एक ज्येष्ठ बालमैत्रीण

माझ्या एक ‘ज्येष्ठ बालमैत्रीण’ आहेत. त्यांना सारेजण आदराने ताई म्हणतात. या ताईपणाची एक गंमत असते. ताई मूळची मोठीच असते पण कधी मोठी होतच नाही. तिची माया असते आणि अधिकारही. मैत्र असतं आणि दराराही. ताईंनी हे सारं छान जपून ठेवलंय. आणि त्याहीपेक्षा जपलंय ते त्यांचं बालपण. इतकं गोड की ओळख नवीन असताना त्यांच्याशी संवाद करताना पंचाईतच व्हायची. ताई म्हणावं तर वय आजीपेक्षा जास्त आणि आजी म्हणावं तर वागणं छान टवटवीत. अगदी बरोबरीच्या मैत्रिणीसारखं. म्हणूनच मी त्यांना 'ज्येष्ठ बालमैत्रीण' म्हणतो. यात त्यांचा अनादर नाहीच. असलीच तर खरी ओळख आहे.

नाव सांगायचं नाही या अटीवर त्यांनी हे लिहिण्याची परवानगी दिली आहे. आणि तेही बरोबरच. कारण नुसतं नाव सांगितलं तरी पुढचं काही लिहायची गरजच उरणार नाही. एखाद्या घटनेचा, संदर्भाचा पुसटसा उल्लेख केला तरी तुम्ही त्या कोण ते ओळखणार. असं आडून आडून लिहिताना अवघड जातंय खरं; पण या निमित्ताने माझ्यासाठी त्यांच्या उपाध्या, प्रसिद्धी बाजूला सारून मूळच्या साध्या निर्मळ व्यक्तिमत्त्वाची नव्याने ओळख करून घ्यायची ही संधी आहे. काही व्यक्‍ती एवढ्या प्रभावी असतात की नाव, वर्णन आणि घटनांशिवायही त्यांची चित्रं लिहिता येतात.

आता वय आहे नव्वदीच्या घरात. म्हणजे ताई, आई, आजी या त्रिगुणातून तयार झालेलं एक छान गोड रसायन. अर्थात त्यांच्याकडे पाहून त्यांच्या वयावर विश्वास बसत नाही ही गोष्ट निराळी. कारण या वयात जीवनरस सुकू लागलेला असतो. प्रकृती, कुटूंब, समाजातल्या न रुचणाऱ्या, थकवणाऱ्या गोष्टी सुरकूतलेल्या हळव्या त्वचेला सहन होत नाहीत. जुन्या विचारसरणीला नवीन मतं पचत नाहीत. मग तक्रारींना सुरूवात होते. माणूस चिडचिडा होतो. जगाला नावं ठेवत स्वतःच्याच कोषात गुरफटत जातो. या नामे म्हातारपणम्‌! पण ताईंकडे बालसुलभ कुतूहल अजून जागं आहे. प्रत्येक नवीन गोष्ट उत्साहाने जाणून घेतात. दुखणाऱ्या पाठीची चेष्टा करत, खोकल्याची थट्टा उडवत, साऱ्या चिंतांना वाकुल्या दाखवत छान हसतात. म्हातारपण अशा मनमोकळं हसण्याच्या आसपास यायला घाबरतंच.

मी एकदा त्यांना थेटच विचारलं, ‘तुमच्या या निर्व्याज निर्मळ हसण्यामागचं रहस्य काय?’ त्यांनी जरा विचार केला. पण उत्तर देणं काही त्यांना जमलं नाही. लहान मुलं खुदकन का हसतात याचं उत्तर तसं कुणालाच सापडलेलं नाही. ‍लहान मुलांसारख्याच त्याही छान हट्टी आहेत. जोडीला स्त्रीहट्ट, वृद्धहट्ट हेही आहेतच. हवं म्हणजे हवंच असा हेका धरून ठेवतात. एकेकाळी त्या म्हणे खूप रागीट होत्या. अगदी सातमजली चिडायच्या. सुदैवाने मला स्वतःला त्यांच्या संतापाचा अनुभव नाही. देव करो आणि येऊही नये. कारण मी त्यांचं हे रूप थोडसं पाहिलेलं आहे. शांतादुर्गेची रणचंडिका झालेली असते. त्या वेळी त्यांच्यासमोर उभं राहणं अशक्यच. पण राग इतक्या लवकर मावळतो की तो खोटाच वाटावा. एवढं लहरी प्रकरण असूनही त्यांच्याबद्दल एकही गैरसमज, एकही वदंता पसरत नाही. कारण स्वभावातला निखळपणा साऱ्या व्यक्‍तिमत्त्वावर व्यापून राहिलेला असतो.

सुखी राहणं सोपं पण ‘आनंदी’ राहणं ही एक कला आहे. जगावेगळं यश, हजारो घटना, अनुभव, सुख, दुःख सग्गळं ओंजळीत घेऊनही त्यापासून अलिप्त राहणं फार अवघड. असंख्य चढउतार सोसूनही गेल्या क्षणाची खंत नाही की विजयाचा उन्माद नाही. असतो केवळ एक प्रसन्न साक्षीभाव. पण तरी कधीकधी असं जाणवतं की जसं गोड फळांचं कवच काटेरी असतं तसं; ताईंनी काही रुतलेले काटे या गोड हसण्याआड जपले असावेत. कितीही झालं तरी काही जखमा ओल्याच राहतात. सल बुजता बुजत नाहीत. एखाद्या गाफिल क्षणी दुखरा कप्पा उघडला जातो. आवाज गहिवरतो. डोळे हरवतात. मग त्यांना अचानकपणे भान येतं आणि खळाळत्या हसण्यामागे सारं पुन्हा दडून जातं.

पण मीही खोदून विचारतो, ‘अशा वेळी तुम्ही मन कसं रमवता?’ ‍या प्रश्नांचं वेगळंच उत्तर ताईंकडे तयार असतं. एक नव्हे अनेक उत्तरं, अगदी तळहातावर मावतील अशी गोड उत्तरं. त्यांना छोट्या छोट्या वस्तू बनवण्याचा विलक्षण छंद आहे. अगदी अंगठ्याच्या नखाएवढा पतंग, चिमटीत मावेल अशी त्याची आरी, उदबत्तीच्या उरलेल्या काडीवर बसेल अशा आकाराचं भिरभिरं, आकाशात उडणारा नाताळबाबा, छोटंसं घर, त्याभोवती खरा वाटावा असा बर्फ, तांदुळाच्या दाण्याएवढा उंदीर... असं बरंच काही. ताईंनी हा छंद जपलाय. छंद जपलाय म्हणण्यापेक्षा अशा लहान लहान गोष्टीत अवघं बालपणच जपलंय.‍

गोष्टीवेल्हाळपण हा त्यांचा खास गुण. एकदा का गप्पांचा फड जमला की त्यांना विषय पुरत नाहीत. स्मरणशक्‍तीला तर सलामच. नव्वद वर्षांतलं काय काय म्हणून आठवावं त्यांना. भूतकाळाचा दरवाजा उघडला की त्या आपल्यालाही तिथे घेऊन जातात. वर्णनंशी करतात की प्रसंग डोळ्यासमोर उभे राहतात. मधूनच एखाद्याची नक्कल करतील, एखादं गाणं गुणगुणतील. असं वाटतं की आपणंही त्यांच्याबरोबर तेव्हा त्या काळामध्ये होतो का काय. एखादंच वाक्य असं बोलून जातात की आयुष्यभर लक्षात राहावं. मध्ये कोणाबद्दल तरी सांगत होत्या. त्या व्यक्‍तीमुळे त्यांना पूर्वी फार त्रास झाला होता. सगळं रामायण ऐकून मी विचारलं,

'पण ताई, तुम्ही त्याला माफ का केलंत?'

छान हसत ताई म्हणाल्या,

काय आहे ना... इथे प्रत्येकजण आपापली घागर रिकामी करत असतो. त्याला ती करू द्यावी. म्हणजे मग आपलं आयुष्यही पाण्यासारखं वाहतं राहतं...’

वयानं दिलेलं शहाणपण पचलं की काही माणसं गंभीर होतात, निरस होतात, मिटून जातात. पण ताई मात्र फुलत राहिल्या आहेत. वेळप्रसंगी स्वतःवरही छान विनोद करू शकतात. हा मोठेपणा केवळ लहान मुलांकडेच असतो. ‍

मध्यंतरीचं कोविडपर्व अवघड होतं. मनं चुरगाळून टाकणारे दिवस होते ते. प्रत्यक्ष भेटीगाठी कमी झाल्या; पण त्यांच्या फोनचाही केवढा आधार वाटायचा तेव्हा! या काळात एक कळलं. ज्यांच्यावर आपली श्रद्धा असते, अशा मोठ्या माणसांना आपल्या मानसिक स्थितीचा अंदाज दूर राहूनही येत असतो. त्यांना न सांगता सारं उमगलेलं असतं. आजही काही प्रश्न पडले किंवा अडचण आली तर नेमक्या त्याच वेळी फोन वाजतो. त्यांचं नाव पाहूनच प्रसन्नपणाची सुरवात होते. फोन उचलल्या उचलल्या खळाळत्या हसण्यानेच साऱ्या गाठी आपोआप सुटतात. हसून झालं की नंतर ‘नमस्काऽऽर’ असं म्हणण्याची त्यांची लकब फार मोहक. त्या ‘नमस्काऽऽर’मध्ये, ‘चला गप्पा मारूया..., काय चाललंय..., परवा असं झालं..., तुम्हाला सांगते...’ अशी अनेक ध्रुवपदं डोकावत असतात. मायेनं विचारपूस असते, सल्ला असतो आणि कधी कधी दटावणीही असते. बोलता बोलता अचानक गप्प होतात. आणि पुन्हा खळाळून हसत गप्पांचा ओघ वाहू लागतो.

खूप वर्षांपूर्वीचे जुने अनुभव म्हणजे मोलाची पण चलनातून बाद झालेली नाणी. ताईंच्या हातात या नाण्यांच्या मोहरा होतात. अशा श्रीमंत हातांचा आशीर्वाद लाभणं हेच भाग्याचं.‍ म्हणूनच आजपर्यंत मी त्यांच्याकडे अधिक काही मागितलं नाही. न मागताच त्यांचं देणं संस्कारांमध्ये झिरपलं होतं. त्यांच्याशी प्रत्यक्ष ओळख खूप नंतर झाली. देव भेटला तर, ‘मला काहीच नको’ असं म्हणण्याएवढा मी निःस्वार्थी नाही. पण यांच्याकडे मागायचं तरी काय?

लहानपणी माझ्या आजीला नमस्कार केला की ती हसत, ‘म्हातारा होऽऽ’ असा आशीर्वाद द्यायची. ‘म्हातारा’ या शब्दाला घाबरून मी तो मनावर घ्यायचो नाही. ताईंकडे पाहून आज त्या आशीर्वादाचा अर्थ उमगतो. ‍

या ज्येष्ठ बालमैत्रीणीसारखंच ‘हसरं बाल-म्हातारपण’ लाभावं एवढीच एक इच्छा आहे!

 

...प्रवीण जोशी
98505 24221
pravin@pravinjoshi.com

Comments

  1. घागर रिकामी करणे आणि आयुष्य वहातंठेवणे ही कल्पना फारच भावली.

    ReplyDelete
  2. उत्तमच चंद्रकांत रोंघे ,,,,

    ReplyDelete
  3. Mastaa! Kay chaan bai astil re hya

    ReplyDelete
  4. सुखी रहाणं सोप्पं आहे पण आनंदी रहाणं एक कला आहे.... खूप आवडलं.
    Ekunach अप्रतीम वर्णन 👌👌

    ReplyDelete
  5. प्रत्येकाला घागर रिकामी करू देणं आणि ते स्विकारणं किती अवघड आहे. पण अशा ज्येष्ठ बालमैत्रिणींना ते बहुधा सरावाने फार चांगलं जमत असेल नाही....

    ReplyDelete

Post a Comment