एक आरस्पानी कोडं...

सामान्यतः माणसांचा स्वभाव प्रसंगाप्रसंगांनी कळतो. एकेक पदर उलगडावा तसं व्यक्तिमत्त्व हळुहळू समजत जातं. पण काही माणसं मात्र, जशी असतात तशीच थेट सामोरी येतात. आपण आपले पूर्वग्रह, औपचारीकता, चौकसपणा अशा सावध पायऱ्यांवर उभे असतो. आणि अचानकपणे समोर एक पारदर्शक स्वभाव अवतरतो. तो पाहून गोंधळून जायला होतं. मनातली गृहितकं फसतात, ताळा चुकतो.

ख्यातनाम गायिका उषा मंगेशकर माझ्या मनातला ताळा प्रत्येक वेळी असाच चुकवत आलेल्या आहेत. त्यांच्या स्वभावात काही कोडं नाही हेच माझ्यासाठी एक भलंमोठं कोडं आहे. इतकं आरस्पानी सरळसाधं व्यक्तिमत्त्व दुर्मिळच.

भेटीआधी मी त्यांच्याबद्दल बरंच काही ऐकून होतो. त्या भलत्याच परखड, स्पष्टवक्त्या आणि कडक आहेत; जराही चूक खपवून घेत नाहीत वगैरे... प्रत्यक्ष ओळख झाल्यावर तर त्याची खात्रीच पटली. पण त्याहीपेक्षा जाणवलं की हे टोकदार समजले जाणारे गुणही लोभस आणि सुंदर असू शकतात. त्यात समोरच्याचा अनादर नाही, ना स्वतःचा अहंकार. असते केवळ पाल्हाळचर्चा बाजूला करून नेमक्या मुद्याची सम गाठण्याची इच्छा. एकदा ती सम साधली गेली की उषाताईंशी मैफल जमलीच म्हणून समजा. मी अशा जमलेल्या मैफलीचा पुरेपूर अनुभव घेत आलो आहे. तिथे एक छान नितळ माणूसपण वास करत असतं. ते शब्दांत मांडणं मुश्कील. म्हणूनच लिहायला सुरवात कुठून करावी हे कळत नाही. इतका आरस्पानी सच्चेपणा शब्दांत मावतच नाही.

मंगेशकर घराण्याला सुरांबरोबरच निर्मळ दिलखुलास हसण्याचीही देणगी लाभली आहे. उषाताईंकडे पाहून तर ‘विनोदबुद्धी’ हा शब्द विनोद आणि बुद्धी या विसंगत वाटणाऱ्या दोन गुणांनी तयार झाला आहे हेच विसरायला होतं. पण तसं तर त्यांच्या स्वभावात अशा अनेक विसंगत जोड्या सुखाने एकत्र नांदतायत. क्षमाशीलता आणि संताप. भाबडेपणा आणि चातुर्य. समर्पण आणि आत्मसन्मान. अर्थात यातला प्रत्येक गुण त्या त्या वेळी बावन्नकशी खरा असतो. पारदर्शी असतो. रोखठोक अशी मतंही असतात. आणि आपण बालबुद्धीने काही सांगू गेलो तर तो नवीन दृष्टिकोन स्वीकारताना स्वतःची पाटी कोरी करण्याचीही तयारी असते. मला उषाताई कोडं वाटत आल्या आहेत ते याच सगळ्यामुळे.

अजून एक कारण म्हणजे त्यांची वेगळीच स्मरणशैली. तुम्हीआम्ही आठवणी लक्षात ठेवतो ते शब्दांनी. उषाताईंच्या स्मरणशक्‍तीचं माध्यम आहे चित्रकला. त्यांच्या स्मरणात हजारो घटना केवळ रंग, रेषा, आणि दृष्य यांच्या संदर्भाने कोरलेल्या असतात. म्हणजे आजपासून सत्तर पंचाहत्तर वर्षांपूर्वी, त्या चारसाडेचार वयाच्या असताना त्यांना बाबांचा अर्थात मा. दीनानाथ मंगेशकरांचा हात धरून कुठेतरी चालत निघाल्याचं आठवतं. पण ते का तर, बाबांच्या फडफडणाऱ्या धोतराच्या रेषांमुळे. दिदींनी पहिल्या पगारातून घेतलेल्या कापडाचा रंग आणि पोतही उषाताईंना नेमका आठवत असतो. पूर्वी नाना चौकात राहात असतानाचं तिथलं आवळ्याचं झाड त्यांच्या डोळ्यांसमोर आजही जसंच्या तसं झुलत असतं. मला वाटतं त्यांच्या मनात संगीत आणि चित्रकला यांना जोडणारा एक स्वरकुंचला सतत फिरत असावा.

उषाताईंची चित्रकला हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे. पोर्टेट अर्थात व्यक्‍तीचित्रण हा त्यांचा आवडता प्रकार. त्यांनी निसर्गचित्र वगैरे काढली पण रमल्या मात्र व्यक्‍तीचित्रांमध्येच. हे चित्रकलेतलं अतिशय अवघड प्रकरण. खरं तर एका माणसाने दुसऱ्याचं मनापासून गुणगान करणं हेच अवघड. त्यासाठी स्वतःसारखंच दुसऱ्याकडेही पारदर्शी नजरेनं पाहावं लागतं. मनाचा मोठेपणा लागतो. आणि ब्रशला आपल्या मनातले रंग चिकटूनही चालत नाहीत. म्हणूनच उषाताई जेवढ्या एकट्या रमतात तेवढ्याच गर्दीतही.

कंटाळा हा शब्द तर त्यांना माहितच नसावा. सदा उपक्रमशील. अगदी सहज गप्पा मारतानादेखील मध्येच त्यांना काहीतरी नवीन करण्याची कल्पना सुचते. क्षणापूर्वी शांत भासणाऱ्या उषाताई अचानकपणे कोणत्यातरी उर्जेने भारावून जातात. मग साधं खुर्चीतून उठताना देखील. ‘चला लगेच कामाला लागू या...’ असा पवित्रा असतो. या जीवाला शांतता मानवतच नाही. एक काम पूर्ण होण्याच्या आतच दुसरं सुरू करण्याची बालसुलभ चंचलता फार मोहक असते. ही क्षणिक हुक्की असेल, कलाकाराचा लहरीपणा असेल असं समजून आपण गाफिल राहावं तर अचानक फोन येतो, ‘आपलं काम कुठवर आलं...?’ त्यांनी ते कल्पनेतलं कामही पूर्णतः मनावर घेतलेलं असतं. टोकदार आवाजात ती उर्जा, ती सर्जनात्मक अस्वस्थता आपल्यापर्यंत पोचते. कार्यरत करते.

उषाताई ‘चालू वर्तमानकाळातच’ रमलेल्या असतात. उलटून गेलेल्या क्षणांना ‘वय’ म्हणत असतील तर वर्तमानातल्या क्षणांना ‘वृत्ती’ म्हणावं. उषाताईंना वय नाहीच एक छान वृत्ती आहे.

मला प्रश्न पडतो, इतक्या वर्षांच्या जीवनात त्यांच्या मनात कसलीच किल्मिषं, खंत, खेद नसतील का? असतीलच. पण मनामध्ये त्या साऱ्यांची अडगळ नाही हे नक्की. एखाद्या त्रासदायक घटनेचं वर्णन करतानादेखील त्यांच्या तिखट मसालेदार स्वभावामागून मध्येच एखादा गुळाचा खडाही डोकावतोच. अनेक वर्षांच्या विविधरंगी अनुभवांची संगती लावायचं त्यांचं स्वतःचं असं एक मानसशास्त्र आहे. त्याच्या जोडीला एक छान खट्याळ बालपणही लाभलेलं आहे. ते तर फारच गोड आहे. लहान मुलांसारखंच त्या छान रुसतात, कमालीच्या चिडतात, लगेच शांत होतात. कुठे खोटेपणा दिसला की उषाताई भडकल्याच. काहीही सहन करतील पण बेसूर वागण्याला क्षमा नाही.

त्यांच्या गाण्याविषयी मी काय बोलू? ते तर ‘सर्वश्रुत’ आहे. पण मला त्यांचं लयदार बोलणंही खूप आवडतं. खूप कमी माणसांच्या बोलण्यात अशी गाण्याची लय असते. उषाताई गप्पासुद्धा सुरेल करतात. अंतरा बदलावा तितक्या सहजतेने विषय बदलतात. पण इथेही एक गंमत होते. त्या एरवी म्हणतात, ‘मला अभिनय करणं आवडत नाही...’ पण चेहरा एवढा बोलका आहे की नावडता विषय निघाला की भावना लपवण्यासाठी त्यांना अभिनय करावाच लागतो. बोलता बोलता शांत झाल्या, ओठ आणि डोळे घट्ट मिटून मान हलवू लागल्या की समजावं काहीतरी बिनसलंय. मग त्या हनुवटीला बोटांचा आधार देऊन गाल फुगवून बसून राहतात. पण अखेरीस बांध फुटतोच. राग, कौतुक जे काय असेल ते स्वच्छपणे समोरच्याला तोंडावर बोलून दाखवल्याखेरीज त्यांना चैनच पडत नाही. त्याचा परिणाम काय होईल वगैरे विचार करण्याच्या भानगडीत त्या पडत नाहीत. बोलून छान मोकळ्या होतात.

मा. दीनानाथांना ‘उषा’ हे नाव सुचण्यामागे काही दैवी संकेत असावा. उत्साह, उपक्रमशीलता, प्रसन्नता, एकाग्रता, उर्जा, रंग असं सारं ज्या एकाच प्रहरात अनुभवता येतं त्या प्रहराचं नाव ‘उषा’. व्यक्‍तीचे गुण आणि त्याचं नाव क्वचितच असं समरस होऊन गेलेलं दिसतं.

बाबांबद्दल वाटणारा प्रचंड अभिमान हा सर्वच मंगेशकरांच्या स्वभावाचा एक प्रमुख पैलू आहे. सर्वांच्याच मनात बाबांची मैफल अखंड चालू असते. उषाताईंच्या मनात बाबांबरोबरच माई आणि लतादिदींनाही देवाचं स्थान आहे. दिदींकडे उषाताईंच्या नजरेतून पाहिलं की विस्तीर्ण हिमालयातून नेमकं कैलास शिखर दिसावं तसा भास होतो. पण बाबा, माई आणि दिदी हा विषय निघाला की उषाताईंकडेच पाहात राहावं. त्यांच्या साऱ्या वृत्ती पाघळून गेलेल्या असतात. मन त्या दिव्यत्वाभोवती रुंजी घालू लागलेलं असतं. ‍त्या वेगळ्याच दिसायला लागतात.

अशा वेळी हे वरवर सोपं वाटणारं आरस्पानी कोडं मला अजूनच अवघड वाटायला लागतं...‍


...प्रवीण जोशी

98505 24221
pravin@pravinjoshi.com

Comments

  1. अप्रतिम व्यक्तिचित्रण !👌👌 जणू काही एखाद्या प्रथितयश चित्रकाराने सहज रेखाटलेल्या सुंदर चित्रासारखंच !....

    ReplyDelete
  2. वर, वृत्ती आणि उषा या शब्दांची विश्लेषणं अफलातून

    ReplyDelete
  3. उत्कृष्ट व्यक्तीचित्र
    आनंद

    ReplyDelete
  4. बेतशीर, हुकमी, सुंदर...

    ReplyDelete
  5. अश्या व्यक्ति आणि त्यांचा सहवास.. आनंदच आनंद..!!

    ReplyDelete
  6. खूप सुंदर व्यक्तिचित्र👌👍😊

    ReplyDelete
  7. सुंदर व्यक्तिचित्रण..स्वरकुंचला हा शब्द उषाताईंसाठी अगदी समर्पक आहे... रोहिणी गोखले

    ReplyDelete
  8. सुंदर शब्दचित्र...! स्वरकुंचला हा शब्द उषाताईंसाठी अगदी समर्पक... रोहिणी गोखले

    ReplyDelete
  9. छानच, आज अनेक पैलू उलगडले उषाताईंचे

    ReplyDelete
  10. फारच सुंदर , व्यक्तिमत्त्वाचे कंगोरे हळुवारपणे उघड होतात या लेखात . अशी व्यक्तिमत्त्वे किंवा माणसं अभावानेच आपल्या आयुष्यात येतात' अत्यंत दुर्मिळ असतात ती ,आणि हा दुर्मिळ ठेवा आठवणींच्या कप्प्यात जपून ठेवावा .

    ReplyDelete
  11. हे व्यक्तिचित्र अतिशय सुंदर झालं आहे

    ReplyDelete
  12. नेमकेपणाने रेखाटलेले शब्दचित्र ......। हिमालय .....कैलास शिखर .......निव्वळ अप्रतिम 👌👌

    ReplyDelete

Post a Comment