जिंदा है...

खरं तर हा लेख या ब्लॉगवरच्या ‘ओळखीची अनोळखी माणसं’ या सदरात टाकावा, का ‘मिक्स व्हेग’ या सदरात, असा प्रश्न पडला होता. यात व्यक्तिचित्रं हेत, फक्‍त ती माणसांची नाहीत. निर्जिव वस्तूंची आहेत. चेहरे नसलेल्या अनेक व्यक्तिमत्वांनी तुम्ही आम्ही सतत वेढले गेलेलो असतो. त्यांची ही शब्दचित्रे.

उदाहरणंच द्यायची झाली तर अनेक आहेत.

लहानपणी माझ्या आजोळी आम्ही संध्याकाळी एका टेकडीवर जाऊन बसत असू. करवंदांच्या जाळ्यांमधून समोर वाहता पुणे मुंबई रस्ता दिसायचा. फारशी वर्दळ नसायची. येणारी प्रत्येक गाडी नवीन चेहरा घेऊन यायची. त्यातही विशेषतः ट्रक्स जास्त. त्यांचे आवाज, दिसणं, वेग, लय, हॉर्न या साऱ्यांमध्ये एक विलक्षण जिवंतपणा असायचा. प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा. अगदी खरीखुरी माणसंच वाटायची ती. तुडूंब माल लादल्यामुळे कललेले ट्रक तिरपं पागोटं घालून जाणाऱ्या गावकऱ्यांसारखे दिसायचे. एखाद्या ट्रकच्या समोरचं बॉनेट अगदी चाफेकळी नाकासारखं भासायचं. डोळ्यांचे गरगरीत हेडलाईट, काचांचं कपाळ यामुळे तो ट्रक बांधकामावर घमेली उचलून चाललेल्या कोंगाडी बाईसारखा दिसायचा. काहींचा आवाज मारकुट्या सरांसारखा चिरका तर काहीजण टायरचा चटचट आवाज करत नाईलाजाने पाय ओढत शाळेला निघाल्यासारखे दिसायचे. त्या निवांत वेळी हे सारं खरं आणि जिवंत वाटायचं.

माझ्या संग्रहातली पुस्तकंही मला माणसांसारखीच भासतात. आतल्या लेखनाएवढंच त्या पुस्तकांचा स्पर्श, त्यांना वापरून आलेला गुळगुळीतपणा हे सारं आपुलकीचं वाटतं. ते इतकं ओळखीचं असतं की माझ्या अनुपस्थितीत दुसऱ्या कुणी ते पुस्तक वाचल्याचं मला लगेच समजतं. लेखक आणि मी यांना जोडणाऱ्या त्या कागदांना चेहरा नाही असं कसं म्हणू?‍ व्यंकटेश माडगुळकरांचं पुस्तक हाती घेताना मला गावच्या पारावर तात्यांच्या गप्पा ऐकतोय असा भास होतो. मग मीही छान अघळपघळपणे ऐसपैस बसतो. पुलंचं पुस्तक पाहिलं की त्यात त्यांचा हसरा प्रसन्न चेहरा दिसायला लागतो. जीएंचं पुस्तक त्यांच्यासारखंच गूढ काळा चष्मा लावलेलं. एखाद्याला जरा वेळ काढून भेटायला जावं तसं ते हाती घ्यावं लागतं. शांताबाईंच्या पुस्तकाला आजीच्या बटव्यातल्या खडीसाखरेचा वास येतो. ज्ञानेश्वरी हातात घेतली की डोळ्यात पाणी येतं. या साऱ्या लेखकांच्या माझ्या मनातल्या प्रतिमांचे खेळ असतील बहुतेक. पण हे नातं एकतर्फी नाही हे मात्र नक्कीच.

पुस्तकांमागे मानवी भावनांचा संबंध तरी आहे. पण आत्ता ज्या लॅपटॉपवर हे सारं टाईप करतोय त्याच्या साऱ्या खोडी मला ठाऊक आहेत. हा जरा ताठ मानेचा लॅपटॉप आहे. थोडा आखडूच. आधीचा जरा मवाळ होता. पण काय केल्यास हा चिडतो, कधी छान काम करतो, कधी रुसतो हे मला पाठ आहे. त्यालाही माझ्या सवयी माहित असाव्यात. जरा लक्ष दिलं नाही की अगदी काम असताना अडून बसतो. कधी मनापासून मदत करतो. त्याची बटणं, स्क्रीन, रंग हे सारं इतकं परिचयाचं झालंय की उघडल्या उघडल्या मला त्याचा नूर कळतो. अगदी अंतर्ज्ञानी असल्यासारखं वाटतं.

माझ्या एका मित्राने दिलेला शर्ट मला नेमका कधी घालावासा वाटतो हे त्या शर्टलाही ठाऊक असतं. अगदी प्रेमळ आहे तो. आपसूक हातात येतो. त्यावर कध्धी काही सांडत नाही. शहाण्यासारखा वागतो. माझी गाडी तर दार उघडतानाच मला तिला काय हवंय ते सांगते. समोरून पाहिलं की हसल्यासारखी दिसते. अर्थात त्या हसण्यातही प्रकार असतात. हिला विकून आता दुसरी गाडी घेतो असं मनात जरी आणलं तरी ते तिला कळतं. ती चिडल्याचं मला इंजिनच्या आवाजावरूनच कळतं. मग छान खर्च काढते, लाड करून घेते. पुन्हा मी तिला सोडून द्यायचा विचार करत नाही. तिही मला कधी दगा देत नाही. असं आमचं छान चालू असतं.

माझ्याकडे एक पेन आहे. एकदम भारीतलं. आजकाल प्रत्यक्ष कागदावर लिहायची फारशी वेळ येत नाही. पण ते महागडं पेन खिशाला लावून भाव खाण्याचं आहे. आणि हे त्यालाही माहित आहे. काळंकुळकुळीतच आहे पण सदा श्रीमंती थाटात आणि टेचात असतं. वेळेला पटकन सापडत नाही. आपण घाबरलो की याला बरं वाटतं. इतकी वर्ष झाली याला घेऊन पण अजूनही माझ्याकडे ‘तू कोण मला बाळगणार?’ अशा नजरेनं बघतं. मात्र अक्षर कधी बरं यावं हे त्याला बरोब्बर कळतं. त्यालाही लिहिण्याचा मूड असतो. सुरवातीला अक्षर एकदम झोकदार येतं. मग मलाही लिहिण्याचा छान उत्साह येतो. पण एक दोन पानं झाली की शैलीदार अक्षरांचे फरांटे होऊ लागतात. दुसरं पेन घेतलं की अक्षर बरं येतं पण आता माझा मूड गेलेला असतो. त्या पेनशी असं काहीतरी शब्दांपलीकडचं नातं आहे.

अशी अक्षरशः अगणित उदाहरणं देता येतील.

त्यातल्या अनेक वस्तू निकामी, निरुपयोगी झाल्या तरी मी आजही जपून ठेवल्यात. टाकून द्यायचं धाडसच होत नाही. कुठलं तरी नातं तुटेल असं काहीतरी वाटत राहतं. माझी जुनी गाडी, एनसीसीच्या युनिफॉर्मवरची माझी नेमप्लेट, माझ्या मुलीने लहानपणी रेघोट्या मारलेले कागद...  कितीतरी.

मी कधीकधी माणसांपेक्षाही या वस्तूंना अधिक चिकटून राहतो. रोजच्या आयुष्यातल्या घटनांमध्ये त्यांचा सहभाग असेल नसेल. पण मला त्यांत माणसांसारखेच चेहरे दिसतात, त्यांचे भाव कळतात. त्यांच्याशी वेळप्रसंगी चक्क संवादही होतो. मग त्यांना निर्जिव का म्हणावं? अर्थात या वस्तू घेताना उपयोग हाच एक रोखठोक विचार होता नंतर त्या हातात बसत गेल्या हे खरंच. पण केवळ मालकी हक्कानं येणारं प्रेम म्हणावं तर मला ते त्यांच्याकडूनही जाणवतं. या वस्तू जशा माझ्या हाती ‘बोलतात’ तशा इतरांच्या हाती बोलत नाहीत.

हे असं जमवलेलं गणगोत समोर घेऊन बसलो की गुलजारसाहेबांच्या ओळी आठवतात.

जिनमें जान थी, 
उन सबका देहांत हो गया.

जो चीजें बेजान थी,
अबतक जिंदा हैं...

जिंदा है...

 

...प्रवीण जोशी
98505 24221
pravin@pravinjoshi.com

Comments

  1. फारच उत्तम .......... चंद्रकांत रोंघे

    ReplyDelete
  2. भारीच सुरेख..... रोहिणी गोखले

    ReplyDelete
  3. खूपच छान! आपल्याला वस्तूंशी लळा लागतो आणि नकळत त्या आपल्या जगण्याचा भाग बनून जातात. वस्तूंना फक्त वस्तूमान नसते तर मानही असतो हे कळले. पटले नाही तरी हीच वस्तुस्थिती आहे!

    ReplyDelete

Post a Comment