इतिहासाचा तास...
‘गाढवा, गद्ध्या... बाकावर उभा राहा’
‘तू रेऽऽ उद्या आईला घेऊन ये शाळेत.’
‘हं... आणि तू... सांग दुसऱ्या महायुद्धाची तात्कालिक कारणे.’
हा लेलेबाईंचा इतिहासाचा तास. इयत्ता सातवी ते दहावी लेलेबाई आम्हाला इतिहास शिकवायला होत्या. आमच्यासारख्या व्रात्य नाठाळ
मुलांच्या शाळेत शिक्षिका मुलांना जरा जपूनच रागवायच्या. सरांच्या हातचा मार खाऊन निबर
कोडगी झालेली मुलं हाकताना शिक्षिकांचे हालच होत असावेत. पण लेलेबाईं मस्तपैकी कान पिळायच्या, बाकावर उभं
करायच्या. बोलणंही तिखट होतं. त्यांचा धाक वाटायचा आणि तेवढंच प्रेमही. विषयात रस
निर्माण करणं म्हणजे काय ते त्यांच्याकडूनच शिकावं. इतिहास
घोकंपट्टी करून शिकता येत नाही. पट्टी मारून शिकवता येत नाही. त्यासाठी त्या
विषयाची गोडीच लागावी लागते. रशियन आणि फ्रेंच राज्यक्रांती, पहिलं दुसरं महायुद्ध हे विषय लेलेबाईंकडून शिकल्यावर पुन्हा वेगळा अभ्यास
करायलाच लागायचा नाही.
गुलाबी काठांची पांढरी सुती साडी, वेणीत कसलंसं पांढरं
फूल. बगलेत पर्स. थोडीशी स्थूल अंगयष्टी, गोरा वर्ण, गोल चेहरा आणि घारे डोळे. आवाज थोडासा रेकून बोलल्यासारखा होता. मला आजही
त्या स्वच्छ आठवतायत. वर्गात आल्या आल्या टेबलाला टेकून काही सेकंद डोळे मिटून
उभ्या राहायच्या. हा वेळ आम्हाला गप्प बसण्यासाठी दिलेला असायचा. पण डोळे उघडल्यानंतर बाई वेगळ्याच भासायला लागायच्या. मग पुस्तकातला धडा गोष्ट
होऊन समोर सादर व्हायचा. मराठी भाषेवर प्रभूत्त्व होतंच.
बोलताना धड्याबरोबरच इतरही अनेक पुस्तकातले संदर्भ द्यायच्या. ही पुस्तकं शाळेच्या
ग्रंथालयातून घेऊन वाचलीच पाहिजेत असं वाटत राही. पण कितीही वाचलं तरी त्यातून
आपण काय शिकायचं हे सांगण्यासाठी लेलेबाईंसारखीच
शिक्षिका लागते. एखाद्या मुद्यानंतर बोलताना मध्येच त्यांचे डोळे मिटले जायचे आणि
असं काही वाक्य बोलून जायच्या की आयुष्यभर लक्षात राहावं.
‘आपल्याच इतिहासावरून आपसात भांडणं म्हणजे आईवडिलांची कापून वाटणी करणं...’
‘इतिहासावर प्रेम कराल तरच देशाचा भूगोल अखंड राहील...’
‘नागरिकशास्त्र हा परिक्षेच्या गुणांचा नाही, तर अंगच्या गुणांचा विषय आहे...’
लेलेबाईंची ही वाक्यं इतिहासाच्या कोणत्याही शालेय क्रमिक पुस्तकात सापडत
नाहीत याचं मला अतीव दुःख आहे. शिक्षणाला विषयांचं बंधन नसतंच. त्यातून जीवनाचं
मूळ तत्व उलगडलं पाहिजे. संस्कार म्हणजे तरी वेगळं काय? लेलेबाईंसारखे
शिक्षक हे कार्य सहजगत्या करतात.
एके वर्षी पंधरा ऑगस्टच्या आधी मला शिक्षिका खोलीतून बोलावणं आलं. असं
बोलावणं येणं म्हणजे पोटात गोळा. मी आपला चाचरतच गेलो. आम्हाला एरवी रागावणाऱ्या, दटावणाऱ्या साऱ्या
बाई तिथे एकमेकींना अगंतुगं करत डबे खात बसल्या होत्या. लेलेबाईंनाही एवढं मोकळं हसताना मी प्रथमच पाहात होतो. मी गेल्या गेल्या
त्यांनी शाळेच्या शिपायाला बोलावलं. तो हार्मोनियम घेऊन आला. माझ्यासमोर ठेवली.
‘हं... काळी पाच धर’ त्या म्हणाल्या. मी गपगुमान पेटीच्या भाता उघडला. काळी
पाच धरली. आणि त्या स्वरात बाई वंदेमातरम् गायला लागल्या. त्या गातात हा शोध मला
नवीनच होता. गाताना त्यांचा आवाज वेगळाच येत होता. छान गुंगी आणणारं गोड गाणं.
त्या ओघवत्या गाण्याला मी कशीबशी साथ करू लागलो.
‘हं... ठिक. पंधरा ऑगस्टच्या कार्यक्रमात तुला माझ्याबरोबर वाजवायचंय. अजून
एकदोनदा प्रॅक्टीस करू.’
लेलेबाईंसारख्या कडक शिक्षिकेबरोबर आपल्याला स्टेजवर पेटी वाजवायला मिळणार
यामुळे मी फुशारून जाण्याआधीच त्यांचा नेहमीच्या आवाजातला प्रश्न आला. ‘गद्ध्या, कालच्या
स्वाध्यायाची वही पूर्ण झाली का?’
त्या वंदेमातरम्ची प्रॅक्टीस मी जन्मात विसरणार नाही. एकदा गाता गाता
अचानक थांबल्या. डोळे मिटले गेले. काही सेकंदं तशीच गेली आणि बाई वंदेमातरम्चा
अर्थ सांगू लागल्या. सलग अर्धा तास बोलत होत्या. ‘शुभ्र ज्योत्स्ना पुलकित यामिनी, फुल्ल कुसुमितां
द्रुमदल शोभिनीम्...’ एक एक शब्द उलगडून सांगत होत्या. गाण्यातल्या शब्दांवर
श्रद्धा असणं, ते समजून गाणं म्हणजे काय याचा तो वस्तूपाठ
होता. मधूनच डोळ्यात पाणीही तरळत होतं. त्यांचं एरवीचं दटावून बोलणं, रागावणं हे सारं त्या हळव्या स्वभावाचं काटेरी कुंपण असावं असं वाटू
लागलं.
दहावीनंतर आपले मार्ग वेगळे होतात. मित्रांच्या, शिक्षकांच्या
भेटीगाठी होत नाहीत. पण काही क्षण मात्र तसेच गोठून
राहिलेले असतात. प्रत्येकाच्या मनात शाळेची एखादी खास आठवण असतेच असते. माझ्या मनात; आधीचा तास
संपून लेलेबाईंचा इतिहासाचा तास सुरु होण्याआधीची उत्सुकता तशीच ताजी होती. एवढी
की जणू काही तो कोणत्याही क्षणी सुरू होईल.
पुढे अनेक वर्षांनी एका स्टुडिओत माझं कसलं तरी रेकॉर्डिंग चाललं होतं. मला
भेटायला बाहेर कुणीतरी आलंय असा निरोप आला. कुणी एक नवीन मुलगी मला गाणं ऐकवायला
येणार होती. तिला आत बोलावलं. बरी गायली. सुरांबरोबरच शब्दांचीही जाण होती.
‘माझ्या आईकडे शिकते...’ तिचं हे वाक्य पुरं होईतो स्वतः लेलेबाईच दार उघडून आत आल्या. तशीच गुलाबी काठाची पांढरी साडी आणि वेणीत
फूल होतं. चेहराही तसाच, पण आता कवळी आली होती. शाळेत
त्यांना चष्मा असल्याचं मला आठवत नव्हतं. आता तोही होता.
त्यांनी मला क्षणात ओळखलं. नमस्कार करायला उठलो तर म्हणाल्या ‘अहोऽऽ नको...
मी तुम्हाला डिस्टर्ब केलं ना?’
गाढवा गद्ध्या म्हणणाऱ्या लेलेबाई असं अचानक अहो जाहो
करायला लागल्या. मला कससंच होत होतं. चहा झाला. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या.
बाई रिटायर होऊन सात आठ वर्ष झाली होती. मी त्यांच्या मुलीला बाईंबद्दल सांगायला
लागलो. तीही कौतुकाने ऐकत होती. वंदेमातरम्ची आठवण सांगितली तर बाई संकोचून
म्हणाल्या,
‘जाऊ द्या हो... आता मोठे झालात तुम्ही.’
‘बाई, मला अहो-जाहो नका ना करू’ मी विनवून म्हणालो.
बाईंचे डोळे पुन्हा तसेच मिटले गेले आणि वाक्य आलं,
‘हं... भविष्यकाळ जेव्हा भूतकाळाचा ऋणाईत राहतो तेव्हा भूतकाळानेसुद्धा
त्याचा मान राखावा.’
...आणि इतिहासाचा तास पुन्हा चालू झाला.
...प्रवीण जोशी
98505 24221
pravin@pravinjoshi.com
आमच्या आगाशे बाईंची आठवण आली..त्या अशाच शिकवायच्या मराठी आणि संस्कृत...
ReplyDelete👌🏻👌🏻
ReplyDelete👌🏻👌🏻
ReplyDelete👌🏻👌🏻
ReplyDeleteलेले बाईंचा इतिहासाचा तास अगदी डोळ्यांसमोर उभा राहिला ! अप्रतिम लेखन 👌👌
ReplyDeleteत्या वेळी सगळे शिक्षक आणि शिक्षिका ज्या तळमळीने शिकवायचे त्यातले अग्रगण्य नाव हे लेलेबाईंचे असेल असे मला वाटते. शाळेतल्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. सगळे प्रसंग अगदी डाोळ्यासमाोर उभे राहिले. लेख वाचताना डाोळ्यातून पाणी आले.
ReplyDeleteअप्रतिम व्यक्ति चित्रण. पण साधारण पणे, 85/86 पर्यन्त तरी म्हणजे, शिक्षण आणि ते देणारे शिक्षक यांचा दर्जा घसरण्याच्या काळाच्या आधी पर्यन्त तरी, शाळा कोणचीही असो, शिक्षक किंवा शिक्षिका साधारणपणे अशाच होत्या.
ReplyDeleteमाझ्या विमलlबाई गरवारे शाळेची खूप आठवण आली
लेले बाईंनी इतिहास इतका सुंदर शिकवला की तू या आठवणींचा इतिहास होऊ दिला नाहीस आणि आज ही नकळत तुझ्या जाणिवेत त्या आहेत हे भासलं.
ReplyDeleteमस्त
ReplyDeleteलेले बाईंची वाक्यं कोरून ठेवण्यासारखी आहेत.
ReplyDeleteअप्रतीम व्यक्तिचित्र... खरच काही व्यक्ती कायमच्या घर करून राहतात.
ReplyDelete- श्रीराम हसबनीस
नेमकं व्यक्तीचित्र लेखन... असंच छान लिहित रहा 👍
ReplyDeleteखूप छान लेखन
ReplyDeleteKhup chhan
ReplyDeleteवा फारच छान इतिहासाचा तास डोळ्यासमोर उभा राहिला
ReplyDeleteअप्रतिम
ReplyDeleteफक्त इतिहासाचाच तास नव्हे तर पूर्ण शाळा आणि शालेय जीवनाच्या आठवणी ताज्या झाल्या.
शाळेची आठवण झाली.... अतिशय सुंदर!
ReplyDelete