सस्पेन्स अकाऊंट

मी काही डायरी लिहिणारा प्राणी नाही. डायरी लिहिणे म्हणजे मेंदूचा बॅकअप काढून ठेवणे. पण त्यासाठी सकाळपासून काय काय केलं ते आठवून तटस्थपणे लिहिणं वगैरे अपने बस की बात नही. माझ्या मेमरीला ते झेपत नाही. म्हणूनच मागील पानावरून पुढे चालू वगैरे काही नाही. दररोज नवीन पान नवीन मजकूर!

तरीपण...

कधीकधी आपलाच एखादा जुना फोटो सापडावा पण तो कुठे, कुणी, का, कधी काढला हे काही केल्या आठवू नये तशी अवस्था होते. एखादी संदर्भहीन घटना, प्रसंग उगाचच टोचत राहतो. बरं तोही काही संपूर्णपणे यथासांग डिटेल्समध्ये नाही. एखादंच दृष्य किंवा शब्द. या आठवण्याला, ‘स्मरणाचा’ दर्जा नसतो. सुटे सुटे तुटके सीन्स. फार काही किंमत देण्याएवढे ते महत्वाचेच नसतात. तरी पण डोक्यातून वजा होत नाहीत. उलट धूसरपणे येऊन ठळकपणे छळत राहतात. स्मरण आणि विस्मरणाच्या काठावरची ही ‘धुस्मरणे’. त्यांचा त्रास म्हटला तर काहीच नाही, करून घेतला तर खूप. मनाच्या खातेवहीत मी त्यांची नोंद 'सस्पेन्स अकाऊंट'मध्ये करतो.

अंधूक आठवणींनासुद्धा सत्याचा काहीतरी आधार असतो. काही धागेदोरे सापडतात. पण हे मेमरीस्नॅप्स त्याहीपेक्षा धूसर आहेत. लिहून काढले तर ते खरवडून तरी निघतील किंवा त्यांचा शोध तरी लागेल म्हणून लिहितोय. पण काही हिंटच लागत नाही. पर्सनल असल्याने सांगायला ऑकवर्ड होतंय पण मला माहित्येय की तुमचेसुद्धा असे सस्पेन्स अकाऊंटस् असणारच.

उदा. खूप लहानपणी वाड्यात राहात असताना आमच्या खोलीच्या शेजारच्या लहानशा जागेत मी आजोबांच्या शेजारी बसलोय. (या प्रसंगाला खरंच काहीही अर्थ नाही, ना त्यातून काही तात्पर्य निघत)

कॉलेजमध्ये फिजिक्स लॅबबाहेर मी कुणाला तरी कसली तरी रिसीट दिली होती आणि ती हरवली. (त्यानं काय अडलं कोण जाणे)

शनिवारवाड्यावर झालेली इंदिरा गांधींची सभा आठवते. (खरं खोटं माहित नाही)

कुठल्यातरी एका मित्राबरोबर अनंतचतुर्दशीला अचानक सिनेमाला गेलो होतो. (मित्र कोण? सिनेमा कुठला?)

कुठेतरी सुतारकाम चालू असताना मी नुसताच बसलोय, कपाट का काहीतरी बनताना पाहतोय. (??)

एका परिक्षेचं वातावरण तर नुसतं रखरखीत हवा आणि टेन्शन म्हणूनच आठवतं. (पेपर कुठला, कधीचा वगैरे डिटेल्स गायब.)

ग्रहण बघायला पर्वतीवर गेलो एवढंच. (का पण?)

आजोळी सगळे मामा पत्ते खेळायला बसले आहेत पलीकडे भजन चालू आहे (हे कधी घडलं असेल?)

एक ना दोन अनेक घटना....

आता त्या खऱ्या घडल्या की नाहीत, तो भास होता का स्वप्न होतं? का माझा मेंदू ऐकीव माहितीवरून फिल्म तयार करून ती खरी आहे असं वाटेपर्यंत मलाच पुन्हा पुन्हा दाखवतोय? काही वेळा त्या फिल्ममध्ये मीच मला दिसतो. असं कसं होईल? किंवा कदाचित सबकॉन्शस गोडाऊनमधला माल संपवण्यासाठी एका घटनेची सुरवात, दुसरीचं शेपूट असं करून कोलाज तयार केला असेल. किंवा जे जे करावसं वाटतं ते आपण ऑलरेडी केलंय असं आपण मेंदूला सांगितलंय; त्यानंही तशी एन्ट्री करून टाकलीय वर आपल्यालाच गंडवतोय. आणि खरं काय खोटं काय याचा आपलाच गोंधळ झालाय....

हळुहळू माझा माझ्यावरचाच विश्र्वास उडायला लागलाय. या तुकड्यांची संख्या वाढली की त्रास व्हायला लागतो. शेवटी आपल्याला कुठे आलो या पेक्षाही कुठून आलो कसे आलो याचंच कौतुक फार. म्हणून हा आपलाच सो-कॉल्ड भूतकाळ टाकून देता येत नाही. पण आठवून करणार तरी काय? मग हा त्रास नेमका कसला? मेमरीचा इगो दुखावला म्हणून? आठवणींची सुसूत्रता हरवली म्हणूनपण ती तरी का हवी असते?

सस्पेन्स अकाऊंटपेक्षा जास्त सस्पेन्स या प्रश्र्नांमध्येच आहे.

छे... डायरी लिहायलाच पाहिजे!

... प्रवीण जोशी
98505 24221
pravin@pravinjoshi.com

Comments

  1. खरंच लिहा अन् काय... आम्हाला आवडेल वाचायला..!!

    ReplyDelete
  2. खूप आठवणी जाग्या झाल्या! पण एक नक्की सांगतो एकदा लिहायला सुरुवात केली की सगळे सगळे नी.... ट आठवते. हाउद्या सूरवात!💚💚

    ReplyDelete
  3. Tu lihilele vachtana asakhya prasanga manat dokavtat
    Pan tyana shabdanche pankha tuch lavu saktos
    Tu asach lihit Raha aamchyasarkhe te anubhavtil

    ReplyDelete
  4. पाठवत राहा, छान चाललं आहे

    ReplyDelete
  5. वा फारच छान लिहिलंय. "धुस्मारण" - मस्त शब्द!
    माझ्याही मनातली धुस्मरण जागी झाली.

    ReplyDelete
  6. वा प्रवीण!नेहमीप्रमाणेच छान लिहिलंयस.

    ReplyDelete
  7. प्रविण..छान लिहितोस ..पेक्षा सगळ्यांच्या मनातलं लिहितोस...मला नेहमी वाटतं की असे स्मृती भ्रंशाचे तुकडे मलाच छळतात..पण आता ध्यानी आलं की ते बाकीच्यांच्या कापली पण असतात...हुश्श..

    ReplyDelete
  8. धूसर स्मरण म्हणजे धुस्मरण..फार सुंदर शब्द बनवलाय तुम्ही.
    ब्लॉग चं शीर्षक देखील मला फार आवडलं.

    ReplyDelete

Post a Comment