पावलापुरता प्रकाश

तारुण्यात प्रवेश करण्याच्या आसपास कवितेची आवड निर्माण होण्याचा एक टप्पा असतो. कवितेचा अर्थ न कळूनही केवळ लयशब्दांचं हे वेड पुन्हा कोणत्याही वयात लागू शकत नाही. नंतर आपण जाणतेपणाने कवी, लेखक निवडू लागतोही. पण ही जाण अनाहूतपणे हाती आलेल्या त्या पहिल्या कवीने दिली आहे हे कायम लक्षात राहतं. माझ्या बाबतीत हे श्रेय संपूर्णतः कविवर्य सुधीर मोघ्यांचं.

व्यवसाय म्हणून लेखन आणि संगीतक्षेत्रामध्ये वावरताना माझ्या अनेक मोठ्या कलाकारांशी ओळखी होऊ लागल्या. ज्यांची नावं लहानपणी केवळ वर्तमानपत्र, रेडिओ, टिव्हीवर ऐकली होती अशा दिग्गज कलाकारांना जवळून पाहायचा योग आला. त्यांच्याबरोबर कामही करायला मिळत होतं. पण काही केल्या सुधीर मोघ्यांची भेट घडत नव्हती. त्यांच्याबद्दल चर्चा व्हायच्या. कवी, गीतकार, संगीतकार, संहितालेखक, स्तंभलेखक, लघुपटांचे दिग्दर्शक, चित्रकार अशा त्यांच्या अनेक भूमिकांबद्दलच्या मतामतांच्या गलबल्यामध्ये एक वाक्य मात्र समान असायचं. ‘सुधीर मोघे एका जागी कधीच सापडत नाहीत.’ आणि त्याचा मी पुरेपूर प्रत्यय घेत होतो.

सत्याण्णव साली मी आणि केदार परांजपे ‘स्वरशब्दांच्या संध्याकाळी’ हा आमच्या स्वतःच्या स्वररचनांचा कार्यक्रम सादर करायचो. त्यावर मोघ्यांच्या ‘कविता पानोपानी’ या कार्यक्रमाचा, संहिता लेखनाचा प्रभाव होताच. एका प्रयोगाला ते स्वतः प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या अभिप्रायातलं एक वाक्य मला अजूनही आठवतं; ‘तुमची नवीन पिढी आमचाच वारसा पुढे नेते आहे...’ त्या दिवशी प्रथमच मला कलाकार म्हणून माझी दिशा योग्य असल्याची जाणीव झाली. ही त्यांची माझी पहिलीच भेट. पण औपचारिकता आणि वयाची बंधनं अलगद पार करून पूर्वापार ओळख असल्यासारखं त्यांनी मला आप्तांमध्ये सामील करून घेतलं.

उमदं व्यक्‍तिमत्व. मागे वळवलेले भरघोस केस. चष्म्याआडून लकाकणारे डोळे. ते हसतायत असं वाटायचं पण कुठेतरी हरवलेलेच असायचे. गळाबंद टिशर्ट किंवा ना हाफ ना फुल असा कोपरापर्यंतच अर्धवट बाह्या असलेला, दोन खिसे असलेला खादीचा कुर्ता. तो कुठून शिवून घ्यायचे देव जाणे. सुखी माणूस आणि कवी यांचा सदरा शिवणारा शिंपी एकच असावा बहुतेक.

काम करण्यासाठी म्हणून त्यांनी एक लहानशी जागा घेतली होती. अगदी एका खोलीची. त्या एवढ्याशा खोलीत काय काय असायचं. हार्मोनियम, रेकॉर्डस्‌, पेंटींग ठेवलेलं इझेल, असंख्य पुस्तकं, सीडीज्‌, फोटो... असं बरंच काही. बऱ्याचदा नसायचे ते खुद्द मोघेच. छान अघळपघळ माणूस. सतत दहा दिशांना पांगलेला. बेभरवशी तर इतके की कधीकधी वेळ देऊनसुद्धा भेटणार नाहीत तर कधीतरी स्वतःच्या कामाचा वेळही खाऊच्या पैशांसारखा गप्पांमध्ये खर्च करून टाकतील. पण कामातली शिस्त पहावी. अतिशय कडक आणि काटेकोर. तिथे काडीचीही हयगय नाही. कागदावर संहितेबरोबरच अतिशय बिनचूक नियोजनही आखलेलं असायचं.

त्यांना सतत काहीतरी सांगायचं असे. आपले अनुभव वाटून टाकायची घाई झालेली असे. मग विचारांची एवढी गर्दी व्हायची की बोलणं अतिशय जलद आणि अस्पष्ट व्हायचं. अगदी कान देऊन ऐकायला लागायचं. पण काव्यवाचन करताना त्याची कधीच अडचण झाली नाही. कारण कविता वाचताना ते शब्दांबरोबरच संपूर्ण देहबोलीचा नेमका वापर करीत. कविता केवळ ऐकवत नसत तर तिचा अनुभव देत असत. कविता आणि गीतांमधली नाट्यमयता त्यांना फारच प्यारी होती.

एकदा कविता, गाणं आणि अभिनय हातात हात धरून कसे चालतात हे पुलंच्या वाऱ्यावरची वरातचं उदाहरण घेऊन समजावत होते. त्यात त्यांचे थोरले बंधू श्रीकांत मोघे काम करत. हे त्यांचं आदरस्थान. मोघे भारावून बोलत होते, ‘अरे, वरातमधल्या एका गाण्यात पोवाड्याच्या ओळी आहेत. त्या गाताना दादा एक पाऊल कसा हलकेच पुढे टाकतो बघ. त्या एका पावलामुळे रंगमंचाच्या अवकाशात पोवाड्यासाठी एक ‘ॲस्थेटिकल स्पेस’ निर्माण होते...’ 

वयात फारसं अंतर नसलेल्या लाडक्या काकानं हळूच काही गुपितं सांगावीत, कधी कान धरावेत, तर कधी मैत्रीच्या नात्यानं हातावर टाळी द्यावी तशा या भेटीगाठी असायच्या. मात्र प्रत्येक भेटीत जाणवायचं की यांचं आपल्यावर बारीक लक्ष आहे. अशा वेळी त्यांचा दरारा वाटायचा.

एकदा पुण्यामध्ये नवीन संगीतकारांचं संमेलन भरलं होतं. त्याचा आरंभ आधीच्या पिढीचे पाच संगीतकार करून देणार होते. त्यात अर्थातच मोघे होतेच. त्यांनी एक अफलातून प्रयोग केला. शांता शेळके या मोघ्यांच्या आधीच्या पिढीच्या. त्यांनी ‘तोच चंद्रमा नभात’ या काव्यात पुरुषाची मनोवस्था लिहिली आहे. जणू त्याला उत्तर म्हणून मोघ्यांनी स्त्रीच्या मनोवस्थेचं काव्य लिहिलं. संगीतबद्ध केलं. त्यांनी हे गाणं माझ्या पत्नीला, मंजिरीला शिकवलं. तिने ते संमेलनात गायचं होतं. वाद्यवृंद संयोजनाची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. हे गाणं निर्माण होतानाचा, संकल्पनेपासून सादरीकरणापर्यंतचा प्रवास विलक्षणच होता पण गोष्ट इथे संपली नाही. मंजिरीने गाणं सादर करण्याआधी मोघे बोलायला उभे राहिले. त्यांनी स्वतःच उपस्थितांना आम्हां दोघांची छान ओळख करून दिली. गदिमा, शांताबाई, मोघे या परंपरेशी आमचंही नातं जुळलं जातंय असं सांगणारा अनुभव होता तो.

मोघ्यांच्या पंचाहत्तरीच्या निमित्ताने त्यांच्या कारकिर्दीवर आधारित कार्यक्रम करण्याची चर्चा सुरू होती. संहिता कोण लिहिणार? अर्थात स्वतः मोघेच दुसरं कोण? पण त्यांनी माझ्याकडे बोट दाखवलं. संयोजकांना सांगितलं, ‘माझ्यावरचा कार्यक्रम प्रवीण लिहील आणि मी त्याचं दिग्दर्शन करेन...’

हा मला सुखद धक्काच होता. रंगमंचीय कार्यक्रमांच्या संहितालेखनासाठी मी मोघ्यांना मनोमन गुरू मानत आलो. प्रत्यक्ष त्यांच्याबरोबर बसून त्यांच्यावरचाच कार्यक्रम लिहिणं म्हणजे वेगळंच काम. पण त्यांनीच मला धीर देऊन लिहितं केलं. इतकं मोठं आयुष्य, असंख्य गाणी, अनेक प्रसंग... दोनतीन तासांच्या कार्यक्रमात काय आणि कसं मांडणार? मला मुळात एक माणूस इतका विविधांगी कसा जगू शकतो याचंच आश्चर्य वाटत होतं. मी धीटपणे विचारलंच. त्यावर उत्तर आलं, ‘अरे, कलाकाराच्या वाटचालीत सर्वात महत्वाचं काय? तर केवळ ‘पावलापुरता प्रकाश’. तोच आधाराला घेऊन चालत राहायचं. मग काही गमावल्याची खंत नाही, कमावल्याचा आनंद नाही. या पावलापुरत्या प्रकाशात जे दिसतं तेवढंच एक सत्य. आणि ते पाहण्याचं भाग्य फक्‍त कलाकारांनाच लाभतं.' हे ऐकताना मला ‘सुधीर मोघे एका जागी कधीच सापडत नाहीत.’ या वाक्याचा अर्थ पूर्णपणे समजून गेला.

काही अडलं तर दार हक्कानं वाजवावं असे मोघे. कधी लहान होऊन ज्यांना आपलं कौतुक दाखवावं असे मोघे. ‍सतत उर्जेने भारलेले मोघे... त्यांच्याकडून रिकाम्या हाती परतलो असं कधी झालंच नाही. आज खूप वर्षांनी ओंजळीत काय मिळालं ते पाहू गेलो तर या ओळी सुचल्या...

काळाचंही वय होतं.‍
त्याच्या सुरकुतलेल्या भिंतीवरचे
पोपडे निघतात, ढलपे गळतात,
चिरे उघडे पडतात.
गिलावा पडून गेलेला चिरा 
सांगतो कथा,
ऐश्वर्याच्यासंपन्नतेच्यापूर्णत्त्वाच्या...
आजोबांनी थकल्या आवाजात
संध्याकाळी शुभंकरोति म्हणावी तशा.
अन् एका अटळ क्षणी,
पडझड होते.
चिरा ढासळतो...  
भिंत उसवते...
करकरीत तिन्हीसांजेची मरगळ
आत शिरते तेव्हा कळतं,
चिऱ्याने रोखून धरला होता सूर्यास्त.
आता त्या पडझडलेल्या खिंडारातून
भेडसावणारी रात्र पाहताना
काय करावं?
स्वतःच चिरा व्हावं,
आजोबा व्हावं,
तेही नाही जमलं तर...
एक पोपडा तरी व्हावं,
पुढच्या पिढ्यांचा
सूर्यास्त रोखून ठेवण्यासाठी.

Comments

  1. Ekdam bhari lihilays re Praveen. Itkya saglya athavani khoopch bhari vatatay. 👍

    ReplyDelete
  2. छान लिहिलं आहे.असेच होते मोघे.

    ReplyDelete
  3. खरंच प्रविण. ह्या जिवंत झऱ्याच्या सहवासाने तुम्ही चिंब समृद्ध झालात. केवढा आनंद अनुभव.. माझ्या अंगावर एकदाच त्यातील काही शिंतोडे अजित सोमणांमुळे उडाले तर मी वेडा झालो होतो. खुप छान. असा वारसदार होणे पण सोपे नसते. तुम्हा दोघांनाही खुप खुप शुभेच्छा. 💐

    ReplyDelete
  4. विलक्षण लिहिलेय प्रविण..... आणि मोघे... खरच अवलिया च... त्यांना एका एका जागी धरून ठेवणे केवळ अशक्य...लेखणीत धरून ठेवलंस... खूपच छान..!!

    ReplyDelete
  5. अतिशय भिडणार लिखाण, 78 सालापासून त्यांचा सहवास लाभला ते होते तोपर्यंत, तुझ्या प्रत्येक वाक्यातून त्या त्या वेळचे मोघे डोळ्यापुढे आले, खूप सुंदर

    ReplyDelete
  6. अनुराधा मराठे

    ReplyDelete
  7. अप्रतिम लिहलंयस रे..

    ReplyDelete

Post a Comment