पुलकित करोना

त्या करोनाच्या वर्षी पार्ल्यातली शाळा उघडली तीच मुळी मास्क लावून. ‘बिगरी ते मॅट्रिक’ सगळे वर्ग मास्क लावूनच चालू झाले. आता शाळा मास्क लावून उघडते का बंद होते हे सांगणं जरा कठीण आहे. पण गर्दी कशी टाळावी याचं प्रशिक्षण घेण्यासाठी खूप मुलांनी प्रवेश घेतला होता. ती एका खोलीची शाळा चितळे मास्तरांच्या शब्दात सांगायचं तर नदी फुगावी तशी फुगली होती. अर्थात चितळे मास्तर हे यावेळी मास्तर झालेले नव्हते. शाळेतले विद्यार्थीच होते. जन्मजात मास्तरपण लाभलेले दामले मास्तरच वर्गावर यायचे. तत्कालीन शाळाखात्याने दामले मास्तरांवर विद्यार्थ्यांना शिस्तीबरोबरच मास्क लावण्याचीही सक्‍ती केल्यामुळे आता त्यांचं नाव दामले ‘मास्कर’ असं पडलं होतं. गिरगावातल्या बटाट्याच्या चाळीतूनकोकणातूनपुणेनागपूरअख्ख्या महाराष्ट्रातून मुलं येतच होती. आपापल्या खास तऱ्हेने वागत होती.

पहिल्याच दिवशी वर्गात शिरता शिरता रत्नांग्रीचा अंतू बर्वा म्हणाला, ‘हे सारं चक्रनिक्रमेण होत असतं. घटकाभर धरातुमचा तो करोना शिट्या फुंकून फुंकून सांगतोय ना तसा आला कोविड आणि गेला पांडू गुरवाच्या परसातून. त्या थोट्या पांडूला त्याची लागण होणाराय का? आणि धर हात आणि धू पाण्याखाली या तुमच्या राज्यात थोट्या पांडूला करोना होणार काय आणि कसा?'  यावर बगूनानांनी आपला मास्क वर करून ‘अरे पण अमेरिकेत किती माणसे मेलीऽऽघाल बोटे मोज.’ असं झंप्या दामल्याला विचारलं. पण झंप्या मास्क डोळ्यावर ओढून झोपेत केव्हाच हरवला होता. मग अंतू बर्व्यानेच ‘भारतात करोनाचा अण्णू गोगट्या झाला काय रे’ असं म्हणून विषय झाडूशिवाय झाडून टाकला.  रत्नागिरीहून येताना बगुनानानी एका होमिओपाथी डॉक्टरला ‘करोनाला चालते का हो तुमची होमीपदी? असं विचारून वर, ‘गर्दीचं आणि तुमचं येवढं का हो वाकडं?’ असं कोडं घातलं होतं.

चार फुटी बाकावर झोपलेलाशाळेची स्टेशनरी वापरून नवकविता लिहिणारा नानू सरंजामे या आवाजाने जागा झाला. त्याने घातलेला हिरवा निळा पिवळा लाल जांभळा असा पंचरंगी मास्क पाहूनच करोना पळून गेला असता. तो उठल्याउठल्याच ‘आणि माझ्या मनाचा पारवा नागवा होतो करोनाच्या साक्षीने’ असं काहीतरी बरळला. त्यावर दचकून एकदोघांचे मास्कच गळून पडले. त्यांच्याकडे तुच्छतेने पाहात आपली गुलाम महंमद बक्षीछाप टोपी सावरत ‘मी झोपतो करून करोनाची उशी’ असं म्हणत नानू वर्गातून चालता झाला. बाहेर पडता पडताच त्याची गाठ बबडूशी पडली. बबडू शाळेत यायचा तोच मुळी वर्गाबाहेर उभं राहण्यासाठी. एरवी ऐटीत उभा असणारा बबडू आज रडवेला झाला होता. ‘साला घोसाळकर मास्तरला करोना होऊन तो डाईड झाला. काय फाडफाड इंग्रजी बोलायचा. आता आपण काय शाळेला येणार नाय.’ असं म्हणून तोही निघून गेला. 

त्या दोघांकडे करुणामय केविलवाणा कटाक्ष टाकत आचार्य बाबा बर्वे वर्गात आले. त्यांनी राजापूरी खादी पंचाचा मास्क परिधान केला होता. त्याला ते पंचामृती तोंडझाकणी म्हणत. आणि त्यावर जय जगत्‌ असं लिहिलं होतं. हातात कुठलसं वेदकालीन पुस्तक धरलं होतं. आल्याल्या त्यांनी शांतपणे पहिला बाक स्वच्छ केला. त्यावर आयुर्वेदिक सॅनिटायझर स्प्रे मारला. त्या वासामुळे त्यांच्या शेजारी बसायचं धाडस एरवीही कुणी करत नसे. आता तर एका बाकावर एकच विद्यार्थी अशी पद्धत असल्याने त्यांनी अख्ख्या बाकावर आपलं बस्तान मांडलं. त्यांच्या बरोब्बर मागच्या बाकावर सखाराम गटणे हरवल्यासारखा बसला होता. त्याने दप्तरात सत्तर ऐंशी पुस्तकं कोंबून आणली होती आणि पुस्तकांच्या कव्हरच्या खाकी कागदातून उरलेल्या कागदाचा मास्क बनवला होता. तो नाक सोडून खाली घसरू नये म्हणून चष्म्याच्या काडीला बांधून ठेवला होता. हे सारं सांभाळण्याची त्याची केविलवाणी धडपड पाहून जनोबा रेगे खि खि करून हसायला लागला. त्यावर गटणे उद‍्गारला, ‘प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायू आहे.’ त्याच्या या छापील वाक्यावर बाबा बर्व्यांनी एकवार मागे पाहिलं आणि पुन्हा आपल्या पंचामृतात हरवून गेले.

करोनाची जागृती व्हावी म्हणून एक गाणं संगीतबद्ध करण्याची जबाबदारी शाळेने एच् मंगेशरावांवर टाकली होती. ते पाठीवर पेटी बांधूनच शाळेत आले. पाठोपाठ काशीनाथ नाडकर्ण्यांचा मुलगा हातात नुसताच डग्गा घेऊन आला. ’शाळकर्‍यांनो एकजुटीने उभवूया झेंडे’ हे गाणं त्यांनी मोठ्या मेहनतीने बसवलं होतं. एकाच ओळीत सात आठ राग कोंबल्यामुळे गाण्याची अवस्था करोनासाथीत मुंबई सोडून जाणार्‍या भय्यांच्या बोचक्यासारखी सारखी झाली होती. पण त्यात झेंडेच्या ऐवजी मास्क हा शब्द का बसत नाही अशी शंका रावसाहेबांना पडली. त्यांना मास्क लावून सात मजली हसता येत नव्हतं म्हणून विडीसाठी धरलेल्या हाताचाच ते मास्कसारखा उपयोग करत होते. त्यांना यमक वगैरे भानगडी समजावायला गेलेल्या मंगेशरावांवरच ते भडकले. ‘काय तुमचं नरडं त्ये एरंडेल पडतं तसं बुळबुळी की हो. एखाद्या गुरूगिरूचं पाय धर ती गाणीगिणी नीट बशीव की. उगाच जमत नाही तर उंटाच्या शेपटीच्या बुडख्याचा मुका घेतो म्हटलं... अरे गाण्याचा सोडकरोनाचा तरी कुळधर्म पाळ की.’

बटाट्याच्या चाळीतल्या इतिहासाचार्य बाबूकाका खर्‍यांनी जरीपटक्याचा भगवा मास्क धारण करत दुटांगी धोतर नेसून वर्गात प्रवेश केला. ‘मुखवटा हाच इतिहासाचा खरा चेहरा... पानपतच्या युद्धात...’ असं काहीतरी बोलत, आपला मास्क पेशवेकालीन कसा आहे यावर व्याख्यान द्यायला सुरवात केली. ते ऐकायला हरीतात्यांशिवाय कुणीच थांबलं नाही. हरीतात्यांनी मात्र एक साधा उदबत्यांच्या झोळण्यापासून तयार केलेला मांजरपाटी मास्क लावला होता. बाबूकाकांचं भाषण मध्येच थांबवून ते गरजले, ‘अरे मी घातलाय तोच खरा पेशवेकालीन मास्क. अगदी पुराव्यानं शाबीत करीन.’ पण दोघांच्या भाषणाला उत्तर म्हणून अचानक एक पुढारी उभे राहिले. आणि ‘स्वातंत्र्यपूर्व कालात...’ असं ठरलेलं भाषण लावलं. नुसत्या त्या उच्चारांनीच पेशवेकालीन मास्क कोणता हा वादच मिटून गेला.

अप्पा भिंगार्ड्याला या शाळेत प्रवेश मिळाला नव्हता. त्याची ठ्यांऽऽऊं..शिक अशी भयाकारी पेटंट शिंक लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशीच बटाट्याच्या चाळीत घुमल्यामुळे त्याची रवानगी मूळ गावी करण्यात आली होती. शांता गोळेशामा चित्रेशरयू प्रधान कुणीच मुली शाळेत येत नव्हत्या. बूड न हलवता उभी राहणारीखालचा ओठ पुढे काढून शंकू वाण्याच्या दुकानातल्या पोत्यासारख्या दिसणारी गोदीही लग्न होऊन सासरी गेली होती. एक शष्ठमांश गोरी यमी गोखले सुद्धा शाळेत येत नव्हती. ‘शेवटी नंऽऽ स्पिरिच्युअल हेच खरं’ असं म्हणून केशर मडगावकरही सांताक्रुझच्या गुरूदेवांच्या आश्रमात गेली होती. मग शाळेत जाऊन करायचं तरी काय अशा डिफीकल्टीत पडलेला नाथा कामत गुलाबाच्या वासाचं सॅनिटायझर शोधण्यात गुंतला होता म्हणून तोही शाळेत येत नव्हता. वाटेत भेटलेल्या प्रोफेसर ठिगळ्यांना त्यानं ‘बाबा रे तुझं जग वेगळं माझं जग वेगळं’ असं एकवून परस्पर वाटेला लावलं होतं.

तिकडे राघूनानासुद्धा करोनाच्या आठवणी टिपून ठेवण्यासाठी घरीच थांबले होते. त्यांनी नवीन कोरी डायरी घेतली होती. त्यावर ‘करोना वासरी’ असं नाव घातलं होतं. पण त्यात ‘बाळे करोने...’ याशिवाय काहीच लिहिलं नव्हतं. कोचरेकर मास्तर आणि चितळेमास्तरांना लहानपणापासूनच आपण विद्यार्थी का शिक्षक असा ‘आयडेंटिटी क्रायसिस’ होता. कोचरेकर मास्तरांनी जन्मजात भित्र्या स्वभावाला अनुसरून विद्यार्थी होणंच मान्य केलं आणि शाळेला दांडी मारली. चितळे मास्तर मात्र वर्गाचे मॉनिटर झाले. एक आकडा दाखवतात तशी उजव्या हाताची तर्जनी नाचवत विद्यार्थी आणि शिक्षक या दोन्ही भूमिका एकदम करू लागले.

करोना नेमका लग्नसराईच्या दिवसांमध्ये आल्यामुळे एकही लग्न होऊ शकलं नव्हतं. घरी बसून कंटाळलेला नारायण सायकलवर टांग मारून शाळेत आला. शाळा सोडून ज्युनिअर बीएच्या वर्गात गेलेला मधु मलुष्टे इम्प्रेशन मारण्यासाठी शाळेत आला होता. ’यू नो धीस करोना हॅव बीन हिअर फ्रॉम हाफ अ‍ॅण्ड सिक्स हवर्स यू सी. इथे अजून काय आहेमास्क आहेसॅनिटायजर आहे’ आणिक काही आहे असं म्हणून त्याला तो तिय्या जुळवायचा होता पण तेवढ्यात त्याच्या पाठीवर कुणाचा तरी हात पडला. त्याला वाटलं पापण्यांची पिटपिट पिटपिट करणारी सुबक ठेंगणी असेल पण पाहतो तो उंच शिडशिडीत कुरळ्या केसांचा नंदा प्रधान. आता याच्यासमोर इंग्रजी कसं बोलावं या कोड्यात पडलेला असताना नंदाच हळव्या स्वरात म्हणाला, ’दुसर्‍या महायुद्धात कैक माणसं मरताना पाहिलीत मी. पण धीस इज टू मच. इंदू वेलणकरलाही झाला करोना.’ आणि निळ्या डोळ्यातलं पाणी लपवत तो निघून गेला.

प्रत्येक गोष्टीचा मजा घेणारे काकाजी लॉकडाऊनच्या काळात पान मिळत नाही म्हणून नाराजलेले होते. ’भैय्या काही मजाच नाही येऊन राहिला कशात’ अशी तक्रार बेबीराजांकडे करत होते. शाळेकडे येतायेता नाक्यावरच्या पानवाल्यापाशी घोटाळत होते. तो पानवालाही पट्टीचा नसून गादीचा असल्याने त्याच्या दुकानात एका सुविचाराची भर पडली होती. ‘जोवरी करोना तोवरी डरो ना.’ यातल्या ‘डरो ना’ मध्ये घाबरण्याची विनंती होती. डब्ल्यू एच ओ ने तरी दुसरं काय सांगितलं?

गजा खोतलखू रिसबूडअण्णा वडगावकरउस्मानशेटत्रिलोकेकर शेट सारी प्रतिष्ठीत मंडळी सोशल डिस्टन्सिगच्या काळात दामले मास्तरांचा मार पडणार नाही या आनंदात होती. पण दामले मास्तर चिंचेच्या हिरव्यागार फोकाला सॅनिटायजर लावून शाळेत आले तेव्हा समस्तास अचंबा जाहला. कडमड्याहून आलेले धोंडो भिकाजी जोशी आणि त्यांचे चिरंजीव मास्टर शंकर उर्फ शंकर्‍या एकाच वर्गात होते. ‘अरे हा मास्क डाव्या बाजूचा असेल’ अशी काहीशी शंका धोंडोपंतांनी काढताच शंकर्‍याने त्यांना ‘राँग फादर राँग. मास्कला काय लेफ्ट आणि राईट असतं?’ असं म्हणून बौद्धिक घेतलं.

अशी गर्दी होऊ लागली. मास्कची सक्‍ती असल्याने सारी मुलं एक तर आवाजानेच ओळखू येत होती. नाहीतर मग त्यांच्या पेहरावाने. सारेच जण मध्यमवर्गीय. एखाददुसरे रावसाहेब किंवा काकाजी त्यातल्या त्यात श्रीमंत. बाकी सारे वाड्यातचाळीत किंवा गावाकडे राहणारे. स्वतःचा चेहरा दाखवण्याची हौसच नसलेले. त्यामुळे मास्कची चिंता कुणालाच नव्हती. चिंता होती ती आपल्यामुळे समोरच्याला काही होऊ नये याची. पण कोणी कोणाला बघूच शकत नव्हतं. शाळा उघडून खूप दिवस झाले. भेटी झाल्या तरी मनाच्या गाठी पडल्या नाहीत. एकमेकांचे खरे चेहरे पाहायची आस लागली. असेच काही दिवस गेले. आता ही मुस्कटदाबी  असह्य व्हायला लागलीएका क्षणी सगळ्यांनी मास्क भिरकावून टाकले. आणि सर्वांना धक्का बसला. 

त्या सर्वांचा चेहरा एकसारखाच होता.

पिंगट कुरळे केस. दोन दात थोडेसे पुढे आलेले. मोठं नाक. गुटगुटीत गाल. जाड काड्यांचा चष्मा. डोळ्यात मिष्कीली. ओठांवर हसू. कोणत्याही क्षणी गप्पांची किंवा गाण्याची मैफल सुरू होईल असा अविर्भाव त्या चेहर्‍यावर होता. आपण आरशात पाहतोय का काय असा भास होईपर्यंत सारेजण आपलं नावच विसरले. तेवढ्यात हजेरी सुरू झाली. आणि सर्वांनीच आपलं नाव एका सुरात सांगितलं... ‘पुरूषोत्तम लक्ष्मण देशपांडे.’ त्या एका नावाने करोनाचं भय पळून गेलं. सगळ्यांच्या चेहर्‍यावर पुन्हा बिनमुखवट्याचं हसणं पसरलं आणि शाळा सुरू झाली.

काही काळ थांबलेलं जग त्या पुलकित हास्यानं पुन्हा मार्गी लागलं...


... प्रवीण जोशी
98505 24221
pravin@pravinjoshi.com

 


Comments

  1. वा... शेवट एकदम मस्त...

    ReplyDelete
  2. एकदम झकास ,,,,,, रोंघे

    ReplyDelete
  3. दामले मास्कर.....😀😀👌

    ReplyDelete
  4. खूपच छान
    शेवट एकदम मस्त अनपेक्षित

    ReplyDelete
  5. खरोखरीचा हॅप्पी पीएल बर्थडे

    ReplyDelete
  6. खूप छान लिहिलंयस प्रवीण👌👌

    ReplyDelete
  7. दामले मास्कर भारी😀

    ReplyDelete
  8. Apratim.Sagli characters dolya samor ubhi rahili.

    ReplyDelete
  9. अप्रतिम प्रवीण🙏🌹😍👌❤️

    ReplyDelete
  10. खूप सुंदर

    ReplyDelete
  11. वा... फारच छान....
    लहानपणी वाचलेल्या पु लं च्या सर्व व्यक्तिरेखा अगदी जशाच्या तशाच डोळ्यांसमोर उभ्या राहिल्या! शेवटही अप्रतिम.

    ReplyDelete

Post a Comment