मीटर डाऊन

माझ्यात आणि समस्त रिक्षावाल्यांमध्ये ‘लव्ह-हेट रिलेशनशीप’ आहे. म्हणजे मला जेव्हा त्यांच्यावर प्रेम येतं तेव्हा त्यांना मी नकोसा असतो. आणि जेव्हा मला रिक्षा नको असते तेव्हा अगदी गर्दीच्या वेळीही इतर गिऱ्हाईकं सोडून रिक्षावाले माझ्याकडे अपेक्षेने पाहात सावकाऽऽश पुढ्यात येऊन थांबतात. मीटरचे अठरा रुपये झाल्यावर त्यांच्याकडे परत देण्यासाठी दोन रुपये कधीही सुट्टे नसतात. आणि त्यांची जिरवण्यासाठी मी सुट्टे पैसे खिशात ठेवले तर नाणी हाती येईपर्यंत मीटर वीस रुपयांवर जाऊन पोचलेलं असतं. माझं जवळचं अंतर त्यांना लांब वाटतं. लांबचं अंतर सांगितलं तर त्यांची दिशाच वेगळी असते.

हे सारं एकवेळ मान्य. पण कधीकधी रिक्षेच्या दुप्पट स्पीडने चालणाऱ्या त्यांच्या गप्पा रिक्षेपेक्षा अधिक लांबच्या रस्त्याने जाणाऱ्या असतात. गर्दी, खड्डे, पोलीस, पेट्रोलचे भाव, बायकांचं ड्रायव्हिंग अशी वळणं घेत घेत त्या राजकारणापाशी पोचतात. खरं तर हे एकतर्फी चाललेलं स्वगत असतं. त्यात मला काहीच स्थान नसतं. कोणीतरी ऐकायला हवं एवढ्याचसाठी मला त्या रिक्षेत घेतलेलं असतं. पण ती बडबड मन लावून ऐकली तर पुण्यातले खड्डे जाणवत नाहीत हेही खरं. म्हणून गर्दीच्या कोलाहलातही मी एकाग्रता पणाला लावून ऐकत बसतो. आणि मग तिचा माझ्यावर परिणाम व्हायला लागतो. त्याचेच हे दोन किस्से.

एकदा घरून निघालो. त्या दिवशी माझा शुभवार नव्हता. म्हणजे नशीबात रिक्षा नव्हती. तीन जणांनी हिणकस नजरेने पाहिलं, दोन जणांनी पाहून न पाहिल्यासारखं केलं. एक तर स्वतःहून थांबला आणि मी कसा चुकीच्या मार्गाला लागलोय असा चेहरा करून यू टर्न मारून निघून गेला. पण अखेरीस स्टँडवर एकजण सापडलाच. थोडसं टक्कल, गोल चेहरा, बुटकाच पण पैलवानी आडवा देह. मनगटात पितळी कडं, गंडा. केवळ त्याच्या गणवेशावरून हा रिक्षाचालक असावा असा संशय येत होता. निवांतपणे तंबाखू चोळत, पेपर वाचत बसला होता. खूप मिनतवाऱ्या केल्यावर त्यानं माझं सारथ्य स्वीकारलं. त्या क्षणापर्यंत मला हा हिरो शल्याचा वंशज निघेल हे ठाऊक नव्हतं. महाभारतामध्ये शल्य नावाच्या एका सारथ्याने कर्णाचा एवढा अपमान केला होता की कर्णाचा युद्ध करण्याचा कॉन्फिडन्सच गेला. रिक्षेत बसल्या क्षणापासून मीटर टाकण्याआधीच याने माझा पाणउतारा करायला सुरवात केली...

खरं तर मी येनारच न्हवतो. पन तुमी लई रिक्वेश्ट केली म्हनल्यावर नायी कसं म्हनायचं.’ हे वाक्य टोचतं न टोचतं तोच पुढची उतारी झाली. ‘जरा आदी निगायचं ना घरातनं. म्हंजे असा उशीर झाला नसता. दुसरा कुणीतरी मिळाला असता तुमाला. आता मी माझी सगळी कामं टाकून तुमच्याबरोबर यायला तयार झालोय...’ शांतपणे हातातल्या पेपरची गुंडाळी करत, तंबाखू थुंकत तो म्हणाला.

मी त्याला किती नकोसा आहे हे त्यानं अतिशय प्रांजळपणे सांगितलं. पण तोडून बोलायची सोय नव्हती. गरज मला होती. उशीर झाला होता. लांब जायचं होतं. महत्त्वाचं काम होतं. डोक्यात काहीतरी चक्र चालू होतं. पण हा चक्रधर काही गप्प बसायला तयार नव्हता. ड्रायव्हिंग तर जेम्स बाँडकडेच शिकला असणार. तोंडाने शिव्या, मध्येच फोन घेणं, सिग्नल तोडणं सारं काही यथासांग चालू होतं.

त्याच्या आयुष्यातल्या साऱ्या कटकटी तो माझ्यावर फेकत होता. जणू काही मीच त्यांना जबाबदार होतो. त्याचा राग, वैताग सगळं मान्य पण त्यासाठी माझी निवड का व्हावी? आता माझ्या डोक्यातलं चक्र पूरतं विस्कटलं. त्याच्या प्रत्येक शब्दागणिक चिडचिड वाढत चालली. घरातून ज्या उत्साहाने निघालो होतो तो मावळला. आणि खरं सांगतो; आता माझं काम होणार नाही या निष्कर्षाप्रत येऊन पोहोचलो. एकाची अस्वस्थता, नकारात्मकता दुसऱ्याकडे कशी परिवर्तीत होते याचं हे तीन चाकांवरचं धावतं उदाहरण. रिक्षा पाहिजे तिथे पोचली. मग मीही घुश्शातच उरलेल्या पैशांसाठी अडून बसलो. यावरही त्याचं छद्मी हसणं कानावर पडलं. एकमेकांना मनातल्या मनात शिव्या देतच आम्ही पांगलो.

आणि खरंच त्या दिवशी माझं एकही काम झालं नाही. भिंतीवर गलिच्छ पोस्टर चिकटावं तसा तो अनुभव मनावर दिवसभर चिकटून राहिला होता.

पण सगळेचजण असे नसतात. किंबहुना चांगलेच असतात. एकामुळे सरसकट सगळ्यांनाच नावं ठेवणं चूकच. खरं तर वाईटांची संख्या बोटांवर मोजण्याइतकीच असते. आणि तेही सदासर्वकाळ वाकडेच असतील असंही नाही. एकेकाची वेळ असते. पण ती समजून घेण्यासाठी मी काही संत वगैरे नव्हतो.

आणि त्याच दिवशी एक वेगळा अनुभव आला.

रात्र झाली. आता रिक्षेच्या नादी न लागता मी चालत चालत निघालो. तर मला पाहून स्टँडवरून एक रिक्षा वळली आणि मागोमाग येत शेजारी येऊन थांबली. हे रिक्षाचालक म्हातारेसे होते.

कुठं?’ त्यांनी खुणेने प्रश्न केला.

मी अनिच्छेनंच गंतव्यस्थान सांगीतलं. त्यावर त्यांनी क्षणभर विचार केला आणि मान डोलावली. ‘हं...’ म्हणून आत बसण्याची खूण केली. कदाचित त्यांना त्या दिशेला जायचं नसावं असं वाटून गेलं. मग मीसुद्धा सकाळच्या अनुभवानं; माझ्या घरच्या वाटेवर चढ लागतो, येताना भाडं मिळत नाही, मीटरप्रमाणेच पैसे देणार वगैरे सगळं आधीच सांगून घेतलं. उगाच मागाहून कटकट नको.

बसा हो माऊली... घरीच जायचं तर वाट कशी का असंना.’ जराशा घोगऱ्या आवाजात हसत म्हणाले.

मळकट पांढरा पायजमा झब्बा, गळ्यात तुळशीची माळ, कपाळाला बुक्का, फाटलेली चप्पल. मोठाल्या पांढऱ्या मिशा, डोळ्याच्या कडेला चामखीळ, पोट सुटलेलं आणि पाठीत पोक. सीटवर फतकल मारून बसले होते. या दिसण्यात काहीच आकर्षक नव्हतं. एरवी त्यांच्याशी बोललोही नसतो.

मीटर टाकलं गेलं. मी गप्प बसलो होतो. ते मात्र आरशातून अधूनमधून माझ्याकडे पाहात होते. ‘घरी चालला होय?’ त्यांनी निरर्थक प्रश्न विचारला. ‘झाऽऽली सुरवात’ असं मनाशी म्हणत मी काहीच बोललो नाही. त्यांना मात्र गप्प राहवत नसावं. दोन तीन चौक गेल्यावर पुन्हा विचारलं, ‘दमलाय का?’ या प्रश्नात आपुलकी होती का भोचकपणा हा निवाडा मी तरी करू शकलो नाही. पण ते बोलतच राहिले, ‘रात्रीच्या वेळेला घरी जाणाऱ्यांना मी कधी नाही म्हणत नाही. माणूस दमलेला असतो. दिवसभराची खिटखिट डोक्यात चालू असते. तेवढीच आपल्याकडून सेवा...’

आता मात्र मी सावरून बसून ऐकू लागलो. हे रिक्षावाले काका कोणत्यातरी अध्यात्मिक गुरूंचे अनुयायी होते. ‘दर रविवारी बैठक असते. ती चुकवत नाही. महाराज म्हणतात आपल्या धंद्यातच परमार्थ शोधा. सेवा करा. पैसा कुठं पळून जात नाही.’

दोन वाक्यांत अंतर ठेवून संथपणे चाललेलं ते बोलणं छान होतं. त्यात भाबडी श्रद्धा डोकावत होती. हात वारंवार गळ्यातल्या माळेकडे जात होता. क्षणाक्षणाने माझी पाटी कोरी होत होती. मग मीही त्यांना सकाळी काय घडलं ते सांगितलं. त्यावर म्हणाले, ‘चालायचंच हो. माणूस आहे म्हणून सोडून द्यायचं झालं,त्या सहज वाटणाऱ्या वाक्यानं पैलवानी चालकावरचा राग मावळून गेला. त्याची कीवच वाटू लागली. घर येईतो सारेच ओरखडे अलगद पुसले गेले. मीटरचे पैसे दिल्यावर काकांनी ‘माऊलीऽऽ’ म्हणत नमस्कार केला आणि निघून गेले. मी पुन्हा पूर्वपदावर आलो.

एकाच दिवसातले हे दोन अनुभव केवळ रिक्षाचालक या साधर्म्यामुळे लक्षात राहिले.

मानसशास्त्रातली कारणं वगैरे मला माहीत नाहीत, पण एक थिअरी खरी वाटते. अंधश्रद्धा म्हणा हवं तर. बघा पटत्येय का. माणसांच्या लहरी असतात. संवाद साधताना या वेव्हलेन्थस्‌ एकमेकांकडे पास होतात. राग, खंत, आनंद, दुःख अनेक भावभावनांची देवाण घेवाण होते. साध्या गप्पा मारताना ओळखीचा असो वा अनोळखी; काही काळ आपण दुसऱ्याचं आयुष्य जगतो. आपलं त्याला जगायला देतो. हे उधारीचं आयुष्य कधी त्रासाचं तर कधी आनंदाचं. हा अनुभव अगदी अनपेक्षितपणे कुठेही येतो. घरात, नात्यात, मित्रांमध्ये, ऑफिसमध्ये. म्हणूनच आपापली रिक्षा चालवताना ऐकणाऱ्याला कुठे आणि कसं घेऊन जायचं हे नीट ठरलं पाहिजे... पण तेच तर अवघड आहे.

ते जमलं की सुसंवादाचं मीटर डाऊन !


...प्रवीण जोशी
98505 24221
pravin@pravinjoshi.com

Comments

  1. नेहमीप्रमाणे उत्तम👌👍😊

    ReplyDelete
  2. शेवटी माणूस आहे. आपणही आपल्या कुटुबियांसमवेत असे अनुभव घेतच असतो. शांतपणे विचार केला की पटत.
    छान मांडले आहे.

    ReplyDelete
  3. छान .....आपापली रिक्षा.....👌👌

    ReplyDelete
  4. 👌👌👌. Chandrakant Ronghe....

    ReplyDelete
  5. आपली रिक्षा तर तुम्हाला माहीतीच आहे. मिटरच नाही ओ..!!

    ReplyDelete
  6. सुरेख... रोहिणी गोखले

    ReplyDelete

Post a Comment