पत्ता चुकलेला सूर...
मोरेश्वरकाका, माझ्या
सख्ख्या मित्राचे सख्खे काका. घराणं पुरोहितांचं.
वेदपठण, धार्मिक कृत्य, पुराणवाचन
यासाठी प्रख्यात. घरामध्ये तिन्ही वेळेला संध्या व्हायची. अग्निहोत्र, एकादष्ण्या, व्रतवैकल्य सतत चालू असायची.
पूर्वापार चालत आलेलं हे पौरोहित्य त्या एकत्र कुटूंबातल्या साऱ्यांनीच कर्मठपणे
सांभाळलं होतं. घराण्याचा लौकीक तोलून धरला होता.
या
सगळ्यात मोरेश्वरकाका जरा वेगळे होते.
ते
बुद्धीने अंमळ अधू होते. वेडसर म्हणता येणार नाही. कारण सर्व कामे ते यथास्थित
करत. सारं काही समजायचं. थोड्याफार प्रमाणात
पौरोहित्यही करत. कुणावर तसे अवलंबून नव्हते. पण आकलनात जरा मंदपणा होता.
हालचालींवर संयम कमी होता. जीभ जड होती. जोडाक्षरं म्हणताना त्यांचे डोळे बारीक
व्हायचे. लग्न वगैरे अर्थातच झालं नव्हतं.
विप्रकुलात जन्म
घेतलेल्या या मोरेश्वरकाकांना वेड होतं ते संगीताचं.
उंचीने
बुटके, रंगाने कोकणस्थी गोरे. डोक्याचा चकोट आणि टोपीच्या बाहेर डोकावणारी शेंडी.
खादीचा कुडता पायजमा. खांद्यावर झोळीवजा पिशवी. लांबून पाहिलं की नुकतीच मुंज
झालेला बटू येतोय असं वाटायचं. चालणंही तसंच लगबगीचं होतं. मी त्यांना प्रथम पाहिलं
तेव्हा त्यांनी पन्नाशी सहज पार केली असावी. पण स्वभावात लहान मुलांचा गोडवा टिकून
होता.
त्यांना सुरांचं वेड कसं लागलं हे मला कधीच कळलं नाही. कारण संगीतविद्या त्या घराशी जरा फटकूनच होती. घरात ना कुणाला गाण्याची आवड ना एकही वाद्य. काकांनी कधीकाळी पेटी शिकायचा प्रयत्न केला होता म्हणे. ‘खानदान की इज्जत’ आड आली असावी आणि राहिलं ते राहिलंच. पण सुरांचं वेड विरून जात नाही. उलट जखम चिघळावी तसं अजून चरत जातं. वय वाढलं तसं काका पौरोहित्यापासून लांब जायला लागले. पण संगीत जवळ येण्याची वेळ कधीच निघून गेली होती. मी जरा गाण्यावाजवण्यातला आहे असं समजल्यावर त्यांनी माझ्याशी गट्टी जमवली. कधीही भेटले की ‘मला एकदा तो चंद्रकंस कसा असतो ते सांग रे...’ असं विचारायचे. कुठल्याशा नाट्यगीताच्या शब्दांचा अर्थ सांगायचे. अर्थात हे सारं ऐकीव माहितीवरच आधारलेलं असायचं. त्यांना या चर्चांचा काहीच उपयोग नव्हता. पण हातातून निसटून गेलेलं काहीतरी ते धरून ठेऊ पाहात होते.
मैफलींच्या
ठिकाणी हमखास दिसायचेच. कुठेतरी कोपऱ्यात उभं राहून थरथरत्या बोटांनी गाण्याच्या
मात्रा मोजण्याचा प्रयत्न करत असायचे. लोकांनी टाळ्या वाजवल्या की मान डोलवत वा वा
म्हणायचे. दाद देण्यात जाणकारी वगैरे नसायचीच. ते मैफलीत सुरांची नाही तर स्वतःची
जागा शोधत असावेत. मग मध्यांतरात संगीतावर गप्पा मारणाऱ्या मंडळींच्या अवतीभवती
घोटाळत. त्या कंपूंमध्ये मिसळण्याचा प्रयत्न करीत. कुठल्या कुठल्या ओळखी काढत. पण
त्यांना कुणीही कधी जवळ केलं नाही. सुरांच्या रसिकांमध्येही असूरपणा असतोच.
पिंजऱ्यातले पक्षी पाहावेत तसं गाणं ऐकणारी काही माणसंही असतातच त्यात.
त्यांच्यासाठी काकांचं वेडंबागडं रूप हा चेष्टेचा विषय होता. त्यांना काकांचं आयुष्य, घराणं
वगैरे माहित असायचं काही कारणच नव्हतं. चहाबरोबर चवीला काहीतरी मिळत होतं बस्.
मला मात्र अशा वेळी फार कानकोंडलं व्हायचं. हे असे असे आहेत हे चारचौघात सांगता
यायचं नाही. काकांनाही समजावता यायचं नाही. त्यांना तर आपली थट्टा होत्येय हेच कळत
नसायचं. त्या गर्दीत मला गाठत आणि, ‘मी अजूनही पेटी वाजवू
शकेन की नाही रे?’ असं उत्साहानं विचारत. हो
म्हणण्यावाचून माझ्या हाती काय होतं? मग ते खूश होत.
झोळीतून पुजेसाठी वापरायची एखादी खारीक काढून हातावर ठेवत. मी ती प्रसादासारखी
घेई. मग म्हणायचे, ‘मला एकदा तरी गाण्याला साथ करायचीय रे
पेटीवर’ मीही काहीबाही म्हणून वेळ मारून नेत असे. अजून काही बोलायला जाणार
तेवढ्यात ‘राहूनच गेलं रे सगळं आमच्या घरात...’ असं काहीतरी पुटपूटत निघून जात.
त्यांच्या त्या अजाण आनंदाला नाही म्हणायला ही एवढीच एक निराशेची किनार होती. पण
तीही त्यांनी ‘कलाकाराचं दुःख’ म्हणून स्वीकारली होती.
विधात्याचं
गणितही काहीतरी चुकलंच होतं. एके ठिकाणी पाठवायचा जीव भलत्याच पत्यावर पाठवला गेला
होता. कलाकार ठरवून होता येत नाही. रसिक होणंही अवघडच. पौरोहित्यही मागे पडलं
होतं. काका अनेक वर्ष असेच दिशाहीन अधांतरी भरकटत राहिले. त्या अवस्थेत त्यांना
सुरांनीच सांभाळलं होतं. आपल्याला संगीत साध्य होणार नाही या जाणीवेचा त्यांना कधी
स्पर्शच झाला नाही. हे भाबडेपण किती भाग्याचं !
आणि एके
दिवशी मोरेश्वरकाका गेले.
त्यांच्या
घरात सगळ्यांना मंत्रांक्षरांचा ध्यास होता, आणि मोरेश्वरकाकांना सूरांच्या
मंत्रांचा. ते प्रसन्न होणं न होणं कुणाच्या हातात असतं का? त्यांच्याही नव्हतंच. पण तरी समाधानाने गेले.
असं साध्य
न झालेल्या सुरांनी दिलेलं समाधान मी अजून तरी कुठे पाहिलेलं नाही...
...प्रवीण जोशी
98505 24221
pravin@pravinjoshi.com
Pure heart....!
ReplyDeleteवा..सुरेख
ReplyDeleteखूपच छान ....
ReplyDeleteMast lihile ahes re
ReplyDeleteछान.. अतृप्त नाही म्हणता येणार.... अशी माणसं निर्मळ प्रेमळ असतात रे....
ReplyDeleteफार छान वर्णन!
ReplyDeleteफार छान व्यक्ती चित्रण
ReplyDeleteछान च ... अतृप्त नाही म्हणता येणार..
ReplyDeleteअसे लोक निर्मळ प्रेमळ असतात...
संगीतवेडा, भाबडा जीव !
ReplyDeleteसवाई गंधर्व, किंवा लक्ष्मी क्रीड़ा अशा ठिकाणी हमखास असायचे, गोल चेहरा, डोक्यावर टोपी, कधी धोतर बर्याचदा पायजमा आणी पांढरा अर्ध्या बाह्यांचा शर्ट. आमच्या पिंपळखरे बुवांच्या कडे कधीतरी यायचे. कोपर्यात बसायचे, काही बोलायचे नाहीत, उठून बुवांना नमस्कार करून जायचे. सवाईत चहा घेऊन दिला की छान निर्व्याज हसून पावती द्यायचे
ReplyDeleteफारच विलक्षण.....का कोण जाणे, पण हा लेख वाचल्यावर आरती प्रभू यांची ही कविता आठवली...
ReplyDeleteही निकामी आढ्यता का? दाद द्या आणि शुद्ध व्हा
सूर आम्ही चोरीतो का? चोरीता का व्हाहवा
मैफिलीची साथ आम्हा दैवयोगे लाभली
न्या तुम्ही गाणे घराला फुल किवा पाकळी
दाद देणे हे ही गाण्याहून आहे दुर्घट
गुंफणे गजरे दवांचे आणि वायूचे घट
नम्र व्हा अन सूर जाणा जीवघेणा रंग हा
साजरा उधळून आयु हो करावा संग हा
चांदणे पाण्य्तले की वेचीत येईल ही
आणि काळोखात पारा ये धरू चिमटीत ही
ना परंतु सूर कोण लावीत ये दिपसा
सूर नोहे तीर कंठी लागलेला शापसा
कवि - आरती प्रभू
काळजाला चुटपुट लावणारा लेख..
ReplyDeleteमेहफीलीत सुरांची नाही स्वतःची जागा शोधत असावेत. फारच छान वाक्य आहे मोरेश्वर काकांबद्दल.
ReplyDeleteचटका लावणारी...
ReplyDeleteमीही सदाशिव पेठेत वाढल्याने तुझ्या blog मधल्या खूपशा मंडळीना ओळखतो.. पण तू लिहितोस ते फक्त वरवरचे नाही तर अंतर्बाह्य वर्णन आहे.
ReplyDelete--आनंद
वाह...जे मोरेश्वर काकांना ओळखत नाहीत त्यांच्याही डोळ्यापुढे प्रसंग उभे करणारे सुंदर लेखन प्रविण..
ReplyDeleteVaa.
ReplyDeleteखूप सुंदर आणि विचार करायला लावणारं....असे लिहिले आहेस.अप्रतिम
ReplyDeleteछान लिहिलं आहेस मित्रा. प्रत्येकाच्या मनात असा, करायचं राहून गेलेला, दुखरा, हळवा कप्पा असतोच रे. मोरेश्वर काका हे प्रतिनिधी आहेत ह्या वेदनेचे. पुढल्या जन्मी योग्य घरच्या पत्त्यावर जातील अशी आशा!
ReplyDeleteछान लिहिलं आहेस मित्रा. प्रत्येकाच्या मनात असा, करायचं राहून गेलेला, दुखरा, हळवा कप्पा असतोच रे. मोरेश्वर काका हे प्रतिनिधी आहेत ह्या वेदनेचे. पुढल्या जन्मी योग्य घरच्या पत्त्यावर जातील अशी आशा!
ReplyDeleteमाझाही असाच एक काका होता त्याची आठवण झाली
ReplyDeleteमाझाही असाच एक काका होता त्याची आठवण झाली ब्लॉग छान झाला आहे
ReplyDeleteएका अनोळखी तरी त्या विशिष्ठ संस्कृतीत अशा और विचाराच्या लोकांच काय अवस्था होते हे अगदी डोळ्यासमोर घडतंय असं वाटलं.
ReplyDeleteसुंदर! नियतीचा अजब खेळ!
ReplyDeleteचुकलेल्या सुराने चुटपुट लावली
ReplyDeleteअतिशय हळुवारपणे रेखाटलेलं आणि वाचता वाचता अंतर्मुख करणारं व्यक्तिचित्र!
ReplyDelete