लाईफ इज जॅझ

पुण्यामध्ये जॅझ म्युझिक ऐकायची फार सोय नव्हती. पूर्व भागात एके ठिकाणी जॅझ बँड सादर होतात हे कळल्यावर मी अधूनमधून तिकडे जात असे. या संगीताची चवच न्यारी. अनपेक्षितता हा मुख्य गुण. ध्यानीमनी नसताना रचनेच्या बाहेरचा सूर अशा तऱ्हेने आत येतो की वाटावं सारी रचना याच्याचसाठी केली आहे. असा क्षणाक्षणाला ‘सरप्राईज’ देणारा, पण बेचैन करणारा अनुभव म्हणजे जॅझ संगीत.

अशीच एक कॉन्सर्ट चालू होती. डबल बास, सॅक्सोफोन, ट्रंम्पेट आणि पियानो चौघेजण मिळून सुरांना नाचवत होते. ‘क्या बात है...’ अशी दाद मनात येत असतानाच अचानकपणे पाठीवर कोणाचा तरी जोराचा हात पडला आणि ‘व्हॉट ॲन इम्प्रोव्हायजेशन मॅऽऽन...’ असा चित्कार कानात घुसला. मी पाठ चोळत आणि कानात बोटं घालत वैतागून मागे वळून पाहिलं. एक लालबुंद युरोपिअन आनंदाने धुमसत होता. आपण अनोळखी पाठीवर जोरात धपका मारलाय याचंही त्याला भान नव्हतं. क्षण दोन क्षणांनी भर ओसरला. त्यानं माझ्याकडे पाहिलं. पण ओशाळला वगैरे नाही. उलट त्या मुक्‍त उत्कट संगीताला ‍सदाशिव पेठी थंड दाद देणारा माणूस पाहून त्याचा जरा हिरमोडच झाला असणार.

कॉन्सर्ट संपली. श्रोते रंगमंचाकडे धावले. कुणी मद्यपानाच्या काऊंटरकडे गेले. मी घरी जायला उठलो. तो मात्र तसाच जागेवर बसून होता. माझ्या लक्षात आलं की त्याचा उजवा पाय अधू आहे. गुडघ्यापासून खाली स्टीलच्या पट्ट्या लावलेल्या दिसत होत्या. खुर्चीच्या पाठीला कुबडी टेकवून ठेवली होती. आमची नजरानजर झाली. काहीतरी बोलायचं म्हणून मी पुणेरी इंग्रजीत म्हणालो, ‘इट वॉज अ ग्रेट कॉन्सर्ट’

‘डिकरा, जॅझ ॲवडटं का टुला?’ मराठी भाषेला गुजराथी इंग्रजीतून ढुशा देत तो म्हणाला. अर्थ लागायलाच दोनतीन मिनीटं गेली. तोपर्यंत त्याचा गोरापान हात शेकहँडसाठी पुढे आला होता,

‘बेहराम बाटलीवाला.’

हा तर पारशी बाबाजी निघाला. अंगावरची लव सोनेरी वाटावी अशी लालबुंद कांती म्हणजे कोडाचा प्रकार होता. पण त्याला शोभत होता. विरळ चंदेरी केस. जाडे ओठ, भरघोस नाक, त्यावर काळ्या जाड काड्यांचा चष्मा. सफाचट दाढी. पातळ भिवया. शरीर स्थूल पण बेढब नाही. अंगात ब्रँडेड टिशर्ट आणि खाली बर्म्युडा. मी शेकहँडसाठी पुढे केलेल्या हाताचाच आधार घेऊन तो उठून उभा राहिला. वयोगट साठीच्या पुढचा असला तरी स्वभावगट ‘‍अरे-तुरे’चा वाटत होता. कदाचित माझ्यावर नुकत्याच ऐकलेल्या तरूण संगीताचा प्रभाव असेल. त्याच्यावर तर मद्याचाही अंमल होता. सावरून उभं राहात स्वतःशीच म्हणाला,

‘बेहराम... टू म्युजिशिअन व्हायला पायजे होता बेटा’

त्यानं माझा हात अजूनही धरून ठेवला होता त्यामुळे सुटका नव्हती. आम्ही तसेच बोलत बोलत बाहेर आलो. ‘आय ॲम अ फूल टाईम जॅझ लिसनर.’ त्यानं स्वतःहून सांगायला सुरवात केली. फायनान्स क्षेत्रात अनेक वर्ष काम करून निवृत्त झाला होता. रग्गड पैसा हाती होता. तो आणि त्याची बायको ‘कामी’ ऐषोआरामात जगत होते. पार्कींगमध्येच आमच्या गप्पा रंगल्या. मग अचानकपणे उशीर झालाय हे लक्षात येताच घाईघाईत म्हणाला, ‘इटस्‌ लेट. कामी बोंब मारेल. टू अशा कर नी, टुमारो माझ्याकडे लंचलाच ये.’ पारशी जेवणाचं इतक्या सहजपणे मिळालेलं आवतान कोण सोडेल? मीही अनमान न करता पटकन हो म्हणालो. दोन हौशी संगीतप्रेमी गप्पा मारतात तेव्हा त्या चर्चेचा शेवट जेवणाच्या टेबलावर होतो.

त्याचं घर म्हणजे राजमहाल होता. जागोजागी गडगंज श्रीमंतीबरोबर सूक्ष्म सौंदर्यदृष्टीही दिसत होती. आत शिरल्या शिरल्या गणपतीची सुरेख मुर्ती ठेवली होती. अस्सल शिसवी लाकडाचं फर्निचर, झुंबरं आणि देशोदेशीहून आणलेल्या देखण्या वस्तूंनी दिवाणखाना सजवला होता. भिंतीशी मोठा पियानो होता. हे ऐसपैस वाद्य कुणाच्या घरात मी प्रथमच पाहात होतो. ‍‘प्ले ना..’ तो म्हणाला. पण पियानोवर ठेवलेल्या लुई आर्मस्ट्राँग, वेज माँटेगोमेरी, मिलेस डेव्हीस अशा जॅझदेवतांचे फोटो पाहून मी गारठलो होतो. काहीतरी कारण सांगून प्रसंग टाळला. मग बेहरामनं किचनकडे पाहून मोठ्ठया आवाजात बायकोला हाक मारली. ‘कामीऽऽऽ’ त्यासरशी हॉलमध्येच गच्चीकडे तोंड करून ठेवलेली आरामखूर्ची हलके हलली आणि त्यातून एक बुटकीशी कृश स्त्री उठून उभी राहिली. बेहरामचा आवाज एकदम चार पट्ट्या खाली आला. ‘ओह्‌... यू आर हिअर... खाना लगाया?’ बेहरामचं वाक्य पूर्ण होईतो ती स्त्री पारशी गुजराथीत त्रासिकपणे काहीतरी पुटपुटत किचनमध्ये निघून गेली. कुणी जेवायला येणार असल्याचं त्यानं तिला सांगितलंच नसावं. मला डोळा मारत बेहराम मिश्कीलपणे म्हणाला, ‘ग्रेट... माझी वाईफ अजून येक घंटा घेणार फूड प्रिपेअर करायला. चल काहीतरी ऐकू.’

भेटीगाठी वाढू लागल्या. तो जॅझ संगीताचा इतका पागल होता की हे संगीत जिथे उदयाला आलं त्या न्यू ऑर्लीन्सलाही अनेकदा जाऊन आला होता. घरी असंख्य सीडीज्‌ होत्या, वाद्यं होती. पण स्वतःला गाता वाजवता काहीच येत नव्हतं. त्यानं मला ऑफर दिली, ‘यू डू वन थिंग... टू मला हिंदी गाणी ऐकव. मी टुला जॅझ ऐकवणार.’ हा करार मस्तच होता. वर पारशी धनसाक, सालीबोटी, रावो, पुडिंग असलं काय काय! त्या ‘कामी माऊली’च्या हाताला कमालीची चव होती. कोण कुठला हा पारशीबाबा प्रसन्न होऊन माझ्या कुंडलीत असा अचानक साग्रसंगीत सहभोजन उगवला होता.

एकदा दिवाणखान्यातल्या मीनाकाम केलेल्या शिसवी टेबलावर एक पुठ्ठ्याचा षट्‌कोनी आकाराचा सुबक बॉक्स दिसला. आत एखादं वाद्य असणार याचा अंदाज येत होता.

‘ओपन इट’

मी बॉक्स उघडला. त्यात एक सुंदर बनावटीचा कॉन्सर्टिनो होता. कॉन्सर्टिनो म्हणजे ॲकॉर्डिअनच्या जातीतलं एक छोटसं वाद्य. आपल्याकडे अतिशय दुर्मिळ असलेलं.

‘परवा माझी छोकरी आली जर्मनीहून. टुज्यासाठन्‌च गिफ्ट आणलंय... घेऊन जा’

अशी महागामोलाची वस्तू कुणी कुणाला इतक्या सहज देऊ करतं का? विश्वासच बसेना. मी विचारात पडलो. ‘डिकरा... लाईफ इज जॅझ, बी रेडी फॉर सरप्राईजेस! पन माझी येक रिक्वेस्ट आहे.’

‘काय ?’

‘मला एकदा म्हराठी पूरनपोळी खायची आहे.’ काहीतरी मोलाची गोष्ट मागावी तसं तो म्हणाला. कुणाचा जीव कशात अडकला असेल हे सांगणं मुश्कील. दुसऱ्याच दिवशी हा बाबाजी माझ्या घरी आईच्या हातची चवदार पुरणपोळी तुपाच्या धारेबरोबर ‘बहू सरस मॅऽऽन...’ अशी तारीफ करत जेवत होता. खूष होत मला म्हणाला, ‘लेटस्‌ वर्क टुगेदर. तू निस्ता म्युजिक कंपोज कर. मी लागेल ती सॉफ्टवेअर प्रोव्हाइड करतो.’

त्याच्याकडे परदेशातून आणलेली संगीताची अनेक सॉफ्टवेअर्स होती. त्या काळी भारतात ती पाहायलाही मिळत नसत. ती मला देऊ केली. एकदा सकाळी मुंबईतल्या वाद्यांच्या दुकानातून त्याचा फोन आला. खेळण्यांच्या दुकानात लहान मुलांचं होतं तसं त्याचं ‘हे घेऊ का ते घेऊ’ झालं होतं. मी फोनवरूनच गुंता सोडवला. बेहरामनं बरंच काही विकत घेतलं. खूप खूप आनंदात होता तो.

मी काही कारणाने दुपारी पुन्हा फोन केला. खूप वेळ रींग वाजत राहिली. तिसऱ्या चौथ्या प्रयत्नानंतर कामीने फोन उचलला. काही बोललीच नाही. मग मुलीने फोन घेतला. ती हुंदके देत चारच शब्द म्हणाली, ‘जॅझ इज नो मोअर...’

खरेदी झाल्यावर बेहरामने त्या दुकानातच अखेरचा श्वास घेतला होता. तो 'फुल टाईम जॅझ लिसनर' वाद्यांच्या संगतीत अहुराघरी गेला होता.

आता कधीकधी पूरणपोळी खाताना मला अचानक पारशी धनसाक आठवतं. कुणी 'मॅऽऽन' म्हटलं की बेहरामचा लालबुंद चेहरा आठवतो. त्या संगीतातलं मला आजही विशेष कळत नाही पण काही अतर्क्य आणि अनपेक्षित घडलं की एक मात्र पटतं;

‘लाईफ इज जॅझ... बी रेडी फॉर सरप्राईजेस...!’

 

...प्रवीण जोशी
98505 24221
pravin@pravinjoshi.com

Comments

  1. सुंदर.....चटका लावणारे वर्णन

    ReplyDelete
  2. रंगात आलेल्या सतार वादनात एकदम तुटणार्या तारे सारखा शेवट.खूपच अप्रतिम,अविस्मरणीय.

    ReplyDelete
  3. बहु सरस छे... आनंद

    ReplyDelete
  4. बरेच दिवसांनी तुमचा हा लेख वाचला एकदम छान

    ReplyDelete
  5. अप्रतिम व्यक्तिचित्र.सुंदर वर्णन.

    ReplyDelete

Post a Comment