बापूरावाय नमः
काटेकोरपणा, शिस्त आणि व्यवस्थितपणा या नामवंत त्रिगुणांची
एक गंमत आहे. ते स्वतःच्या अंगी बाणवणं अवघड आणि ते
ज्यांच्या अंगी असतात त्यांच्याशी जमवून घेणंही अवघडच. कारण काटेकोरपणाच्या
नादात ती माणसं स्वतःच काटेरी होतात. त्यांच्या शिस्तीच्या आखीव रेखीव
घडीचं कौतुक करण्यापलीकडे संवादच होऊ शकत नाही. आणि व्यवस्थितपणाचा अट्टाहास तर त्रासदायकच असतो.
पण हे तिन्ही गुण पुरेपूर बाळगूनही अशा सगळ्या
समजांना छेद देत बापूराव आपल्या स्वभावातला गोडवा छान सांभाळून होते.
हरी विनायक दात्यें उर्फ बापूराव दात्यें हे राष्ट्रीय
स्वयंसेवक संघ परिवारामधलं आदरणीय नाव. मार्शल म्युझिक अर्थात ‘रणसंगीत’ या विषयात
भारतामधल्या मोजक्या तज्ज्ञांमध्ये त्यांचं स्थान फार मानाचं आहे. संघाच्या
घोषपथकासाठी त्यांनी अनेक संगीतरचना केल्या. भारतीय नौदलाच्या प्रसिद्ध
बँडमध्येही त्यांच्या रचना ऐकायला मिळतात. पण त्यांच्याशी ओळख झाली तेव्हा
ही थोरवी समजण्याचं माझं वय नव्हतं. बापूरावांनी पाश्चात्य संगीतातल्या स्वरलिपीच्या आधारावर एक नवीन भारतीय स्वरलिपी तयार
केली होती. या विषयावर ते पुस्तक लिहित होते. लेखनिक म्हणून काम करण्यासाठी माझा भाऊ मला
त्यांच्याकडे घेऊन गेला होता.
सत्तरीपलीकडचं वय, पण तयार हापूस आंब्यासारखा
तुकतुकीत प्रसन्न हसरा चेहरा. पिवळसर गोरा वर्ण. बोलणं स्पष्ट आणि सानुनासिक.
बेताची उंची. प्रमाणबद्ध शिडशिडीत शरीर. ताठ कणा. या वयातही गळ्याखालची कातडी घट्ट
होती. अंगावर खादीचा सदरा आणि एकही सुरकुती नसलेली पांढरीस्वच्छ लुंगी. तिच्या
निऱ्यांच्या पट्ट्या पावलांच्या रेषेत यायच्या. अगदी
इस्त्री केल्यासारख्या. चष्म्याचा उपयोग वाचण्यापुरताच. निळसर घारे डोळे म्हणजे
जणू एक्स-रे मशीन.
पहिल्या भेटीतच त्यांनी मला डोक्यापासून पायापर्यंत निरखून पाहिलं. आरपार भेदक नजर आणि चेहऱ्यावरचं निर्मळ हसू यांचा मेळच लागत नव्हता. रोखून बघत म्हणाले,
‘हं... ये उद्यापासून. बरोबर दहा वाजता ये.’ मी मान हलवून हो म्हणण्याच्या आत पुढचं वाक्य आलं, ‘उशीर झाला तर येणार नाहीयेस असं समजेन.’
हे कडक प्रकरण आपल्याला झेपणार नाही अशी खूणगाठ
बांधून दुसऱ्या दिवशी पावणेदहालाच हजर झालो. सहकारनगरमधल्या बंगल्यातल्या गच्चीवर
ब्रह्मचाऱ्याची मठी शोभावी अशी त्यांची छोटीशी खोली मला अजून आठवते. टेबलावर टाक, नीफ, पेन्सिली ठेवायला चकाकता पितळी गडू.
त्याच्याशेजारी काचेची दौत आणि रोटरिंगच्या मार्कर्सचा सेट.
कोनाला कोन जुळवून रचलेले कागदांचे ताव. टेबललँपच्या मानेचा कोनही
डौलदार. वीणकाम केलेल्या कापडाने आच्छादलेला टेपरेकॉर्डर. पलीकडे एक
लहानसा ओटा. त्यावर लख्ख घासलेली भांडी पातेली. गॅस पेटवण्यासाठी चकमकीचा लायटर.
तसा लायटर मी आजतागायत कुठेही पाहिलेला नाही. चकमकीचे खडे ठेवण्यासाठी एक छोटीशी
डबीही तिथे नीट ठेवलेली असायची. खोलीच्या मध्यभागी तेलपाणी केलेला पितळी
कड्यांचा झोपाळा. भिंतीवर विवेकानंदांचा फोटो. शेकडो दुर्मिळ पुस्तकांनी भरलेली कपाटं. कुठेही अस्ताव्यस्तपणा नाही की
धुळीचा कण नाही. या साऱ्या मांडणीत कोरडा व्यवस्थितपणा नव्हता; तर सौंदर्याची जाणीव होती.
पाश्चात्त्य स्वरलिपी म्हणजेच स्टाफ नोटेशन लिहिणं ही एक कला
आहे. त्या खुणांमधला एखादा ठिपका चुकला तरी स्वररचना वेगळी वाजते. बापूरावांचं
अक्षर छापल्यासारखं रेखीव होतं. त्यांनी लिहिलेले कागद मला
तर चित्रांसारखे दिसायचे. कारण त्या लिपीतलं काहीच समजत नव्हतं. पण मग लेखनिक म्हणून माझा काय उपयोग असं मनात आलं. शिवाय
वर ती बोचरी शिस्त. काही चाचरत बोलू गेलो तर त्यांनी ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि
खास संघीय आवाजात आज्ञा केली,
‘तिथले दोन कागद घे.’
मी मुकाटपणे उठलो. कागदांचा गठ्ठा उचलला. त्यासरशी, ‘दोनच कागद...’ अशी सूचना झाली. आता आली का पंचाईत.
अशा वेळी काय करायचं असतं? जास्तीचे कागद पुन्हा जागेवर
ठेऊन द्यायचे? पण का? मी
गोंधळलो आणि वैतागलोही. माझी तारांबळ पाहून गालातल्या गालात छान खोडकर हसत बापूराव म्हणाले;
‘लेखनात चूक नको. एक रेघ सोडून खालच्या रेघेवर
लिहायचं. छपाई करणाऱ्यासाठी त्या जागेत सूचना लिहिता येतात.’
मग त्यांनी क्षणभर डोळे मिटले आणि मजकूर सांगायला
सुरवात केली. आणि मजकूर खरंच दोन म्हणजे दोनच पानांत संपला. त्यांनी कागद वाचायला मागितले. एकदोन ठिकाणी खाडाखोड
झालीच होती. त्यांनी माझ्याकडे पाहात तो कागद शांतपणे फाडून टाकला.
‘चूक नको. आता ते पान मनानं आठवून पुन्हा लिहून काढ.’
हा संगीतगुरू तर गणिताच्या
शिक्षकापेक्षाही भयंकर होता. पण त्या दिवसापासून माझी एकही चूक झाली नाही.
त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे एकदाच ऐकून लक्षात ठेवायची सवय लागली. ते
अवघड स्टाफ नोटेशन इतक्या सहजपणे आत्मसात झालं की पुढे वीस एक वर्षांनी मी लंडनच्या ट्रिनिटी कॉलेज ऑफ म्युझिकची परीक्षा
कणभर अभ्यास न करता उत्तम मार्कांनी पास झालो.
बापूरावांची अजून एक ओळख म्हणजे सूर्यनमस्कार. प्रत्येकाने नमस्कार घातलेच पाहिजेत असा त्यांचा आग्रह
असायचा.. त्यांच्याकडे जायला कधी उशीर झालाच तर गच्चीतल्या उन्हात
बारा सूर्यनमस्कार घातल्याशिवाय खोलीत प्रवेश मिळायचा नाही. तेव्हा ते सूर्यनारायणासारखेच उग्र दिसायचे. मी तर घाबरून सूर्याच्या
बारा नावांनंतर एक जास्तीचा नमस्कार ॐ बापूरावाय नमः असं म्हणून घालायचो. सूर्यनमस्कार घालण्यासाठी त्यांनी पाश्चात्त्य रणवाद्यं वापरून सुंदर संगीत तयार केलं
होतं. त्यातले मंत्र साक्षात् पंडित भीमसेन जोशी
यांच्याकडून गाऊन घेतले होते. या रेकॉर्डिंगच्या वेळी त्यांनी पंडितजींकडूनही
स्टुडिओमध्ये नमस्कार घालून घेतले होते म्हणतात.
आपल्या
संग्रहातल्या पुस्तकांना ते कुणालाही हात लावू देत नसत. पण मला मात्र काही पुस्तकं स्वतःहून वाचायला द्यायचे.
आनंद व्हायचा. पण पुढच्या भेटीत त्या पुस्तकांवर आधारित प्रश्न विचारून परीक्षा
घ्यायचे. असा एक वर्णन न करता येण्यासारखा मोहक पण काटेरी गोडवा त्यांच्या साऱ्या शिस्तीमागे होता. नीटनेटकेपणामागे प्रगल्भ रसिकता दिसायची. स्वभावात जरासा हेकटपणा असेलही पण त्यामागे स्वतःचं तर्कशास्त्र होतं.
त्यांच्या रेखीव चाकोरीत डोकावून पाहिलं तर एक मनमोकळा माणूस
दिसायचा. विनोदबुद्धी सतत जागी असायची. नवख्या माणसाला विनोदाच्या आधी टोकदार
बुद्धीचं दर्शन व्हायचं एवढंच काय ते.
बापूरावांसारखी माणसं आपल्याही नकळत जन्मभर पुरेल अशी पुंजी बांधून देतात. आजही कधी लिहिताना खाडाखोड झाली
तर मला त्यांनी फाडून टाकलेला कागद आठवतो. काही लक्षात राहिलं नाही तर बोलणी बसतील याची भीती जागी असते. कोणताही नवीन विषय आत्मसात
करण्याची बैठक त्यांच्याकडेच तयार झाली. तेवढं वेळ पाळणं अजून जमलेलं नाही. पण प्रत्येक गोष्टीचं महत्व मात्र मनात रुजलं आहे. कदाचित यालाच संस्कार म्हणत असावेत... ते सांभाळून ठेवण्यासाठी अंगी
बापूरावांचे ते खास त्रिगुण उपजतच असावे
लागतात.
ते कुठून आणायचे?
...प्रवीण जोशी
98505 24221
pravin@pravinjoshi.com
काहीही माहिती नसताना एखाद्या माणसाबद्दल आपलेपणा वाटावा असे लिखाण !
ReplyDeleteया अशा वरवर विक्षिप्त वाटणाऱ्या माणसांकडून च शिकण्यासारखं खूप मिळतं.
ReplyDeleteछोट्या छोट्या उपमा आणि चटकदार शब्दांनी अनैसर्गिकपणे फुललेले लखन
ReplyDeleteटंकलेखनात चूक आहे........नैसर्गिकपणे फुललेले लेखन वाचावे ......क्षमस्व
Deleteशिस्त प्रिय माणसांचा त्रास करून न घेता नेटाने त्यांच्याकडून चांगल्या गोष्टी शिकून घेणे हा एक नकळत संदेश दिला आहेस
Deleteव्यक्ती व तर छानच केलायस
प्रसंग रेखाटताना त्यातील गंमत अनुभवास येते
Excellent 👌👍
ReplyDeleteअति उत्तम ,,,,,
ReplyDeleteसगळी गोष्ट डोळ्यासमोर घडली असच वाटलं 👍👍
ReplyDeleteबापूराव फार आवडले.
ReplyDeleteपुन्हा एकदा उत्तम लेखन, अभिनंदन.
ReplyDelete- संजीव मेहेंदळे
प्रवीण जी , तुम्ही खरंच भाग्यवान..! इतक्या विविध स्वभावाच्या व्यक्ती आयुष्यात आल्या तुमच्या आणि त्या तुम्ही मनात जपल्याचे...! आमच्या पुढे त्यांची सुरेख शब्दचित्रे मांडताय.. खूप छान वाटतं वाचताना...! रोहिणी गोखले
ReplyDeleteम्हणजे अगदी फणसा सारखाच स्वभाव.... वरुन काटेरी पण आतून एकदम गोड
ReplyDelete��������
ते वेळ पाळणं अजूनही जमलेलं नाही.अगदी बरोबर आहे.😊😊😊
ReplyDeleteबाकी सर्वसुद्धा बरोबर आहे.👍👍
ReplyDelete