फॅमिली कंपाऊंडर...

माझ्या लहानपणी डॉक्टरकी हा एक घरगुती पेशा होता. डॉक्टरांची नावंसुद्धा दादा, अण्णा अशीच असायची. आमच्या डॉक्टरांना तर ‘भाऊ’ हे घरगुती टोपणनाव होतं. भाऊ जसे फॅमिली डॉक्टर, तसे सदाकाका ‘फॅमिली कंपाऊंडर’.

सदाकाका मजेशीर होते. सावळे, ठेंगणेठुसके. कोपरापर्यंत बाह्या लोंबणारा बदामी रंगाचा ढगळ हाफ शर्ट, घळी पँट. पांढरे होण्याची घाई झालेले केस. थोडंसं सुटलेलं पोट. हात कायम औषधं बनवण्यात गुंतलेले, त्यामुळे कोपरांनीच पँट वर करण्याची गमतीशीर लकब... इतकं साधं आणि कानेकंगोरे नसलेलं व्यक्तिमत्त्व मी आजवर पाहिलेलं नाही. आवाजही तसाच गुळगुळीत होता. डोळे मात्र महामिश्कील. सदोदित कडू औषधांच्यात राहूनही चेहऱ्यावर गोड हसू असे. फारसे बोलायचे नाहीत तरी मधूनच एखाद्या मजेशीर वाक्याची टप्पल बसायची. भाऊंशी माझ्या वडिलांची मैत्री असल्याने लहानपणापासून दवाखान्यात माझे लाड असायचे. हातावर श्रीखंडाची गोळी मिळायची. काही चुकीचं घडलं की, ‘बापूला सांगू का रे?’ अशी तंबी मिळायची. बापू म्हणजे माझे वडील.

क्लिनीकमधल्या तीन बाय पाचच्या छोट्याश्या केबीनमध्ये सदाकाकांचं राज्य होतं. त्यात तेच एकटे कसेबसे मावू शकत. पार्टीशनच्या अर्धगोलाकार खिडकीतून लगबग दिसायची. पेशंटस्‌च्या नावाचा कागद बनवणे, औषधं बनवून देणे, बिलांचे व्यवहार करणे असे ते ‘मल्टीपर्पज’ होते. पेशंटस्‌ना क्रमानुसार भाऊंकडे सोडण्याची जबाबदारीही त्यांचीच. पण भाऊंकडून एकजण बाहेर पडला की जो दाराजवळ बसला असेल तो खो दिल्यासारखा आत मुसंडी मारायचा. अशा वेळी बाकीचे पेशंटस्‌ सदाकाकांकडे रागावून बघायचे. पण काका केवळ मान खाली घालून मिश्कीलपणे हसत.

त्यांच्याकडून गोळ्यांच्या पुडीबरोबर, ‘ही जेवणाआधी, यातली दुपारी अर्धी... लक्षात ठेव, वेंधळेपणा नको’ असं  ऐकून घ्यायला लागे. पिण्याचं औषध असेल तर घरून बाटली घेऊन जावी लागे. ती नसेल तर पुन्हा बोलणी. डाव्या हाताने असंख्य खणांमधून पांढऱ्या रंगीत गोळ्या मोजून घेणं, त्यांची पावडर बनवणं, उजव्या हाताने मोठमोठ्या बाटल्यांची मानगूट पकडून त्यातली गुलाबी रसायनं खलबत्त्यात ओतणं... हे सारं बघत बसावसं वाटायचं. तिथे एक छान तुरट गोडसर वास भरून राहिलेला असे. पण प्रयोग एवढ्यात संपत नसे. औषध तयार झालं की एक हस्तकला पाहायला मिळायची. कागदाच्या निमुळत्या पट्टीच्या घड्या घालून, त्यांचे कोन कापून अष्टकोनांची रांग असलेली पट्टी तयार होई. ही पट्टी बाटलीवर उभी डकवली जायची. एक अष्टकोन म्हणजे एक डोस. पाच मिलीलीटर, दोन टेबलस्पून अशी आजच्यासाखी फॅडं नव्हती. ‘बाटली हलवून औषध घेणे’ हीच सुचना सर्वात महत्वाची. आणि बाटली कोणत्याही आकाराची असली तरी अष्टकोनाची उंची मात्र एकसारखीच.

औषधांपेक्षा डॉक्टरांवर विश्वास ठेवायचा जमाना होता तो.

काही वर्ष गेली. मी मोठा झालो, लग्न झालं. एकदा दवाखान्यात गेलो होतो. नंबर येईपर्यंत बायको आणि मी गप्पा मारत बसलो होतो. काका केबीनमधून आमच्याकडे मिश्कील नजरेने बघतच होते. अचानक कधी नव्हे ते बाहेर आले आणि मला विचारलं,

‘काय गप्पा मारत असता रे नवराबायको इतका वेळ?’

मी हसण्यावारी नेलं. प्रश्न साधाच होता. पण काका त्या दिवशी उगाचच निराळे भासले.

लहानपणी पाहिलेली मोठ्ठी माणसं आपण मोठं झाल्यावर वेगळीच दिसायला लागतात. तेव्हा त्यांच्याशी कसं वागायचं असतं? ‍लाड करून घ्यायची वेळ सरलेली असते. काही ठिकाणी हक्कानं लहान व्हावं असं वाटतं. पण मोठं झाल्याचा पोकळ अहंभाव जागा होतो. कदाचित म्हणूनच आता सदाकाकांचं हसूही गूढ वाटायला लागलं होतं. त्यात मधूनच उदासी डोकावल्याचा भास व्हायचा. वरवर साधे आणि आनंदी वाटले, तरी आत एक बरं न होणारं दुखावलेपण होतं. त्यांना ते मुळीच शोभत नव्हतं. काय ते नक्की कधीच कळलं नाही. आणि विचारण्याचा माझा अधिकारही नव्हता. ते असो...

एकदा असंच मला खुणेनंच आत बोलावलं. आत गेलो. विनोदी वाक्याची वाट पाहात कसाबसा दीड पायांवर उभा राहिलो. काकांनी कपाटातल्या फाईल्स काढल्या. नावांनुसार नीट लावून ठेवलेल्या कागदांतले दोन कागद माझ्या हाती देत नजर चुकवत म्हणाले, ‘भाऊंनी सांगितलंय, बील आता बापूकडे नको, थेट मुलाकडेच देत जा...’

मी पाहिलं, त्या कागदावर माझं टोपणनाव नाही, तर खरं संपूर्ण नाव लिहिलं होतं. नावामागे श्रीयुत असंही होतं. मोठा झाल्याची, जबाबदार झाल्याची जाणीव मला त्या टिचभर केबीनमध्ये अशी अचानक झाली. का कोण जाणे त्यांच्या पाया पडायची इच्छा झाली. पण खूप आतून जेव्हा असं वाटतं ना तेव्हा वाकायला जागाच नसते. मी नुसताच त्यांच्याकडे पाहात राहिलो. ते लहानपणीचे श्रीखंडाची गोळी हातावर ठेवणारे सदाकाका नव्हते. माझ्या हाती मोठं होण्याचं कडू औषध देऊन कुणी एक नवीनच अनोळखी माणूस; चिनी मातीचा खलबत्ता, गोळ्यांच्या बाटल्या, प्लॅस्टिकची मापटी, औषधांचे बुदले अशा पसाऱ्यात हरवून गेला होता...

माझ्या कुटूंबाचा ‘फॅमिली कंपाऊंडर’.

 

...प्रवीण जोशी
98505 24221
pravin@pravinjoshi.com

Comments

  1. निरीक्षण अफाट आहे

    ReplyDelete
  2. नाव तर छानच आहे लेखाचं. मलाही असे डॉ. आणि कंपा. आठवतात अष्टकोनी चिठ्ठ्या डकवणारे. सुरेख शब्दचित्र.

    ReplyDelete
  3. Replies
    1. डोळ्यापुढे लहानपणीच्या आठवणी उभ्या राहिल्या.

      Delete
  4. सगळ्यांच्याच आयुष्यात अशा अनेक व्यक्ती येऊन जातात, बऱ्याच जणांना आपण विसरून जातो, पण काही कायम लक्षात राहतात ते त्यांच्या विशिष्ट वृत्तीने, राहणीने, इत्यादी..
    इतक्या वर्षांनी देखील त्यांना तंतोतंत डोळ्यासमोर उभं करणं हे खूप अवघड असतं. तुला ते खूप प्रभावी पणे जमलं आहे. आणि सातत्याने......

    ReplyDelete
  5. फॅमिली कम्पौंडर.... सुंदर संकल्पना... लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या... मी सुद्धा असं व्यक्तिमत्त्व अनुभवलंय ..... आता कंपौंडर आणि त्या बरोबर फॅमिली डॉक्टर सुद्धा लुप्त झाले आहेत....

    ReplyDelete
  6. उत्तम लिखाण

    ReplyDelete
  7. सुंदर, लेखन शैली पु ल न सारखी वाटते. एक एक पैलू उलगडत जातो, व्यक्तिरेखेचा ही आणि लेखकाचा ही

    ReplyDelete
  8. खूप छान शब्दचित्र.. डोळ्यासमोर आमच्या फॅमिली डॉक्टरांचे कम्पाउंडर आणि त्यांची अगदी तशीच पण जराशी मोठी खोली उभी राहिली..
    रोहिणी गोखले

    ReplyDelete

Post a Comment