रुखरुख

खूप वर्षांपूर्वीची गोष्ट. कॉलेजला होतो तेव्हाची. इंटरकॉलेजिएट स्पर्धा चालू होत्या. मी संयोजनात होतो. दुपारची वेळ. काहीतरी कामासाठी बाहेर पडलो. रस्त्यात एका मंगल कार्यालयातून जेवणाचा मस्त वास येत होता. पंगती वाढल्या होत्या. मला राहवलंच नाही. बिनधास्त आत घुसून पानावर बसलो. त्या वयात आपण असे आचरटपणे करत असतो. चार घास पोटात गेल्यावर जरा भानावर आलो तेव्हा लक्षात आलं की आपण आगंतूक आहोत. इथे आपल्याला कुणीच ओळखत नाही आणि आपणही कुणाला. पकडले गेलो तर? पण हा विचार करायची वेळ निघून गेली होती.

अशातच आता शेजारचा माणूस ओळखीचा वाटायला लागला. माझ्या भरल्या पोटी भीती आली. कडेची पंगत असल्याने तो उठेपर्यंत मला उठणं शक्य नव्हतं. मग संभाविताचा आव आणून चेहरा लपवतचोरट्या सावध नजरेने अंदाज घ्यायला लागलो. काही सेकंद तसेच ताणले गेले. आणि अचानक विंगेतून प्रॉम्प्टर बोलावा तशी शेजारून हलक्या आवाजात सुचना आली, ‘चेहरा शांत ठेव. इकडेतिकडे फार बघू नकोस. हातांची चुळबूळ थांबव. कुणाच्याही लक्षात येणार नाही.’ माझा पोकळ अभिनय उघडा पडला होता. मी पार संपलोच. दोन घासांनंतर शेजारच्या खुर्चीतला माणूस सहजपणे म्हणाला, ‘डोन्ट वरी. मीही तुझ्यासारखाच आलोय.’ क्षणभर काही कळलंच नाही. पण एकदम हलकं वाटायला लागलं. चेहरा दिसणार नाही अशी पोज घेऊन तो सहजपणे बसला होता. मग रंगमंचावरची पात्रं आपापल्या भूमिकेचं बेअरींग सांभाळून ‘तुझा पट्टा सुटलाय, तुझं वाक्य विसरलंय’ अशा गप्पा मारतात तसा आमचा संवाद सुरू झाला. मोठ्या नटानं नवशिक्याला सांभाळून घ्यावं तसा तो मला धीर देत होता. जेवण झालं आम्ही बाहेर आलो. आणि प्रवेश संपल्यावर एक्झिट घ्यावी तसा तो निघून गेला.

ही माझी त्याची दुसरी भेट. लहानपणी एका बालनाट्यात काम करताना तोंडओळख झाली होती. पण मैत्री अशी कधीच नव्हती. तेव्हापासूनच तो एक विक्षिप्त कलंदर म्हणूनच प्रसिद्ध. आणि ‘अशांच्या फार जवळ जायचं नसतं’ या मध्यमवर्गीय शिकवणूकीत वाढलेला मी. 

पुढे त्यानं नाटकात फार मोठं नाव कमावलं. अक्षरशः अचाट ताकदीचा विनोदी नट होता तो. शिवाय लेखक, वादक आणि दिग्दर्शकही. अधूनमधून भेट व्हायची. पण आमची ओळख, ‘आहे नाही’च्या काठावरच राहिली. त्याच्या भूमिकांएवढ्याच त्याच्या थोरपणाच्या आख्यायिकाही प्रसिद्ध होत होत्या. एकदा म्हणे तो एका अवघड नाटकाचं अख्खं स्क्रीप्ट काही तासात पाठ करून आयत्या वेळी उभा राहिला. एकदा म्हणे सहकलाकार आला नाही तर संपूर्ण अंक त्यानेच पेलला. अशा अनेक ‘एकदा म्हणे’नं त्याची छबी घडवली जात होती.

अजून काही वर्ष गेली. आता त्याच्या पाठीशी प्रचंड अनुभव होता. सिनेमा आणि छोट्या पडद्यावरही झळकू लागला. कलाकार म्हणून नवनवीन उंची गाठत होता. पण व्यावहारीक जगात मात्र सैरभैर होत होता. तिथे टिकून राहण्यासाठीची चतुराई आणि शिस्त त्याच्याकडे नव्हतीच. त्या ऐवजी उत्कट कलंदरपणा आणि यश न पेलता येण्याचा शाप मात्र पुरेपूर मिळाला होता. मग भरकटयात्रा चालू झाली. आता त्याच्या कहाण्यांनी वेगळा सूर धरला. ‘उशीरा येऊनही अख्खं नाटक एकहाती तोललं’ या वाक्यातलं कौतुक कमी होऊन. ‘तो नेहमीच उशीरा येतो’ अशी तक्रार होऊ लागली. अमूक निर्मात्याबरोबर हे झालं आणि तमूक निर्मात्याबरोबर तसं वाजलं हा मीठमसालाही चवीला होताच. लहान मुलांचं कौतुकही ती मोठी होऊ लागली की विरळ होत जातं; हा तर कलाकार होता...

अशाच काळात कधीतरी मी लिहिलेल्या एका कार्यक्रमाचं दिग्दर्शन तो करणार असं ठरलं. मला आनंदच झाला. पण खोटं का बोला, जोडीला थोडी धाकधुकही होती. करीअरमध्ये माझी दुसरी इनिंग चालू होती आणि तो फॉलोऑन टाळण्याचा जीवापाड प्रयत्न करत होता. वाचनाचा दिवस ठरला. तो एका स्वस्त लॉजमध्ये उतरला होता. पुण्याचाच असून लॉजमध्ये का उतरला असेल, हा प्रश्न मनात घेऊन मी तिथे पोचलो. मला पाहाताच त्याने सलगीनं ‘याऽऽ जोशीमास्तर’ असं भरघोस स्वागत केलं. मधल्या वर्षांच्या भिंती पडून गेल्या. जुन्या आठवणी निघाल्या. चेष्टामस्करी, नकलांची मैफल सुरु झाली. त्यात तर तो बादशहा होता. मी अस्वस्थपणे, ‘चल ना, वाचन करू’ असं म्हणून मुद्यावर आलो. त्यानं माझ्याकडे गमतीनं पाहिलं आणि त्याला काहीच तास आधी मिळालेली माझी संहिता हातात कागद न घेता तोंडपाठ म्हणायला सुरवात केली. पाठांतराचा हा चमत्कार पाहून मी अवाक् पडलो.

कार्यक्रमाच्या तालमी सुरू झाल्या. मला हा माणूस अजूनच उलगडत चालला होता. एकदा तालीम लवकरच संपली. टळटळीत दुपारची वेळ. मी घरी निघालो. हा पाठोपाठ आला.

मला सोडतोस?’

कुठे?’

अंऽऽ कुठे असं नाही... इथेच कुठेतरी.’ त्याच्या बोलण्यात काहीच ठाम नव्हतं. त्याला कुठेच जायचं नसावं. तालीम लवकर संपल्यामुळे त्याची पंचाईत झाली होती. इकडे तिकडे हिंडत राहण्याऐवजी काही वेळापुरता विसावा हवा होता. कदाचित भूकही लागली असेल. खरं तर मी ‘घरी चल’ म्हणावं असं त्याला वाटत होतं.

आपण माणसांना त्यांच्या भूतकाळातल्या घटनांनी मोजतो. आम्ही दोघांनी एकमेकांना त्या जेवणाच्या घटनेपाशीच बांधून ठेवलं होतं. त्याला मी त्याच्याच जातकुळीतला वाटत असेन. या नात्याने त्याला माझ्यापाशी विश्वासाने मोकळं व्हायचं आहे हे मला कळत होतं. अशा संबंधांना काय नाव द्यावं? एकानं दुसऱ्याकडून केलेली माणूसपणाची साधी अपेक्षा असते ती. त्याचं कुठेतरी काहीतरी खूप बिनसलं होतं. आयुष्याची काही गणितं सुधारण्याच्या पलीकडे चुकली होती. त्याविषयी बोलायचं असावं. पण मी शक्यतो व्यावसायिक ओळखींना घरी आणत नाही. त्यांच्याबरोबर येणारी नकारात्मकता, गॉसिप्स मला नको असतात. मी माझ्याही नकळत फार क्रूर झालो. त्याच्या चमकदार कलंदरपणाला बाजूला सारून, अंधाऱ्या बाजूकडे पाहात विचारलं, ‘घरी का नाही जात?’ या सहज प्रश्नानं त्या जन्मजात अभिनेत्याचं अवसान मुखवट्यासह गळून पडलं. त्यानं हसण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. पण हा अभिनय तर माझ्या त्या जेवणाच्या वेळच्या अभिनयापेक्षाही खूप पोकळ होता. आणि सांभाळून घ्यायला मी काही तो नव्हतो. अशा वेळी हात सोडून देणंच इष्ट असतं. मी तेच केलं.

अरे मला अचानक एक काम आठवलं... मी घरी जाणार नाहीये.’ त्याच्या अपेक्षा सोडवून घेत म्हणालो आणि रस्ता बदलून दुसऱ्या रस्त्याने घरी निघून आलो. अशा अवेळी तो कुठे गेला असेल, काय केलं असेल, याचा विचार झटकून टाकण्यापलीकडे मी काय करू शकत होतो? काही कलाकारांचं असं का होतं याचा उदात्त विचार करून मनाशी हळहळ व्यक्‍त केली. त्यांच्याच माथी दोष मारून अपराधीपणातून मोकळाही झालो.

ती आमची शेवटची भेट. यानंतर काहीच दिवसात तो भेटींच्या पार निघून गेला.

आपण काही कुणाच्या जन्माला पुरणार नसतो. पण दोन क्षण संगत द्यायलाही का कमी पडतो? नेमकी तेव्हाच आपली तथाकथित तत्व कुंपणासारखी आड येतात. तत्व कसली ती? नव्या अनुभवांना सामोरं जाण्याची भीतीच. ती पुढे करून आपण एका जित्याजागत्या आयुष्याला सहज झिडकारून टाकतो. त्या दिवशी माझ्या हातून हेच घडलं.

आता केवळ रुखरुख लागून राहिली आहे...

 

...प्रवीण जोशी
98505 24221
pravin@pravinjoshi.com

 

- - - - -

(मी त्याचं नाव सांगणार नाही. 
तुम्हीही शोधायचा प्रयत्न करू नका.
ओळखलं असेल तरी कॉमेंटमध्ये उल्लेख करू नका.
...त्याला तेवढंच समाधान! )

- - - - -

Comments

  1. वा प्रवीण, भावना छान व्यक्त केल्या आहेस
    आता लवकरच 50,000
    👍🙂🙂👍

    ReplyDelete
  2. खूपच छान आणि अतिशय हृदयस्पर्शी !!!

    ReplyDelete
  3. दोन पेग नंतर तो म्हणाला, मला नक्की घरी सोडणार ना, तिसरा संपलेला मी म्हणालो, Don't take me for granted.. तसच काही guilty वाटलं वाचून.

    ReplyDelete
  4. प्रत्येकालाच अशी कुठे तरी कशाची तरी रुखरुख लागलेलू असते कोणाला व्यक्त करता येते तर कोणी आयुष्यभर तिच्या बरोबर जगतो .तु मात्र छान व्यक्त केली आहेस .

    ReplyDelete
  5. As usual great ... Chandrakant Ronghe ...

    ReplyDelete
  6. खुप छान व्यक्तिक्त होतोयेस. शुभेच्छा.

    ReplyDelete
  7. आपल्या नकळत असे बरेच प्रसंग घडतात
    आणि ते मनात घर करून राहतात
    शब्दात तु नेहमीच छान व्यक्त होतोस

    ReplyDelete

Post a Comment