आतल्या, आऊट्या आणि मी
(हे
सगळं मी त्या दोघांना कळू न देता चोरून लिहितोय...)
एकाचं नाव आतल्या आणि
दुसऱ्याचं आऊट्या. दोघांचं आजिबात पटत नाही. दोघंही हंड्रेड परसेंट बेभरवशी, नाटकी,
अन् खोडकर. फुल्ल टॉम अँड जेरी. मला
अजूनही या दोघांचा अंदाज आलेला नाही. पण संशय असा आहे की दोघं आतून कनेक्टेड असतात
आणि मला गिऱ्हाईक बनवतात.
म्हणजे बघा...
'रंग
ओला आहे' अशी पाटी वाचल्यावर ओल्या रंगाला हळूचकन् बोट लावून
बघायची आतल्याला जोरदार खाज येते. तो आऊट्याला गंडवून रंगाला बोट लावायला सांगतो
आणि स्वतः गायब होतो. पुढच्या क्षणाला मी मात्र ते रंगानं माखलेलं चिकट बोट घेऊन
येडबंबूसारखा चारचौघांच्या नजरा चुकवत उभा असतो. मला आऊट्याचं हसू येतं अन्
आतल्याच्या राग. आतल्या लहान मुलगा. आऊट्या गंभीर. मी
कायम काठावर.
आम्ही तिघं कधीकधी
सिनेमाला जातो. अंधारात आऊट्याला अनोळखी मऊ स्पर्श होतो. तो आतल्याला डोळा मारतो.
मग आतल्या जाम चिडतो. डायरेक्ट आऊट्याचे संस्कार बिंस्कार काढतो. दोघांच्या
भांडणात मी आपला अंधारात अंग चोरून बसलेला. आतल्या रंगेल.
आऊट्या संधीसाधू. मी कायम बावरलेला.
पूर्वी शाळेची परिक्षा
आली की दोघांच्या अंगातच यायचं. आतल्या म्हणायचा अभ्यास करू. आऊट्या म्हणायचा
टाईमपास करू. आतल्या म्हणायचा कॉपी करू, लगेच मग आऊट्या म्हणायचा
आता कुठे गेले संस्कार? मधल्यामध्ये मला मार्क कमी पडायचे. आतल्या चतूर. आऊट्या नामानिराळा. मी कायम येडपट.
रस्त्यात भांडण
मारामारी वगैरे चालू असताना जाम गोंधळ होतो. आतल्या म्हणतो मध्ये पड. आऊट्या
म्हणतो इथून पळ. मी आपला खोखोच्या गड्यासारखा दिड तंगडीवर बसलेला.आतल्या शूर.
आऊट्या धूर्त. मी कायम धीट भित्रा.
खर्च करताना आतल्याचा
हात उधळा, आऊट्याचे हात पिशव्या उचलण्यात गुंतलेले. मधल्यामध्ये माझं
पाकिट रिकामं. आतल्या हा, आऊट्या
तो. मी कायम अधांतरी. मी काय करायचं कुणीच सांगत नाही.
खरं म्हणजे मला ते दोघं विचारतंच नाहीत. त्यांचं त्यांचंच काहीतरी चालू असतं. मी
त्यांना खेळातला भोज्जा म्हणून हवा असतो.
पण आता बाssस !
लई ऐकून घेतलं. मला कायम टेकन फॉर ग्रँटेड घेतात दोघं. माझं ठरलंय. मी दोघांची बरोब्बर करणार आहे. परत माझं गिऱ्हाईक करायची हिंमत नाही
होणार. पण त्यासाठी आतल्याला मदतीला घ्यायचं का
आऊट्याला एवढंच ठरत नाहीये. ठरलं की सांगतो...
(ता.क.
- हे सगळं आतल्यानं सांगितलंय आणि आऊट्यानं माझ्याकडून लिहून घेतलंय. आता तुमचा 'आऊट्या' वाचेल, 'आतल्या'
मत सांगेल. तुम्ही कोणाचं ऐकणार?)
मस्त रे!हे म्हटल्या बद्दल आतल्या पार्टी देईल, औट्या बील भरेल. बघ,जमल्यास तू पण ये
ReplyDeleteमस्त मजा आली ! खरंच कायम हा खेळ चालूच असतो .
ReplyDeleteAs usual Best
ReplyDeleteमी या दोघांना चांगलाच ओळखतो..!!
ReplyDeleteवा,. मस्त कन्सेप्ट, सुंदर कल्पना - आतल्या आणि आऊट्या.. प्रत्येकात दडलेला असतो. छान बाहेर काढला त्याला. मजा आली.
ReplyDeleteवा... मस्त कन्सेप्ट, सुंदर कल्पना... आतल्या आणि आऊटया... प्रत्येकात दडलेला.... छान बाहेर काढला त्याला.
ReplyDeleteतसं बघायला गेलं तर ते दोघेही बाराचे च मात्र मधल्यामध्ये आपलं भिजलेलं मांजर होतं... भारीच लिहिलयस. मस्तच.. लिहित रहा असाच...
ReplyDeleteहा हा हा हा आउट्या आणि आतल्या नावापासूनच अतरंगी आहेत. आतल्या म्हणतोय लिही चावट कमेंट आतल्या नाही म्हणतोय. बेष्ट चाललंय👍
ReplyDeleteअप्रतिम, मी आधी कसं वाचलं नाही☺️
ReplyDeleteI , me and myself...एक होता अट्टू , एक होता गट्टू आणि एक होतो मी .. अशी सुरुवात करून एक गोष्ट मी माझ्या मुलांना साधारण ३०/३५ वर्षांपूर्वी सांगत असे..ती मी कुठे वाचली होती ते आठवत नाही..त्यात भर घालून मी ती वाढवत असे..अट्टू लागला हसायला , गट्टू लागला हसायला..मी लागलो रडायला..त्या दोघांना सगळंच यायचं आणि मला काहीच येत नाही , या विचाराने मुलांना मज्जा वाटायची.त्या गोष्टींची आठवण झाली.
ReplyDeleteरोहिणी गोखले