आप्पोऽऽऽ
रस्त्यावर फिरणाऱ्या भिकारी आणि
वेड्यांबद्दल मला फार कुतूहल आहे.
ते तसे का होतात? दिवसभर
करतात काय?त्यांची ओळख काय? का ओळख ही
त्यांची गरजच नसते? असे अनेक प्रश्न घेऊन मी या लोकांकडे
पाहात आलो आहे.
लहानपणी आमच्या गल्लीत एकजण यायचा.
त्याला वेडा म्हणावं का भिकारी हे मला अजून उमगलेलं नाही. त्याचं नाव अपो. खरं
म्हणजे हे नाव आप्पोऽऽऽ असं लिहायला पाहिजे. कोपऱ्यावरूनच त्याची आप्पोऽऽऽ अशी साद
यायची. ती लांबलेली पोऽऽऽ ची आरोही लकेरच त्याचं नाव बनली. ती शब्दात लिहून दाखवता
येणं शक्य नाही. त्याचं खरं नाव वेगळं काहितरी असावं पण वेड्यांच्या आणि
भिकाऱ्यांच्या खऱ्या नावाशी आपल्याला कुठे देणंघेणं असतं? त्यालाही
नसावंच. त्यानंही ती ओळख ओ देण्यापुरतीच स्वीकारली असावी असं वाटायचं.
आप्पोऽऽऽ गल्लीत येणं म्हणजे आनंद
असायचा. अंगावर एक फाटका कोट, हातात तुटकी बॅग,
ठिगळलेली पँट आणि अनवाणी. असा काळाकुट्ट मळका आप्पोऽऽऽ आम्हा
मुलांच्या आवडीचा होता. कारण तो धमाल नकला करायचा. तो आला की पाईडपायपरच्या मागे
जमा व्हावीत तशी गल्लीतली सगळी पोरं त्याच्याभोवती जमायची. त्याच्यासारखंच
आप्पोऽऽऽ आप्पोऽऽऽ असं ओरडायची. गल्लीक्रिकेटचं पीच त्याला स्टेज म्हणून वापरायला
द्यायची. ‘साहेबाची नक्कल कर’ म्हणत मागे लागायची. ही साहेबाची नक्कल तर मला
स्वच्छ आठवते. धरून ठेवणारा परफॉर्मन्स म्हणजे काय ते मी प्रथम आप्पोऽऽऽ कडून
अनुभवलंय. तो प्रथम इकडेतिकडे बघत प्रेक्षकांचा अंदाज घ्यायचा. स्टान्झ घ्यायचा
आणि मग अचानकपणे इंग्रजीच्या चालीत काहीतरी जोरदार फाडफाड बोलायला लागायचा. आपण
काहीबाहीच बोलतोय याची त्यालासुद्धा कल्पना असायची. हे बोलणं रंगत जायचं. मग तो
काल्पनिक खुर्चीवर बसायचा. ऐटीत फोन घ्यायचा. नोकराला हाका मारायचा. क्षणभरात दोन
आप्पोऽऽऽ दिसायला लागायचे. साहेब आप्पोऽऽऽ नोकराला कामं सांगायचा. त्याने ती ऐकली
नाही की नोकर आप्पोऽऽऽ ला म्हणजे स्वतःलाच लाथा घालून हाकलून द्यायचा. नोकर गयावया
करायचा. साहेब ऐकायचा नाही. मग नोकर आप्पोऽऽऽ लोकांकडे मिश्किलपणे पाहात पुन्हा
साहेबाची नक्कल करायला लागायचा. साहेब पुन्हा चिडायचा. असं एकात एक गुंतलेलं हे
सगळं अक्षरशः मेस्मरायजिंग असायचं. शेवटी एखाद्या बॅले कलाकाराने कर्टन कॉलला
कमरेत झुकून अभिवादन स्वीकारावं तसा तो गल्लीचं अभिवादन स्वीकारायचा. कुणी चार आठ
आणे तर कुणी शिळंपाकं अन्न द्यायचे.
तरीपण आप्पोऽऽऽ ची गणना वेड्यात किंवा
भिकाऱ्यांमध्ये कधीच व्हायची नाही. त्याच्या डोळ्यात कसली तरी चमक होती. आपल्या
आयुष्यात काहीतरी घडेल अशी आशा असणाऱ्यांच्या डोळ्यात असते तशी. काळ्या चेहऱ्यावर
पांढरेस्वच्छ दात उठून दिसायचे. कपडे फाटके असले तरी हसणं निर्मळ होतं. त्याची
दाढी कधी वाढलेली दिसायची नाही. एखाद्या कलाकाराने स्वतःला मेंटेन्ड ठेवावं तसं
त्यानं ठेवलं होतं. गल्लीत त्याला कुणी चिडवायचं नाही. भाषाच वेगळी होती त्यामुळे
कुणी फार जवळही जायचं नाही. जरा जवळ जायला लागलं की घरातून आयांची हाक यायचीच. मग
आप्पोऽऽऽ डोळ्यांनीच हसायचा. अनेक दिवस गल्लीत आला नाही की त्याची आठवण निघायची.
बस्स एवढाच तो आप्पोऽऽऽ
मध्ये काही वर्ष गेली. आम्हीही ती जागा
सोडली. आप्पोऽऽऽ विस्मरणात गेला.
एकदा मुंबईला जाण्यासाठी एशियाड गाठत
असताना स्टेशनवर अचानकपणे तो दिसला. केवळ रंगावरून मी त्याला ओळखलं. पुढचे दोनचार
दात पडले होते. डोळेही त्याचे नव्हते. त्यातली चमक गेली होती. तो स्टेशनच्या
खांबाला टेकून बसला होता. वेडेपणा आणि भिकारीपणाच्या काठावरती होता पण अजूनही
त्यातला काहीच झाला नव्हता. याही परिस्थितीत त्याच्या हातात एक तुटकी बॅग होती. दुसऱ्या
हातात कुणीतरी दिलेला वडापाव होता. एंट्री घेण्यासाठी विंगेत तयार असलेल्या
नटासारखा तो सावधपणे खात होता.
त्याला ती साहेबाची नक्कल पुन्हा आठवेल
का? विचारायचं धाडस झालं नाही. बघण्याची तीव्र इच्छा मात्र
झाली. त्यानं ती पुरी करावी असं प्रकर्षानं वाटून माझा याचक झाला. लहान होऊन
आप्पोऽऽऽ असं ओरडावं असंही मनात आलं. पण मग मी मलाच वेडा म्हटलं. का कोण जाणे
त्याला मात्र स्वतःची ओळख पूर्णपणे उमगली आहे असं राहून राहून वाटत होतं. तुम्हाला
मला कुणालाच न कळणाऱ्या एक समजुतीने तो जगाकडे पाहात होता.
आणि माझ्या मनात, आता बस
लवकर सुटावी एवढाच एक विचार होता.
प्रवीण जोशी
98505 24221
pravin@pravinjoshi.com
क्या बात!!!
ReplyDeleteछान लिहिलंय! तो आप्पो डोळ्यासमोर उभा राहिला !!
ReplyDeleteMastttt
ReplyDeleteअप्रतिम लेखन 🙏🏻🙏🏻🙏🏻
ReplyDeleteहृदयस्पर्शी... नकळत समाज व्यवस्थेचं एक भकास रूप व्यक्त झालं. पण अध्यात्मिक पातळीवरील जगण्याचा एक शुद्ध आयाम म्हणावा असं काही पण वाटलं.
ReplyDeleteमस्त, खूप दिवसांनी इतकं मनापासून लिहिलेलं वाचायला मिळालं....अतिशय निर्मळ लेखन आणि भाषा..... अप्रतिम.... असंच नवनवीन लेखन आम्हाला वाचायला मिळू दे तुझ्या कडून...
ReplyDeleteअप्रतिम..
ReplyDeletePravin khup chhan vatal vachun eitaki sunder Bhasha vachatana dolysamor asa ghadtay asa vatala
ReplyDeleteप्रविण, तुझ्या शब्दांना एक छान गेयता आहे. थोडक्यात, खूप छान व्यक्त होतोस.
ReplyDeleteहे व्यक्ति चित्रण , ती व्यक्ति अगदी डोळ्यासमोर उभी राहते इतक जिवंत आहे.
असाच कायम लिहिता रहा.
सुंदर. आमच्या माडीवाले कॉलनीमधे पण यायचा आपो. "आ बाये मा.. छोटे मोटे मा. आपो " अशी काहीतरी आरोळी असायची. हातात पांढरी झोळी धरून लगबग जायचा. याशिवाय वासुदेव, रामदासी, बलूची डोंबारी, नंदीबैल, कडकलक्ष्मी, " केळी गावरान केळी " असं प्रचंड मोठ्या आवाजात ओरडणारा केळीवाला, कल्हईवाला, अस्वलवाले, पाठीतून एक्स्ट्रा पाय फुटलेलं वासरू घेऊन पैसे मागणारे अशी अनेक मंडळी तुझ्या blog मुळे आठवली.
ReplyDelete- आनंद
Mast re
ReplyDeleteप्रत्येकाला आपापला आप्पोऽऽऽ आठवला असेल हे नक्की. नेहमी प्रमाणेच सहज मनातलं लिखाण... मनाला स्पर्श करणारं. शुभेच्छा.
ReplyDelete,khup chan lihila ahe
ReplyDeleteसुरेख लेखन... माणसं वेळी का होतात आणि कशी याबद्दल मलाही खूप कुतूहल आहे .
ReplyDeleteमस्त रे
ReplyDeleteAppo ....chi itaki bolaki pratima varnan keli ahe,ki janu Appo....samorach ahe asa bhass hoto.
ReplyDeleteकिती सहज आणि सुंदर लिहितोस.. आपल्या बहुतेकांच्या आयुष्यात असे अप्पो / अप्पी येऊन गेले.. त्याची आठवण झाली.
ReplyDeleteसुंदर लिखाण ! आप्पो डोळ्यांसमोर उभा राहिला
ReplyDeleteखूप नेटकं व्यक्तिचित्रण..! माडीवाले कॉलनीत आपो ऽ नेहमी यायचा..पण तेव्हा तो नक्कल करत नसे. नुसतेच सुरुवातीला नकळत्या भाषेत काहीतरी लयदार बोलून नंतर आपो ऽ असा पुकारा करीत असे..
ReplyDeleteअरे मला आठवतो आहे तो.. तु परत आठवण करून दिलीस...
ReplyDeleteगरीब बिचारा होता तो ..
अरे काय जबरदस्त लिहिलं आहेस तू प्रवीण, आप्पोssss चं चित्रण कमाल केलं आहेस. मी लहानपणी पाहिलं आहे त्याला. तू जणू त्याचा एखादा जुना फोटोच दाखवला आहेस त्याचा..
ReplyDelete- संजीव मेहेंदळे
सुंदर व्यक्तिचित्र..... एखादं पोर्ट्रेट काढल्यासारख....!
ReplyDelete