एक अबोल प्रेमकथा...
माझ्या सोसायटीच्या गल्लीतली ही गोष्ट. राजेश आणि
मेघाची. मी त्यांना खूप दिवस पाहतोय. मला आपला उगाच संशय आहे की त्यांच्यात ‘काहीतरी
आहे’. खरंखोटं तेच जाणोत. राजेश तसा चारचौघांसारखाच. थोडासा काळासावळा पण डौलदार. मेघाच्या
मानाने उंच. मेघाही दिसायला बरी. सुंदरात जमा होण्यातली नसली तरी चारजणीत उठून दिसेल
अशी, नाकीडोळी नीटस.
मी रात्री फिरायला म्हणून बाहेर पडतो तेव्हा मला
ते दोघं दिसतात. तेही फिरत असतात. म्हटलं तर एकत्र, म्हटलं तर लांबलांब. गल्लीच्या
एका टोकाला राजेश दिसला की नक्की समजावं दुसऱ्या टोकाला मेघा त्याच्याकडे पाहात उभी
असणार. राजेशही अधूनमधून वाकून पाहात त्याची खात्री करत असतो. मधूनच त्या टोकाला चालत
जातो. पण ती बिचारी काही बोलत नाही. तो आला की नुसती तुरूतुरू त्याच्या जवळ जाते. दोघंजण
काही वेळ एकमेकांना पाहतात. मग पुन्हा ‘तुम कहाँऽऽ मै यहाँऽऽ’ चालू.
पलीकडे एक बांधकाम चालू होतं तेव्हापासून तिथे वाळूचा
मोठ्ठा ढिग पडला आहे. राजेशची ही बसायची आवडती जागा. तो अक्षरशः राजासारखा ढिगावर जाऊन
बसतो. तेव्हा मात्र त्याला आसपास कुणीही चालत नाही. अशा वेळी तिच्या डोळ्यात राजेशबद्दल
तुडूंब प्रेम दाटून येतं. अगदी कौतुकाने पाहात असते. ती तशी पाहत्येय याची त्यालाही
कल्पना असतेच. किंबहुना म्हणूनच त्याचा थाट वाढलेला असतो. माझं लक्ष गेलं की दोघं असं
दाखवतात की आमच्यात ‘तसं’ काहीच नाही. असलीच तर विशुद्ध मैत्री आहे. असेल ते असो पण
हे गोड नातं अतिशय अबोलपणे वाढतंय हे नक्की.
समोरच्या बंगल्यातल्या रॉजरला याची कल्पना आहे की
नाही मला माहित नाही. पण राजेशने त्याला सारं सांगितलेलं असणार. कारण मेघा आली की दोघेही
काहीतरी लपवाछपवी केल्यासारखं बोलतात. उगाच इकडेतिकडे बघत राहतात. मग मेघा बिचारी लाजून
लांब निघून जाते. ही काय रीत झाली? खरं तर राजेश आणि रॉजरची एवढ्यातच मैत्री झालीय.
पण रॉजरकडेकडे कुणीही आलं की राजेशच पुढे. अशा वेळी त्याला समजावून सांगावसं वाटतं.
‘बाबा रे यापेक्षा त्या मेघाकडे बघ, कधीपासून झुरत्येय तुझ्यासाठी...’ पण सांगणार कसं?
आणि या भानगडीत आपण का पडायचं म्हणून मी आपला आडून आडून काय घडतंय ते पाहात असतो. राजेश
एवढा भाव का खातो तेच कळत नाही. असेल ना उमदा आणि तिच्यापेक्षा जरा तरतरीत. पण दुसरा
चॉईस आहे का बाबा तुझ्याकडे? तर नाही. आणि मिळण्याची काही शक्यताही नाही. कारण तो फारसा
कुठे बाहेर जात नाही आणि दुसरं कुणीही आमच्या सोसायटीत शिरू लागलं की अंगावर जाऊन हाकलूनच
देतो. एकूणात तिढाच आहे हा सगळा.
पण मला मात्र मेघाविषयीच जास्त वाटतं. राजेशनं नाकारण्यासारखं
तिच्यात काहीच नाही. मग जुळायला काय हरकत आहे?
पण एक मात्र आहे. मेघाकडे कुणी पाहायला लागलं की
राजेशचा अवतार बघावा. तो अस्वस्थच होतो. आसपास राहणारा एकजण राजेशपेक्षाही जास्त रुबाबदार
आहे. रात्री तोही आमच्या सोसायटीत फिरायला येतो. त्याच्या चालण्यात तर राजेशपेक्षा
खानदानी डौल आहे. रॉजरही बड्या घरचा आहे. दोघही मनमोकळे, खेळकर. कधी कधी वाटतं मेघा
यापैकीच कोणाची तरी निवड करणार. आणि केली तरी तिला चूक म्हणणार नाही कोणी. पण ती कसली...
एकटी एकटी फिरत असतानादेखील राजेशच्याच विचारात असल्यासारखी दिसते. तिचा निमुळता चेहरा
अजूनच बारीक होतो. काळ्या डोळ्यांमध्ये काहीतरी दाटून येतं. अगदी हतबल होऊन माझ्याकडे
पाहात बसते. दोघंही जरा वेडेच आहेत. ती काही बोलत नाही आणि हा काही सांगत नाही.
परवा एक मजा झाली. काही लहान मुलं खेळत होती. का
कोण जाणे राजेश त्यांच्या अंगावर धावून गेला. उगाच हिरोगिरी करण्याची हौस बाकी काय.
ती मुलं बिचारी घाबरली. प्रकरण वाढलं, त्यांच्या आईवडलांपर्यंत गेलं. वडिल तर म्हणाले
मी राजेशला गोळीच घालेन. सोबत त्या मेघालाही. मेघा बिचारी व्याकूळ होऊन बघत होती. सारा
प्रकार संपल्यावर तिनं एकटीनंच निषेध नोंदवला. मान वर करून रडत राहिली. मला वाटलं आता
तरी प्रेमाला वाचा फुटेल. चांगली संधी होती. कोणीही त्याच्या बाजूनं नसताना ती उभी
राहिली म्हणून तो थँक्यू तरी म्हणेल. पण नाही...
पण मला कधी कधी त्याचंही पटतं. कारण मेघा तशी लहान
आहे, अल्लड आहे. याच्या अंगावर जबाबदारी नाही हे मान्य पण रॉजर आणि त्या दुसऱ्याचं
घरदार पाहिलं की यालाही मनातून न्यूनगंड निर्माण होत असणार. हे मेघाला कसं सांगायचं
असं वाटत असणार.
त्यांचं जमायला पाहिजे असं मात्र मनापासून वाटतं. ही त्रिकोणी चौकोनी प्रेमकथा आता कशी वळणं घेत्येय हे पाहण्यात मलाच रस निर्माण झालाय. पण या सगळ्यात मी काहीच करू शकत नाही याचं फार वाईटही वाटतं. मलाच अबोल झाल्यासारखं वाटतं. ती दोघं तर बोलूच शकत नाहीत. आपण तरी मध्ये कसं पडायचं? पण जवळ गेल्यावर पायात घुटमळतात. नाकानं लाडेलाडे हुंगतात. शेपट्या हलवून आनंद व्यक्त करतात. कधी कान पाडून उदास आहोत असं दाखवतात. माझा निरोप पोचवा म्हणतात...
मला सांगा कुत्र्यांनी आपलं प्रेम अजून कसं व्यक्त करायचं?
...प्रवीण जोशी
98505 24221
pravin@pravinjoshi.com
(: ता.क. - खरंच माझ्या सोसायटीत राजेश आणि मेघा या नावांचे एक श्वान जोडपे आहे... :)
😂😂😂
ReplyDeleteमी आधीच् वळाखलं व्हतं, भौ, भौ, भौ
ReplyDelete१ नंबर 👌👌
ReplyDeleteहा हा हा
ReplyDeleteआजवरच्या लेखांपेक्षा खूप वेगळं लेखन ! अखेरचा परिच्छेद क्लायमॅक्स 👌 वेगळा प्रकार प्रवीण मस्स्स्त रे !
ReplyDelete😀 वेगळंच
ReplyDeleteजबरी
ReplyDeletegerm....लई भारी..😀
ReplyDelete