आपुले मरण...

मला वाटतं चार पाच साल असावं. काही कामानिमित्त मुंबईला सातत्यानं जाणंयेणं होत असे. त्यासाठी मी एक गाडी ठरवली होती. तिच्या मालकाची ही आठवण. तोच स्वतः गाडी चालवायचा. वय असावं तिशीच्या आसपास. गावाकडच्या तालमीत तयार झालेलं शरीर. वर्णही असा रापलेला, काळासावळा. मनगटात लाल गंडा. मस्त मिशा. पैलवानांसारखे झीरो नंबरचे केस. उंची बेताचीच पण चालण्यात ऐट. एकही व्यसन नाही. मधूनच एखाद्या देवाचं नाव घ्यायची त्याला सवय होती. तेही अगदी हळूच, पुटपुटल्यासारखं. भजनाच्या नादी मंडळींच्या तोंडावर असतात तशी संतवचनंही बोलण्यात असायची.

एकदा माझ्याबरोबर एक मित्र गाडीत होते. ‘राही रखमाबाई विठोबा सावळा’ यातल्या ‘राही’ या शब्दावर आमची चर्चा चालू होती. अर्थ नीटसा कळत नव्हता. तो पटकन्‌ मध्येच म्हणाला, ‘साहेब, राही म्हणजे राणी. आमच्या गावाकडे म्हणतात की विठ्ठलाच्या दर्शनाआधी राहीची भेट घेतली तरच विठ्ठल पावतो...’ असं म्हणून त्यानं काही ओव्याही ऐकवल्या. आम्ही दोघं चकीत होऊन पाहात राहिलो. हा माणूस ड्रायव्हर म्हणून दारात उभा राहिला तर एक क्षण विचार करावा लागेल असं काहीतरी त्याच्यात होतं.

वेळेआधी पंधरा मिनीटं हजर असायचा. ड्रायव्हिंग अतिशय कुशल आणि सुरक्षित. सांगितलेल्या वेळेत पोचवणार. पण का कोण जाणे त्याची ही शिस्त, नीटनेटकेपणा, सुरक्षित ड्रायव्हिंग या सगळ्यामागे काहीतरी गूढ दडलंय असं वाटत राहायचं. त्याच्या मनावरचं विचित्र दडपण किंवा भीती स्पष्ट जाणवायची. अवघड ओव्हरटेक करताना किंवा, एखाद्या वळणावर कुणी अचानक समोर आलं तर त्याचा चेहरा विचित्र पिळवटला जायचा. मग पुन्हा जागेवर यायला काही सेकंद जायचे. समोरच्या गणपतीला वारंवार नमस्कार करायचा. हायवेला ॲक्सिडेंट झालेल्या गाड्या हमखास दिसतात. ड्रायव्हर लोकांचा हा गप्पा मारायचा आवडीचा विषय. पण हा त्या गाड्यांकडे पाहिलं न पाहिलं करून पुढे निघून जायचा. हटकलं तर उडवाउडवीची उत्तरं द्यायचा. मी एकदोनदा या भित्रेपणाची थट्टा केली, तर काही न बोलता समोर पाहून गाडी चालवत राहिला.

मुंबईत आला की खूष असायचा. किरकोळ खरेदी वगैरे करायचा. मोठ्या हौसेने मुंबई बघत राहायचा. मी कुणा मोठ्या माणसाला भेटणार असेन तर याच्या नजरेत अप्रूप दिसायचं. एकूणच जीवन असोशीने जगणारी मंडळी असतात त्यातला हा गडी होता.

एकदा मुंबईहून निघायला उशीर झाला. रात्रीचा एक दिड वाजला असेल. जोराचा पाऊस होता. घाटात दरड कोसळली होती. रस्त्यात मोठमोठे दगडधोंडे पसरले होते. सुदैवानं काही अपघात झालेला नव्हता. दगडातून वाट काढत गाडी सावकाश पुढे जात होती. अन्‌ हा अचानक गप्प झाला. घाट संपला. लोणावळा मागे पडलं. पाऊस धो धो चालूच होता. आता रस्त्यावर तुरळक वाहने होती. तरीपण गाडीचा वेग नेहमीपेक्षा खूपच हळू झाला होता. याला झोप येत्येय का ते तपासण्यासाठी मीच काहीतरी बोलत राहिलो. हा गप्पच. कंटाळून शांत बसलो. खूप वेळ गेल्यावर अचानक त्याचा खर्जातला आवाज उमटला...

साहेब, दगडाखाली फार भीती वाटते.’

मी चमकून पाहिलं. त्याची नजर रस्त्यावर होती पण त्याहीपलीकडचं काहीतरी पाहात तो यांत्रिकपणे गाडी चालवत होता.

खूप भीती वाटते दगडाखाली’ भावनाशून्य चेहऱ्याने तो पुन्हा तेच बोलला. मला काही अर्थच लागेना. त्याच्याकडे टक लावून पाहू लागलो.

तुम्हाला किल्लारीचा भूकंप आठवतो का?... आमचं गाव किल्लारीशेजारीच. अनंत चतुर्दशीची रात्र. मंडळाच्या गणपतीचं विसर्जन करून रात्री घरी येऊन दमून झोपलो होतो. काय झालं कळलं नाही. अचानक मोठा आवाज झाला आणि नाकातोंडात माती गेली. उठायलाही वेळ मिळाला नाही. घर कोसळून अंगावर येतंय एवढंच जाणवलं. मग मिट्ट काळोख पसरला.’

दोन दिवस ढिगाऱ्याखाली होतो. लोकांना वाटलं मी मेलो. पण दोरी बळकट होती. कण्हण्याच्या आवाजावरून शोधून मला बाहेर काढलं. गाठीला पुण्य आहे. घरातले सगळे वाचले. पण घर गेलं. होतं नव्हतं ते सारं संपलं. थोडीफार शेती होती, तिचीही पार वाट लागली. दोन दिवसांनी मदत मिळाली. पण आपण जिवंत आहोत याचं भान यायला दोन महिने गेले. आजही तो भीतीचा क्षण आठवतोय.’

मग?’

मला उद्ध्वस्त गावात राहवेना आणि घरही सोडवेना. शेवटी हाती लागलं ते घेतलं आणि पुण्याला आलो. हा धंदा चालू केला. बरं चाललंय. लग्नही झालं तीन वर्षांमागे. मुलगा आहे दिड वर्षांचा. पण साहेब, आजही असे पडलेले दगड दिसले की त्यांच्याखाली स्वतःचा चेहरा दिसायला लागतो...’

मी समजूत काढत म्हणालो, ‘हो रे, पण असं घाबरून कसं चालेल?’

खरं आहे तुमचं, पण एकदा मरण जवळून पाहिलं ना की त्याची भीती उरत नाही. भीती वाटते ती निराळीच.’

कसली?’

पुन्हा मला कुणीतरी दगडातून बाहेर काढेलही; पण त्यानंतर उभं राहायला जन्माची ताकद खर्ची पडते. ती परत कुठून आणू? मी आता आला दिवस आनंदानं जगून घेतो. घरी जायला कितीही उशीर झाला तरी पोराला झोपेतून उठवून त्याच्याशी खेळत राहतो. पैशासाठी कुणाशी वाद घालत नाही. कुणी भांडू लागलं की मला त्याचीच कीव येते. पूर्वीचा मी उरलोच नाही आता. दुसरा जन्म मिळालाय तो आनंदानं जगून घ्यावा असं वाटतं...’

मग तो असंच काहीबाही सांगत राहिला. मघाचचा उदासवाणा स्वर पुन्हा उत्साही बनत चालला. ‘आपुले मरण’ पाहिलेल्या या माणसाला जीवनाचा सोहळा अनुपम्य करण्याची कला सापडली होती. उरलेला रस्ताभर मी ती आदराने ऐकत होतो.

खोलवर रुजलेलं मृत्यूचं भय जीवनाची सुंदर गोष्ट सांगत होतं.

 

...प्रवीण जोशी
98505 24221
pravin@pravinjoshi.com

Comments

  1. वा प्रवीण, खूप छान लिहिलं आहेस 👌

    ReplyDelete
  2. वेगळाच अनुभव. या अनोळखी व्यक्तीला नमस्कार

    ReplyDelete
  3. अंगावर काटा आला आणि डोळ्यात पाणी..भयानक अनुभव.. रोहिणी गोखले

    ReplyDelete
  4. तुझा ड्रायव्हर जे म्हणतोय ते मी स्वतः अनुभवले आहे. त्याच वर्षी मिरवणूक संपवून घरी येताच पहाटे कळलं की भूकंप झाला..रात्री ढोल वाजवण्याचा नादात जनवल नव्हत. त्याच दुपारी डंपर मधून धान्य आणि कपडे घेऊन आम्ही ९ जण किल्लारी ला गेलो. पुढचे ८ दिवस अशी अनेक माणसे धिगर्यातून काढली...पण बहुतेक प्रेतच होती...काही थोडे जिवंत निघाले....भयानक होते ते ८ दिवस. आज त्या आठवणी जाग्या केल्यास प्रवण्या...

    ReplyDelete
  5. वा प्रविण👌🙂🙏

    ReplyDelete
  6. खूपच ह्रदयस्पर्शी आणि हळूवार अनुभव देणारं लेखन

    ReplyDelete
  7. दरड कोसळली एवढे लोक त्यात सापडले असं पेपर मधे वाचलं की मन सुन्न होत
    ड्रायव्हर सारखी बरीच माणस असतील ना मरण जवळून बघणारी....

    ReplyDelete
  8. हृदयस्पर्शी
    - संजीव मेहेंदळे

    ReplyDelete

Post a Comment