हस्तांतरण...

ते नव्वद साल असावं... रात्रीचे बारासाडेबारा वाजलेले असतात. टिळक स्मारकमधला गाण्याचा कार्यक्रम संपतो. सगळे कलाकार नवखेच. कुणाला आपण गाऊ शकतो हे नुकतंच विंगेत कळलेलं असतं. कुणाला संगीत संयोजन म्हणजे काय याचा अंदाज कार्यक्रम संपल्यावर येऊ लागलेला असतो. प्रमुख पाहुणा म्हणून एका प्रसिद्ध संगीतकाराला निमंत्रित केलेलं असतं. त्याच्या नावावर सिनेमे, नाटकं, प्रायोगिक कार्यक्रम, खाजगी रेकॉर्डस्, टिव्ही मालिकांचं संगीत असं बरंच काही जमा असतं. ते आम्हां उभरत्या कलाकारांचं कौतुक करत असतात. निमंत्रितांचं कामच असतं ते. पण या पाहुण्यामध्ये पाहुणेपणच नसतं. औपचारिकता नसते की स्वतःचा आब राखण्याची धडपड नसते. पुढल्या इयत्तेतल्या हुशार मुलानं गणित सोडवून द्यावं तसे ते सगळ्यांशी हसून खेळून गप्पा मारत असतात.

गर्दी ओसरते. आता माझीही भीड चेपलेली असते. हा सूर असा काती चाल तशी काअसं काहीबाही विचारत मी त्यांच्याबरोबर थिएटरच्या बाहेर येतो. मनात एवढंच की आता हे घरी निघून जाणार. मग परत भेटता येणार नाही. भेटीची ही शेवटची मिनिटं मला दवडायची नसतात. पण ते वैतागत नाहीतचिडत नाहीत. उलट मस्त मोकळ्या आवाजात म्हणतात, ‘चल चहा घेऊ’. मीही अवघडून मागोमाग जाऊ लागतो. यांची कार कुठे लावली असेल याचा अंदाज बांधेस्तोवर त्यांनी एका जुन्या स्कुटरला किल्ली लावलेली असते. पाठीमागच्या सीटवरची धूळ हाताने फटाफटा झटकत ते म्हणतात, 'बस, आता फक्त अंबादासलाच मिळेल चहा

मग रात्री एक वाजता लक्ष्मी रोडवरच्या अंबादासमध्ये पुन्हा गप्पा रंगतात. एस्‌ डी बर्मन हे त्यांचं माझं गोत्र जुळलेलं असतं. अंबादासच्या समोरच्या खुरट्या झाडाला टेकूनलोखंडी बॅरिकेटवर हाताने ताल धरत हा अवलिया मोठ्या आवाजात एस्‌ डी बर्मनांची गाणी गाऊ लागतो. आसपासची माणसं चमत्कारिक नजरेनं पाहात असतात. पण यांना त्याचं काहीच नसतं. अंगात एक ढगळ झब्बा. अस्ताव्यस्त दाढी, कसेही वाढलेले केस. चेहऱ्यावर सतत छान हसू. तीक्ष्ण विनोदबुद्धी. उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट ते कोपर यामधला भाग खाजवत जराशा घोगर्‍या आवाजात बोलण्याची लकब. कोणाही मोठ्या व्यक्‍तीबद्दल बोलताना भारावलेपण. एखादा किस्सा सांगताना काहीही लपवून न ठेवता नावंबिवं घेऊन थेट कॉमेंट... मी अजूनही त्यांच्या या साधेपणाच्या धक्यातून सावरलेला नसतो.

रात्रीचे दोनअडीच वाजून जातात. पुणं गाढ झोपी गेलेलं असतं. आम्ही पुन्हा त्यांच्या गाडीवर स्वार होतो. एकीकडे स्कुटर चालवतमध्येच हात उंचावून मोठ्या आवाजात ते बोलत असतात. मी कान देऊन ऐकत असतो. पर्वती पायथ्यापासच्या एका गल्लीतल्या अगदी साध्या सोसायटीपाशी गाडी थांबते. पण गप्पांचा रंग उतरलेला नसतो. पहिल्या मजल्यावरून कोणीतरी वैतागून खिडकी उघडून डोकावतो. पण यांना पाहून, ‘हे नेहमीचंच आहे...’ असा चेहरा करून आत जातो. पहाटे कधीतरी गप्पा संपतात.

मग माझं त्यांच्याकडे जाणं येणं चालू होतं. कविता, पुस्तकं, नाटकं, अनेक अनुभव, संगीत... आम्हाला विषय पुरत नाहीत. त्यांचं घर अतिशय साधंसुधं असतं. टेबलावर, टिव्हीवर, पडद्याच्या पेल्मेटवर देवघराच्या फळीवर जिथे जागा मिळेल तिथे विविध पुरस्कार कसेही रचून ठेवलेले असतात. अनेक मानाचे पुरस्कार मिळवणारा हा संगीतकार बँकेत नोकरीला असतो. तिथेही कर्जबिर्ज मागायला आलेल्या ग्राहकांना ‘जरा थांबा होहोऊन जाईल काम...’ असं म्हणत टेबलवर ताल धरून गाणं चालूच असतं. बँकेत आठवडाभर खर्डेघाशी करून हा शनिवारी रात्री मुंबईला जातो. सुट्टीच्या दिवशी सिनेमांसाठी आशा भोसल्यांकडून गाणी गाऊन घेतो. इथे आमच्यासारख्या नवख्या मुलांबरोबर रमतो. एक दोनच प्रयोग होणाऱ्या प्रायोगिक नाटकांना संगीत देण्यासाठी महिनोन्‌महिने झटतो... मी हे सारं चकीत होऊन पाहात असतो. कुठेही नाटकी खोटेपणा नाहीफिल्मी भपकेबाजपणा नाही. शंभर टक्के सच्चा साधेपणा.

आतापर्यंत मीही धीटावलेला असतो. कधीतरी हळूच हट्ट धरतो, ‘‍सिनेमाच्या गाण्यांचं रेकॉर्डिंग कसं करतात ते मी अजून पाहिलेलं नाहीबघायला मिळेल का?’ ते हसतात आणि पुढच्याच आठवड्यात मला फोन येतो. ‘मुक्‍ता या सिनेमाच्या गाण्यांचं रेकॉर्डिंग आहे. उद्यापासून मुंबईला जायचंय.’

त्यांच्याबरोबरचे मुंबईतले चारपाच दिवस स्वप्नवत असतात. तिथल्या रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये ही कुणी वेगळीच व्यक्‍ती असावी असं वाटू लागतं. खूप प्रयत्न करूनही त्यांचं बँकेतल्या टेबलावरचं रूप मी डोळ्यासमोर आणू शकत नाही. माझ्यासाठी सारंच वातावरण दडपून टाकणारं असतं. अगम्य चर्चामोठी माणसं... पण तिथे हे अतिशय आत्मविश्वासाने वावरत असतात. माझं बावरलेपणही हलकेच दूर करतात. मग मीही रेकॉर्डिंगमध्ये थोडासा सहभाग घेतो. ते माझ्याकडे कौतुकाने पाहतात. संध्याकाळी मला एका प्रसिद्ध हॉटेलात जेवायला घेऊन जातात. तिथल्या मॅनेजरला उगाचच ‘हे उद्याचे यशस्वी संगीतकार...’ अशी माझी ओळख करून देतातमला कससंच होतं.

आपण कलेच्या क्षेत्रातच काहीतरी करायचं हा विचार तिथेच पक्का होतो. त्या विचाराबरोबरच ‘जे काही करायचं ते अशाच साधेपणाने’ हेही रुजतं.

आपलं कौतुक करणारं या क्षेत्रात कुणीतरी आहे याचा आनंद झालेला असतो. ही मी स्वतः कमावलेली ओळख असते. अधून मधून भेटी घडत असतात. ‘काय चाललंय?’ या प्रश्नाला आता जबाबदारीने उत्तर द्यावं लागतं. काही चुकलं तर चारचौघात कान धरला जाईल याचं दडपण असतं. माझ्या प्रत्येक कृतीकडे त्यांचं लक्ष असतं. मीही त्यांचीहक्काने ठोठावायचं दार म्हणून नोंद करून ठेवलेली असते. वर्ष उलटतात. मला ‍सिनेमासाठी संगीत दिग्दर्शन करण्याची संधी मिळते. माझ्या पहिल्याच सिनेमात सर्वश्री आशा भोसले गाणार असतात. एकीकडे लेखक म्हणूनही थोडीबहुत ओळख मिळायला लागलेली असते. मी त्यांना फोन करतो. कृतज्ञता व्यक्‍त करतो. नकळत्या वयापासूनची आत्तापर्यंतची माझी लहानशी कारकीर्द घडवण्यात त्यांचा खूप वाटा आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतो. पण मला ते शब्दांत नीट सांगता येत नाही. ते प्रथम अवघडतातमग हसून म्हणतात ‘विशेष काय रे त्यात. हे माझ्यासाठी कुणीतरी केलंच होतं. मी तुझ्यासाठी केलं. तू अजून कोणासाठी कर...’

असा निर्मळ साधा प्रवास शेवटपर्यंत चालू राहतो. ते अचानक जाईपर्यंत. त्यांच्या जाण्याचं दुःख तर होतंच पण त्याहीपेक्षा एका अनामिक जबाबदारीची जाणीव होते... तीही शब्दांत सांगता येत नाही!

.....

मला ‘संगीतकार आनंद मोडक’ हे नाव कधीच विसरता येणार नाही. त्यांनी दिलेला साधेपणाचा संस्कार त्यांच्या संगीताइतकाच श्रीमंत आहे. नवख्या कलाकाराला आशीर्वाद वगैरे देण्याएवढा मी मोठा नाही. पण तो काही सांगू लागला तर ते ऐकून घेताना हा सुजनत्वाचा गुणही आनंद मोडकांनीच हाती सोपवला आहे हे सतत जाणवत राहतं...

हस्तांतरण म्हणजे हेच असतं का?

 

...प्रवीण जोशी
98505 24221
pravin@pravinjoshi.com

Comments

  1. भाग्यवान आहात... योग्य वेळी बोटाला धरून योग्य व्यक्तीला चालतं करा...

    ReplyDelete
  2. Great words to describe a great personality

    ReplyDelete
  3. मी खूप भाग्यशाली ठरलो आनंद मोडक नावाच्या अवलिया बरोबर मला बरंच काम करायचा योग आला. तू लिहिलंयस ते तंतोतंत खरं आहे. मोडकांच्या अनेक आठवणी ताज्या झाल्या. धन्यवाद.

    ReplyDelete
  4. Mastaaa!! Kaay vilakshan anubhavanni bharlela ahe re tuza ayushya!!! Nashibvan ahes Dhaktya!!!!

    ReplyDelete
  5. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  6. छान प्रविणजी वेळेवर अशा अवलियाचा आशीर्वाद मिळणे भाग्याचे आहे.

    ReplyDelete
  7. Great personality and awesome experiences! Hats off to Anand Modak Sir!

    ReplyDelete
  8. छान.. रोहिणी गोखले

    ReplyDelete
  9. छान लिहिले आहेस👍👍🙏

    ReplyDelete
  10. सुंदर सुंदर. सुंदर वर्णन. आनंद मोडक यांच्याबरोबर माझा स्नेह होता. फार मस्त माणूस ! - अनिल उपळेकर

    ReplyDelete

Post a Comment