मेळ माणसांचा...

दोन ओंडक्यांची होते सागरात भेट
एक लाट तोडी दोघां पुन्हा नाही गाठ
क्षणिक तेवि आहे बाळा मेळ माणसांचा

मला गदिमांच्या या ओळी मनापासून आवडतात, पण वेगळ्या कारणासाठी. त्यांनी सांगितलेला हा 'मेळ माणसांचा' कितीही क्षणिक आणि अस्वस्थ करणारा असला तरी त्यामध्ये आयुष्यभराची उर्जा दडली आहे. कोण कुठली माणसं एकत्र येतात. नात्यांचा गोफगुंता करतात. विरून जातात. पण विसरली जात नाहीत. आठवणींच्या गर्दीतून कधीतरी अचानक आपल्याकडे अशी हसून पाहतात की हे चेहरे इतकी वर्ष आपल्या स्मरणात होते; याचं आपलं आपल्यालाच आश्चर्य वाटायला लागतं. प्रत्येकावर स्वतंत्रपणे लिहावं असा कुणीच महत्वाचा नसतो. कोणत्याही विशेष घटना किंवा प्रसंगांनी आपल्याशी जोडला गेलेला नसतो. पण वजा करावं तर प्रत्येकाशी काहीतरी न सांगता येणारं नातं जडलेलं असतं.

अशा साऱ्या व्यक्‍तींचं हे समूहचित्र. ही माणसं एकमेकांशी एवढी विसंगत आहेत की याला धड ग्रुप फोटोही म्हणता येणार नाही.

लहानपणी सदाशिव पेठेत राहात असताना आमच्या कोपऱ्यावर एक लॉन्ड्री होती. मध्यमवयाचे मस्त तिरसट गृहस्थ ती चालवायचे. टिप्पिकल कोकणी उभट चेहरा. त्यावर सतत त्रासिक भाव. गालफडं आत गेलेली, कपाळावर आठ्या. त्यांच्या दुकानाला चार उंच दगडी पायऱ्या होत्या. त्या चढायचा कंटाळा यायचा. रस्त्यावरूनच सायकलवरचा पाय टेकून इस्त्रीच्या कपड्यांची विचारणा केली की खेकसायचे, ‘हा काय रायगड आहे का घोड्यावरून बाजारपेठेत हिंडायला?’ हे रायगडवाले काका बिनबाह्यांचा बनियन आणि चट्ट्यापट्ट्याचा पायजमा घालून काऊंटरवर मांडी घालून बिडी ओढत बसलेले असायचे. इस्त्रीच्या लोंबणाऱ्या वायरींना दोऱ्यांच्या रिळांच्या पुंगळ्या लावलेल्या असत. एकूण दृष्य कळकटच होतं. ‘इथे कपडे धुवून मिळतील’ या पाटीखाली मीच, ‘पण कधीतरी दुकानही धुवा’ असं लिहिल्याचं आठवतं.

आमच्या घरी कपडे धुण्यासाठी एक शांताबाई म्हणून बाई यायच्या. त्यांना आम्ही गोऱ्या शांताबाई म्हणायचो. कारण भांड्यांसाठी काळ्या शांताबाई आधीपासून होत्या. या गोऱ्या शांताबाई चांगल्या उंचनींच होत्या. कपाळावर आडवी चिरी लावायच्या. त्या लक्षात राहायचं कारण म्हणजे त्यांची साडी. वय काही फार नसावं पण नऊवारी साडी नेसायच्या. छान चापून चोपून. ‘घोळ निऱ्यांचा पदी अडखळे, जलद चालणे जरा...’ ही लावणी वाचल्याबरोबर माझ्या डोळ्यांसमोर त्या गोऱ्या शांताबाई उभ्या राहिल्या. हसरा चेहरा आणि टापटिपीचं वागणं. मशेरी लावलेले पण स्वच्छ दात. मोठ्या आवाजात बोलणं. का कोण जाणे, माझ्या आजीला त्या बिलकुल आवडत नसत. त्या आल्या की ‘आली मेली टाकमटिकलीची नटवी’ असं म्हणायची.

टिळक रोडवर शंकरची बेकरी प्रसिद्ध होती. शंकर मस्त बॉडीबिल्डर होता. पिळदार देहयष्टी दाखवणारा काळा घट्ट टिशर्ट घालायचा. केक ब्रेड वगैरे घ्यायला आलेल्या गिऱ्हाइकांना दंडातली बेटकुळी नाचवून दाखवायचा त्याला छंद होता. पंजा म्हणजे हा असा दणकट. पण चेहऱ्यावर अतिशय सौम्य खेळकर भाव. त्याला बोलायला ओळखपाळख लागतच नसे. उरलेले पैसे परत घेण्यासाठी हात पुढे केला की अशी काही हातचलाखी करायचा की आपल्या हातात ही नाणी कुठल्या जादूनं आली हेच कळायचं नाही. त्याच्या दुकानात शिरताना आपल्या मागे जर कुणी मुलगी असेल तर शंकर नमस्कार करत, ‘दादा... ताईन्ला आधी मोकळं करतोऽऽ’ म्हणायचा.

त्याच्याच समोर एक टेलीफोन बुथवाला होता. अपंग होता बिचारा. दोन्ही पाय लुळे आणि डावा हात स्पीनर बॉलरसारखा मागे वळलेला. एक पाऊल उचलतानाही त्याला तीन दिशांना वळायला लागायचं. कपडे फाटलेले असत. पण चेहरा लक्षात राहण्यासारखा होता. काळ्यासावळ्या मळलेल्या चेहऱ्यावर स्वच्छ हसू असायचं. दोन भिवयांच्या मध्ये गंधाचा ठिपका. डाव्या गालावर कसला तरी व्रण. माझी बायको म्हणजे तेव्हाची मैत्रीण मला त्याच्या बुथवरून फोन करायची. मला पोचायला उशीर झाला की हा तिला ‘काय कुठाय तुझा हिरोऽऽ’ असं विचारायचा. हे विचारणं इतकं सहजसाधं आणि आपुलकीचं असायचं की कुणाही मुलीला खटकू नये, आधारच वाटावा.

आमचे चित्रकलेचे भिडे सर लक्षात राहिले ते कडक शिस्तीमुळे. त्यांची नजर नुकत्याच तासलेल्या पेन्सिलीसारखी टोकदार होती. नाकपुड्यांपासून ओठांच्या कडांपर्यंत आलेल्या सरळ रेषा, कपाळाच्या दोन्ही बाजूंच्या उंचवट्यांवर फुगलेल्या शिरा, ताठ मान, कोपरापर्यंत येणाऱ्या बाह्यांचा पांढरास्वच्छ हाफशर्ट, बसकट आवाज असे भिडे सर वर्गावर आले की चिडिचूप व्हायचं. सर कमालीचे सुंदर चित्रकार होते. अक्षर देखणं होतं. शिल्पकारही होते. आमच्या शाळेच्या गणपतीची मूर्ती त्यांनी बनवली होती. ती घडताना पाहात बसणं हा एक विलक्षण अनुभव असायचा. भिडे सर एकदा जास्वंदाचं चित्र काढायला शिकवत होते. मी चित्रकला वर्गातून खाली उतरून घरी जायला निघालो तर शाळेच्याच बागेत जास्वंद दिसला. घरी सराव करण्यासाठी म्हणून तोडला. सर वरून पाहात होते. दुसऱ्या दिवशी वर्गात शिरल्या शिरल्या त्यांनी माझा गाल जास्वंदापेक्षा लाल केला होता.

माझा अजून एक कलाशिक्षक होता एक पेटीवाला भिकारी. गुडघ्याच्या वरती धोतर, भोकं पडलेला बनियन, एका खांद्यावर बोचकं आणि दुसऱ्या खांद्यावर पेटी. वाजवून झालं की डोक्यावरची मळकट टोपी काढून त्यात पैसे जमा करायचा. आमच्या घरासमोर रात्रीचा हा कार्यक्रम ठरलेला असे. ‘आजा सनम’ हे त्याचं पेट गाणं. एवढी गोड पेटी मी क्वचितच ऐकली असेन. नंतर जेव्हा संगीत कळायला लागलं तेव्हा तो न शिकता काय काय करत असे याचा अंदाज आला. पण एकदा, त्याची पेटीच भारी असणार असं वाटून मी न राहवून त्याच्याकडे ती वाजवायला मागितली होती. त्या क्षणातली त्याची नजर मी कधीच विसरणार नाही. ओशाळेपण, आश्चर्य, स्वतःबद्दलचा अभिमान, भिकारीपणाची लाज असं सगळं त्या एका क्षणामध्ये सामावलेलं होतं. या भावगुंत्यात त्याचा चेहराच दिसेनासा झाला होता.

आमच्या मागच्या गल्लीत एकजण पंचांग विकायचे. त्यांचं आडनाव अभ्यंकर असावं. कृष्णाचा पेंद्या मोठेपणी असाच दिसला असता. स्वतःपेक्षा उंच अशा काठीला आपला अधू पाय वेटाळून उभे राहात. गोऱ्या म्हाताऱ्या चेहऱ्यावरचा डावा डोळा ओघळलेला होता. अंगात स्वच्छ बंडी आणि धोतर. बोलणं जरासं तोतरं आणि बोबडं. त्यांच्याकडे वर्षभर पंचांग मिळायचं. पण या अभ्यंकरांचा जोडधंदा होता पत्ता सांगण्याचा. एक पत्ता सांगायला आठ आणे घ्यायचे. पेठेतल्या वाड्यांचे ‘नवा-जुना’ असे सगळे नंबर त्यांना तोंडपाठ होते. कमी पैसे दिले तर बिनधास्त चुकीचा पत्ता सांगायचे. बसा शोधत.

एक फुगे विकणारे काका आठवतात. काकडी फुग्यावर बोटं फिरवून ‘कर्र्‌र्र क्रक् क्रक्‌’ असा लयदार आवाज काढायचे. मानही त्याच लयीत हलायची. दिसायला थेट शरद तळवलकरांसारखे. चालणं अगदी सावकाश. त्यांच्याकडून कोणी फुगे विकत घेताना कधीच दिसायचं नाही. या फुग्यांप्रमाणेच काही तर नुसते आवाजच लक्षात राहिले आहेत. त्या आवाजांचे जनक मी आजवर पाहिलेले नाहीत. अशा अनेक बिनचेहऱ्याच्या आवाजांनाही माझ्या ‘मेळ माणसांचा’ मध्ये स्थान आहे. त्या काळच्या सदाशिव पेठेतल्या पुणेकरांना ‘ताजेऽऽ ते घे मोडाच्चैऽऽऽय्या.’ ही आरोळी आठवत असेल. हिचा अर्थ कळायलाच खूप वर्ष गेली. मोड आलेली ताजी कडधान्य विकणाऱ्याचा आवाज होता तो. त्या कडधान्यांइतकाच ताजा. तसाच दुसरा आवाज म्हणजे ‘घेऽऽऽ आघाडा दुर्वा फुल्लंऽऽ’ श्रावणाच्या पहाटे पावसाच्या आवाजावर मात करून हा आवाज गल्लीत घुमत असे. कोणी विकत घ्यायला येतंय की नाही याची त्याला पर्वाच नसे. झपाझपा दुसऱ्या टोकाला निघून जाई. उन्हाळ्यामध्ये रात्री दहाच्या सुमाराला एकजण मोगरा विकायला यायचा. मोगऱ्याचा घमघमाट आणि ‘वास्स्वाल्लेऽऽ’ हा आवाज दोन्ही एकदमच यायचे.

असो... ही यादी संपणारी नाही. 'क्षणिक मेळ' म्हणता म्हणता भलामोठा 'मेळा' झाला. अशी अक्षरशः जाता येता भेटून इतस्ततः विखुरलेली माणसंच आपलं जग बनवतात. गणपतीच्या गर्दीत टाचा उंच करून पाहिलं की आपल्याला, ‘आपण एकटे आणि गर्दी खूप’ असं वाटतं. पण त्याच वेळी आपल्याकडेही कुणीतरी 'गर्दी' म्हणून पाहात असेलच ना?

आता त्यांच्या ‘मेळ माणसांचा’ मध्ये आपण कसे दिसत असू हे पाहण्याची मला उत्सुकता लागलेली आहे.

 

...प्रवीण जोशी
98505 24221
pravin@pravinjoshi.com

Comments

  1. प्रविण, तू उल्लेख केलेले भिडे सर, माझ्या सुनेचे मोठे काका ,,,,, लेख उत्तमच ,,,,,,, चंद्रकांत रोंघे ,,,,,

    ReplyDelete
  2. किती छान आणि हुबे हुब वर्णन करतोस तु
    बरेचसे लोक मी पण आपल्या सदाशिव पेठेतील त्या लांब लचक गच्चीतून पाहिलेले आठवतायत

    ReplyDelete
  3. Wah!! Chaan Utariyet hi mansaa...

    ReplyDelete
    Replies
    1. नामांकीत व्यक्ती आणि त्यांचे चित्रण.मला लहानपणी नेनेघाटावर येत असलेला चनाचोर गरम वाला आठवला.👍👍👌👌😊

      Delete

    2. प्रवीण सर .. मला वाटते की या साऱ्या व्यक्ती झाल्या आपल्या आजु बाजूच्या . घरी दारी फिरणाऱ्या . ग दी मा ना अभिप्रेत असणारी गाठ भेट ..

      दोन ओंडक्यांची होते सागरात भेट
      एक लाट तोडी दोघां पुन्हा नाही गाठ

      ही जरा निराळी .. जरा स्पेशल ..
      उदाहरणार्थ रोम ला जिलाटो आइसक्रीम शॉप च्या रांगेत ओळख झालेली युवती आणि तिच्या सोबत घालवलेले 2-3 दिवस ..
      किंवा कौलालम्पुर च्या south indian देवळात भेटलेला Tamilian artist .. आणि मग त्याच्या स्टुडिओ मधे घालवलेली सम्पूर्ण दुपार ..
      आपण होतो ondke .. फक्त उरतात आठवणी .

      Delete
  4. प्रवीण,प्रत्येक व्यक्ति च्या लकबी छान उतरवल्यात.आवडलं👌

    ReplyDelete
  5. प्रविण, ज्या भिडे सरांचा तू उल्लेख केला आहेस, ते माझ्या सुनेचे मोठे काका ,,,,,,,

    ReplyDelete

Post a Comment