कोई जाने ना...

‘ओळखीची अनोळखी माणसं’ या सदरात मी जराशा लांबून पाहिलेल्या माणसांबद्दल लिहितो किंवा ओळखीच्या माणसांच्या एखाद्या अनोळखी बाजूबद्दल. पण यात शामरावांचं नाव येईल असं वाटलं नव्हतं. पण एक लहानशी घटना आठवली आणि लिहावसं वाटलं.

आधी शामराव कोण ते सांगतो. चित्रपट संगीतातल्या ‘वाद्यवृंद संयोजन’ अर्थात ‘म्युझिक ॲरेंजमेंट’ या क्षेत्रातलं शामराव कांबळे हे एक दिग्गज नाव. गाण्याचा आपल्या मनावर परिणाम करण्यात शब्द आणि चाल यांच्याबरोबरच वाद्यवृंदाचा फार मोठा वाटा असतो. गाण्यातल्या भावना विविध वाद्यांनी नटवल्या जातात. सुधीर फडके, रोशन, जयदेव, लक्ष्मीकांत प्यारेलाल अशा अनेक विख्यात संगीतकारांचे प्रतिभावान वाद्यवृंद संयोजक - शामराव कांबळे. अनेक चित्रपटांच्या श्रेयनामावलीत तुम्ही त्यांचं नाव वाचलं असेल. अक्षरशः हजारो लोकप्रिय गाणी त्यांच्या नावावर जमा आहेत.

शामराव तसे माझे कुणीही नव्हते पण तरी माझ्यासाठी खूप काही होते. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ओळख झाली. त्यांचं घर माझ्या जवळच होतं. जाणंयेणं वाढलं आणि मी त्यांच्या घरातला कधी होऊन गेलो ते कळलंच नाही. उमेदीच्या काळात जी माणसं तुमच्यावर विश्वास ठेवतात, जवळ घेतात, धडपडीचं कौतुक करतात ती आयुष्यभर लक्षात राहतात. त्यांच्यापाशी सुरक्षित वाटतं, स्थिर वाटतं. शामराव तसे होते.

चौकोनी चष्म्यातून पाहणारे मिश्कील हसरे डोळे, जराशी स्थूल किंवा खरं तर बोजडच शरीरयष्टी. हातात काठी. विरळ झालेले पांढरे केस. गळ्यात रुद्राक्षांची माळ, एक लाल गंडा. काहीही बोलताना उजव्या हाताची बोटं अशी लयीत हलायची की वाटावं शब्दांचा ऑर्केस्ट्रा कंडक्ट करताहेत. विलक्षण प्रेमळ, अगत्यशील आणि गोष्टीवेल्हाळ. पण त्यांचा मूळचा कडक स्वभाव लपायचा नाही. आवाज छान झारदार होता. वाद्यवृंद संयोजकाचं मुख्य काम दोन अंतऱ्यांना म्युझिक पीसेसनं जोडून देण्याचं असतं. शामरावांचं बोलणंही तसंच असायचं. ते मधूनच चालू व्हायचं आणि ‘बोलून’ झालं तरी ‘सांगून’ संपायचं नाही. ध्रुवपदाची आस लागून राहायची. बोलता बोलता मोठी गोष्ट शिकवून जायचे.

मी एका चित्रपटाचं संगीत करत होतो. त्यासाठी काही काळ मुंबईत राहात होतो. गाणी पूर्ण झाली होती. पार्श्वसंगीताचं काम चालू होतं. हे काम प्रचंड मानसिक ताण देणारं असतं. आणि इकडे पुण्यात माझ्या वडिलांची प्रकृती बिघडली. कामात व्यत्यय नको म्हणून घरच्यांनी मला ते मुद्दाम कळवलं नाही. कामातून मध्येच एक दिवस मोकळा मिळाला म्हणून घरी आलो तर वडिलांना हॉस्पिटलला ॲडमिट केलं होतं. परिस्थिती गंभीर होती. मी बावरून गेलो. एका वातावरणातून अचानकपणे संपूर्णतः वेगळ्या मनस्थितीत फेकला गेलो होतो. काही सुचेना. हॉस्पिटलमधून घरी न जाता थेट शामरावांकडे गेलो. एरवी आमच्या गप्पांना विषय पुरायचे नाहीत पण आज एकही शब्द न बोलता नुसता त्यांच्या पुढ्यात बसून राहिलो. मनात काळजी नव्हती, भीतीही नव्हती. पण भावनांचं ते आंदोलन मात्र सहन होत नव्हतं. शामरावांना सारं उमगलं असावं. काठी टेकत जवळ आले, डोक्यावर अलगद हात ठेवला. मग मात्र माझा बांध फुटला. शामराव काहीच बोलले नाहीत. थोड्या वेळानं विचारलं,

 ‘तू अनोखी रात मधलं, ‘ओहो रे ताल मिले नदीके जलमें’ ऐकलंयस का रे?’

‘हो...’ मी म्हणालो.

‘मी या गाण्याचं वाद्यवृंद संयोजन करत होतो त्या वेळी माझा मोठा भाऊ अखेरच्या घटका मोजत होता. हॉस्पिटलमध्ये बाहेरच्या बाकड्यावर बसून मी नोटेशन लिहित होतो. तुझ्यासारखीच अवस्था. या गाण्याचा अर्थ फार सुंदर आणि खोल. पण त्या परिस्थितीत ध्रुवपद सजवण्यासाठी मला केवळ एकच स्वर सुचत होता. ‘नदीके जलमें’ पासून सुरू होऊन ते ‘कोई जाने ना’ पर्यंत बासरीवरती एकच स्वर... ‘वरचा सा.’ का ते विचार.’

‘का?’

‘अरे, त्या क्षणी मला वाटून गेलं की हे ओढे, नाले, नदी, समुद्र... आयुष्याचं सारं संगीत कुठे विलीन होत असेल तर त्या ‘वरच्या सा’ मध्ये. मी तो सूर गाण्यामध्ये जसाच्या तसा वापरला. आपण प्रत्येक घटना संगीताच्या नजरेतून पाहायची. जगात त्यापेक्षा शाश्वत असं असतं तरी काय?’

मी निःशब्द. शामराव माझ्याकडे चौकोनी चष्म्यातून रोखून बघतायत...

‘काळजी करू नकोस. वडिलांना काहीही होणार नाही. आजच मुंबईला निघ आणि जो सगळ्यात उत्कट, अवघड सीन असेल त्याचं पार्श्वसंगीत करायला घे... छान होईल.’

आणि तसंच झालं.

शामरावांना अलीकडे अध्यात्माची आवड लागली होती. मधूनच कुठलंतरी तत्त्व किंवा वचन सांगायचे आणि ते समजावण्यासाठी एखाद्या गाण्याचं उदाहरण द्यायचे. आजोबांनी नातवाला खेळवता खेळवता सहज एखादा डाव शिकवावा तशा या भेटी असायच्या. फार छान दिवस होते ते. पण त्यांना अचानक पॅरॅलिसीसचा सिरीअस ॲटॅक आला. अगदी शेवटचा वाटावा असा क्षण आला होता. पण मला ते दोन तीन दिवसांनी समजलं. धावतच हॉस्पिटलमध्ये भेटायला गेलो तोपर्यंत प्रकृती स्थिर झाली होती.

‘शामराव, अहो कळवायचं नाही का? मी होतो ना एवढ्या जवळ.’ मी जरासं रागावूनच विचारलं.

‘हो रे. पण नेमकं समेला कुणी नव्हतं नाऽऽ.’ त्याच झारदार आवाजात पण पॅरॅलिसीसच्या थरथरत्या हाताने ऑर्केस्ट्रा कंडक्ट करत शामराव म्हणाले. ‘अरे मीही जरा घाबरलोच होतो. पण एक समजलं की आपल्या आयुष्याचं वाद्यवृंद संयोजन कुणीतरी आधीच केलेलं असतं. या आजारपणात मी त्या गाण्यातला ‘वरचा सा’ बघून आलो... पण आता ना, त्याला स्पर्श करण्याची ओढ लागलीय रेऽऽ.’ शामराव नेहमीच्या प्रसन्नपणे हसत बोलत होते. पण डोळे मात्र पैलतीरी हरवले होते. जणू अंतरा संपवून धृवपदाकडे नेणारा सूर त्यांना सापडला होता. हे शामराव मला अनोळखी होते.

संगीतकाराला चाल सुचण्याच्या क्षणी तिथे थांबू नये. मी बाहेर पडलो. शामरावांना त्या ‘वरच्या सा’चा स्पर्श कधीही न व्हावा अशी प्रार्थना करत राहिलो. पण अखेरीस ते झालंच...

शामराव गेले त्या दिवशी मला ‘ओहो रे ताल मिले नदी के जलमें’ ने झपाटून टाकलं होतं.

का?

...कोई जाने ना !

 

...प्रवीण जोशी
98505 24221
pravin@pravinjoshi.com

Comments

  1. उत्तम मांडणी....

    ReplyDelete
  2. खूपच छान . नेहमी प्रमाणे योग्य मांडणी.

    ReplyDelete
  3. हृदय स्पर्शी लेखन
    अगदी मनाला भिडणार

    ReplyDelete
  4. शामराव म्हंटलं की त्यांच्या आठवणींनी हरवून आणि हलून जायला होता.....खूप छान लिहिलंयस प्रविण...अगदीच नेहमी प्रमाणे...🌹😀

    ReplyDelete
  5. कमाल आठवणी असतात या. तुझ्या आठवणीतुन बरंच शिकायला मिळालं..!!

    ReplyDelete
  6. खरोखर पितृतुल्य व्यक्तिमत्त्व ! हृदयस्पर्शी, भावनिक लेखन ! 👌👌👌

    ReplyDelete
  7. प्रवीण, अप्रतिम लिहिलयंस...तुझे इतर ब्लाॅग्जचे मेसेजेस मिळतातच पण नंतर वाचू...निवांत वाचू अशा सबबींखाली ते राहून जातात. आज मात्र शामराव कांबळे हे नाव वाचल्याबरोबरच त्वरित लिंकवर क्लिक करुन वाचलं...शामराव कांंबळ्यांची माझी ओळख भारत गायन समाजाच्या कुठल्याशा कार्यक्रमात झाली आणि पुढेही काही गाठी-भेटी झाल्या. खरोखर आदरणीय व्यक्तिमत्व. त्यातून छोटा गंधर्व हे त्यांचे व माझे दोघांचेही दैवत ! खरोखर अशी माणसं आयुष्यात येतात तेव्हा आपण पूर्वजन्मात काहीतरी जबरदस्त पुण्यकर्म केलंय असंच वाटत राहतं...खूप छान वाटलं "शामरावांबद्दल " वाचून...न राहावून लिहित सुटलो त्याबद्दल क्षमस्व !

    ReplyDelete
  8. ह्रदयस्पर्शी!✍️✍️💚💚

    ReplyDelete
  9. Surekh. Vyaktipan Ani vyaktichitran pan.

    ReplyDelete
  10. प्रविण जी छान आठवणी एखाद्या झुंबराच्या लोकांतून अनेक प्रतिबिंबे दिसतात पण अंतरी किरण एकच असतो. तसेच काहीसे.

    ReplyDelete
  11. अप्रतिम

    ReplyDelete
  12. नेहमप्रमाणेच उत्तोत्तम, आता तुला माणस आतून वाचायला जास्त चांगली जमताहेत, आनंद आहे.....

    ReplyDelete
  13. अत्यंत ह्रदयस्पर्शी ....

    ReplyDelete
  14. प्रवीण, तू लिहितोस असं न वाटता बोलतोयस असa भास होतो.... अप्रतिम लिखाण!

    ReplyDelete
  15. 👌 माझ्याकडे शब्दच नाहीत.

    ReplyDelete
  16. बोलून झालं तरी सांगून संपायच नाही...wa

    ReplyDelete

Post a Comment