बाकी काऽऽही नाही.

चार वर्ष झाली त्याला जाऊन...

मागे काय उरलं?

.....

रारंगढांग’ नावाच्या कादंबरीत एक प्रश्न विचारलाय, ‘आदमी मर जाता है, तब उसका क्या रह जाता है?’ मागे काय उरतं या प्रश्नानं जखम चिघळते. मी उत्तराचा विचार करत जातो तसतसा अधिकच निरुत्तर होत जातो.

लहानपणी दिवाळीत फुलबाजी पेटवून गोल गोल फिरवत प्रकाशाची वर्तुळं तयार करायचो. फुलबाजीच्या झगमगीत प्रकाशापेक्षा ती आभासी वर्तुळं खरी वाटायची. आपली वाटायची. फुलबाजी विझली की लग्गेच डोळे मिटून घ्यायचो. मग पापण्यांआड बुब्बुळांसमोर निळी जांभळी वर्तुुळं कितीतरी वेळ गरागरा फिरत राहायची. हळुहळू विरून जायची. फुलबाजी अचानक विझण्याचं दुःख हे असं सावकाश लय पावायचं. पण काळी पडलेली फुलबाजीची तार फेकून देताना एक प्रश्न सतावायचाच, उघड्या डोळ्यांनी पाहिला तो झगमगीत प्रकाश आणि ही मिटल्या पापण्यांमागची भिरभिरणारी वर्तुळं यातलं अधिक खरं काय? मागे काय उरतं?

एक गार तार... बाकी काऽऽही नाही...

.....

आपण रांगेत उभे असतो. मागचापुढचा कुणीतरी, ‘माझा नंबर धरा, मी येतोच’ असं म्हणून निघून जातो. आपण नेमकं काय धरलेलं असतंएक रिकामी जागाका तो कधीतरी येणार ही आशा? तो परत येतच नाही. रांग पावलं फरफटत पुढे सरकते. मागे काय उरतं?

एक अटळ लय... बाकी काऽऽही नाही...

.....

टायटॅनिकमधला बोट पूर्ण बुडण्यापुर्वीचा सीन. एक टोक उंच आकाशात उचललं गेलेलं आणि दुसरं वेगाने समुद्रतळाकडे चाललेलं अशा अधांतरी अवस्थेत क्षणभर विसावून आयुष्याला खिजवणारी ती महाकाय बोट. आकांत आणि निराशेनी भरलेली. कुणी प्रार्थना म्हणतंय, कुणी शेवटचं म्हणून वाद्य वाजवतंय. कुणी प्रेमाचा आधार शोधतंय, कुणी खाली कोसळण्याच्या अंतिम अवस्थेत, तर त्यालाच आधार करून दुसरा कुणी लोंबकळतोय. बुडत्या बोटीतच आधार शोधायची ही केविलवाणी हास्यास्पद धडपड कुणी डोळे विस्फारून पाहतोय तर कुणी डोळे मिटून आतल्या अथांगाचा ठाव शोधू जातोय. प्रत्येकाला एकच करायचंय. हा क्षण टाळायचाय. जणू या क्षणानंतर अमरता लाभणार आहे. 

प्रेम, द्वेष, माया, श्रद्धा, देव, धर्म, पाप, पुण्य, तत्त्व, सत्त्व, लोभ, मोह, नीती, अनीती, मैत्र, नाती, सुंदर, असुंदर... जी हाती लागेल ती फांदी धरून ठेऊन या प्रचंड निसरडया उतारावर मागे उरायचंय. रोरावत वाहून जाणार्‍या जीवनानंतरही मागे उरतं ते काय?

जन्मजात लामलेलं मरणाचं भय... बाकी काऽऽही नाही...

.....


आज चार वर्ष झाली त्याला जाऊन. पण अजूनही कधी कधी भास होतात. त्याला भेटल्याचे, स्पर्श केल्याचे, त्याच्याशी बोलल्याचे. डोळे उघडून भानावर आल्यावर भास होता हे कळतं. तेवढ्यापुरताच क्षणिक आनंद. पण तोही टिकवून ठेवता येत नाही. सत्यबित्य सोडाच, आपले भासही आपल्या हातात नाहीत. रडू का येतं याची कबुली मात्र स्वार्थी अंतर्मन देत राहतं, ‘कौन रोता है किसी और की खातीर ए दोस्त... सबको अपनीही किसी बात पे रोना आया’. पण या उत्तरानं तरी समाधान होतं का
भिरभिरता प्रश्न येतोच, मागे काय उरलं?

काही रिकामे शब्द... आणि एक संपूर्ण आयुष्य...
बाकी काऽऽही नाही.

 

... प्रवीण जोशी
98505 24221
pravin@pravinjoshi.com

Comments

  1. पण हे सगळं वाचून मागे काय उरलं म्हणाल तर हुरहूर लावून जाणारं खूप दिवसांनी वाचल्याचं समाधान!!!!!

    ReplyDelete
  2. फारच पटलं। प्रवीण,सुंदर

    ReplyDelete
  3. व्वा.... उत्तम...!!!

    ReplyDelete
  4. वा....अप्रतिम! 👌👌👌
    एक से बढकर एक प्रतिकात्मक उदाहरणं....पेटून विझलेल्या फुलबाजीपासून.... टायटॅनिक मधील जीवघेण्या प्रसंगापर्यंत.......वाचून मागे काय उरलं? .....
    सुन्न करणारं विचारांच काहूर!
    बाकी काही नाही....👍👍👍 😊

    ReplyDelete
  5. व्वा! काही नाही हेच खरं. काम राहू शकतं. पण तेही सापेक्षच आहे.

    ReplyDelete

Post a Comment