ज्याचे हाती पडद्याची दोरी...

मी लहानपणापासूनच नाटक आणि संगीताच्या वातावरणात वाढलो. या क्षेत्रात ओळखी होत्याशिवाय जोडीला स्वतःचा अगोचरपणाही होताच. त्यामुळे पुण्यातल्या सगळ्या थिएटर्समध्ये मला शिरकाव असायचा. माझ्या धडपडीच्या काळातएका थिएटरमध्ये माझी त्याच्याशी ओळख झाली. स्टेजकडे जाण्याच्या मार्गावर म्हणजे विंगेत तो स्टूल टाकून बसलेला असायचा. या विंगेतून स्टेजवर एंट्री घेताना नवख्या कलाकारांना काय वाटतं हे शब्दात सांगता येणार नाही. आपण काहीतरी वेगळं करतोयकशात तरी ओढले जातोय याचा तो विलक्षण सुंदर अनुभव असतो. बाहेरच्या जगात आणि या वातावरणात एक अदृष्य भिंत असते. या भिंतीपाशी तो निर्विकारपणे बसलेला असायचा.

तो बॅकस्टेज वर्कर म्हणून कामाला होता. घंटा देणंपडदा ओढणंप्रयोग झाल्यावर स्टेजची साफसफाई करणं ही त्याची कामं. त्यात तो तरबेज होता. अंगावर थिएटरचा खाकी युनिफार्म. तोंडात सदा तंबाखू किंवा पान. उंची चांगली पण चालणं जरासं तिरपं आणि पोक काढून. दिसायला ठिकठाकच होता पण त्याच्यात काहीतरी बात होती. बच्चन स्टाईल फिरवलेले केस. दोन भिवयांच्या मध्ये शेंदराचा ठिपका. बोलण्यात जराशी गुर्मी. पण त्यातच एक न्यूनगंडही डोकावतोय असं वाटायचं. अस्पष्टसा हसायचा. दोन चार शब्दांच्या तुटक्या वाक्यांचा अर्थ लगेच कळायचाच नाही. बोलताना प्रथम हनुवटी उचलली जायची. मग क्षणभर पॉज घेऊन तोंडातून वाक्य यायचं. आवाजही जरा खर्जातला होता त्यामुळे तो अजूनच बेफिकिर वाटायचा.

दुसऱ्या घंटेनंतर विंगेतलं वातावरण तापलेलं असतं. पण हा विलक्षण थंड. कामं सगळी चोख करायचा. पण ‍नाटक किंवा गाणं कितीही रंगलेलं असोयाला त्याच्याशी काहीही देणंघेणं नसायचं. स्टेजवरून दाद घेण्यासाठी नजर कधी विंगेत गेलीतर तिथल्या अंधारात स्टूल टाकून हातात पडद्याची दोरी घेऊन मख्खपणे बसलेला दिसायचा. गालात तंबाखूचा बारही असायचाच. मग समोरची टाळ्या वाजवणारी शेकडो माणसं अचानक वजा व्हायची आणि फक्‍त हाच लक्षात राहायचा. खूप राग यायचा तेव्हा. यानं विंगेत बसून कितीतरी मोठे कलाकार पाहिले असतीलतरी असा अडाणीच राहिला म्हणून किवही यायची त्याची.

बॅकस्टेजचं काम करणारी माणसं जरा कडक असतात. त्यांच्याकडून स्टेजवर एखादी वस्तू पाहिजे असेलकाही काम करून पाहिजे असेल तर दादापुता करावं लागतं. याची माझी ओळख अशाच कारणाने झाली होती. सुरवातीला मीही जरा नरमाईनं बोलत असे. पुढे अनेक वर्षांनी या क्षेत्रातली माणसं मला नावानं ओळखायला लागली. पण तो होता तिथेच राहिला होता. आता मी कुणा मोठ्या व्यक्‍तींबरोबर बोलत असताना तो आसपास असेल तर अस्वस्थ वाटायचं. त्याने तिथे मला अरेतुरे करू नये असं वाटायचं. अशा वेळी मुद्दामून काही कामं सांगून त्याला तिथून पिटाळायचो. हे त्यालाही समजायचं. मग तो नजरेनंच अस्पष्ट हसत मला म्हणे, ‘तूही होतास तिथेच राहिलायस की रे...’

एके दिवशी थिएटरवर भेटला. कधी नव्हे तो रिकामा बसला होता. तोंडात तंबाखू नव्हतीतरीपण हनुवटी उचलूनच त्यानं ‘काय?’ असं विचारलं. मी आपला मोघम हसलो. मग इकडे तिकडे बघतइतर बॅकस्टेज कामगारांची नजर चुकवत म्हणाला, ‘चहा घेऊ.’ आम्ही बाहेर चहाच्या स्टॉलपाशी आलो.

एक काम आहे.’

मला वाटलं आता हा पैसे वगैरे मागणार.

नाटकात काम करायचंय’

हे अनपेक्षितच होतं. याला नाटकात काम करायचंय?

हिरोचा रोल मिळालाय’

एव्हाना त्याचे सारे साथीदार बाहेर येऊन गंमत बघत उभे होते.

मग?’ मलाही मजा वाटायला लागली.

मला करायचं नाहीये.’ तो पुन्हा त्याच थंडपणे म्हणाला.

करायचंयही म्हणतोयकरायचं नाहीही म्हणतोयहिरोचा रोल... काहीच कळेना. मग जराशानं उलगडा झाला. कुण्या एका नाट्यसंस्थेनं बॅकस्टेज आर्टीस्टस्‌चा ग्रुप बनवून एक नाटक बसवायला घेतलं होतं. आणि त्यात याला हिरोचं काम मिळालं होतं. ही मंडळीसुद्धा आधी उत्साहानं हो म्हणाली. पण पडदा उघडल्यानंतर स्टेजवर पाऊल टाकण्याचा अनुभव कुणालाच नव्हता. त्यामुळे घाबरून एकएकजण गळू लागला. याला हिरो म्हणून घोड्यावर बसवलं होतं. आता बिचाऱ्याला मागे येता येईना.

म्हणजे माझं काम त्याला त्या नाटकातून काढून टाकणं हे होतं तर. त्या नाटकाशी माझा काहीच संबंध नव्हता हे त्याला माहित होतं. पण अडचण कुणाला मोकळेपणाने सांगू शकत नव्हता. का कोण जाणेमाझा भरवसा वाटत असावा. लहान मुलानं अडलेलं गणित घेऊन यावं तशा निरागसपणाने तो बघत होता. मीही त्याला नाटकात काम करण्याचा आग्रह केला तर चहाचा रिकामा कप ठेवत म्हणाला;

नको रे... ते नाटक वगैरे नको. विंगेतला अंधार बरा असतो, आणि तोचरा असतो... 

तिरप्या चालीनं तो पुन्हा विंगेनिघून गेला. ज्याच्याकडे हेटाळणीच्या दृष्टीने बघत आलो त्याच्याकडून कलेच्या क्षेत्रातलं हे रोकडं सत्य असं अचानक उजेडात आलं. 

त्या दिवशी एक शिकलो. काही माणसं आसपास असण्यानं जेव्हा अस्वस्थ वाटतं तेव्हा एवढंच लक्षात ठेवावंआपल्या प्रवेशाच्या पडद्याची दोरी त्यांच्या हातात असते...

हे एकदा कळलं की आपलं नाटक छान वठवता येतं.

 

... प्रवीण जोशी
98505 24221
pravin@pravinjoshi.com

Comments

  1. अशा कलाकारांची नावंही अचाट असतील नाही?

    ReplyDelete
  2. Great... Great . ...... Chandrakant Ronghe...

    ReplyDelete
  3. हा कै.अरुण भालेकर, भरत चा..
    मस्त लिहिलं आहेस प्रवीण...

    ReplyDelete
  4. सुरेख........खास करून शेवटचा पॅरा शोध घ्यायला लावणारा.

    ReplyDelete
  5. एकदम दमदार लिहिले आहेस. आवडले.

    ReplyDelete
  6. Nemak tiplayas, Changla lihitos tu

    ReplyDelete
  7. फारच सुंदर.... आणि शेवटही तितकाच परिणामकारक!

    ReplyDelete
  8. देवाच्या देवळात जशी पाहऱ्याला माणसे असतात, तिरूपती सारख्या देवस्थानात तेव्हा असंच वाटतं की काय यांची ऐट, रोज देवाला बघतात... म्हणूनच मान, प्रतिष्ठा, आत्मप्रकटिकरण वगरे मोहापासून कायमची दूर असतात व फक्त सेवा देतात. याचे ही असेच अंधार बरा का वाटत असावा कारण तो कशातच गुंतवत नाही.

    ReplyDelete

Post a Comment