'नसतं' म्हणजे काय 'असतं'?

नाहीये’ हे जगातलं अतिशय अर्थहीन क्रियापद. मला आजवर त्याचा अर्थच कळलेला ‘नाहीये’. 

नाहीये म्हणजे ‘नाही आहे’. अरे आता जर ते ‘नाही’ तर मग ‘आहे’ कसंआहेला आपण कधी नाही म्हणतो कामग नाहीला आहे का म्हणायचंहे नसतं म्हणजे काय असतं?

हा जरा वेडसर विचार असेल. नव्हेआहेच. पण नसण्याला मान्यता देताना आपण ते नसणं असणं करून टाकतो हे मला काही केल्या पटत नाही. म्हणजे एखाद्या डब्यातले तांदूळ संपले तर त्या रिकाम्या डब्याकडे बोट दाखवून ‘तांदूळ नाही आहेत’ असं म्हणायचं. म्हणजे तांदूळांचं अस्तित्व मान्य पण करायचं आणि नाकारायचं पण. दोन्ही एका वेळी कसं असेलमग ही अडचण सोडवण्यासाठी आधी ते तिथे होते या आठवणीशी सगळं बांधून ठेवायचं. आता कुणी ‘तांदूळ कुठे नाहीयेत’ असं विचारलं की आपण त्या डब्याकडे बोट दाखवणार. म्हणजे त्यांच्या आधी असणार्‍या जागेकडे. आणि आता त्याच जागेला तांदूळ नसण्याची जागा म्हणणार. पण प्रत्यक्ष तांदूळाचं नसणं यातून सांगता येतं काछे... गोंधळ आहे सगळा. 

आपल्याला सारं काही आपल्या आयत्या अनुभवांच्या आवाक्यात पाहिजे. आभासी का होईना 'असलंपाहिजे. ‘स्वच्छ शुद्ध केवल नसणं’ हेच आपल्याला मान्य नाही. ‘नसणं’ हे ‘असण्याच्या’ दगडावर घासून पाहिल्याशिवाय त्याची व्याख्याच करता येत नाही आपल्याला. मग अज्ञात गोष्टी अमान्य करणं हेच सोयीस्कर असतं. म्हणजे माहित असलेला अनुभव तिथे ‘नाही आहे’ असं म्हणायला आपण मोकळे. ख्रिसमसच्या आदल्या रात्री लोक ती खेळणी आणि काय काय लपवून ठेवतात. आणि मग दुसर्‍या दिवशी स्वतःलाच फसवून आश्चर्याचा अभिनय करतात. त्यातलंच हे सगळं. 

माझी अडचण हीच आहे. नसण्याचा शोध घ्यायचा म्हटलं तरी ते नसणं ‘असतं’ कसं हे माहित पाहिजे. अरे पण मग ते नसणंनसणं कसं उरणारम्हणजे शोधाचं कारणच संपलं की. पण नाही... शोध तर चालू राहिलाच पाहिजे त्यशिवाय आपल्या ‘असण्याचा’ अहंकार कसा सुखावणारमग घ्यायची हातात एक पेटती मशाल आणि अंधारात शिरून कुठाय तो अंधार असं विचारत सुटायचं. ‘तिथे तांदूळ नाहीयेत‘ इथपासून ‘तो या जगात नाहीये’ इथपर्यंत सगळ्या नव्हत्याचं होतं करायचं. नसण्याचा फुटका भोपळा पाठीला घट्ट बांधून असण्याच्या खोल पाण्यात उतरायचं.

या वेडगळ शोधात कुणी असण्याला जाणीव म्हटलं. नसण्याला नेणीव म्हटलं. कुणी म्हणाले अस्तिक लगेच कुणीतरी म्हणालं नास्तिक. कुणी म्हणाले पापणीआडचं ते सारं असणं आणि पापणीपल्याडचं ते सारं नसणं. कुणी म्हणाले याच्या उलट. असणं नसणं दोन्ही एकाच पातळीवर बघता येण्यासाठी भक्तीपासून अध्यात्मापर्यंत काय काय केलं. शोध अजून चालूच आहे.

पण 'नसणंखरंच असं सापडेल?

नसणं’ कळण्यासाठी कदाचित आपल्यालाही ‘नसावं’ लागेल. आणि इथेच तर खरी गोम आहे महाराजा...!

तोपर्यंत घ्या एक निरर्थक शब्दांची माळ हाती आणि बसा जपत... 

हे ‘नसतं’ म्हणजे ‘असतं’ काय?

 

... प्रवीण जोशी
98505 24221
pravin@pravinjoshi.com

Comments

  1. बौद्धिक पीळ.☺☺☺

    ReplyDelete
  2. मित्रा...तू नेहमी मला पडलेले निरर्थक प्रश्न बऱ्याच वेळा उत्खलन करतोस...जसे काही आपण दोघे एकाच काळात मोहोंजोदारो मध्ये गाडले गेलो आहोत आणि तुला अचानक जाग येऊन तुझ्या हातात एक लेखणी नावाचे धारदार फावडे दिले आहे..आणि हाण सख्या हरी हा संदेश देवून मैदानात सोडले आहे...
    असो...
    नसणे म्हणजे असणे हे कसे याचे साधारण विश्लेषण असे की आता चे नसणे हे कधीतरीचे असणे नक्की असते...
    बस तू पण विचार करत...भेटू एकदा

    ReplyDelete
  3. Know a story from Russian Folk tales - जा कुठे माहित नाही आणि आण काय ठाऊक नाही !! 😊👍🏻त्याची आठवण झाली..

    ReplyDelete
  4. भारीच....हे म्हणजे पुलं.नच्या असामी असामी मधल्यासारख झालं. ' he in the you and I in the you is ,you in the you and I in the you.'

    ReplyDelete
  5. असणं नसणं..?? हे सगळं खोटंय..!! तुलाच कळेल हे प्रविण..!!

    ReplyDelete
  6. असण्या नसण्याचा इतका खोल विचार कधी केलाच नव्हता..आपल्या भाषेची गम्मत वाटते..
    नाही आहे मध्ये सुद्धा एक सकारात्मकता असेल कदाचित!!
    पण इथून पुढे मात्र "नाही आहे" असे म्हणताना जीभ अडखळेल..
    उत्तम विचार, उत्तम लेखन

    ReplyDelete
  7. जाणीव नेणीवेचे हे मंथन खूप छान..!
    विचार करायला उद्युक्त करते आहे

    ReplyDelete
  8. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  9. dokyat gondhal zalay. shevt kartana tumcha gondhal kasa nahizala? kholat jau tevadhe navinach samor yete..... cchan khadya 👌

    ReplyDelete
  10. हे म्हणजे " गाडी रस्त्यावर आडवी उभी केली आहे" च्या धर्तीवरचं झालं

    ReplyDelete
  11. अष्टवक्र म्हणतात, जे आहे वाटते, आणि जे नाही वाटते दोन्ही मिथ्याच ! आपल्या संवेदनांचा खेळ !

    ReplyDelete

Post a Comment