वाडा + मामी = समाजवाद
'आमच्या वाड्यात एक मामी होत्या...'
हे वाक्य वाडा संस्कृतीत राहिलेल्या प्रत्येकाला आपलंसं
वाटेल. कारण प्रत्येक वाड्यात अशा एक तरी मामी, ताई, वहिनी असतातच. एकदा का वाड्याचा दिंडी दरवाजा ओलांडून आत शिरलात की बाहेर
कुणीही असा; इथे तुम्हीही नाना, पमी,
नंदू, अप्पा असेच कुणीतरी होऊन जाता. या
टोपणनावांचा उगम शोधायला जाऊ नये. माझ्या आजीला ‘माईच्याई’ म्हणायचे. या चायनीज
वाटणाऱ्या नावाचा समास ‘माईच्या आई’ असा सुटतो हे कळायला मला वर्ष लागली. मग या
मामींना मामी हे नाव कसं पडलं असेल हे कोडं सोडवण्याच्या नाद मी सोडूनच दिला.
वर्ण अस्सल देशस्थी सावळा. बुटक्या. गोलसर चेहरा. सैलसर वेणी किंवा अंबाडा.
पुढून थोडेसे पांढरे झालेले केस. मोठं कुंकू. त्या काळच्या बायकांना फॅशन, मॅचिंग, मेकअप, टापटिप वगैरे गोष्टी फारशा शिवल्या नव्हत्या. स्वभाव अघळपघळ. खरं तर धांदरटच. सदा कसल्यातरी लगबगीत असत. मला तर त्या
कायम पदर खोचलेल्याच आठवतात. स्वयंपाकघरातून काम करत बाहेर आल्यात असंच वाटायचं. आवाज उंच किनरा होता.
शेजारी बसून बोलल्या तरी पलीकडच्या बिऱ्हाडात सहज ऐकू जाई. पण बोलण्यात एक छान
उबदार प्रेम असे.
आमचा वाडा म्हणजे एक मोठ्ठं कुटूंब होतं. छान निकोप वातावरण. एकमेकांत
प्रेम असं की आम्ही मुलं ज्यांच्या घरी असू तिथेच जेवायचो. आपुलकी अशी की
परिक्षेचा निकाल वाड्यातल्या चौकात जाहिरपणे वाचला जायचा. एकी अशी की एकांकडे
गणपती बसला तर प्रसाद दुसऱ्यांकडून यायचा. सुरक्षितता अशी की गावाला जातानाही
घराला कुलूप लावायची गरज नसायची. आणि नातं
असं की कुणाशीही रक्ताचे संबंध नसतानाही लग्नकार्याची पहिली पत्रिका वाड्यातल्या
घरांमध्येच दिली जायची.
पण इथे प्रत्येकाला स्वतंत्र राजकीय आणि सामाजिक मतं होती. तीही अत्यंत
टोकाची आणि जहाल. मग कधीतरी वादावादी व्हायचीच. निवडणुकांच्या वेळी तर कट्टर
संघवाले, गायवासरू काँग्रेसवाले, हाती नांगर घेतलेल्या
चिन्हाच्या जनता पार्टीवाले असे सगळे अगदी हमरीतुमरीवर यायचे. आम्हां मुलांना
त्यातलं कळायचं काहीच नाही पण विहिरीच्या कट्ट्यावरती होणाऱ्या गरमागरम चर्चा
ऐकायला छान वाटायचं. जो अधिक जहाल त्याचं आम्हाला पटायचं. कुठल्या कुठल्या घटनांचे
संदर्भ, मोठमोठ्या नेत्यांची नावं निघायची. पण हे वाद कधीच
वैयक्तिक पातळीवर घसरत नसत. मतं मांडून, भांडून थकले की
सारेजण पुन्हा गुण्यागोविंदाने एकत्र यायचे. घरी
केलेल्या पदार्थांची देवघेव, उधार उसनवारी सारं
काही पुन्हा सुरु व्हायचं. सशक्त लोकशाही
म्हणजे तरी वेगळं काय असतं? आम्हाला ती वाड्यातच पाहायला
मिळत होती.
या सगळ्यात मामी समाजवादी होत्या. पण म्हणजे नेमक्या काय होत्या हे कुणाला
कधीच समजलं नाही. मामींनाही कधी सांगता आलं नाही. त्यांना कुठली ठाम बाजूच नव्हती.
त्यांना साऱ्यांचं पटायचं आणि तरी स्वतःचं काहीतरी वेगळं मत असायचं. पण ते नेमक्या
शब्दात मांडता यायचं नाही. मामींचा मुद्दा कधीच टोकदार नसायचा. जरा गुळमुळीतच
प्रकरण. त्यामुळे वादावादीत त्यांचा निभाव लागायचा नाही. काही बोलायला जायच्या आणि
मध्येच गाडं बिनसायचं. मग कुणीतरी त्यांची थट्टा करायला
सुरवात करे. यात माझी आजी सगळ्यात पुढे. एकूणात सारी गंमतच होती ती. मामी नुसत्याच
धुसफुसायच्या. त्यात आमचा आनंदा आणि मी अर्धवट ज्ञानाच्या आधारावर मामींना
उचकवायचो. अर्थात वयाचा मान राखूनच. पण मग इतरांवरचा सगळा राग आमच्यावर निघायचा;
अगदी त्यांच्या समाजवादाला न शोभेल असा. शांत झाल्या की हातावर
खाऊची वाटी ठेवत म्हणायच्या. ‘पवन्या, मोठा झालास की कळेल
तुला.’
तरी ‘समाजवाद’ या शब्दाचं मला कोडंच होतं.
मामी ‘साने गुरूजी कथामाले’चं काम पाहायच्या. ही चळवळ आता चालू आहे की नाही
कल्पना नाही. पण फार छान उपक्रम होता तो. लहान मुलांनी गोष्टी सांगायच्या. पाठ करून
सांगा, वाचून सांगा कसंही. बरी गोष्ट सांगणाऱ्याला बक्षीस मिळायचं. बक्षीस म्हणजे
काय तर एखादं लहानसं पुस्तक. बस. पण यामुळे धीटपणा वाढायचा. तेव्हा याला ‘संस्कार
शिबीर, प्ले ग्रुप, चिल्ड्रन्स कल्चरल
ॲक्टिव्हिटी, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट’ असली लेबलं चिकटली नव्हती;
त्यामुळे त्यातला मूळ उद्देश टिकून होता. आमच्या वाड्यामागे एक
म्युन्सिपालिटीची शाळा होती. तिथे महिन्याच्या एका ठराविक दिवशी ही कथामाला
चालायची. मामी मला बरोबर घेऊन जायच्या.
त्या दिवशी निळ्या काठाची पांढरी साडी नेसलेल्या मामी ओळखूच यायच्या नाहीत.
इथे त्यांचं वागणं सर्वस्वी वेगळं असायचं. अतिशय शिस्तबद्ध आणि शांत. मुलं गोष्टी
सांगत असताना एका खुर्चीत काहितरी लिहित बसलेल्या असायच्या. पण कान गोष्टीकडे
असायचे. त्या या कार्यक्रमाच्या प्रमुख. त्यांच्याबरोबर गेलेलो असल्यामुळे मीही
जरा टेचातच असायचो.
या कथामालेच्याच वेळचा एक प्रसंग मला अजून आठवतो. मामी ‘आता तू सांग
गोष्ट.. आता तू सांग...’ असं करत एकेका मुलाला स्टेजवर ढकलत होत्या. काही
मुलांच्या गोष्टी पाठ होत्या. तर काही रडायलाच लागली होती. मी जरा धीट. माझा नंबर
कधी येणार म्हणून चुळबूळ करायला लागलो तर मामींनी मला दामटून खाली बसवलं. ‘देऊ का
घरी पाठवून?’ अशी धमकीच दिली. मामी आपल्याला मुद्दामूनच शेवटी पाठवतायत हे मला कळत
होतं. जरा खट्टूच झालो. नंतर माझ्या गोष्टीचं कौतुक वगैरे झालं; पण ते बक्षीस मात्र मिळालं नाही. मग तर फारच रुसलो. मामी समजूत घालत
म्हणाल्या, ‘नंतर सांगेन कारण.’ मी वाट बघत राहिलो.
कार्यक्रम संपला. घरी आल्यावर मामी म्हणाल्या;
‘अरे तू तर गोष्ट चांगलीच सांगतोस. पण त्या शाळेतली सगळी मुलं गरीब कामगार
वर्गातून येतात. त्यांना बक्षीस मिळालं तर जास्त आंनद वाटेल की नाही? तुला हवं ते पुस्तक मी देते ना वाचायला.’ असं म्हणत त्यांनी खाऊची वाटी
पुढे केली.
...त्या दिवशी समाजवाद हा अवघड विषय मला वाड्यातल्या मामींकडून इतक्या सहजपणे
समजला. मी त्यांच्याशी पुन्हा कधीच वाद घातला नाही.
...प्रवीण जोशी
98505
24221
pravin@pravinjoshi.com
अप्रतीम!
ReplyDeleteसुंदर
ReplyDeleteनेहमीप्रमाणे छान. अशा अनेक बायका असायच्या आजूबाजूला समाजवाद शिकवणाऱ्या. हे नेमकेपणानं हेरलंय या सदरात.
ReplyDeleteखरच. वाडा संस्कृती हुबेहुब अनुभवता आली वाचताना
ReplyDeleteसाधेपणाने मोठा पण तेवढाच हळवा संदेश दिला आहेस
असच लिहीत जा
Kharach agdi hubehoob varnan kela ahes Pravin tu👌👍
ReplyDeleteखूप च सुंदर. आज्जी डोळ्यांसमोर उभी राहिली🙏
ReplyDeleteवाड्यात राहिलो होतो, पण या अनुभवला मुकलो 😀
ReplyDeleteअप्रतिम, खूप खरं आणि touching!😊👌👍
ReplyDeleteछान!
ReplyDelete
ReplyDeleteMast re
नेहमीप्रमाणेच लेखही छान आणि शेवटही छान..!
ReplyDeleteरोहिणी गोखले
वाडा संस्कृतीच्या अनेक नॉस्टॅल्जिक आठवणी ताज्या झाल्या.
ReplyDeleteकमाल लिहिलंस! समाजवाद इतका गोड तुझ्याच लेखणीत
ReplyDelete