मेथड इन मॅडनेस
‘कॉलेजमधला मित्र’ ही ओळख केवळ एका माणसाची नसते. हे दोन शब्द तरूणपणाचे
असंख्य क्षण बरोबर घेऊन येतात. खरं तर कॉलेजची आठवणच जादूची. इतकी की तेव्हा शामळू
बावळट असलेली मुलंसुद्धा काही वर्षांनी ‘काय टेरर होतो आम्ही’ असं सांगत फिरतात.
कॉलेज याचा अर्थच तरूणाई. आणि बिनधास्त बेछूटपणा हे तिचं पहिलं लक्षण. तो विरून
गेला की कॉलेज संपलंच.
आमच्या ‘मिलिंद माधव दाते उर्फ नंदू’ या अतरंगी महाआचरट मित्राचं हे
‘कॉलेजपण’ संपायलाच तयार नाही.
आता कसं वर्णन करू त्याचं? तुम्हाला चिंटू सिरीअलमधला बगळ्या
आठवतोय का? कॉलेजमध्ये असताना नंदू थेट त्याच्यासारखा
दिसायचा. उंच काटकोळ्या लंबू. मोठ्ठं ढापण, त्याहून मोठे
डोळे. चालणं फताडं. कर्कश आवाज. कपड्यांचा सेन्स शून्य. कायम ढगळ शर्ट आणि सुरनळी
झालेली पँट. हुशारी आणि तल्लखपणाला तोड नाही पण बुद्धी कायम अभ्यासाच्या बाहेर.
स्कॉलर पोरांनी अभिमानाने डिस्टिंक्शनचे मार्क सांगावेत तसा नंदू आपले बॅकलॉग
सांगायचा... अजूनही सांगतो.
हैरत अंग़ेज करणारे त्याचे शेकडो किस्से आता काल्पनिक दंतकथा वाटतील. पण
आम्ही सारेजण त्याला साक्षीदार आहोत. आणि त्यात सहभागीसुद्धा...
आमच्या फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य फारच शिस्तीचे होते. पोरं
त्यांना चळचळा कापायची. प्रत्येक मुलाकडे आयकार्ड असलंच पाहिजे असा कडक नियम होता.
सर स्वतः मेन बिल्डींगपाशी उभे राहून ‘शो मी यूवर आयकार्ड...’ असं ओरडत दिसेल त्या
पोराला आयकार्ड मागायचे. डोळे बारीक करून तपासायचे. आयकार्ड नसलं की कंबख्ती. ही धरपकड
चालू असताना एकदा हा धाडसी वीर त्यांच्या समोरून ओरडत धावत गेला. ‘अरे पळा
पळाऽऽ... आज सरांचं आयकार्ड हरवलंय आणि ते सगळ्यांकडे शोधतायत...’ इतर कुणी असता
तर सरांनी त्याला उभा सोलला असता. पण नंदूला पाहून ते हसत आत निघून गेले. त्याच
रात्री सरांच्या घरी कसला तरी कार्यक्रम होता. तिथे बासरी वाजवायला नंदू हजर.
मिलिंद बासरी सुंदर वाजवतो. पंडित हरीप्रसाद चौरासियांकडे व्यवस्थित
शिकलेला आहे. त्यानं गुलाम अली, जगजितसिंग, सुरेश
वाडकर अशा नामवंतांबरोबर वाजवलंय. मराठी, हिंदी लोकप्रिय
गाण्यांच्या कार्यक्रमात वाजवणं त्यानं सोडलं. आता जागतिक पातळीवरच्या कॉर्पोरेट
इव्हेंटस्साठी ‘फ्यूजन म्युझिक’ वाजवणे हा त्याचा व्यवसाय आहे. त्यासाठी अनेक देश
हिंडला आहे.
असो... ते तर काय कुणीही करतं.
आम्ही एका संगीत स्पर्धेसाठी दिल्लीला गेलो होतो. तेव्हा दिल्लीमध्ये कडक
बंदोबस्त होता. मला आठवतं की नुकतंच राजीव गांधी हत्याप्रकरण झालं होतं. कर्फ्यूचं
गंभीर वातावरण. जागोजागी लष्कराचे बंकर्स आणि जवान. आम्ही पुण्यातल्या कोणत्याही
चौकात ठिय्या मारून रात्रभर गप्पा मारणाऱ्यांच्या वंशातले. मी आणि नंदू रात्रीचे
फिरायला बाहेर पडलो. हातात वाद्यं होतीच. एक बरा शांत चौक बघितला आणि मैफल जमवली.
कुठून कोण जाणे अचानकपणे काही सैनिक उगवले. खाकी युनिफॉर्म, हातात बंदूका,
उग्र चेहरे... त्यांच्यासमोर आपलं पुणेरी शहाणपणा चालत नाही. माझा
श्वास वरच्यावर अडकला. पण नंदू मात्र श्वास संपेपर्यंत बासरी खाली ठेवायला तयार
नव्हता. ओळ पूर्ण वाजवून झाल्यावर त्यानंच एका सैनिकाला ‘काय है?’ असा मिश्र भाषेत उंच आवाजात सवाल केला. त्या बिचाऱ्या सैनिकाला
आपल्याबरोबर असं काही घडेल याची कल्पनाच नव्हती. तोच गडबडला. ‘यहाँ बांसुरी बजाना
मना है’ त्याने कशीबशी बाजू सावरली. यावर मिलिंद दाते इकडे तिकडे शोधक नजरेने
पाहात उद्गारले...‘ऐसा कुठे लिखा है पण?’
त्या जवानांनी आम्हाला बखोटीला धरून बंकरमध्ये नेलं. आणि रात्रभर असंख्य
गाणी वाजवून घेतली. पहाटे चहा देऊनच सोडलं. परत निघताना दाते वदले, ‘माणसंच असतात रे
ती. त्यांनाही टाईमपास हवाच असतो... रियाज छान झाला ना पण?’
या माणसाची विचार करण्याची पद्धतच तिरपागडी. एकदा कॉलेजच्या ‘कल्चरल डे’ला
खांद्यांच्याही बाहेर विस्तार असणारी मेक्सीकन हॅट, हातात खेळण्यातली प्लॅस्टिकची मशीनगन,
अंगात ढगळ टीशर्ट, पायात पायजमा तोही एक पाय
गुडघ्यापर्यंत दुमडलेला. खाली स्लीपर्स अशा वेशात आला. का तर म्हणे, ‘मी मेक्सीकन कल्चर दाखवतोय.’ वैशाली हॉटेलच्या गल्लीत याला कुणाच्या तरी
गाडीच्या बॉनेटचा धक्का लागला तर हा त्या कारच्या बॉनेटवर चढून बसला. मोठ्या
आवाजात भोकाड पसरून रडायला लागला. शेवटी तो कारवालाच गयावया करायला लागला तेव्हा
कुठे प्रकरण मिटलं. वैशाली हा तर मिलिंदचा बालेकिल्ला. फर्ग्युसन कॉलेजच्या वीस एक
पिढ्यांनी तरी त्याला तिथे पाहिलं असेल. खाता खाता मध्येच, हातात
डिश घेऊन वैशालीतून सहज घरी निघून जायचा. त्याच्या घरी ‘व्ही’ लिहिलेल्या डिशेस
आणि चमच्यांचा डझनाचा अख्खा सेट तयार झालाय. वाचन अफाट. त्यावर स्वतःची टोकाची मतं बनवून कोणाशीही कोणत्याही विषयावर वाद घालण्याचा कॉन्फिडन्स त्याहीपेक्षा अफाट. तो
समोरून येताना दिसला की भलेभले रस्ता बदलत. अजूनही ही दहशत कायम आहे. तुम्ही हो
म्हणालात की हा नाही म्हणणारच. ते सिद्धही करून दाखवणार. त्यासाठी नाही नाही ते
संदर्भ त्याला कुठून आठवतात देव जाणे. येन केन प्रकारेन समोरचा माणूस शरण आला की
हा खूश.
हे सारं ‘कॉलेजपण’ त्याच्या स्वभावात अजूनही टिकून आहे. आजही तो तसाच
वागतो. त्याला कुणी येडपट म्हणाले, कुणी मनस्वी म्हणाले, कुणी वाह्यात म्हणाले तर कुणी ‘तसा तो मुळचा हुशार’ अशी सेफ भूमिका घेतली.
या सगळ्यांचे अंदाज चुकवत मिलिंद आजही अगोचरपणाच्या नवनवीन कक्षा पार करतो आहे.
नवे उच्चांक नोंदवतो आहे.
हा सारा विक्षिप्तपणा आहे हे तर नक्कीच. विदुषकी चाळे म्हणा हवं तर. पण नंदूचा स्वभाव पोकळ भंपक वाटत नाही. त्याचं हे सारं केवळ निखळ करमणूकीसाठी चाललेलं असतं. त्यामागे कणभरही दुष्टावा किंवा कुरूपता नसते. त्याचा तो पिंडच
नाही. नंदूचा कोणी शत्रू मला तरी माहित नाही. कुणाशी वितूष्ट येत
असेलही पण ते टोकाला जात नाही. त्याच्याकडे अशी काहीतरी चतुराई आहे की तो एकदाही गोत्यात आलेला नाही. त्याच्याबद्दल गैरसमज अर्थातच खूप आहेत.
त्याला ते माहितही असणार. पण त्यानं ते आपल्या पर्सनॅलिटीचे ‘पार्ट ॲण्ड पार्सल’
म्हणून स्वीकारले असावेत. प्रसिद्ध यशस्वी माणसांच्या तऱ्हेवाईक वागण्याचं आपण
कौतुक करतो. कलाकारांच्या लहरीपणाचं आपल्याला अप्रूप वाटतं. ही एक प्रकारची
सहानुभूतीच असते. तो ॲडव्हांटेज आचरटपणाला मिळत नाही.
पण मला एक वेगळाच प्रश्न पडला आहे. अगदी त्याच्या पहिल्या भेटीपासून.
कुणाचा स्वभाव गंभीर असतो, कुणी विचारी असतो, कुणी विनोदी असतो... हे स्वभाव बनण्यामागे काही सूत्र, लॉजिक, मेथड असते. तशी काही मिलिंदच्या
अगोचरपणामागेही असेलच ना? त्याच्या प्रत्येक कृतीमागे तिरकस बुद्धीची झाक दिसते.
ही ‘मेथड इन मॅडनेस’ नक्की काय असेल? समोर
येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला छेद देत, मनात येईल ते बिनधास्त
करून मोकळे होणे? का मानवी स्वभावाचा नेमका अभ्यास? का चौकट मोडण्याची हौस? पण
नाही... त्याचे एकसोएक कारनामे पाहता हे एवढंही सोपं नसावं. अशी काही ‘मेथड इन
मॅडनेस’ असलीच तरी ती मिलिंदला कधीही न सापडो. त्याच्या अतरंगी स्वभावाचं गमक ती न
सापडण्यातच आहे.
आणि...
झपाट्याने म्हातारपणाकडे जाणाऱ्या या वयात आम्हाला एक तरी ‘कॉलेजमधला
मित्र’ पाहिजेच ना !
...प्रवीण जोशी
98505 24221
pravin@pravinjoshi.com
👌👌
ReplyDeleteMastaa ahe ha!
ReplyDeleteकमाल लिहितोस प्रवीण तू...
ReplyDeleteनंदू हे एक अजब व्यक्तिमत्व आहे..
Hats off त्याला.
- संजीव मेहेंदळे
👌👍😊
ReplyDeleteअप्रतिम , अतिशय तंतोतंत स्वभाव वर्णन 👌👌
ReplyDeleteMilind Date che kisse as ek pustakch tayar hoil Pravnya itke atrangi kisse ahet tyache.Aso. Chan lihilyas
ReplyDeleteभारी रे!����
ReplyDeleteमी ऐकलंय त्यांचं बासरीवादन. व्यक्तिमत्त्वाचे इतर अज्ञात पैलू छान उलगडलेत. शेवट नेहमीप्रमाणे छान.
ReplyDeleteव्यक्ती चित्र खूप छान रेखाटल आहेस,,
ReplyDeleteधनंजय
ReplyDeleteआचरटपणाला न मिळणारं ॲडव्हानटेज ......👌👌
Deleteनेहमीप्रमाणे शेवटचा पंच मस्त
उत्तम,,, मिलिंदची भेट झालेली आठवते ,,,, chandrakant Ronghe..
ReplyDeleteVery well said !!
ReplyDeleteवाह् ... असा एक तरी अतरंगी मित्र असावाच.
ReplyDeleteWaa प्रविण, जियो....Waa मिलिंद जियो...
ReplyDeleteवल्ली ही छान आणि लिहिलं पण छान..
वा..अतरंगीपणाचं हुबेहूब वर्णन..शेवटही छान
ReplyDeleteरोहिणी गोखले
बढिया... इतकं हुबेहूब वर्णन केलंय की मी ह्याला कधी भेटलो नसलो तरीही समोर दिसला तर ओळखू शकेन....
ReplyDeleteडॉ. राहुल देशपांडे
ReplyDeleteअफाट लिहिले आहेस प्रवीण ! नंदू या रसायना बद्दल लिहायला तसाच कोणीतरी चाकोरीच्या पल्याडचा विचार करणारा हवा....तू पण मनस्वी कलाकार असल्याने तू नंदूला अक्षरातून प्रकट केले आहेस. कविवर्य सुधीर मोघे आणि माझा मित्र जयेश हे आमच्यातील समान दुवे☺️☺️.
या जगात टेचात राहत असताना क्षितीजा बाहेरच्या जगात स्वतःचे घरटे बांधणारे जे मनस्वी कलाकार आहेत...त्यातील एक म्हणजे नंदू.... जय हो.....
This comment has been removed by the author.
ReplyDeleteवा खूप छान! 👍👍😊
ReplyDeleteप्रविण उत्तम व्यक्तिरेखा
ReplyDeleteकधी तरी स्वतः चही लिही🙂🙂🙂😜
प्रवीण ,क्या बात है!! तुझ्या लेखनातून मिल्याचे हुबेहूब शब्दचित्र काढलेस!!!
ReplyDeleteवाचताना लिटरली सगळे डोळ्यासमोर उभे राहत होते..खूप छान लिहिले आहेस..अभिनंदन!!!
डोळ्यासमोर खरंच नंदू उभा राहिला
ReplyDeleteमस्त !!👌👌
ReplyDeleteHmmmmmm
ReplyDelete👌👌
ReplyDelete