शहाणा केशव...

या ब्लॉगवर आप्पोऽऽऽ लिहिताना मी म्हटलं होतं की मला वेडे आणि भिकाऱ्यांबद्दल आकर्षण आहे. याचं कारण मलाच तेव्हा नीटसं कळलं नव्हतं. आज केशवबद्दल लिहिताना लख्खपणे उमगलं. ते म्हणजे ही माणसं मनाने विलक्षण शुद्ध आणि निर्मळ असतात. त्यांच्यावर आपल्यासारखा व्यवहारीपणाचा राप चढलेलाच नसतो. गाढ करुणेने आणि निरपेक्ष प्रेमाने ते जगाकडे पाहात असतात.

माझ्या मित्राच्या घरी केशव यायचा. यायचा म्हणण्यापेक्षा तो तिथेच असायचा. शारिरीक वय पन्नासच्या पुढे पण बौद्धिक वय आठदहाच. गोड होता. दात वेडेवाकडे, डोळे खाली ओढलेले. जाडेजुडे ओठ. एकुणच जन्मजात बुटक्या माणसांचा असतो तसा चेहरा होता केशवचा. फताडे पाय, अनियंत्रित बोटं, वाढही खुरटलेली होती. नडगीवर नखांनी खाजवल्यामुळे पांढऱ्या रेघा उमटलेल्या असायच्या. अंगावर कुणीतरी दिलेला शर्ट आणि खाकी हाफपँट घातलेला केशव प्राथमिक शाळेतल्या अवखळ मुलांसारखा दिसायचा.

केशव आमच्या गल्लीत कधी आला कुठून आला हे कधीच कळलं नाही. या रस्त्याला झाडं, घरं, खांब यासारखाच एक केशवही होता. त्याला आसपासच्या चारपाच वाड्यांनी सांभाळला होता. पलीकडच्या एका देवळात झोपायला असे. जेवणही असंच कुणीतरी वाढायचं. कुणी म्हणे त्याची कोकणात शेतीवाडी आहे आणि वेडा म्हणून भावंडांनी हाकलून दिलाय; किंवा हाकलून दिल्यामुळे वेडा झालाय... काही का असेना पण केशव अंतर्बाह्य भाबडा होता. देवाचा माणूस होता.

केर टाकणे, दळण आणणे, लांब गेलेला बॉल आणून देणे अशा कामांमध्ये तो सदा व्यग्र असायचा. प्रत्येक काम अतिशय तन्मयतेनं नीटनेटकेपणानं करायचा. आमच्यासमोरच एक कचराकुंडी होती. कुंडी रिकामी आणि कचरा रस्त्यावर असाच प्रकार. पण केशवला कचरा टाकायला सांगा. तो त्या घाणकचऱ्यातून चालत कुंडीपर्यंत जाणार. हातातल्या बादलीतला कणन्‌कण कुंडीतच टाकणार. बादली स्वच्छ करून परत येणार. तिथेच एक शाळा होती. पोराटोरांना टवाळकी करायला केशव सापडायचा. लहान मुलं किती क्रूर असू शकतात हे दिसायचं. केशव होता होईतो सहन करायचा. अगदीच झालं की आरडाओरडा करायचा. पोरांवर हातातली बादली उगारायचा. मग आमचा मित्र धावून जायचा आणि केशवची सुटका व्हायची.

त्याची एक कमाल खासियत होती. त्याला पंचांग तोंडपाठ होतं. मागच्या पुढच्या अनेक वर्षांतले सणवार, तिथ्या, तारीखवारांसह मुखोद्गत. हे कसं काय ते माहीत नाही. पण, ‘केशव सांग. अमूक साली अमूक महिन्यातल्या या तारखेला वार काय होता? किंवा पाच वर्षांनंतर भाऊबीज कोणत्या तारखेला येणार?’ असं काही विचारलं की केशवचं उत्तर क्षणार्धात तयार असे. चमत्कारच होता हा. मग लोक त्याची परिक्षा घेण्यासाठी उगाच काय काय विचारत राहायचे. अशा वेळी केशव वैतागायचा. तुम्ही आम्ही आपल्या गुणांची चेष्टा होत्येय असं वाटलं तर चिडतो. पण केशवच्या वैतागण्यात तो अहंकार नव्हता. लहान मुलांना त्यांचा मूड नसताना नकला करायला किंवा गाणं म्हणून दाखवायला सांगितलं की वैतागतात तसं हे होतं.

आमच्या मित्राची आजी अतिशय गोड होती. छान सुरकुतलेली. आम्हीसुद्धा सगळेजण तिला आजीच म्हणायचो. आजीची आणि केशवची खास गट्टी. लाडक्या नातवानं आसपास घोटाळावं तसा केशव तिच्यापाशी घोटाळत असे. कुठल्या तरी जन्मीचे ऋणानुबंध असणार असंच वाटायचं.

त्याच्या आयुष्यात एक खलनायकही होता. काल्पनिक खलनायक. त्याचं नाव इंगवले. हा इंगवले म्हणे वकील होता आणि केशवची जमीन हडपणार होता. कल्पनेतला इंगवले बळावला की केशव कावराबावरा व्हायचा. मग काही दिवस अस्वस्थ असायचा. कधी नव्हे ते अपशब्द वापरायचा. ओळखीचा कुणी दिसला की त्याला इंगवलेच्या तक्रारी सांगायचा. अशा वेळी कसं समजवायचं असतं हे शहाण्यांना कळत नाही. तिथे तर्काची नाही तर प्रेमाचीच भाषा लागते. केशवला जवळ घेऊन समजूत काढावी असं वाटत राही. पण माझा कधी धीर झाला नाही. आजीला ते सहज जमलं.

‘शहाणा केशव व्हायचं ना तुला?’ असं थरथरत्या आवाजात म्हणत आजी त्याला जेवायला वाढायची. मग तो आजीचं सग्गळं काही ऐकायचा. त्या घरात एक कुत्रा होता त्याच्याशीही केशवची घट्ट मैत्री होती. केशवचा सगळ्यांनाच लळा होता.

आणि एके दिवशी आजी गेली.

मृत्यूचं दर्शन आपल्याला जसं होतं तसंच केशवसारख्यांना होतं का? त्या दिवशी केशव पूर्णपणे शहाण्यासारखा वागत होता. त्याला काहीतरी वेगळं घडलंय हे कळत होतं. आपल्यापासून काहीतरी हिरावलं गेलंय याचीही खोल जाणीव त्याला झाली असावी. पण त्याच्याकडे शब्द नव्हते. केशवची कीव करावी का जीवनाला लेबलं न लावता ते थेट भोगण्याचं भाग्य लाभलं म्हणून त्याचा हेवा करावा हेच मला कळत नव्हतं.

आजीचं पार्थीव दृष्टीस पडू नये म्हणून कुणीतरी केशवला वाड्यातल्या मागच्या बाजूला घेऊन गेलं. तिथे तो डोळे मिटून काहीतरी पुटपूटत शांत बसला होता. मी जवळ जाऊन ऐकलं. म्हणत होता,

‘ देवा... पुढच्या जन्मी मला शहाणा केशव बनव.’

...

कोण म्हणतं वेड्यांना सुखदुःख नसतात? त्यांच्या भावनांचं व्याकरण जरा वेगळं असतं एवढंच...

 

...प्रवीण जोशी
98505 24221
pravin@pravinjoshi.com

Comments

  1. खूप सुंदर. अंगावर येतंय रे.👌

    ReplyDelete
  2. ह्रदयी भिडले

    ReplyDelete
  3. अप्रतिम....माझ्या माहेरी ,लहानपणी असाच एक जरासा वेडगळ वाटावा असा मुलगा होता....त्याची आठवण झाली...

    ReplyDelete
  4. सुंदर रेखाटल आहेस
    एका क्षणासाठी डोळे ओले झाले

    ReplyDelete
  5. भालचंद्र पेंढारकराच्या दिगूची आठवण झाली. उत्तम व्यक्तिचित्रण

    ReplyDelete
  6. भालचंद्र पेंढारकराच्या दिगूची आठवण झाली. उत्तम व्यक्तिचित्रण

    ReplyDelete
  7. अप्रतीम मित्रा .खूप सुंदर .

    ReplyDelete
  8. आठवणींचे शब्द चपखल.

    ReplyDelete
  9. काय लिहिलंय, वाह, ही अशी माणसं असामान्यच !

    ReplyDelete
  10. शेवटचं वाक्य वाचताना आत काहीतरी तुटल्यासारखं वाटलं

    ReplyDelete
  11. अगदी मोजक्या शब्दांत व्यक्त होत एखाद्या व्यक्तीचं इतकं प्रभावी चित्रण.... असं वाटतं की आपणही त्याच्या संपर्कात आहोत.... fantastic!

    ReplyDelete

Post a Comment