अंदाज

जगात सगळ्यात कठीण काय असेल तर ते माणसांबद्दल अंदाज बांधणं. 

माझ्या माहितीत एक दुकानदार आहे. पुण्यातल्या चांगल्या भागात त्याचं किराणा मालाचं दुकान. पुण्याच्याच रितीरिवाजाप्रमाणे पुर्वापार चालत आलेलं. त्या वाहत्या रस्त्याला न शोभेल असं कळकट आणि मेणचट. विचित्र त्रिकोणी आकाराचं. अवघ्या शंभर दिडशे स्क्वेअरफुटाचं. अलीकडची पलीकडची दुकानं बघत बघत याच्या दुकानावरून जायला लागलो की आपण अचानक रस्ता चुकलोय असं वाटायला लागतं. बरं, याच्याकडे काहीही मागा, ती वस्तू नसतेच. ‘साबण आहे का?’ किराणा मालाच्या दुकानात हा प्रश्न बावळटपणाचा आहे. पण याही प्रश्नाला याचं उत्तर मख्खपणे ‘नाही’ असं येऊ शकतं. याच्या अंगावरचा कधी काळचा पांढरा पण आत्ता हिंगाच्या रंगाचा आणि वासाचा लेंगा झब्बा पाहिला की याच्या दुकानात काय, घरीही साबण नसणार याची खात्री पटते. मीही पुणेकर गिऱ्हाईक असल्याने मला काहीही खरेदी करायचं नसतं तेव्हा टाईमपास म्हणून याच्या दुकानात जातो. उत्तर 'नाही' येणार हे माहितीच असतं. तीच तर खरी गम्मत. बरं आपण काही गुलबकावलीचं फूल वगैरे मागत नाही. अमूक तेल आहे का?... नाही. तमूक पेस्ट आहे का?... नाही.  दुकानाचं नाव 'अलाणा फलाणा व्हरायटी स्टोअर' असलं तरी  या ‘नाही’ म्हणण्यामध्येही व्हरायटी नाहीच. पण ते नाही म्हणतानाचा भाव मात्र अतिशय देखणा असतो. आपल्याकडे काहीतरी कमी आहे याची त्याला जाणीवच नसते. ‘उद्या आणून देतो’ छापाची व्यापारी उत्तरं देण्याची बुद्धी नसते. तुम्ही रागवाल याची भीती नसते. उलट एवढं नाही म्हणूनही तुम्ही त्याच्याकडे पुन्हा येता याचाच  सुक्ष्म आणि अनाकलनीय आनंद त्या निरागस चेहऱ्यावर दिसत असतो. आणि जोडीला एक बद्दड असं हास्यही. त्यामुळे त्या दुकानात जाण्याचा करमणूक हा उद्देश लवकरच विफल होत गेला. त्याची जागा रागाने घेतली. तोही येईनासा झाला आणि नंतर उरली ती केवळ उत्सुकता.

एकदा तो दुकानदार घोळदार लेंग्याला क्लिपा लावून सायकलला मालाची पिशवी लावून जाताना दिसला. मी दुकानाशी गेलो तर आत काऊंटरवर अगदी तस्साच एक माणूस बसलेला होता. मग मला शोध लागला की हा दुकानदार एक नसून दोन आहेत. म्हणजे ते जुळे भाऊ आहेत. सकाळी एकजण संध्याकाळी एकजण. दोघेही अर्थातच तंतोतंत. एकावर एक फ्री. गंमत म्हणजे दोघांच्या चेहऱ्यावरचे भावही डिट्टो कॉपी. म्हणजे तिथेही काटकसरच. निर्विकार मिचमिच्या डोळ्यांनी ते वाहत्या रस्त्याकडे पाहात बसलेले असतात. या गर्दीतलं कुणी आपलं गिऱ्हाईक असू शकेल यावर त्यांचा विश्वासच नसावा.

मी यांच्याबद्दल अंदाज बांधायला सुरवात केली. -

दुकान वडलोपार्जित असणार. यांना व्यापाराची बुद्धी नसली तरी नशीब बरं असणार. यांच्या गरजा कमी असणार. मुख्य रस्त्यावर दुकान असणं हा केवळ नशीबाचा भाग असणार. गरिबी झाकता येईल तोपर्यंत दुकान चालेल. नंतर इथे काहीतरी झकपक दिसेल.

असे अनेक अंदाज बांधत असताना परवा त्या दुकानातला सारा माल रस्त्यावर काढून ठेवलेला दिसला. शतकांपूर्वीची पोती, बाटल्या, डबे वगैरे सगळं काही. दोघं भाऊ आपल्या दुकानाकडे नजर लावून बसलेले होते. वाईट वाटलंच पण त्याहीपेक्षा आपलं बरोबर ठरलं हा अहंकार सुखावून गेला. मग दोनतीन दिवस तसेच गेले. दुकान खाली झालं होतं. तिथे नूतनीकरणाचं काम चालू होतं. नवीन रंगाचा पहिला हात झाला होता. त्यामुळे अचानक ती जागा ओळखू येईनाशी झाली होती. आणि हे दोघंजण रस्त्यावर उभे राहून देखरेख करत होते. दोघांच्या चेहऱ्यावर उत्साह नाहीच. तोच आळसटलेला भाव. तोच थंडपणा. दुकान विकलं तर हे दोघं इथे काय करतायत? माझा अंदाज चुकतोय का काय?

अखेरीस मी माहिती काढायचंच ठरवलं. तर हाती लागलेली माहिती अशी...

यांचा याच एरियात एक अलिशान बंगला आहे. सात पिढ्या बसून खातील एवढा पैसा गाठीशी आहे. गावाकडे जमीन आहे. दारात मर्सिडिज उभी आहे. पोरबाळं अमेरिकेत शिकत आहेत. आणि हे सारं याच दुकानाच्या बळावर उभं केलेलं आहे.

मी अक्षरशः बंद पडलो. ‘तुम्हाला अंदाज बांधता येतात का?’ या प्रश्नाला आता माझंही उत्तर मख्ख चेहऱ्याने ‘नाही’ असं येत होतं. त्यांची हेटाळणी करताना वाटणारा राग, सहानुभूती या साऱ्याची जागा त्यांच्याच चेहऱ्यावरच्या सुक्ष्म अनाकलनीय आनंदाने घेतली होती. आत कुठेतरी खूप बरं वाटत होतं.

पण हे बरं वाटणं त्यांच्याबद्दल चांगलं समजलं म्हणून होतं, का माझा अहंकार गळून पडला म्हणून होतं याचा अंदाज मात्र अजून लागत नाहीये...

... प्रवीण जोशी
98505 24221
pravin@pravinjoshi.com

Comments

  1. अंदाज अपना अपना...!!!

    ReplyDelete
  2. वा मस्त , अनोळखी नात्यातून कधी कधी ओळखीची वाटणारी माणसं ..
    मस्त लिहिलं आहेस 👌

    ReplyDelete
  3. अंदाज चुकला की आपणच आपल्याला ओळखत नाही असे वाटते मग!
    शेवट पर्यंत वाचनीय!✍️✍️👍👍

    ReplyDelete
  4. एक आगळा वेगळा विषय आहे. खूपच छान मांडणी केली आहे.

    ReplyDelete
  5. हे काम झकास झालेलं आहे. डोळ्यासमोर तू रंगवत असलेलं चित्र आणि मला भेटलेले असे दुकानदार येऊन गेले. "आत कुठेतरी बरं वाटलं" या वाक्यात लिहिण्यामागची भावना दिसून येते. ती फार सुंदर आहे.

    ReplyDelete
  6. ती संपत्ती त्यांनी मिळवली कशी? ही उत्सुकता अजुन शिल्लक आहे.,😀😀😀😀

    ReplyDelete
  7. सुंदर लिहिलंय. अशी दुकानं आणि दुकानदार पुणे 30 मधेच असतात.

    ReplyDelete
  8. मस्त लिहीला आहेस, पुण्यात या प्रकारची दुकानं, माणसं ठीकठिकाणी दिसतात.
    तुला दिसतं आणि ते मस्त मांडता येतं हे खूप छान आहे मित्रा. लिहीत जा नेहेमी. मला मज्जा येते हे Between the lines वाचायला

    ReplyDelete
  9. येता जाता बारकाईने केलेल्या निरीक्षणाचा वापर असे छोटेसे धक्के देणारे अनुभव लिहून केले.खूपच छान.

    ReplyDelete
  10. मी स्वतः काही वर्षे दुकानदारी केली आहे.जसे दुकानदार नमुनेदार असतात तशीच असंख्य नमुनेदार गिऱ्हाईके मी अक्षरशः एन्जॉय केली आहेत.त्याच्याबद्दल पुन्हा केव्हातरी.

    ReplyDelete
  11. गायक आता असे गाईल असे वाटत असताना आपल्या कल्पने ला छेद देवून आश्चर्य चकित करतो तसाच अनुभव आला.....

    ReplyDelete
  12. खूप छान लिहिलंय, वाचायला सुरुवात केली की थांबावंसंच वाटत नाही. कुठेही कृत्रिमपणा नाही, रोजच्या बोलीभाषेत लिहिल्यामुळे अधिक आपलंसं वाटतं ! अगदी प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो ! 😊 असंच लिहीत रहा आणि पाठवत राहा ! शुभेच्छा 🙏😊

    ReplyDelete
  13. छान लिहिलं आहेस. मजेशीर आहेच, शिवाय विचारप्रवर्तक ही! आणि स्फूर्तिदायक, कारण त्यांच्या मख्ख हाताळणी च्या आड कुठेतरी त्यांचं चातुर्य लपलं होतं.
    On a lighter note- पुढल्या वेळी परेश रावल स्टाईल मध्ये विचार - आज काय नाही आहे?

    ReplyDelete
  14. अगदी पहिल्या वाक्यात कथेचा आशय सांगून सुध्दा कथेच्या शेवटी मिळणारी कलाटणी अनपेक्षित वाटते.....यातच लिखाणाचं सामर्थ्य दिसून येतं. हलकीफुलकी पण ओघवती भाषा... फारच छान!

    ReplyDelete
  15. अंदाज खरच येईना अप्रतिम पुढे पुढे काय ही उत्सुकता वाढत गेली वाचनीय आणि चिंतनीय किशोर दंताळे

    ReplyDelete
  16. Aapka yeh aandaaz bahot khub laga

    ReplyDelete
  17. चि.प्रवीण अ. आ.

    तू लि हिलेली गोष्ट नक्कीच वेगळी आहे.मुखवटा पांघरून ढिम्म दिसत राहणे व वागणे अजिबात सोपे नाही, पण तुझया पात्रानी ते आजीवन निभावले...

    आपण सदैव आपल्या आनंदात राहणे व दूसरयाच्या दुःखात तेव ढ्याच हिरीरीने सामिल होणे हीच
    छान जगण्याची गुरुकिल्ली आहे.

    ते दोघे नक्कीच बेरकी लोकांच्यात फिट्ट बसतात....

    मीरा काकू

    ReplyDelete
  18. चि.प्रवीण अ. आ.

    तू लि हिलेली गोष्ट नक्कीच वेगळी आहे.मुखवटा पांघरून ढिम्म दिसत राहणे व वागणे अजिबात सोपे नाही, पण तुझया पात्रानी ते आजीवन निभावले...

    आपण सदैव आपल्या आनंदात राहणे व दूसरयाच्या दुःखात तेव ढ्याच हिरीरीने सामिल होणे हीच
    छान जगण्याची गुरुकिल्ली आहे.

    ते दोघे नक्कीच बेरकी लोकांच्यात फिट्ट बसतात....

    मीरा काकू

    ReplyDelete
  19. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  20. प्रवीण, फारच भन्नाट लिहिले आहेस. अहंकार गेल्याचा आनंद मोठाच मानायला हवा. छान.
    -अनिल उपळेकर

    ReplyDelete
  21. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  22. अंदाज

    या अंदाजाचाच'अंदाज' कधी अजिबात येत नाही.असेच काहीसं या दुकानदारा बाबत झालंय.
    आपला अंदाज बरोबर ठरला आहे याचा आनंद जसा असतो तसाच काहीवेळा आपला अंदाज चुकीचा ठरला याचाही आनंद असतोच की.हेच या लेखात जाणवतंय.


    नेहमी प्रमाणेच मस्त जमलेला लेख.

    ReplyDelete
  23. Visualize zale sagale.... Ekdum chan

    ReplyDelete
  24. प्रविण दादा खूप छान लिहिलं आहेस
    डोळ्यासमोर प्रत्यक्षात जणू ते दुकान तो रस्ता सगळ डोळ्या समोर येत

    ReplyDelete
  25. मी ओळखले आहे कुणाबद्दल लिहिले आहेस ते 😁 अगदी अचूक व्यक्तीचित्रण !

    ReplyDelete
  26. वा उत्तम, नेहेमीप्रमाणे च.
    तू कमाल आहेसच.
    - संजीव मेहेंदळे

    ReplyDelete

Post a Comment