इडली, काका आणि मी
वीसेक वर्षांपूर्वी पुण्यात वडापावच्या गाड्यांबरोबर
इडलीचेही स्टॉल्स दिसू लागले होते. वडापावपेक्षा इडली अधिक सात्विक, म्हणूनही असेल
कदाचित पण त्यांचं प्रमाण सदाशिव पेठेत अधिक होतं. तिथलेच हे एक इडली स्टॉलवाले
अस्सल पुणेरी काका.
उंची जेमतेम साडेचार फूट. वय पन्नाशीच्या आसपास पण
शरीरात आणि वागण्यात कुठेही काहीही सैल सुटलेपणा नाही. घोटून दाढी केलेला चौकोनी
चेहरा. त्यावर मोजूनमापून हास्य. गिऱ्हाईकांशी अघळपघळ जवळीकही नाही आणि तुसडेपणाही
नाही. बोलण्याला एक कोकणस्थी धार. स्वच्छ पांढरा पायजमा, हातधुलाईची ताणून
वाळवलेली हाफ बंडी. त्यातून क्वचित डोकावणारं जानवं. खांद्यावर हात पुसायला एक
नॅपकिन. सारं काम चोख टापटिपीचं.
एका जुनाट वाड्यातल्या अर्ध्या खणाच्या टिचभर जागेत
त्यांचा स्टॉल होता. एका वेळी एकच माणूस जाऊ शकेल अशा छोटाशा बोळातून आत जावं
लागे. एकदा आत शिरलं की मनात आणलं तरी परतीची वाट बंद. कारण मागे गिऱ्हाईकं
दाटीवाटीने उभी असत. आत प्रवेश मिळाला की आपण वाड्यातल्या एखाद्या मित्राच्या
माजघरात आलो आहोत असं वाटायचं. त्या लहानशा जागेत सांबाराचा वास आणि इडलीची वाफ
साठून राहिलेली असे. रेडिओवर हलक्या आवाजात हिंदी मराठी गाणी चालू असत. डावीकडे
कडप्प्याचा ओटा आणि त्याला लागून लहानशी मोरी. उजवीकडे अक्षरशः अडीच टेबलं. त्यावर
सहा फूल आणि दोन हाफ अशी आठच माणसं कशीबशी बसू शकायची. काकांकडे काचेच्या डिशेसही
मोजून आठच होत्या.
हा व्यवसाय त्यांनी निवृत्तीनंतर स्वीकारलेला असावा.
ते आधी काय करायचे हे कधी कळलं नाही; पण वृत्ती नोकरीची नव्हती हे खरं.
व्यवहाराला अतिशय पक्के. शिस्त बिनसलेली आजिबात चालायची नाही. संध्याकाळी बरोब्बर
सहा ते आठ ही स्टॉलची वेळ. ‘सहाच्या आधी येणाऱ्यांकडे बघायचं नाही आणि आठ वाजता
गिऱ्हाईकाच्या तोंडावर दरवाजा लावून घ्यायचं.’ हा पुणेरी नियम होता. इडली पार्सल
हवी असेल तर आदल्या दिवशी सांगावं लागे. ‘इथल्या गिऱ्हाईकांचा हिशोब चुकतो माझा’
हे उत्तर तयार असायचं. त्यातून कुणी गिऱ्हाइकानं लाईन चुकवण्यासाठी पार्सल
मागितलंच तर सदाशिव पेठी आवाजात ऐकवत, ‘इथे एक डिश खाल्ली
तरच पार्सल.’ गंमत म्हणजे हा सारा व्यवहारीपणा कधी टोचायचा नाही.
प्रत्येक व्यवसायाचं एक लहानसं गुपित असतं, थोडी चलाखीही
असते. तशी काकांकडेही होतीच. गिऱ्हाईकाच्या डिशमधली इडली संपत आली की ते आग्रहाने
सांबार वाढीत. आणि सांबार संपत आलं की इडली. त्यामुळे गिऱ्हाईक एक काहीतरी अजून
मागतच राही. आपण हरतोय असं वाटलं की चटणीची वाटी पुढे करायचे. हा प्रकार पोट
भरेपर्यंत चालत राहायचा. इडली वाढायची त्यांची लकब मस्त लयदार होती. बोटांच्या
पुढच्या पेरांत नजाकतीने धरलेली इडली, डिशला स्पर्श न करता
अलगद सांबारात सोडायचे. लगेच दूर होत पंचाला बोटं पुसायचे. पण तरी हे अगत्य खोटं
किंवा व्यावसायिक होतं असं कधीच वाटलं नाही.
मी त्या स्टॉलच्या जवळच राहायचो. पण काका कधी कुणाशी
गप्पा मारताना, कुणाकडे जातायेताना दिसायचे नाहीत. त्यांचा स्वभाव मुळचा बोलका असावा.
कारण कधीतरी एकदम मनापासून बोलायला लागायचे. मग ‘गिऱ्हाईकाशी ओळख वाढली तर उधारी
द्यावी लागते’ हे व्यापाराचं मराठी सूत्र आठवून अचानक गप्प व्हायचे. पण तशा उसन्या
घुमेपणाचा त्यांना त्रासच होत असावा. आठ वाजत आले की हे मौन ढिलं पडत जायचं.
अर्थात तरीपण उधारी मागणाऱ्याची भीडभाड ठेवली जायची नाहीच.
एके दिवशी इडली खाऊन निघताना लक्षात आलं; आपल्याकडे सुटे
पैसे नाहीत. आज काका काहीशा वेगळ्या मूडमध्ये होते. दुसरीकडे कुठेतरी बघत ‘असू दे
हो. नेहमी येता तुम्ही’ असं म्हणाले. त्या दिवशी मी इतर गिऱ्हाईकांकडे तुच्छतेचा
कटाक्ष टाकत विजयी मुद्रेनेच त्या बोळातून बाहेर पडलो. दुसऱ्या दिवशी पाहतो तर
वाड्याचा तो भाग रोड वायडिंगसाठी पाडत होते. स्टॉल बंद झाला होता.
काका तेव्हापासून आजपर्यंत परत कधीही दिसले नाहीत.
कुठे असतात माहित नाही.
वीसेक वर्षांपूर्वीची ही साधीशीच गोष्ट पण एक विलक्षण
तुटकेपण देऊन गेली. काहीतरी हरवलंय असं वाटून राहिलं आहे. आपलीही गंमतच असते.
स्टॉल बंद होणार आहे हे आधी समजलं असतं तरी काय जन्माच्या इडल्या खाऊन घेणार होतो
का? पण गोष्ट फक्त इडलीपुरती नाहीच. एखादं आवडलेलं वातावरण आपल्या सिस्टीमचाच
भाग होऊन जातं. नकळत आपली गरज बनतं. तसं काहीसं झालं आहे. अगदी शेवटच्या दिवशी
त्यांचं उधारी न देण्याचं तत्व माझ्याकडून चुकून मोडलं गेलं, त्याचंही वाईट वाटतंय.
एवढं सगळं सांगायचं कारण एकच. तुम्हाला कुणाला ते
काका सध्या कुठे असतात हे कळलं तर कृपया कळवा. त्यांचं नाव आणि तो स्टॉल कुठे होता
हे सांगायची तशी आवश्यकता नाही. तिथली चव, वातावरण ज्यांनी अनुभवलं असेल
त्यांना आपसूक कळेलच. काका भेटलेच तर मी दोन गोष्टी करेन. त्या दिवशीचे राहिलेले
पैसे देईन आणि हळूच त्यांच्या त्या आठ काचेच्या डिशेसपैकी एखादी मागून घेईन.
मला खात्री आहे, माझ्या हातात ती लखलखीत डिश
दिसल्याबरोबर ते इडली आणि सांबार आलटून पालटून वाढत राहतील...
...प्रवीण
जोशी
98505 24221
pravin@pravinjoshi.com
वा.वा..खूपच छान आठवण..
ReplyDeleteअगदी समोर भेटल्यासारख वाटतं 🙏🏻🙏🏻🙏🏻
ReplyDeleteडोळ्या समोर सगळा प्रसंग उभा राहिला
ReplyDeleteन भेटलेल्या काकांबद्दल पुढे कुठे गेले असतील अशी उगाचच कुतूहल जाणवतं
सुंदर आठवण!!
ReplyDeleteAthavanitali gosht chhan mandali aahe
ReplyDeleteखुप निवडक आठवणी!👍👍🙏🙏
ReplyDeleteSurekh varnan
ReplyDeleteWahh. मस्तच प्रविण..👏👏
ReplyDeleteवाचल्यानंतर इडली खावीशी वाटतीय.
ReplyDeleteसदाशिव पेठेत माझे लहानपण गेले.. किती सारी अवलिया माणसे आसपास होती.. आता सगळच कस चकाकत असते.. एकदम पॉश आणि प्रोफेशनल.. मजा च संपली ...
ReplyDeleteते सदाशिव पेठ हौदापाशी असत का?त्यांचं आडनाव दाते.पण आता कुठे असतात माहीत नाही.माझ्या महितीमधले आहेत.
ReplyDeleteApratim athvan .
ReplyDeleteत्या काकांचे नाव श्री चंदू दाते.ते सध्या पानशेत जवळ सूर्य शिबीर नावाचे ठिकाण आहे.तिथे इडली सांबार तयार करून विकतात.लॉक डाऊन मुळे ते हल्ली पुण्यातच डहाणूकर कॉलनी जवळ राहतात.
ReplyDeleteवा ! छान माहिती .
Deleteत्यांचा काही फोन वगैरे आहे का तुमच्याकडे
वाह! मस्त!!
ReplyDeleteइडली काकांची आठवण खूप स्पर्शून गेली. शिवाय आजच्या यांत्रिक जगातला तांत्रिक व्यवहार अशा मानवीय स्पर्शाला पोरका झालाय.
ReplyDelete- श्रीराम हसबनीस
सुंदर लिहले आहे... प्रसाद
ReplyDeleteवा छान..!
ReplyDeleteHi gosht khup Loos Looshit vatali...idli sarakhi
ReplyDeleteफारच छान लिहिले आहेस प्रवीण ! इडली काकांची व्यक्तिरेखा डोळ्यांसमोर उभी राहिली !
ReplyDeleteआठवतात ते काका, त्या इडली चटणी ची चव अजून आठवते, सांबार नको नुसती इडली चटणी द्या म्हणल की परग्रहावरून आलेला माणूस दिसतोय अशा नजरेने पहायचे, आपण न बोलता गपचुप ते घालतील तेवढं सांबार घ्यायचं. दोन मोठी आकर्षण होती त्या गल्लीत, एक श्री उपहार गृह आणी इडली वाले काका.
ReplyDeleteFantastic.
ReplyDeleteउत्तम.. As always.
ReplyDelete- आनंद
चविष्ट लेख !
ReplyDeleteमस्तच......
ReplyDeleteसर्व कसं आत्ताच घडत असल्यासारखे डोळ्यासमोर उभे राहिले.
माझ्या माहितीत महाजन म्हणून एक जण होते ते असेच होते.सारसबागेसमोर त्यांचा स्टॉल असायचा.गेली १२/१५ वर्ष तरी त्यांचा स्टॉल तिथे दिसलाच नाहिये
लेख इडली/ल्या इतकाच चवदार झाला आहे. छान.
ReplyDeleteसुरेख लेख..!
ReplyDelete👌👌
ReplyDeleteखूप छान!
ReplyDeleteहा आमचा पल्याकाका. कधी काेणाशी गप्पा मारायचा नाही पण आमच्याशी नेहमी दिलखुलास आणि मिश्किलपणे बाेलायचा. लाॅकडाऊन मुळे बर्याच दिवसात भेट नाही.
ReplyDeleteशब्दचित्र इतकं प्रभावी आहे की मी जरी हे अनुभवलं नसलं तरीही वाचताना असं वाटलं की मी सुद्धा त्या इडल्यांचा आस्वाद घेतोय आणि त्या काकांना भेटतोय.... फारच छान!
ReplyDeleteतिथे खाल्लेल्या इडली सांबाराची चव तर कधी विसरणं शक्यच नाही पण तिथे खाताना घालवलेला वेळ हा पण कधीच संपू नये असंच वाटायचं... अगदी तंतोतंत वर्णन प्रवीण ... काकांनी हा लेख जरूर वाचला असावा आत्तापर्यंत. त्या सांबाराच्या चवीत काकांच्या चांगुलपणाची एक चव कायम मुरलेली होती हीच तर खरी खासियत होती, एक घरगुती थाट होता, एक शिस्त, घरगुती वातावरण आणि कधीही न संपणारा तो इडल्यांच्या वाफेचा घमघमाट .... आणि विशेष म्हणजे त्यांची कधीही न बदलणारी चव. ते सारं काही परत हवंहवंसं वाटतंय.
ReplyDelete