'मी'पण त्यांचे...

थोर माणसांचं थोरपण मोजायची फूटपट्टी सापडणं अवघडच. त्या व्यक्‍ती अगम्य अशा विषयातल्या ज्ञानवंत असतील तर अजूनच कठीण. आपल्याला त्या विषयातलं काहीच कळत नसतं. मान देण्यासाठी त्यांची ‘किर्ती’ हाच एकमात्र निकष असतो. मग आपण काय करतो? चक्क आपल्या ‘मी’पणाशी त्यांचं ‘मी’पण ताडून पाहतो. त्या आधारे त्यांना जाणून घ्यायचा प्रयत्न करतो. आणि हे गणित हमखास चुकतंच. कारण आपलं मापच फार तोकडं असतं. हे मला दोन घटनांमधून उमगलं. आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रचंड नावलौकिक मिळवणाऱ्या, पद्मविभूषण पदवीने सन्मानित झालेल्या, दोन महान मराठी शास्त्रज्ञांचा मला अगदी काही क्षणांचाच सहवास लाभला. या घटना छोट्याच आहेत. त्यात काहीच विशेष नाट्य वगैरे नाही. पण खोल परिणाम करून गेल्या.

झालं असं...

वीस एक वर्षांपूर्वी एका जाहिरात संस्थेला पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकरांवर काही लेखन करून हवं होतं. त्यांचं व्यक्तिमत्व, विचार, अनुभव यांविषयी लिहायचं होतं. हे काम माझ्याकडे आलं. या निमित्ताने माशेलकर सरांना भेटण्याची संधी मिळणार होती.

भेटीची वेळ मिळाली. ‘सकाळी सात वाजून पंधरा मिनीटे.’ इथूनच मला त्यांचं वेगळेपण जाणवायला लागलं. तेव्हा माशेलकर सर पुण्यातल्या ‘नॅशनल केमिकल लॅबरोटरीचे’ संचालक होते. प्रचंड व्यग्र असल्यामुळे भेटीसाठी रविवार सकाळचा केवळ अर्धा तासच मिळाला होता. मी तर सात वाजताच त्यांच्या ऑफिसबाहेर हजर झालो. थंडीचे दिवस. एनसीएल मधला लांबलचक कॉरीडॉर. फक्‍त सरांच्या केबीनचं दार उघडं. बाकीची बंद. आसपास ना कोणी शिपाई ना कोणी इतर कर्मचारी. कुठेच काही हालचाल नाही. काय करावं? कुणाला विचारावं? मी बाहेर ताटकळत उभा. त्यांना विचारायचे प्रश्न पुन्हा पुन्हा डोळ्याखालून घालत होतो. भेटीची वेळ पार करून काटा पुढे पुढे सरकत होता. माझं दडपण वाढत होतं. चुकून भलत्याच ऑफिससमोर तर उभे नाही ना राहिलो इथपासून साऱ्या शंका येऊन मी अस्वस्थ. आणि तेवढ्यात स्वतः माशेलकर सरच आतून बाहेर आले. सहा फुट उंची. रुबाबदार ताठ चालणं. चेहऱ्यावर आपुलकीचं आश्वासक हास्य. साध्या शर्टवर घातलेला निळा कोट. माझ्याकडे पाहून नाव विचारत सहजरित्या म्हणाले, ‘वाट पहायला लागली का? यायचं की थेट आतमध्ये. सॉरी, तुमचा वेळ गेला. या ना आत या...’

पहिल्या वाक्यातच समोरच्याला जिंकणारं व्यक्तिमत्व म्हणजे काय, हे त्या दिवशी मला समजलं. मी काढलेल्या निम्म्याहून अधिक प्रश्नांची उत्तरं मला भेटीच्या आधीच मिळाली होती.

चर्चा सुरू झाली. सर अतिशय नेमकेपणाने मुद्देसूद बोलत होते. पण तरीही ते बोलणं रुक्ष नव्हतं. पिकलेल्या ज्ञानाने गोड ललीतरूप धारण केलं होतं. बोलता बोलता त्यांनी मध्येच विचारलं, ‘पाणी घेणार?’ मी अनाहूतपणे हो म्हणालो. ‘एक मिनीट हं...’ असं म्हणत सर स्वतः खूर्चीतून उठून बाहेरच्या कॉरिडॉरमधल्या कूलरपाशी गेले. ग्लास भरून पाणी आणून दिलं. तो ग्लास हाती घेताना मला मेल्याहून मेल्यासारखं झालं.

ठरल्याप्रमाणे ‍अर्ध्याच तासात त्यांनी मला हवं ते दिलं. नंतर अवांतर बोलता बोलता मी संगीताशी संबंधित आहे हे कळल्यावर सहजपणे एक अवघड प्रश्न आला, ‘भारतीय संगीतातल्या श्रुतीविचारावर तुमचं काय मत आहे?’ यावर मी सावध होऊन निरखून पाहिलं. त्या महान शास्त्रज्ञाच्या डोळ्यात नवीन काही जाणून घ्यायची उत्सुकता जागी झाली होती. इथे माझा काय पाडाव लागणार होता? गप्प राहिलो. मग तेच हसत म्हणाले, ‘पुढच्या भेटीत यावर नक्की बोलूया...’ या वाक्यानं त्यांनी भेट संपवली नव्हती तर नवीन भेटीसाठी दारं उघडली होती.

साधेपणा हा गुण साधा नसतोच. आणि ज्ञानाशी अनुसंधान बांधलेलं मन छोट्यामोठ्या मानसन्मानांचा विचारही करत नाही.

दुसरा छोटा प्रसंगही असाच मोठा अनुभव देणारा.

एका कार्यक्रमासाठी पद्मविभूषण डॉ. जयंत नारळीकरांचं मनोगत चित्रीत करायचं होतं. अवघ्या दोन मिनिटांच्याच लांबीचं. मी चित्रीकरणाची मंडळी बरोबर घेऊन त्यांना ‘आयुका’ या संस्थेत भेटायला गेलो.

यापूर्वी नारळीकर सरांचे फोटो बघितले होते. मुलाखती पाहिल्या होत्या. त्यांची अनेक पुस्तकंही वाचली होती. त्यातून स्वभावाचा जो अंदाज बांधला होता तसंच अत्यंत ऋजू व्यक्तिमत्त्व समोर येऊन उभं राहिलं. हसरे बुद्धीमान डोळे, त्यात किंचित मिश्कीलपणाची छटा, गोरा रंग. शांत आणि मितभाषी स्वभाव. बोलण्यात एक छान ठेहराव. स्वच्छ वाणी. समोरच्याचं म्हणणं ऐकून घेण्याचा गुण खूप दुर्मिळ असतो. तो तर इथे इतका प्रबळ की सर आपलं ऐकतायंत याचंच दडपण यावं. त्या दिवशी त्यांची प्रकृती ठिक नव्हती तरी दिलेली वेळ पाळण्यासाठी आयुकामध्ये आले होते.

चित्रीकरणापूर्वी जरा चर्चा झाली. ‘मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण’ या विषयावर सरांना मनोगत मांडायचं होतं. त्यांनी पेन काढलं, समोरच्या पॅडवर काही मुद्दे उतरवले. त्यातले काही मनाशी पक्के केले. हे चालू असतानाच आमची कॅमेरा, लाईटस्‌, मायक्रोफोन इत्यादी तयारी चालू होती. शुटींगचे लाईटस्‌ भलते प्रखर असतात. त्यांच्याकडे पाहून बोलणं अवघड असतं. सरांच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ लाईट ठेवला गेला. त्या छोट्याशा केबीनमध्ये दुसरा पर्यायच नव्हता. पण ते आमच्या लक्षात येईपर्यंत सर हलकेच मान हलवत म्हणाले, ‘दोन मिनीटं सलग बोलेन, म्हणजे तुम्हाला एडिटींगचे कष्ट नकोत. चला...’ सर बोलू लागले. पण त्या प्रखर प्रकाशामुळे त्यांच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. तिकडे लक्ष न देता त्यांनी दोन मिनीटं म्हणजे अक्षरशः एकशेवीस सेकंदात आपलं म्हणणं प्रभावीपणे मांडलं. आणि कलाकाराने अभिप्रायासाठी दिग्दर्शकाकडे पाहावं तसं माझ्याकडे पाहिलं. फारच सुरेख बोलले होते पण डोळ्यात आलेलं पाणी शुटींगमध्ये दिसत होतं. डोळे लालही झाले होते. ‘पुन्हा एकदा करुया’ असं म्हणण्यासाठी माझी छाती होत नव्हती. पुरता अवघडून गेलो होतो.

त्यांच्या ते लक्षात आलं. लाईटींगची तांत्रिक अडचणही त्यांनी ओळखली. काही बोलले नाहीत. चिले तर नाहीच. क्षणभर विचार केला आणि शेजारची खिडकी उघडली. बाहेरच्या नैसर्गिक प्रकाशाबरोबर शुटींगच्या दिव्यांचा त्यांनी असा काही मेळ घडवला की मी थक्क झालो. ‘चला, अजून एकदा बोलतो मी. काळजी करू नका. माझ्या डोळ्यांतून ना आजकाल असंच पाणी येतं. तब्येत ठिक नाही ना सध्या...’ स्वतःला झालेल्या त्रासाचं त्यांना काही वाटतंच नव्हतं. जणू काही दुसऱ्याच कोणाचं शुटींग चालू होतं आणि ते प्रेक्षक म्हणून आले होते. काहीच झालं नाही अशा रितीने हसत हसत स्वतःच ‘कॅमेरा लाईटस्‌...’ अशा ऑर्डर्स देत पुन्हा मनोगत सुरू केलं. या दुसऱ्या टेकच्या वेळीही तोच उत्साह, तीच सुसूत्रता... एवढ्यावर संपलं नाही तर, सरांनी नैसर्गिक प्रकाश आणि कृत्रिम प्रकाश यांचा चित्रीकरणासाठी कसा एकत्रित उपयोग करून घेता येईल यावरही काही मौलीक मतं दिली. एकदोन प्रयोगही करून पाहायला सांगितलं.

थोर माणसांकडून कुणीच रिक्‍त हस्ते परतत नाही.

या दोन्ही घटना तशा सहजी घडलेल्या. पण आपल्या मनातल्या ‘थोरपणा’च्या प्रतिमेबद्दल विचार करायला लावणाऱ्या. तेव्हापासून मला खूप प्रश्न पडले. इतका साधेपणा, सच्चेपणा ही माणसं आणतात तरी कुठून? स्वतःच्या अधिकाराचं, ज्ञानाचं कणभरही ओझं त्यांच्या वागण्याबोलण्यावर येत कसं नाही? विद्या, शास्त्र, कला हे सारं आतून मानवतेच्या ज्या एकाच धाग्याने बांधलं गेलं आहे त्याचा त्यांनी प्रत्यय घेतलेला असतो का? उत्तूंग यशानंतर अहंपणाची रांगोळी ते कशी पुसून टाकतात? त्यांचं थोर ‘मी’पण पाहायचं तरी कोणत्या पातळीवरून?

आणि या साऱ्या प्रश्नांची उत्तरं मला अचानकपणे बोरकरांच्या कवितेत सापडली.

जीवन त्यांना कळले हो
जीवन त्यांना कळले हो
मीपण ज्यांचे पक्व फळापरी
सहजपणाने गळले हो.

जीवन त्यांना कळले हो...


...प्रवीण जोशी
98505 24221
pravin@pravinjoshi.com

Comments

  1. परिपक्व फळापरी लिखाण
    तुझे आता मात्र पिकले हो

    ReplyDelete
  2. अंर्तमुख करायला लावणारं लेखन 👍

    ReplyDelete
  3. उत्तम लिखाण, नेहेमीप्रमाणे,,,,,,, चंद्रकांत रोंघे,,,,,,,

    ReplyDelete
  4. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  5. अप्रतीम .लाई भारी.

    ReplyDelete
  6. विद्या विनयेन शोभते

    ReplyDelete
  7. छान लिहीलं आहेस ओघवत्या भाषेत

    ReplyDelete

Post a Comment