बन्सी...
भन्नाट या एकाच शब्दात त्याचं वर्णन करता येईल. हा बन्सी कोण? तर अजय अत्रे या
कुशल ऱ्हिदम ॲरेंजरचा हा
सहाय्यक. सहाय्यक म्हणजे कलेतला वगैरे नव्हे. तर वाद्यं उचलणे, घरची कामे करणे, निरोप पोचवणे अशा कामांसाठी ठेवलेला
मुलगा. अगदी बारा पंधरा वर्षांचा असल्यापासून बन्सी अजयकडे होता. अतिशय विपरीत
परिस्थितीतून उचलून अजयनं त्याला घरी आणलं. स्टुडिओत कामाला लावलं. सुशिक्षित
सुसंस्कृत जगाचे रितीरिवाज यत्किंचितही ठाऊक नसलेला बन्सी थेट कलाकारांच्या
दुनियेत येऊन पडला. इंग्रजी वगैरे सोडाच पण त्याला मराठीसुद्धा धड बोलता येत
नव्हतं. लिहिण्यावाचण्याचा गंध नव्हता. पण तरी बन्सी भन्नाट होता. त्याच्यात
काहीतरी बात होती.
स्टुडिओमध्ये येणारे कलाकारही बन्सीला कामं सांगायचे. ते तर सगळेच लहरी आणि
मनमौजी. पण म्हणूनच बन्सीला स्टुडिओमध्ये जुळवून घेणं फार अवघड पडलं नसावं. कारण
तो तर कलाकारांपेक्षा अधिक लहरी होता. एककल्लीपणा हा गुण काही फक्त कलाकारांसाठी
राखीव नसतो. पण बन्सीला काम सांगणं आणि करवून घेणं ही मात्र एक अवघड कला होती.
समजा त्याला असं काम सांगितलं की, ‘बन्सी जरा पाणी दे, बँकेत चेक टाकून ये; लक्षात ठेव बँक एक वाजता बंद
होते; आणि येताना अमूक वस्तू आण...’ अशी ऑर्डर आली की
बन्सीचा मेंदू भंजाळलाच. तो हमखास आधी ती वस्तू आणायला जाणार. मग तिथून बँकेत.
तोवर बँक बंद झालेली असणार. मग हा पठ्ठ्या बँक उघडेपर्यंत तिथेच थांबणार. चेक
टाकणार आणि मग आल्यावर तुम्हाला न चुकता पाणी देणार. यावर त्याला कितीही रागवा
किंवा बोला, त्याचं हसू कधी मावळायचं नाही. आपलं काही चुकतंय
याचीच त्याला गंधवार्ता
नसायची.
मतीमंद वगैरे नव्हता पण त्याचं सॉफ्टवेअरच जगावेगळं होतं. चकित होऊन
मोठाल्ल्या डोळ्यांनी या अद्भूत जगाकडे पाहावं तसा त्याच्या चेहऱ्यावर भाव
असायचा. पुढे आलेला प्रत्येक दात स्वतंत्र अपक्ष उमेदवारासारखा दिसायचा. वर्ण काळा, अंगाने किडकिडीत
बुटका. केस सदा विस्कटलेले. मानेला झटका देत बेफिकीरीने बोलायची सवय. लाल पिवळ्या
रंगाचा टिशर्ट. तो कितीही मळलेला, उसवलेला असला तरी बन्सी
वाढदिवसाचे कपडे घातल्यासारखा थाटात वावरायचा. हात सदा धुळीने बरबटेलेले. मिळेल ते
खायचा. जागा मिळेल तिथे झोपायचा. कधीही हाक मारली तरी ओ द्यायचा. खूप राबायचा.
एवढासा मुलगा अंगमेहनतीचं काम कसं करेल असं वाटेपर्यंत त्याने ते पार पाडलेलं
असायचं. पण संगतवार बुद्धीशी संबंध आला की गाडं मस्त भरकटायचं.
एकदा त्याला दोन लीटर दूध आणायला सांगितलं. ते आणायला जाताना मध्येच
त्याच्या कानावर कसा कोण जाणे पण ‘खजूर’ हा शब्द पडला. बन्सीने दुधाऐवजी दोन किलो
खजूरच अजयच्या पुढ्यात आणून ठेवले.
अजयचीही कमालच. बन्सीच्या प्रत्येक खोडीवर त्याच्याकडे लस होती. बन्सीला
काय आणि कसं सांगितलं की कळतं हे केवळ त्यालाच माहिती होतं. पण बन्सीचा
आज्ञाधारकपणा आणि खट्याळ इरसालपणा यातली सीमारेषा इतकी अंधूक होती की कधीकधी अजयही
हात टेकायचा.
एकदा बन्सीला घरी स्टोव्हसाठी रॉकेल हवं होतं. सकाळपासून डोक्यात तेच.
अजयची महत्वाची मिटींग चालू होती. तशात बन्सीनं त्याच्यामागे रॉकेलची भुणभूण लावली
होती. अजय फारच वैतागला, पैसे देत ओरडला, ‘बन्स्या हे घे पैसे
आणि आण एकदाचं पन्नास लीटर रॉकेल, कटकट करू नकोस.’
बन्सीमहाराजांनी पैसे घेतले आणि खरंच पन्नास लीटर रॉकेल घरात भरून ठेवलं. आता
त्यानं ते कुठून कसं पैदा केलं देव जाणे. असं काहीतरी चमत्कारीक करून जायचा. पण
खरं सागायचं तर त्याचा राग कधीच यायचा नाही. काही चुकलं की लहान मुलांना जवळ घेतात
ना तसं त्याला जवळ घ्यावंसं वाटायचं.
बन्सीसारखा प्रामाणिकपणाही आजवर पाहिला नाही. त्याच्या हातात लाख रुपये
द्या आणि महिन्याभराने परत मागा. त्यातला एक पैसाही कमी झालेला नसणार. अट एकच, पैसे परत द्यायची
आज्ञा अजयनेच दिली पाहिजे.
त्याला पगार वगैरे मिळायचा पण पैसे खर्चच व्हायचे नाहीत. या जगात काही विकत
घेण्याच्या लायकीचं असतं यावर त्याचा विश्वासच नसावा. दोन वेळचं अन्न आणि कपडा
मिळाला की गडी खूश. गरज ही कल्पनाच त्याला शिवली नव्हती. म्हणूनच त्याची जगण्याची
व्याख्याही स्वतंत्र होती. तुम्हाआम्हासारखं किंचित स्वार्थाच्या अंगानं जाणारं
चतूर चौकोनी शहाणपण त्याच्याकडे नव्हतंच. त्याच्या भावनांचं जग छान अस्पर्श होतं.
एखाद्या कार्टून फिल्ममधल्या पात्रासारखं त्याचं वागणं मोहात पाडायचं. मनात
लहानमोठा, उच्चनीच अशा भींतीच नव्हत्या. सगळ्यांना अरेतुरेच म्हणायचा. स्टुडिओत
आलेल्या कोणा मोठ्या व्यक्तीला मान वगैरे द्यायचा असतो हे त्याच्या गावीही
नव्हतं. मग भल्याभल्यांच्या सहज विकेटस् पडायच्या. अर्थात यात अगोचरपणा, अहंकार वगैरे नसायचा. बन्सी जसा होता तसाच वागायचा.
या स्वभावाला काय म्हणावं? भाबडेपणा, निरागसता
की अज्ञान? काहीही म्हणू नये हेच खरं. तो दिसला की छान
वाटायचं हीच त्याची ओळख.
पण काळ कोणालाही सोडत नाही. हळुहळू बन्सीला शिंगं फुटली. वाढत्या वयाबरोबर
गरजांची जाणीव झाली तशी निरागसता घटत चालली. भाबडेपणाची जागा बेरकीपणाने घेतली.
अज्ञान मात्र तसंच राहून गेलं. काहीतरी बिघडलं, कुठेतरी बिनसलं. आणि घरात पाळलेलं
माया लावलेलं मांजर अचानक दिसेनासं होतं तसा बन्सी एके दिवशी अचानकपणे निघून गेला.
परत कधी दिसलाच नाही. त्याच्याबद्दल काहीबाही ऐकायला आलं आणि नंतर तेही विरून
गेलं.
या सरळसाध्या भाबड्या जीवाचं असं का व्हावं? त्याला स्वास्थ्य मानवलं नाही? का रानोमाळ वाढणारं झुडूप अजय घरच्या कुंडीत लावू पाहात होता? आत कुठेतरी खोलवर दडून बसलेला वेगळाच बन्सी अचानक बाहेर यावा तसं काहीसं झालं. हा धक्काच होता. पण आज वाटतं की या क्षणाक्षणाने बदलणाऱ्या जगात बन्सीनं मात्र होतं तसंच राहावं ही आमची अपेक्षाच अधिक भाबडेपणाची होती. आता तो कुठे असतो, काय करतो हे माहित नाही. पण या दुनियेनं त्याला जगायला शिकवलं असेल. तो बावरला असेल, धडपडला असेल पण एक नक्की सांगतो बन्सी हरला नक्की नसेल.
तो बन्सीचा स्वभावच नाही...
...प्रवीण
जोशी
98505 24221
pravin@pravinjoshi.com
वाह प्रवीण वाह , एखाद्या व्यक्तीबद्दल लिहिताना त्याचे सुक्ष्म निरीक्षण आणि अभ्यास करून ते समर्पक शब्दात मांडणे ह्यात तुझे प्रभुत्व वादातीत आहे .
ReplyDeleteबन्सी काय ऊभा केला आहेस मित्रा !
अप्रतिम लिखाण .
धन्यवाद आणी शुभेच्छा.
अजय अत्रे.
😘😘
ReplyDeleteसुंदर व्यक्तिचित्रण 👌🏽👌🏽 अनेक आठवणी ताज्या झाल्या
ReplyDeleteवावा!!!
ReplyDeleteपद्माकर बरोबर मी भेटलोय राव ह्याला अनेकदा.आगदी हुबेहूब रेखाटलय चित्र.
ReplyDeleteKhupach masta nirikshan
ReplyDeleteखूपच छान!खरं व्यक्तिमत्व समोर उभं राहतं.👌👍
ReplyDelete