फुलचोर म्हातारी

एक म्हातारी माझ्या समोरच्या बंगल्याच्या बागेतली फुलं दररोज चोरते. मी वरून पाहात असतो. म्हातारी नित्यकर्म असल्याप्रमाणे हा उद्योग मनोभावे करत असते. पहाटे अंधारात वगैरे नाही तर दिनदहाडे दहा अकरा वाजता. मान थरथरत असणारी, कमरेेतून वाकलेली, तोंडावर सुरकुत्यांचं जाळं असलेली ही सत्तरी ऐंशी सहज पार केलेली म्हातारी. अंगावरचं धडुतं बरं असतं. आजकाल तोंडावर मास्कही असतो. कुठे राहते माहित नाही पण जवळच्याच एखाद्या कामगार वस्तीत राहात असणार. बंगल्यातली माणसं बघतील याची तिला पर्वा नसते. ती माणसंही आता सरावली आहेत. कधीकधी हटकतात. पण म्हातारी आपलं व्रत सोडत नाही. 
मला हे सारं विचित्र वाटतं पण आजवर तिचा राग आलेला नाही. का आला नाही ते नीट सांगता येत नव्हतं. पण एक चांगल्या श्रीमंत घरातली बाई जेव्हा न सांगता कुंपणातून हात घालून भराभरा फुलं तोडताना पाहिली तेव्हा सुक्ष्म फरक लक्षात आला. आणि म्हातारी अचानक कळू लागली. 
आज जरा निरखून पाहिलं. अगदी कुंपणाच्या बांधावर चढून हाताला न येणारी वरची फांदी खाली ओढून ती फुलं तोडण्याचा मजा घेत होती. झाड ओरबाडत नव्हती. झाडाला होणारा स्पर्श मालकीचा नव्हता तरी मायेचा होता. चेहर्‍यावर शेतात काम करणार्‍याचा भाव होता. तो तिला शोभतही होता. तिच्या दृष्टीनं ती चोरी नव्हतीच. झाडावरची फुलं तोडण्यात कसली आलीय चोरी? झाड फुलं देतं आणि आपण ती काढायची असतात. एवढा साधा सरळ हिशोब. झाड कुणाचं हा विषय महत्वाचाच नाही. आता या वयात ही म्हातारी फुलं वेणीत वगैरे माळत नसणार विकतही नसणार. देवपुजेलाच वापरत असणार.
कुंपणाच्या आड असलेल्यांसाठी जी चोरी; ती कुंपणापलीकडच्यांसाठी गरज असते. त्या श्रीमंत घरच्या बाईची होती तशी. चार फुलं तिला महाग नव्हती. आणि म्हणूनच तिचा राग आला. या म्हातारीला गरिबीसाठी अनुकंपा द्यावी तर तिनं गरजेचंही कुंपण ओलांडलं होतं. उरला होता तो केवळ फुलं तोडण्यातला आनंद. तिनं कधीतरी स्वतःच्या किंवा राखणीच्या शेतात तोडणी करताना घेतला असेल. चार फुलांनी तिला तो परत मिळाला तर मिळू दे की. अर्थात हा झाला माझा अंदाज. मातीशी एवढी मिसळलेली ही म्हातरी. तिला चोर का म्हणायचं? 
या माझ्या शहरी उदात्त विचाराला एक किनार मात्र आहे. उद्या हीच म्हातारी माझ्या कुंपणातली फुलं अशाच मायेने तोडताना दिसली तर मी हे लिहू शकेन की नाही...?
शंकाच आहे !



प्रवीण जोशी
९८५०५ २४२२१
pravin@pravinjoshi.com


Comments

Post a Comment