पुण्यनगरी...

पुणे हा जगाच्या पाठीवरचा एक अद् भूत त्रिकोणी भूप्रदेश आहे. मुठा नदी, टिळक रस्ता आणि बाजीराव रस्ता या त्याच्या तीन सीमा आहेत.

(बर्म्यूडा ट्रँगलने उगाच माज करू नये, त्या पापत्रिकोणात सर्व हरवते आणि या पूण्यत्रिकोणात हवे ते गवसते) शनिवार, सदाशिव आणि नारायण असे तीन स्वर्ग येथे नांदतात

दुपारी १ ते ४ या वेळात दुकानेच काय, वैकुंठ स्मशानभूमीही बंद असल्यास आम्हाला नवल वाटत नाही. कारण इथले 'यम'नियमही स्वतंत्र आहेत.

वैशालीची इडली, गुड्लकचा बनमस्का नुकतीच अस्तंगत झालेली अप्पाची खिचडी, बेडेकरांची, रामनाथची अथवा श्रीकृष्णची मिसळ यापेक्षा जगात काही खाण्यालायक चवी असू शकतात यावर पुणेकरांचा विश्वास नाही. अशा क्षुधाशांतीगृहांचा आम्हाला मनापासून आदर आणि अभिमान आहे. म्हणूनच आम्ही चहाच्या दुकानालाही टपरी असे न म्हणता 'अमृततूल्य' असे संबोधतो.

पुणे-मुंबई रस्त्याला मुंबई-पुणे रस्ता असे म्हणत नाहीत. कारण मानाच्या शहराचे नाव आधी घेण्याची पद्धत आहे.

येथे कोणाच्याही चुका काढून मिळतात (विनामूल्य नव्हे तर चुका करणाऱ्याचा अपमान करून) उदा. - गुगलवर मराठी टाईप करताना अद् भूत हा शब्द अद् आणि भूतच्यामध्ये स्पेस न टाकता लिहिता येत नाही. (जिज्ञासूंनी खात्री करून पहावी) त्यामूळे गुगल हे पुण्यात क्षूद्र मानले जाते. गुगलपेक्षाही अधिक ज्ञानवंत माणसे पुण्यात गल्लोगल्ली सापडतात.
पुण्याच्या त्रिसीमा ओलांडून आत येताना त्यांच्याकडून अपमान सहन करण्याची तयारी ठेवली काय आणि नाही ठेवली काय, फरक पडत नाही कारण अपमान तुम्हाला विचारून होतच नाही. आपला अपमान झाला यातच धन्यता मानून आपल्या गावी परत जावे.

तरीही आजकाल, 'गणपती बघायला आले आणि इथेच राहिले' या तत्त्वावर घुसलेली आणि मूळ पुण्यवासियांच्या उपकारांवर जगणारी माणसे स्वतःला पुणेकर म्हणवतात. परंतू त्यांच्यात आणि अस्सल पुणेकरांत, चितळ्यांची बाकरवडी आणि काका हलवाईची बाकरवडी एवढा फरक असतो.
असे तोतया पुणेकर ओळखण्यासाठी त्यांना खालील प्रश्नपत्रिका सोडवायला द्यावी -

एका वाक्यात उत्तरे द्या -
१. मानाच्या ५ गणपतींची नावे आणि क्रम काय ?
२. अप्पा बळवंतांचे आडनाव काय ?
३. श आणि ष असलेले प्रत्येकी किमान ५ शब्द सांगा

खालील विषयांवर निबंध लिहा -
१. पुण्यनगरीचा सरकता प्रेमबिंदू - सारसबाग ते Z ब्रीज
२. जागतिक रंगभूमीचा आधार - अर्थात, पुरुषोत्तम करंडक.

सविस्तर उत्तरे द्या -
१. सवाई गंधर्वात तिकीट न काढता कसे घुसावे ? (२ युक्त्या सांगा)
२. मस्तानी आणि मिल्कशेक विथ आईस्क्रीम यातील नेमका फरक सांगा
३. पत्र्या, जिलब्या, भांग्या, डुल्या, सोन्या, खुन्या ही देवांची नावे कशी निर्माण झाली ?

हिंमत असल्यास पुढील मुद्दे खोडून दाखवा. -
१. पर्वती ही जगातील सर्वात उंच टेकडी आहे
२. तुळशीबागेमध्ये अमेझॉनपेक्षा जास्त विक्री होते
३. पुण्यात गाडी चालवता येणं हे सूपर नॅचरल स्कील असून ते जन्मतःच यावं लागतं. RTO ही अंधश्रध्दा आहे
४. टिळक टँकची खोली अरबी समुद्रापेक्षा जास्त आहे.

योग्य पर्याय निवडून गाळलेल्या जागा भरा - (अर्थात सर्व पर्याय बरोबरच आहेत) -
१. पुणेकर ..... असतात
(चोखंदळ / रसिक / ज्ञानी / विचारवंत)
२. कोणत्याही विषयावर चर्चा हे इथले ...... आहे
(व्यवच्छेदक लक्षण / आद्यकर्तव्य / मूख्य काम / वेळ घालवायचे साधन )
३. फर्ग्यूसन रस्त्यावर ..... आढळते
(ज्ञान / सौंदर्य / चव / सर्व काही)
४. एस् पी कॉलेज चा फूल फॉर्म ..... असा आहे.
(सूंदर पोरींचे / सपक पोरांचे / सनातन प्रकृतीचे / सर परशुराम)

अर्थात ही केवळ लिटमस टेस्ट आहे.
पुण्यात शिरण्याची पळवाट नाही. पुणेकर म्हणवणे हे यूएस् चा व्हिजा मिळवण्याएवढे सोपे नाही हे लक्षात ठेवावे.
यातील एकाही प्रश्नाचे उत्तर चुकले आणि १०० पेक्षा कमी गुण मिळाले तर तो गृहस्थ अपमानित होण्याच्याही लायकीचा नाही असे समजावे आणि भूतदया दाखवून त्याला वेशीबाहेर सोडून द्यावे.


... प्रवीण जोशी
98505 24221
pravin@pravinjoshi.com

(लेखकाचे नाव न बदलून अथवा न वगळून फॉरवर्ड करतात तेच खरे पुणेकर)

Comments

Post a Comment