वसंत...
मी वसंतबद्दल काहीही
चमकदार लिहिणार नाही. मला ते जमणारही नाही. हे आहे केवळ त्याचं स्मरण.
काही माणसं शांत
असतात. पण या शांतपणाच्या तळाशी खूप खोलवर अनेक प्रवाह वाहात असतात. त्यांना वरवरचा
उथळ खळखळाट मान्य नसतो. वागणंबोलणं चमकदार नसतं. चार जणात वेगळं उठून दिसावं असंही
वाटत नसतं. हेच तर त्यांचं खरं वेगळेपण. ते जाणून घेण्यासाठी तेवढंच खोलवर उतरावं लागतं.
म्हणूनच एक कुठलातरी प्रसंग वेचून वसंतचं वर्णन करणं अशक्य आहे.
वसंत माझा एकमेव
मित्र. आणि मीही त्याचा. पाचवीपासून अगदी आजपर्यंत. आम्ही संपूर्णतः भिन्न स्वभावाचे.
म्हणूनच अत्यंत जवळचे. पण मैत्री होण्यासाठी अशी काही अटच नसते. स्वभावातला ‘स्व’ गळून
पडला की उरते ती मैत्री.
अंगाने मजबूत. व्यायामानं
कमावलेलं शरीर. रुंद खांदे मस्त उंची. सरळ नाक. त्याच्या मोठ्या डोळ्यांत हुशारी आणि
करुणा एकदमच चमकायची. विनोद करताना डावा डोळा अलगद मिटला जायचा. पण विनोद तर फारच फुसके
असायचे. हरवलेलं बालपण जपण्याचा प्रयत्न करणारी माणसं असे विनोद करतात. वागणं कोकणस्थी काटकसरीचं. ‘नीटनेटकेपणा
हेच सौंदर्य’ यावर पक्का विश्वास. अक्षर तर इतकं बारीक, की शाळेत माझ्या दोन वह्या
भरल्या तरी याच्या पहिल्या वहीची पानं उरलेली असायची. पण त्यात एकाही अक्षराची खाडाखोड
नसायची. बोलणंही तसंच. उंच किनऱ्या आवाजात तरीपण स्पष्ट, मुद्देसूद आणि खोडलं न जाणारं.
काही पटलं नाही की
मान हलवून गप्प राहायचा. पण कुणी अंगावर आलं की दुप्पट वार करायचा, अगदी सर्वस्व पणाला
लावून भिडायचा. आई लवकर गेली त्यामुळे असेल कदाचित पण प्रत्येक शब्द तोलून
मापून जबाबदारीने बोलायला लागला. मला त्याच्या समजूतदारपणाची चीडच यायची. ‘अरे का इतका
विचार करतोस प्रत्येक गोष्टीचा?’ असं विचारलं की नुसता डोळ्यांनी हळवं हसायचा. कदाचित
तेव्हा त्याला माझ्या बेछूट बेफिकिरीचा आधार वाटत असेल. जरा गमतीशीरच होती आमची जोडी.
शाळेनंतर मार्ग बदलतात.
जुने मित्र दुरावतात. नवीन जग दिसायला लागतं. पण मी जरा भरकटलेलो होतो. मला आधाराची,
योग्य दिशेची गरज आहे हे वसंतनं ओळखलं होतं. तेव्हापासूनच त्याचं माझ्याशी ‘वडिलकीचं
मैत्र’ होतं. मला आठवतंय, त्यांची कुठेशी जागा होती. मला तिथे घेऊन गेला. त्या अंगणात
मला एक झाड लावायला सांगितलं. आणि माझ्याच वयाचा वसंत झारीने पाणी घालत गंभीरपणे म्हणाला,
‘झाड लावलं की मन स्थिर होतं...’ मी याला पुस्तकी भाबडेपणा असं म्हणून खूप हसलो होतो.
आज तिथून जाताना
मी ते झाड शोधत असतो. हरवलं कुठेतरी...
वसंतनं असाच स्वतःचाही
सांभाळ केला होता. स्वतःलाच चॅलेंजेस द्यायचा. एकदा भीमाशंकरच्या जंगलात ट्रीपला गेला.
पण एका ठिकाणी अचानक कसलीतरी भीती वाटली. घाबरून परत आला. पण आपण कशाला तरी भ्यायलो
हे त्याला सहनच होईना. दुसऱ्या दिवशी एकटाच जंगलात गेला. जिथे भीती वाटली होती त्या
ठिकाणी दोन तास बसून परत आला. असा मनस्वी होता.
साधी राहणी म्हणजे
म्हणजे काय ते वसंतकडून शिकावं. हॉटेलमध्ये कधी खाणार नाही. ब्रँडेड वस्तू वापरणार
नाही. त्या महाग असतात म्हणून नव्हे, तर त्यामुळे स्थानिक लोकांचा व्यवसाय जातो म्हणून.
त्यासाठी चपलाही रस्त्यावरच्या चांभाराकडूनच बनवून घेणार. हातमागाच्या कापडाचे शिवून
घेतलेले शर्ट घालणार. पँटची सुरनळी होईपर्यंत वापरणार. आणि या सगळ्यासाठी माझी आणि
त्याच्या बायकोची निमूटपणे बोलणीही खाणार.
बीएस्सी नंतर त्यानं
समाजसेवा या शिक्षणशाखेत मास्टर्सची पदवी मिळवली. हे त्याचं आवडीचं क्षेत्र. मग वसंत
फुलून आला. प्रचंड वाचन, प्रगल्भ विचार आणि ते मांडण्याची अभ्यासपूर्ण पद्धत... त्याला
हा प्रौढपणा छान शोभत होता. अलीकडे तो अंधांविषयी काम करणाऱ्या एका जागतिक संस्थेशी
निगडित होता. झपाटल्यासारखा काम करायचा. सतत प्रवासात असायचा. मी गमतीनं म्हणायचो,
‘इंडियन रेल्वे तुझ्याच पैशावर चालते’. कुठल्याशा दुर्गम खेड्यात कुणा एका अंध मुलीला
मदत हवी आहे हे समजल्यावर चोवीस तास प्रवास करून तिथवर पोचला होता. या संस्थेत तो फार
मोठ्या पदावर होता. अगदी सहा आकडी पगारावर. आता जागतिक स्तरावरही त्याची ओळख निर्माण
होत होती.
दहाबारा वर्षांपूर्वी
वसंता भोपाळमध्ये छान स्थायिक झाला. पुणे, परभणी, रत्नागिरी, पाबळ, शिवापूर, भोपाळ
असं करत त्यातं नुकतंच लखनौमध्ये काम सुरू केलं होतं. मला आज वाटतं की वसंत हळुहळू
उत्तरेकडे जात होता. ही पूर्णत्वाची पण न परतीची दिशा...
आम्ही दोघंही जरा
मॅडच. इतर मित्रांसारखा धुडगूस नाही, कुठल्या सेलीब्रेशनचा धांगडधिंगा नाही. काहीही
न बोलता एकमेकांच्या मनातलं कळायचं. दिवाळीच्या दिवसात संध्याकाळी मुठेकाठच्या एका
देवळाच्या पायऱ्यांवर जाऊन बसायचो. संवादासाठी तेवढं पुरायचं. आकाशात उडणाऱ्या बाणांची
प्रतिबिंबं मुठेच्या वाहत्या पाण्यात पडत असायची. सारं जग आनंदात असताना ते त्रयस्थपणे
पाहायचं ही त्याची समज. आणि माझ्यात कलाकाराची प्रसन्न उदासिनता.
मध्यंतरी मी त्याच्याकडे
भोपाळला गेलो. त्याचं नवीन घर, कर्तृत्वाची चढती कमान तृप्तपणे पाहिली. खूप वर्षांनी
तिथल्या एका तळ्याकाठी तसेच पूर्वीसारखे शांतपणे शेजारी बसून राहिलो. तसंच मूकपणे खूप
काही बोलून घेतलं. दोन चार दिवस राहून मी पुण्याला परत निघालो. वसंता मला आणि माझ्या
बायकोला स्टँडवर सोडायला आला. ही निरोपाची वेळ फार विचित्र असते. एक गेल्याशिवाय दुसऱ्याला
निघता येत नाही. बोलणं होतं पण गप्पा रंगत नाहीत. बस खूप वेळ येईचना. वसंत अस्वस्थ
होता. सारखी चुळबूळ चालली होती. अचानक मध्येच तुटकपणे म्हणाला, ‘चल रे, निघतो मी...’
आणि पाठ फिरवून, मागे न बघता निघून गेला. माझी बायकोही जरा गोंधळलीच. जरा वेळानं फोन
केला तर गदगदल्या आवाजात म्हणाला,
‘प्रवीण... सॉरी
मी असा निघून गेलो. पण मला ना, तुला निरोपाचं अच्छा म्हणता आलं नसतं रे...’
वसंता सहा वर्षांपूर्वी
या जगातूनही असाच अचानकपणे निघून गेला. न सांगता, न निरोप घेता...
- - -
अशी अगणित स्मरणं
घेऊन गेली सहा वर्ष मी एका प्रश्नापाशी अडलोय. आठ जुलै हा वसंतचा वाढदिवस. पण पुढे
निघून गेलेल्या जिवलग मित्राचा वाढदिवस साजरा करावा का मृत्यूदिनाचा शोक करावा? सदा
सकारात्मक विचार करणाऱ्या वसंतनं या प्रश्नाचं उत्तर ‘वाढदिवस’ असंच दिलं असतं.
वसंतबद्दल लिहायला
ही जागा पुरेशी नाहीच. पण मला फक्त एवढंच म्हणायचं होतं...
हॅपी बर्थ डे वसंत
!
अजून काय लिहू?
...प्रवीण जोशी
98505 24221
pravin@pravinjoshi.com
खूप सुंदर सुरवातीला मैत्रीचं वर्णन केलं आहेस मामा ..वाचून खूप छान वाटलं .तुमची मैत्री खूप खूप घनिष्ट होती आहे आणि कायम असेल . आपल्याला प्रत्येक प्रसंगात आपले जवळचे मित्रच मदत करतात हे खर आहे .. खूपच सुंदर शब्दांच लेखन आहे ..
ReplyDeleteअप्रतिम ...
ReplyDeleteअसे मित्र क्वचित मिळतात. त्यांना जपावे जिवापाड
ReplyDeletePravin manala lagatay tujha lihina..sadhe saral kuthe milate re aajkaal..lahanpani tu asa navata vatat.. kharch khup pudhe gelas God bless you.
ReplyDeleteखूप सुंदर .अप्रतीम .रडवलस मित्रा .
ReplyDeleteअप्रतिम, तुमचं मैत्र विलक्षणच. तू ते नेमक्या आणि मोजक्याच शब्दात चितार लस
ReplyDeleteApratim.
ReplyDeleteVery touching.
ReplyDeleteवसंता आपल्यात असून नसल्या सारखा. परिचय च्या कुठल्याही कार्यक्रमात अंग झडझडून काम करणारा. एका अत्यंत विद्वान शास्त्री वडिलांचा बंडखोर विचारांचा मुलगा. पण उपमर्द नाही, अनादर नाही.
ReplyDeleteवसंता गेला हे शब्द ऐकून बसलेला धक्का अजून जाणवतो, त्याच अकाली जाणं अस्वस्थ करत.
मृगुच्या SSB च्या वेळेस भोपाळ ला गेलो तर नेमका तेंव्हा तो पुण्यात होता. खुप हळहळ वाटली त्याला कळल्या वर. मुद्दामून परत ये म्हणाला, पण तेव्हा राहिलं ते राहीलच. नंतर एकदम बातमी........
त्याला लहानपणी नूमवि मधे पाहिले, नंतर कॉलेजमधे तुझ्यामुळे त्याची परत भेट झाली. घराण्यातली परंपरागत चाकोरी सोडून वाया न जाता स्वतः निवडलेल्या विधायक कामात गुंतणारे फार कमी असतात, "शास्त्रीना" या ब्लॉगद्वारे पुन्हा भेटायचा योग आला.. Thanks.
ReplyDeleteआनंद
पुन्हा एकदा अप्रतिम लेख ... चंद्रकांत रोंघे,,,,
ReplyDeleteतुझ्याकडून ऐकलं होतं आजपर्यंत.. आज जाणंवलं..!!
ReplyDeleteमाणसं अमर होतात ती त्यांच्या मागे उरलेली माणसं त्यांना मनात, आठवणीत जिवंत ठेवतात म्हणून. तू ही ते केलंस प्रविण.
ReplyDeleteएक भावपूर्ण व्यक्तीचित्रण
ReplyDeleteछान लिहिलंस ,
ReplyDeleteछान लिहीलंयस. वसंतचा स्वभाव असाच होता अगदी. माझी आणि त्याची मैत्री एमएसडब्ल्युला प्रवेश घेतल्यावर झाली, तोपर्यंत ओळख होती फक्त. परीचयमधे नेहेमी येणारा एक शांत कष्टाळू मुलगा एवढीच. तुमच्या दोघांची इतक्या लहानपणापासून ओळख होती हे मला माहित नव्हतं. एमएसडब्ल्युला आमचा गृप होता त्यात रमायचा वसंत, खूप वैचारिक वादविवाद व्हायचे, मजा यायची.
ReplyDeleteया लेखाच्या निमित्ताने परत एकदा आठवण आली त्याची. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी त्याला पुण्याला आणलं. ते दोन दिवस आपण सतत बरोबर होतो.
तो गेला पण त्याच्या छान छान आठवणी आहेत आपल्या बरोबर.
तू काळजी घे स्वतःची
Thanks for writing this Pravin. I knew Vasant when we were both older and were working together. Your memories of a young boy, did add to my understanding of the man I knew.
ReplyDeleteReading this on Vasant's birthday, makeit more touching.
Deleteमित्र नाही, फक्त आठवणी उरल्या ... हा प्रकार फार वाईट आहे रे. छान लिहीलं आहेस.
ReplyDeleteवाचता वाचता शब्द दिसेनासे झाले डोळे भरून आले
ReplyDeleteमैत्र जिवाचे .... खूप खोलवर रूजलेलं
ReplyDeleteमंजिरीच्या पुस्तकाच्या वेळीहतिने सांगितलं होतं या मैत्रीबद्दल ते सगळं आठवलं.
मोजक्या शब्दांत पण प्रभावी आणि भावपूर्ण व्यक्तिचित्रण.
ReplyDeleteवसंत अगदी समर्पित आणि प्रामाणिक .. खूप मेहनती.. आराम शब्द त्याच्या साठी अगदी वर्ज.. काम, संसार, व्यायाम, वाचन, प्रवास, समाजकार्य, नातीगोती , मित्रपरिवार, मी आणि सर्वात त्याला प्रिय श्रावणी.. आज श्रावणी मधे मला वसंत पूर्ण दिसतो.. उंची, शरीरयष्टी व्यायामाची आवड, वाचन, सडेतोड पण मुद्देसूद बोलण आणि प्रामाणिक असणे.. आधी ही आणि आज ही जी मी उभी राहू शकले आणि श्रावणी ला उभे राहायला मदत करू शकले त्यात वसंत ची भूमिका निर्विवाद ...
ReplyDeleteत्याचे आत्मचरित्र लिहायचे झाले तर त्याचे नाव मी ' बूट, बुक आणि बनाना ' ठेवेन.. व्यायाम, वाचन आणि केळी खात खात त्याने केलेले अखंड प्रवास.. भारतातील जवळजवळ सर्व राज्य आणि ५- ६ देश त्याने पाहिले.. शंभर टक्के खरा माणूस...
तुम्हाला सर्वांना माहीत आहे का ते मला माहीत नाही.. Sightsavers या आंतरराष्ट्रीय संस्थेमध्ये वसंत लखनौ ला काम करत होता. त्याच्या कामाची पावती म्हणून त्यांनी एका देशव्यापी कार्यक्रमाचे नाव 'नेत्र वसंत' ठेवले आहे आणि आज सहा वर्ष तो कार्यक्रम देशभरात चालू आहे... जागतिक स्तरावर ही त्याच्या कामाची दखल घेतली गेली आणि त्याला पुरस्कार दिला गेला.. अर्थात तो स्वीकारायला वसंत नव्हता ... 😥 असो... वसंत बद्दल मी खूप बोलू शकते.. आज प्रवीण च्या निमित्ताने मी हे एवढं लिहिले.. मरावे तरी किर्तिरुपी उरावे हे वचन आपल्या अवघ्या ४५ वर्षाच्या अल्प आयुष्यात त्याने खरे केले ..आणि कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनिया बाबा गेला.... हे यथार्थ खरे करत त्याने निरोप घेतला.....😥😥😥
परमेश्र्वराकडे माझी एकच तक्रार आहे .. की हा प्रवास अवेळी आणि कोणताही निरोप न घेता अचानक का थांबला...
अगदी खरं! स्मिता - तुझं हे लिहीण आपल्या MSW च्या गृपवर टाकू का?
Deleteअरे, हा आपला वसंत शेंडे ना ???
ReplyDeleteहो
Deleteखऱ्या मित्राला कधीच निरोप देऊ शकत नाही त्याच्यावाठवणी आपल्या बरोबर असतात .
ReplyDelete