकले होते हे काही मला माहित नाही. पण आत्मविश्वास हाच त्यांचा मोठा गुरू
असावा. त्यांच्याठायी लोकसंगीतातला रांगडेपणा आणि हळवेपणा दोन्हींचं मस्त मिश्रण झालं
होतं. मी एकदा त्यांना ‘माझी मैना गावाकडं राहिली’ ही छक्कड गायची फर्माईश केली. काकांनी
एकच अंतरा गायला. मी म्हटलं, ‘काका पूर्ण ऐकवा ना’. काका म्हणाले ‘नाही रे, पुढचे अंतरे
गाताना मला ना भरून येतं. तुम्हां पोराटोरांसमोर का उगाच डोळ्यातून पाणी काढायचं?’
आणि मग त्यांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, त्यात या गाण्याचं योगदान असं सगळं समजावून
सांगितलं. गाणं कितीही उडतं असलं तरी काकांचा गाण्याच्या भावनेबरोबर ‘ठेहराव’ असायचा.
विविध
प्रकारची वाद्यं गोळा करण्याचा त्यांना अक्षरशः सोसच होता. घरातली एक खोली तर वाद्यांनीच
भरलेली असे. कुठून कुठून पैदा करत कोण जाणे. दसऱ्याच्या दिवशी घरातल्या सगळ्या वाद्यांची
पूजा व्हायची. प्रत्येक वाद्य छान नटवून ठेवलेलं असायचं. त्यांच्याकडे एक भलामोठा देखणा स्केलचेंजर ऑर्गन मी बघितला होता. काकांच्या हाती तो मस्त खुलायचा. एकदोन पायपेट्या,
ढोलकी, वेगवेगळ्या सुरांचे तबले... सारं काही
होतं. घरी गेलं की प्रत्येक वेळी त्या संग्रहात भर पडलेली असायची. नवीन वाद्याचं कौतुक
‘साग्रसंगीत’ चालू असायचं. ही सारी वाद्यं दुरुस्त करण्याचाही त्यांना नाद होता. त्यासाठी
अनेक कसबी कारागिर शोधून काढत. का कोण जाणे एकदा त्यांना संबळ वाजवण्याची हुक्की आली.
पण संबळ कुठे मिळेना. एका नामवंत वादकाकडे मागितली तर त्याने नकार दिला. मग काळेकाका
इरेलाच पेटले. तडक जुन्या बाजारात गेले. जुन्या गाड्यांचे ते हंड्यांसारखे दिसणारे
हेडलाईट शोधून विकत घेतले. त्याला चामडं, दोऱ्या, कड्या वगैरे लावून आपली संबळ तयार
केली. ती वाजती झाल्यावरच त्यांच्या जीवाला बरं वाटलं. असं हे छान नादिष्ट प्रकरण होतं.
काळेकाका कधीही कोणत्याही कार्यक्रमात पेटी वाजवताना किंवा गाताना दिसत. त्यासाठी पैशांची अटच नसे. चौकातल्या भजनीमंडळांपासून थिएटरमधल्या नाटकमंडळींपर्यंत कुठेही तेवढ्याच मनापासून वावरत. कथा अकलेच्या कांद्याची, गाढवाचं लग्नं, घाशीराम कोतवाल या प्रसिद्ध नाटकांचे तर त्यांनी अनेक प्रयोग केले. भारतभर, जगभर हिंडले. मध्यंतरी सत्तरीच्या घरात असताना त्यांना हृदयविकाराचा त्रास होऊ लागला. आपण आजारी आहोत हे त्यांनी कुणालाच सांगितलं नव्हतं. त्यातून बरेही झाले. बरं होण्यात मला वाटतं औषधांपेक्षा सुरांचाच वाटा जास्त असावा. पण कहर म्हणजे बरे झाल्यावर लगेचच नर्मदा परिक्रमा करायला गेले. जिथे काळेकाका तिथे पेटी असा जणू दंडकच होता. त्यांच्या सामानात कपड्यांच्या पेट्यांबरोबर वाजवण्याची पेटीही होती. संपूर्ण परिक्रमा त्यांनी अक्षरशः ‘वाजवत गाजवत’ पूर्ण केली. खरं तर काकांनी सारं आयुष्यच असं हौसेनं साजरं केलं.
इथे
मला काकूंबद्दलही सांगायलाच पाहिजे. त्यासुद्धा काकांसारख्याच. काकांच्या अशा नादिष्ट
स्वभावाला साथ द्यायला त्याच हव्यात. भरत नाट्य मंदिरात प्रयोग चालू असेल तर बाहेर
चहा पिताना, वडा खाताना काकू हमखास भेटायच्याच. प्रत्येक वेळी काकांच्या गुणवर्णनात
किंवा कधी लटक्या तक्रारी सांगण्यात रमलेल्या असायच्या. मुलगा उत्तम तबलावादक आणि चित्रकार
झाला, मुलगी चांगली गायला लागली. पण काकांना त्यांच्यापेक्षा अधिक कवतिक आपल्या नातीचं.
एका मांडीवर नातीला बसवून दुसऱ्या मांडीवर पेटी ठेवून लावणी गाणारा हा आजोबा वेगळाच
होता.
अगदी
अलीकडे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही रंगमंचावर एकत्र आलो. त्या कार्यक्रमात
लेखन, संगीत, व्हिडिओज्, नृत्य, नाट्य अशा सगळ्याचाच समावेश होता. मी त्याचं दिग्दर्शन
करत होतो. त्या दिवशी काकांनी माझ्याकडे अशा कौतुकाने पाहिलं की मला पुन्हा एकदा लहान
झाल्यासारखं वाटलं. त्यांच्या पाया पडावसं वाटलं, पडलोही. त्यांनी दुसऱ्या दिवशी घरी
बोलावून घेतलं. म्हणाले, ‘आपण एकत्र मिळून पारंपरिक लावण्यांवर कार्यक्रम करू रे.’
हे तर माझ्यासाठी एक प्रकारचं बक्षिसच होतं. पण करू करू म्हणत राहून गेलं आणि एके दिवशी
अचानक बातमी आली, काळेकाका गेले.
अशा
बातम्या खोट्या ठरत नाहीत. मला त्यांच्या घरी समाचाराला जायचं धैर्यच होईना. पण
जाणं तर आवश्यक होतं. सातव्या आठव्या दिवशी कधीतरी गेलो. अगदी चाचरत. पण ते घर उदासलेलं
नव्हतं, रडत नव्हतं. काकांच्या अनेक आठवणी काढून हसत होतं. जणू काही काका पेटी न घेताच
परिक्रमेला गेले होते. काकूंनी पुन्हा तसाच हसून निरोप दिला.
सुरांनी
भारलेल्या त्या घराला काकांनी जगण्याची ‘हौस’ दिली होती.
...प्रवीण जोशी
98505
24221
pravin@pravinjoshi.com
सुंदर
ReplyDeleteHats off to this artist
ReplyDeleteजगण्याची हौस....क्या बात है.....”प्रवीण पंच”
ReplyDeleteMasta
ReplyDeleteसुरेख..
ReplyDeleteरोहिणी गोखले
लिखाणात तुझ्या जादू आहे ती व्यक्ती प्रत्यक्ष भेटल्या सारखं वाटतं
ReplyDeleteअप्रतिम लिहिलयंस प्रवीण ! काळेकाका पुन्हा एकदा जिवंत केलेस...अर्थात अशी माणसं म्हणजे काळेकाका काय किंवा शामराव कांबळे काय...फक्त शरीरानं आपल्याजवळ नसतात...सुरांच्या माध्यमातनं ती अमरच आहेत..
ReplyDeleteBhari re
ReplyDeleteउत्तम!
ReplyDelete